एकनाथ शिंदे बंड : ठाकरे सरकारचं भवितव्य आता नरहरी झिरवळांच्या हाती

फोटो स्रोत, Twitter
एकनाथ शिंदे यांच्या गटानं 34 आमदारांच्या सहीचं एक पत्र विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांना लिहिलं आहे. त्यात एकनाथ शिंदे यांना गटनेता तर भरत गोगावले यांना प्रतोद म्हणून नेमण्याची शिफारस करण्यात आली आहे.
पण असं कुठलंही पत्र आपल्याला प्राप्त झालेलं नसल्याचं झिरवळ यांनी सांगितलं आहे. गुरुवारी सकाळी झिरवळ यांनी एक पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी वेगवेगळ्या मुद्द्यांवर भाष्य केलं आहे.
तसंच या कथित पत्रात बाळापूरचे आमदार नितीन देशमुख यांनी त्यांची सही खोटी असल्याचं कळवलं आहे. त्यांची सही ते इंग्रजीत करतात पण या पत्रात मात्र त्यांची सही मराठीत अल्यातं त्यांनी कळवल्याचं झिरवळ यांनी पत्रकारांना सांगितलं आहे.
त्याचवेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं अजय चौधरी यांना गटनेता आणि सुनील प्रभू यांना प्रतोद म्हणून नेमण्याचं पत्र मिळाल्याचं त्यांनी स्पष्ट करत त्यांनी त्यांची नियुक्ती केल्याचं सांगितलं आहे. गटनेता पक्ष प्रमुख नेमतो आणि गटनेता प्रतोदाची नियुक्ती करतो असं कायद्यानुसार आहे असंही त्यांनी म्हटलं आहे.

तुम्ही शिवसेनेच्या दोन तृतियांश आमादारांचं पत्र आलं तर त्यांना वेगळा गट म्हणून मान्यता द्याल का, असा सवाल विचारल्यावर त्यांनी मी अभ्यास करून निर्णय घेईल असं सांगितलं आहे. तसंच या दोन तृतीआंश आमदारांमध्ये अपक्ष आमदांना धरलं जाणार नाही असंही त्यांनी सांगितलं आहे.
मग प्रश्न उतरतो ते आता नरहरी झिरवळ नेमकं काय काय करू शकतात...
सध्या सुरू असलेल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांची भूमिका महत्त्वाची ठरते. नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आणि ते महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बनले. त्यानंतर हे पद रिक्तच आहे.
परिणामी विधानसभेचे कामकाज उपाध्यक्ष नरहरी झिरवळ पाहतात. अध्यक्षांच्या अनुपस्थितीत सर्व कामकाज आणि प्रशासकीय जबाबदाऱ्या उपाध्यक्षांना निभावाव्या लागतात. त्यामुळेच त्यांची भूमिका यावेळी महत्त्वाची ठरते.
नरहरी झिरवळ यांची भूमिका का महत्त्वाची?
बीबीसी मराठीनं याबाबत राज्यशास्त्राचे आणि संविधानाचे अभ्यासक अशोक चौसाळकर यांच्याशी संवाद साधला. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार...
- जर एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या गटाला वेगळी मान्यता देण्याचा अर्ज केला तर तो विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे जाईल. या अर्जावर झिरवळ यांना निर्णय घ्यावा लागेल.
- झिरवळ यांनी जर का या गटाला मान्यता दिली तर सरकार पडू शकतं. कारण एकनाथ शिंदेंचा गट त्यांच्या पक्षाच्या सरकारच्या विरोधात गेले आहेत.
- जर झिरवळ यांनी एकनाथ शिंदेंच्या गटाला मान्यता दिली नाही तर प्रकरण कोर्टात जाण्याची शक्यता आहे.
- जर उद्धव ठाकरे सरकारविरोधात अविश्वास ठराव आला तर तो त्याचं संचलन करण्याची जबाबदारी झिरवळ यांच्यावर येईल. त्यावेळीसुद्धा त्यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.
- पाकिस्तानात नॅशनल असेंब्लिच्या अध्यक्षांनी इम्रान खान सरकारविरोधात अविश्वास ठरावच फेटाळून लवला होता. त्याची आठवण चौसाळकर करून देतात.
- महत्त्वाची गोष्ट इथं लक्षात घेतली पाहिजे ती म्हणजे नरहरी झिरवळ हे विधानसभेचे उपाध्यक्ष होणयाआधी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत. ज्या राष्ट्रवादीनं अजून या सगळ्या घडामोडींवर स्पष्ट भूमिका घेतलेली नाही. त्यांचे पत्ते अजूनही गुलदस्त्यातच आहेत.
नरहरी झिरवळ कोण आहेत?
नरहरी झिरवळ हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी येथील आमदार आहेत. त्यांची उपाध्यपदी बिनविरोध निवड करण्यात आली होती. वंचितांसाठी काम करणारे नेते अशी झिरवळांची ओळख आहे.
झिरवळ हे अतिशय साधे आणि नम्र असल्याचे त्यांना ओळखणारे लोक सांगतात. त्यांचे घर देखील खूप साधे आहे. आदिवासी भागातील 'गण' या एककापासून त्यांचा राजकीय प्रवास सुरू झाला आहे, असं बीबीसीचे सहकारी पत्रकार प्रवीण ठाकरे सांगतात.
झिरवळ हे शरद पवारांचे निकटवर्तीय आहेत आणि थेट लोकांच्या संपर्कात असलेल्या नेत्यांपैकी एक आहेत. आदिवासी समुदायातील लोकांसाठी झटणारे नेते अशी त्यांची ओळख आहे, असं ठाकरे सांगतात.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








