'मुलं पळवणारी टोळी'चा तो व्हायरल मेसेज, धास्तावलेले पालक आणि सत्यस्थिती

फोटो स्रोत, Getty Images
- Author, दीपाली जगताप
- Role, बीबीसी मराठी
"आमच्या सोसायटीच्या व्हॉट्स अप ग्रुपवर दोन-तीन दिवसांपूर्वी मी एक मेसेज वाचला आणि मी घाबरले. लहान मुलांचं अपहरण करणारी टोळी सध्या कार्यरत आहे आणि एका इमारतीतून मुलांना त्यांनी किडनॅप केलंय असा तो मेसेज होता. त्यासोबत काही फोटो आणि ऑडिओ क्लीप होती. माझा मुलगा 12 वर्षांचा आहे. तो चौथीत शिकतो. त्यामुळे हा मेसेज आणि त्यासोबत व्हायरल झालेले फोटो पाहून मी खूप घाबरले." ठाणे शहरात राहणाऱ्या विभावरी मणी यांनी बीबीसी मराठीशी बोलताना ही प्रतिक्रिया दिली.
गेल्या काही दिवसांपासून मुंबई, ठाण्यासह नाशिक, पुणे, नागपूर, जळगाव, औरंगाबाद, अहमदनगर अशा विविध जिल्ह्यांमध्ये 'मुलांना पळवणारी टोळी' सक्रिय असल्याचे संदेश व्हॉट्सअपवर व्हायरल होत आहेत.
'एवढ्या मुलांचे अपहरण झाले, अनोळखी महिला शाळेत घुसल्या, काही महिला संशायस्पदरित्या घराजवळ फिरत होत्या, वस्तू विकण्यासाठी आल्याचं सांगून मुलांना पळवलं' अशा आशयाचे अनेक मेसेज सध्या व्हॉट्सअपवर फॉर्वर्ड केले जात आहेत.
हे प्रकरण नेमकं काय आहे? पोलिसांनी काय म्हटलंय? पालकांनी काय खबरदारी घ्यावी? आणि असे मेसेज व्हायरल कसे होतात? या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्याचा प्रयत्न आपण करूया.
'शाळेत पाठवतानाही भीती वाटते'
मुंबई पोलीस उपायुक्त प्रशांत कदम यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं, "मुलांना पळवणारी टोळी आहे आणि अपहरण करत आहे असे मेसेज व्हीडिओ आणि ऑडिओ स्वरुपात सुरुवातीला मुंबईमध्ये पसरले. मग काही दिवसांनी यात थोडेफार बदल करून ते पुण्यात व्हायरल झाले. पुण्याच्या पाठोपाठ नाशिक, औरंगाबाद अशा वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये आता मेसेज व्हायरल होत आहेत."

फोटो स्रोत, Getty Images
सोशल मीडियावरील अशा व्हायरल संदेशांमुळे राज्यातील अनेक भागांत पालकांमध्ये असुरक्षिततेचं वातावरण आहे.
ठाण्यात राहणाऱ्या विभावरी मणी एक पालक आहेत. त्यांचा मुलगा चौथीत शिकत असून त्या दररोज त्याला शाळेत सोडायला आणि आणायला जातात.
त्या म्हणाल्या, "पालकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. मुलांना कुठेही सोडायला भीती वाटते. मी स्वत: माझ्या मुलाला शाळेत सोडायला आणि आणायला जाते. पण तरीही भीती वाटते की माझ्या आधी कोणी पोहचलं तर शाळा ओळखपत्राशिवाय कुणाकडेही मूल देत नाही पण तरीही असे मेसेज वाचले की भीती वाटते. मुलांना एकटं कुठेही सोडता येत नाही आणि मी बाहेर असल्यावर माझ्या मुलाचा हात सोडत नाही."
ही धास्ती केवळ एका पालकाच्या मनात नाही तर राज्यातील शेकडो पालकांमध्ये सध्या भीती आणि अस्वस्थता आहे. पालक सांगतात, मोबाईलवर व्हॉट्स अपवर चेक केलं की कितीतरी ग्रुप्सवर लहान मुलांच्या अपहरणाच्या किंवा खबरदारी घेण्यासंदर्भात मेसेज दिसतात आणि मग मनात असंख्य विचार यायला सुरूवात होते.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
काही दिवसांपूर्वी मुंबईतील विक्रोळी येथे बीएमसी (महानगरपालिका) शाळेतून दोन मुलांच्या अपहरणाची बातमी पसरली. त्यानंतर एका इमारतीतून मुलांचं अपहरण झाल्यासंदर्भात ऑडिओ क्लीप व्हायरल झाली. यानंतर प्रकरण पोलिसांपर्यंत पोहचलं आणि मुंबई पोलिसांनी या माहितीची पडताळणी केली.
पोलीस उपायुक्त प्रशांत कदम यांनी यासंदर्भात बोलताना सांगितलं, "विक्रोळी बीएमसी शाळेतून आणि एका इमारतीतून मुलांचं अपहरण झाल्याच्या ऑडिओ क्लीप्स व्हायरल होत आहेत. आम्ही याची पडताळणी केली आहे. हे मेसेजेस अफवा असल्याचं निष्पन्न झालं आहे. पालक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांना आम्ही अश्वस्त करतो की त्यांनी अफवांवर विश्वास ठेऊ नका. अफवांना बळी पडू नका. शिवाय, अशा अफवा पसरवणाऱ्यांवर आम्ही कडक कारवाई करणार आहोत."

मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांना एका कार्यक्रमादरम्यान पत्रकारांनी याबाबत प्रश्न विचारला असता ते म्हणाले, "मुंबई सुरक्षित आहे. कोणीही अफवांवर विश्वास ठेऊ नये."
पोलीस आयुक्तांनी दिलेल्या आदेशानुसार, मुंबई सायबर गुन्हे पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. मुलांच्या अपहरणाच्या या बातम्या कोण पसरवत आहे तसंच जुने व्हीडिओ काढून, त्याला ऑडिओ लावून असे मेसेज कोण व्हायरल करत आहे याची चौकशी सायबर पोलीस करत आहेत. असे मेसेज बनवणाऱ्यांवर आणि अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई केली जाणार असल्याचं मुंबई पोलिसांनी स्पष्ट केलं आहे.
'मुलं पळवण्यासाठी आल्याच्या संशयावरून मारहाण'
मुंबई पाठोपाठ नाशिकमध्येही मुलांच्या अपहरणाचे मेसेज व्हायरल होत आहेत. नाशिकच्या वडाळगाव इथे मुलं पळवण्याच्या संशयावरून एका तरूणाला स्थानिकांनी बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नाशिक शहरात वडाळगाव येथे एक तरुण बुरखा घालून आपल्या प्रियसीला भेटण्यासाठी गेला होता. पण स्थानिकांना संशय आला की मुलं पळलणारं कुणीतरी आहे आणि यावरून त्यांनी तरुणाला मारहाण केली.
इंदिरानगर पोलीस घटनास्थळी पोहचल्यानंतर त्यांनी या प्रकरणाची दखल घेतली आणि नागरिकांची समजूत काढली. संबंधित तरुण अपहरणकर्ता नाही हे पोलिसांनी नागरिकांना पटवून दिलं आणि तरुणाची सुटका करण्यात आली.

फोटो स्रोत, Pravin Thackeray
नाशिक शहराचे पोलीस उपायुक्त अमोल तांबे यांनी सांगितलं, "लहान मुलं पळवणाऱ्या टोळीच्या अफवा कुणीतरी पसरवत आहे. वास्तविक कुठल्या टोळीकडून अपहरण झाल्याच्या घटना नाहीत. अशी कोणतीही टोळी सक्रिय नाही. असे मेसेज अफवा आहेत."
स्थानिक नागरिकांमध्ये संभ्रमाचं वातावरण असल्याने परिसरात नवीन आलेल्या लोकांवर संशय घेऊन त्यांना मारहाण केली जात आहे अशीही माहिती अमोल तांबे यांनी दिली.
ते पुढे सांगतात, "नागरिकांनी कायदा हातात घेऊ नये. तुम्हाला कुणावरही संशय असल्यास पोलिसांना कळवावे. नाशिकमध्ये 112 या क्रमांकावर संपर्क साधा. पोलीस तत्काळ घटनास्थळी पोहचतील." असंही आवाहन त्यांनी केलं.
जळगाव,नागपूर, अहमदनगर आणि औरंगाबाद या जिल्ह्यातही 'अपहरणकर्त्यां'बाबत काही फोटो आणि व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याचं समोर येत आहे.
काय खबरदारी घ्याल?
मुंबई पोलीस उपायुक्त प्रशांत कदम यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं,
- मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद अशा एका पोठापाठ शहरांमध्ये अफवा पसरवल्या जात आहेत. त्यामुळे सर्वप्रथम आम्ही नागरिकांना आवाहन करत आहोत की, कोणतीही माहिती तुम्ही पडताळणी केल्याशिवाय पुढे फॉर्वर्ड करू नका. तुमच्याकडे आलेले मेसेज हे फॉर्वर्डेड असल्याचं तुम्ही पाहू शकता. त्यामुळे त्याची सत्यता तपासल्याशिवाय तुम्ही पुढे कुणालाही असे मेसेज पाठवू नका.

फोटो स्रोत, NAGPUR CITY POLICE TWITTER
- व्हीडिओ, ऑडिओ पाहून त्यावर लगेच विश्वास ठेऊ नका. जोपर्यंत त्याची पडताळणी होत नाही किंवा पोलीस तुम्हाला सांगत नाहीत तोपर्यंत नागरिकांनी अशा कोणत्याही व्हायरल आणि फॉर्वर्ड गोष्टींवर विश्वास ठेऊ नये.
- तुमच्या मोबाईलवर सोशल मीडियावर मुलांच्या अपहरणासंदर्भात काहीही आलं आणि तुम्हाला संशयास्पद वाटलं तर तातडीने तुमच्या जवळच्या पोलीस स्टेशनला संपर्क साधा. पोलिसांना याविषयीची सर्व माहिती द्या.
- पालक, शिक्षक आणि स्थानिक नागरिकांनी संशयास्पद हालचाली आढळल्यास किंवा कोणीही संशयास्पद आढळल्यास स्थानिक पोलीस किंवा 100 या क्रमांकावर पोलिसांना संपर्क साधा. पोलीस घटनास्थळी पोहचतील.
पालकांच्या मनातील भीती कमी करण्यासाठी मुंबई पोलीस पालक आणि शिक्षकांच्या सभा घेत आहेत. मुंबईतील अनेक भागात जाऊन शिक्षक, पालक, विद्यार्थी यांना जागरूक करण्याच काम आम्ही करत आहोत अशी माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे.

फोटो स्रोत, AURANGABAD POLICE CP/TWITTER
केवळ पोलिसांनाच नव्हे तर पालक शाळांमध्येही संपर्क साधत आहेत.
नागपूरमध्ये तर पोलिसांनी 24*7 हेल्पलाईन सुरू केली आहे.
नागरिकांच्या मनातील भीती आणि संभ्रम दूर करण्यासाठी नागपूर पोलिसांनी 24 तास सेवेत असलेला वॉट्स अप नंबर सुरू केला आहे.
या ठिकाणी आलेल्या तक्रारींवर काम करण्यासाठी नागपूर पोलिसांनी 10 पथक तयार केली आहेत. तसंच महिला अधिकाऱ्यांचा समावेश असलेल्या 5 टीम समुपदेशनासाठी सज्ज असल्याचंही नागपूर पोलीस सांगतात.

फोटो स्रोत, SHAHID SHIKH/BBC
- अपहरणासंदर्भात तक्रारीसाठी नागपूर पोलिसांनी 9823300100 या वॉट्स अप क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. तसंच नागरिक 112 या क्रमांकावरही संपर्क साधू शकतात.
- अहमदनगर जिल्ह्यातही पोलीस अधिक्षकांनी अफवांवर विश्वास ठेऊ नका असे आवाहन केले आहे. तसंच नागरिकांनी पोलीस नियंत्रण कक्ष 0241-2416132 या क्रमांकावर संपर्क साधावा असं आवाहन पोलीस अधिक्षक मनोज पाटील यांनी केलं आहे.
सोशल मीडियावर अफवा कशी पसरते?
अपहरणासंदर्भात फॉर्वर्ड केले जाणारे काही संदेश अफवा असल्याचं त्या त्या भागातील स्थानिक पोलिसांनी म्हटलं आहे. पण प्रत्येक घटना वेगळी असू शकते हे सुद्धा महत्त्वाचं. तूर्तास तरी अफवांवर विश्वास ठेऊ नका असं पोलीस सांगत आहेत.
मुळात सोशल मीडियावर वेगाने अफवा कशा पसरतात हे समजून घेणंही गरजेचं आहे.
सोशल मीडिया अभ्यासक मुक्ता चैतन्य याविषयी बोलताना सांगतात, "मुलं पळवणारी टोळी फिरत असल्याच्या बातम्या व्हॉट्स अपवर व्हायरल होणारे मेसेज वरुन पुन्हा एकदा व्हायरल झाल्या आहेत. मुलांच्या सुरक्षिततेसाठी आपण जागरूक असलंच पाहिजे आणि मुलांनाही जागरूक केलंच पाहिजे पण सोशल मीडियावर अफवा पसरते कशी हेही समजून घेणं गरजेचं आहे कारण आपणही अनेकदा अशा अफवा पसरवण्यात आपल्याही नकळत सहभागी झालेलो असतो."

"मानवी मनाला गॉसिप्स आवडतात, त्यात काहीतरी जबरदस्त, चटपटीत मसाला असेल तर फारच रंजक. फारसा विचार न करता अफवांवर विश्वास ठेवणारी मानसिकता, जे काही छापून येतं, हातातल्या अगर भिंतीवरल्या स्क्रीनवर दिसतं ते खरं असतं हे मानण्याची वृत्ती आणि प्रश्न न विचारण्याचा संस्कार या सगळ्यामुळे समाज म्हणून आपण 'फॉरवर्ड-फॉरवर्ड'चा नवानवा खेळ चवीचवीने रंगवतो आहोत आणि त्यापोटी जन्मणार्या अफवांचे बळी ठरतो आहोत.
आपल्याकडे आलेली माहिती पुढे फॉर्वर्ड करण्यासाठीही स्पर्धा लागलेली असते असं दिसून येतं. आपल्याकडे आलेला मेसेज विशेषत: तो गंभीर असल्याच त्याबाबत पडताळणी न करता अनेकजण तो फॉर्वर्ड करतात."
मुक्ता सांगतात, "एखादी 'बातमी' मलाच कशी पहिल्यांदा समजली, सगळ्यांना जागं करण्यासाठी मीच कसा पहिल्यांदा तो मेसेज पाठवला, मला कसं इतरांपेक्षा जास्त माहीत आहे अशा निरनिराळ्या मानसिक गरजांच्या पूर्तीसाठीदेखील फॉरवर्ड मेसेजेसचा खेळ जोरात खेळला जातो. आपल्यापर्यंत येऊन पोहचलेल्या मेसेजमधील तथ्य शोधण्याचा प्रयत्न कुणीही करत नाही."
आपल्याकडे आलेली माहिती पुढे पाठवण्याआधी प्रत्येकाने किमान तीन प्रश्न स्वत:ला विचारले पाहिजेत असंही मुक्ता सुचवतात.
1. हा मेसेज खरा आहे का?
2. ही माहिती योग्य/उचित/वास्तव आहे का?
3. हा मेसेज पुढे पाठवला तर त्याचे काय परिणाम होऊ शकतील?
त्या पुढे सांगतात, "आपल्याकडेही अशाच विषयांबद्दलच्या अफवा पसरतात, जे विषय सामाजिक स्तरावर असुरक्षितता निर्माण करणारे आहेत, मनात भीतीची भावना जागृत करणारे आहेत. अशाच विषयांची माहिती चटकन मोठय़ा प्रमाणावर प्रसारित होते आणि त्यातून अफवेचा अक्राळ-विक्राळ राक्षस उभा राहतो. आपल्याकडे व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून पसरणार्या अफवांमुळे सामुदायिक तणाव आणि हिंसेचं प्रमाण झपाटय़ाने वाढतं आहे, म्हणूनच सजग होण्याची गरज आहे."
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








