'व्हर्चुअल किडनॅपिंग'चे वाढते प्रकार, पण मुलांचं 'व्हर्चुअल किडनॅपिंग' म्हणजे काय?

हॅकर

फोटो स्रोत, Getty Images

आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून लोकांना लुबाडण्याचे प्रकार सर्रास झाल्याचं आपण पाहतो. मात्र, आता या तंत्रज्ञानाचा वापर करूनच लोकांना त्यांच्या मुलांचं अपहरण झाल्याचं भासवलं जातंय आणि त्यांच्याकडून खंडणी उकळली जात आहे.

आधुनिक तंत्रज्ञान आणि आर्थिक फसवणूक याची वेगवेगळी उदाहरणं हल्ली आपल्याला पाहायला मिळतात. रॅनसमवेअर, ओटीपींचे फ्रॉड यांसारख्या गोष्टी वारंवार कानावर पडत असतात. त्यात आता (Virtual Kidnapping) 'व्हर्चुअल किडनॅपिंग' या प्रकराची भर पडली आहे.

लोकांना त्यांच्या मुलांबद्दल मानसिकदृष्ट्या घाबरवून आणि मुलांना पकडल्याचे खोटे फोटो आणि व्हीडिओ पाठवून हे व्हर्चुअल किडनॅपिंग केलं जात असल्याचं महाराष्ट्र सायबर पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. त्यांनी हा प्रकार काय आहे याबद्दल माहिती प्रसिद्ध केली आहे.

व्हर्चुअल किडनॅपिंग म्हणजे काय?

महाराष्ट्र सायबर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, व्हर्चुअल किडनॅपिंगमध्ये पालकांना काही टेक्नॉलॉजिकल आणि सायकोलॉजिकल ट्रिक्स वापरून असं भासवलं जात की, त्यांच्या मुलांचं किडनॅपिंग झालं आहे.

त्याच्यामागे पैसे उकळण्याचा हेतू असू शकतो. प्रत्यक्षात त्या मुलांचं अपहरण झालेलंच नसतं.

मुलगा किंवा मुलगी घरात नसतानाच या गोष्टी केल्या जातात. मुलं कधी घराबाहेर जातील, कुठे जातील, कोणत्या मार्गाने जातील याची माहिती आधीच मिळवलेली असते. तसंच, बऱ्याचदा ही मुलं परदेशात शिक्षणासाठी असतानाच या गोष्टी केल्या जातात.

कोरोना
लाईन

तंत्रज्ञानाचा वापर करून अनेकदा 'स्पूफ कॉल' केले जातात. 'स्पूफ कॉल' करताना मोबाईल नंबर आणि आपली ओळख लपवता येते. असं करणारे मोबाईल अॅप्सही प्ले स्टोअरवर आहेत. यामध्ये इतरांची ओळखही वापरून कॉल करता येतात.

पालकांना आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI), डीप फेक तंत्रज्ञानाचा वापर करून मॉर्फ इमेजेस, खोटे व्हीडिओ पाठवले जातात. म्हणजेच, त्यांच्या मुलाचा फोटो घेऊन त्याचा वापर खोट्या इमेजेसमध्ये शिताफीने केला जातो.

या खोट्या इमेजेसमध्ये त्या मुलाला कोणीतरी पकडून ठेवलं आहे, असं पालकांना भासवलं जातं. तर, डिप फेक तंत्रज्ञानाद्वारे खोटे व्हीडिओ तयार केले जातात. यात काही जणांनी एका मुलाला पकडलंय आणि तो मुलगा रडतोय असा व्हीडिओ असतो.

सायबर सिक्युरिटी

फोटो स्रोत, Reuters

यात डीप फेक तंत्रज्ञानाद्वारे व्हर्चुअली किडनॅप केलेल्या मुलाचा फोटो त्या रडणाऱ्या मुलावर लावला जातो. हे इतकं बेमालूमपणे केलेलं असतं की लोकांना खरंच वाटतं की आपल्या मुलाचं अपहरण झालंय.

व्हर्चुअल किडनॅपिंग होतं कसं?

ऑनलाईन गुन्हेगार प्रथम अशी कुटुंब हेरतात. त्यांची मुलं कधी घराबाहेर असतात याची ते माहिती मिळवतात. मुलांचा आणि पालकांचा एकमेकांशी संवाद होऊ नये याचीही लोक काळजी घेतात. बहुतेक वेळा ही मुलं परदेशात शिक्षणासाठी गेलेली असतात.

या मुलांना 'स्पूफ कॉल' केला जातो. त्या मुलांना सांगितलं जातं की, आम्ही तुमच्या देशाच्या दूतावासातून बोलतो आहोत आणि तुमचा फोन हॅक झाला आहे. फोन तातडीने स्विच ऑफ करा. मुलंही घाबरून फोन बंद करतात.

त्यांनी फोन बंद केला की, ऑनलाईन गुन्हेगार त्या मुलांच्या पालकांना वर उल्लेखल्याप्रमाणे खोटे फोटो आणि व्हीडिओ पाठवून घाबरवतात. पालकांचा मुलांशी संपर्क होत नाही आणि ते अशा फोटो, व्हीडिओजना बळी पडतात.

घाबरलेल्या पालकांना ऑनलाईन पैसे पाठवण्यासाठी बळी पाडलं जातं. पालकही घाबरून पैसे पाठवतात. प्रत्यक्षात कोणत्याही स्वरुपाचं अपहरण झालेलं नसतं. अशा घटना भारतात घडलेल्या नसल्या तरी ऑस्ट्रेलिया, अमेरिका, चीन इथे घडलेल्या आहेत.

अशा केसेस महाराष्ट्रातल्या परदेशात असलेल्या मुलांच्या बाबतीत घडतील, अशी शंका महाराष्ट्र सायबर पोलिसांना आलेली आहे. म्हणूनच त्यांनी याबद्दल जनजागृती करायला सुरुवात केली आहे.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)