उद्धव ठाकरे म्हणतात त्याप्रमाणे खरंच आज शिवसेनेचा पंतप्रधान असता का?

बाळासाहेब ठाकरे

फोटो स्रोत, DOUG CURRAN/getty

    • Author, प्राजक्ता पोळ
    • Role, बीबीसी मराठीसाठी

बाबरी मशिदीच्या घटनेनंतर देशभरात शिवसेनेची लाट होती. जर तेव्हा शिवसेनेनी ठरवलं असतं तर शिवसेनेचा आज पंतप्रधान असता असं वक्तव्य काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनी केले.

या त्यांच्या वक्तव्यानंतर भाजप आणि शिवसेनेमध्ये खडाजंगी पाहायला मिळत आहे. पण खरंच उद्धव ठाकरे म्हणतात त्याप्रमाणे शिवसेनेचा आज पंतप्रधान होऊ शकला असता का या गोष्टीचा शोध घेण्याचा प्रयत्न या लेखातून करण्यात आला आहे.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या 96 व्या जन्मदिनी उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांशी संवाद साधला.

"बाबरी पाडली त्यावेळेला हे सगळे पळाले होते नव्या हिंदुत्ववाद्यांकडून नवी पिढी आली बाबरी शिवसैनिकांनी पाडली असेल तर मला त्यांचा अभिमान आहे. असं बाळासाहेब म्हणाले."

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सप्टेंबर मध्येत्यांच्यावर झालेल्या शस्त्रक्रियेनंतर पहिल्यांदाच बोलत होते.

संभाषणादरम्यान, उद्धव ठाकरे यांनी बाबरीच्या पतनानंतरचा काळ अधोरेखित केला.

त्याचबरोबर शिवसेना 25 वर्षं युतीत सडली. आपण भाजपला पोसलं याचाही त्यांनी पुर्नउच्चार केला. पण बाबरी पाडली तेव्हाची परिस्थिती काय होती? उध्दव ठाकरेंनी आता त्याचा पुर्नउच्चार करण्याचे काय अर्थ आहेत? हे आपण यातून समजून घेऊ.

त्याकाळी शिवसेनेची लाट आली होती पण...

6 डिसेंबर 1992 सकाळ होती. देशभरातून अयोध्येत जवळपास दीड लाख लोक दाखल झाले होते. त्यादिवशी हिंदुत्ववादी संघटनांनी बाबरी मशिदीभोवती कारसेवा करण्याचं आवाहन केले होते.

ज्याठिकाणी रामाचा जन्म झाला त्याच ठिकाणी 16 व्या शतकात मुघल बादशाह बाबराने ही मशीद उभारली असल्याची हिंदुत्ववाद्यांची मान्यता आहे.

6 डिसेंबरच्या 'त्या' दिवशी दुपारी बाबरी मशिदीजवळ जमलेल्या जमावाने हिंसक वळण घेतलं. काही तरूण मशीदीच्या घुमटावर चढले आणि तिथे भगवा फडकवून मशीद तोडायला सुरुवात केली.

बाबरी मशीद पाडली. यामध्ये शिवसेनेनेही मुंबईहून एक तुकडी अयोध्येत पाठवली होती. त्याचं नेतृत्व मनोहर जोशी करत होते.

शिवसेना, महाराष्ट्र, बाबरी मशीद, दिल्ली

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे

बाबरी पाडल्यानंतर या कटाचे प्रमुख सूत्रधार भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी असल्याचं सीबीआयने त्यांच्या आरोपपत्रात म्हटलं होतं.

हा कट रचून हिंसा घडवून आणल्याचा आरोप लालकृष्ण अडवाणी यांच्यावर होता. पण त्यात कोणतंही षड्यंत्र नसून जमावाला अचानक हिंसक वळण लागल्यामुळे ते घडल्याचं सांगत अडवाणी यांनी सर्व आरोप फेटाळून लावले होते.

तेव्हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी जाहीर भूमिका घेतली होती. "बाबरी पाडणारे जर माझे शिवसैनिक असतील तर मला त्यांचा अभिमान आहे". बाबरी मशिदीबाबत जाहीरपणे भूमिका घेणारे ते एकमेव नेते होते.

ज्येष्ठ पत्रकार राही भिडे सांगतात, "बाळासाहेबांच्या जाहीर भूमिकेमुळे आणि भाजप नेत्यांच्या माघारीमुळे निश्चितपणे शिवसेनेच्या बाजूने वातावरण निर्माण झालं होतं. शिवसेनेची एक लाट त्यावेळी दिसून आली होती. 1995 च्या निवडणुकीत ते दिसून आलं. पण ही लाट इतकी मोठी नव्हती की, देशभरात शिवसेना निवडून आली असती.

"शिवसेना महाराष्ट्राव्यतिरिक्त फार कुठे वाढलेली दिसली नाही. त्याकाळात महाराष्ट्रात भाजप शिवसेनेमुळे वाढली असं म्हणता येईल. उत्तरप्रदेशमध्ये तेव्हा शिवसेनेने काही उमेदवार उभे केले होते, पण पवन पांडे नावाचे एक शिवसेनेचे आमदार निवडून आले होते. पण त्यानंतर देशपातळीवर शिवसेना फार वाढलेली दिसली नाही. शिवसेनेचा पंतप्रधान होण्याइतकी तर नाही."

सोयीचा इतिहास आणि सोयीस्कर विसर...

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाषणातून भाजपवर केलेल्या टीकेला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले आहे. ते म्हणतात, "सोयीचा इतिहास मांडणे आणि सोयीस्कर विसर या दोन ठळक गोष्टी उद्धव ठाकरे यांच्या भाषणात दिसून आल्या."

शिवसेना, महाराष्ट्र, बाबरी मशीद, दिल्ली

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे

"शिवसेनेने विधानसभेची पहिली निवडणूक भाजपच्या चिन्हावर लढवली होती. मुंबईत पहिला नगरसेवक हा शिवसेनेचा नाही तर भाजपचा होता.

"1993 मध्ये शिवसेनेने उत्तरप्रदेशमध्ये 180 उमेदवार उभे केले होते. त्यापैकी 179 उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले होते. तुमचे हिंदुत्व कागदावर आहे. हिंदुत्व हे कागदावर असून चालत नाही ते जगावं लागतं. आमच्या सोबत होतात तेव्हा शिवसेना पहिल्या आणि दुसर्‍या क्रमांकावर होती. आज तुम्ही चौथ्या क्रमांकावर गेला आहात. त्यामुळे कुणासोबत कोण सडले हे दिसते आहे," असे फडणवीस यांनी म्हटले.

निवडणुकांसाठी हिंदुत्वाचा मुद्दा?

नुकत्याच पार पडलेल्या नगरपंचायती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत शिवसेना चौथ्या क्रमांकाचा पक्ष ठरला. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्ष या निवडणुकीत सरस ठरले.

ज्यापक्षाचा मुख्यमंत्री आहे तो पक्ष निवडणुकीत चौथ्या क्रमांकावर आला याबाबत राजकीय वर्तुळात बरीच चर्चा झाली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं पक्षाकडे झालेल्या दुर्लक्षामुळे ही पिछेहाट झाल्याचं बोललं गेलं. मुख्यमंत्र्यांच्या तब्येतीच्या कारणामुळे मुख्यमंत्री पद सोडण्यावरून किंवा चार्ज दुसर्‍याला देण्यावरून झालेल्या चर्चा, नगरपंचायत निवडणूकीत झालेली पीछेहाट, शिवसेनेच्या काही नेत्यांवरच्या ईडी - सीबीआयच्या कारवाया यामुळे शिवसेना पक्ष इतर पक्षांच्या तुलनेत सक्रिय दिसत नव्हता.

बाळासाहेब ठाकरे, प्रबोधनकार ठाकरे, श्रीकांत ठाकरे, शिवसेना.

फोटो स्रोत, STRDEL/Getty Images

ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई सांगतात, "संपूर्ण कोरोना काळात काही विशिष्ट नेते सोडले तर संघटना म्हणून शिवसेना पूर्णपणे थंड होती. त्यानंतर उध्दव ठाकरेंच्या तब्येतीचं कारण आलं. नगरपंचायतीमधला तर पराभव तर त्यांनी मान्यच केला.

"या सगळ्यांमध्ये आता मुंबईसह अनेक महापालिकांच्या निवडणुका आहेत येत्या काही महिन्यात कार्यकर्त्यांना ऊर्जा देण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी पुन्हा हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भाष्य केल्याचं दिसून आलं.

"भाजपने शिवसेनेला फसवल्याची भावना, बाळासाहेब ठाकरे यांची भावनिक वक्तव्य, हिंदुत्ववाद अशा भावनिक मुद्द्यांवर शिवसैनिकांना ऊर्जा मिळत असते.

"त्यामुळे शिवसेना विकासाच्या मुद्यांपेक्षा भावनिक मुद्यांना हात घालताना दिसते. मुंबई महापालिका हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. जर तो हातातून गेला तर शिवसेनेसाठी पुढच्या निवडणुका कठीण जातील. त्यामुळे कार्यकर्त्यांना ऊर्जा देण्यासाठी आणि सक्रिय करण्यासाठीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वाच्या आणि बाबरी पाडल्याच्या संदर्भाचा उल्लेख केला," असं देसाई सांगतात.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)