कोरोना लॉकडाऊन: सायबर क्राइमपासून स्वतःचं संरक्षण कसं कराल?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, निधी राय
- Role, बीबीसी प्रतिनिधी
कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत असल्याने अडचणीत आलेल्या मदत करणाऱ्यांच्या ऑनलाईन फसवणुकीची प्रकरणं सध्या वाढताहेत.
असेही काहीजण आहेत, ज्यांनी आकर्षक ऑफर पाहून ऑनलाईन ऑर्डर नोंदवली. पण या वस्तू त्यांच्यापर्यंत पोहोचल्याच नाहीत. तर अनेकांनी इंटरनेटवर स्कॅमला बळी पडत आपले पैसे गमावले आहेत.
कोरोना व्हायरसचा संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी संपूर्ण देशामध्ये 25 मार्चपासून देशात लॉकडाऊन लावण्यात आलाय आणि अर्थातच याचा परिणाम रोजच्या आयुष्यावर झालेला आहे. मजूर शहरं सोडून गावाकडे निघालेत. दुकानं बंद आहेत. कारखान्यांमधलं काम ठप्प आहे.
मात्र, आता लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात काही गोष्टींबाबत नियम शिथील करण्यात आलेले आहेत आणि अनेक ठिकाणी काही अटींवर दुकानं आणि कारखाने काम करू लागले आहेत.
या सगळ्यांसोबतच आणखी काही जणही कामाला लागले आहेत. हे सगळे इंटरनेटवर सापळे रचतायत. कोणी स्वस्त सामानाची ऑफर देत ऑनलाईन पेमेंट घेतंय पण या वस्तू ग्राहकांपर्यंत पोहोचत नाहीय.
काहींनी बोगस वेबसाईट्स तयार करत लोकांकडून देणग्या घेतल्या, तर काहीजण बाजारात उपलब्ध नसणाऱ्या सॅनिटायजरसारख्या गोष्टी स्वस्तात देण्याचं प्रलोभन देत लोकांना जाळ्यात अडकवतायत.
फसवणूक करणाऱ्या या लोकांविषयी सध्या पोलीस आणि ग्राहक हक्कांसाठी लढणाऱ्या संस्था, लोकांना सावधानतेचा इशारा देत आहेत.
स्वस्त ऑफर्स मागचा धोका लोकांना सांगितला जातोय. पण तरीही फसवणुकीचे प्रकार सुरूच आहेत.
यापैकीच काही प्रकार पाहिले, तर त्यातून काही बोध घेता येईल.
सायबर गुन्हेगार लोकांना आपल्या जाळ्यात फसवण्यासाठी नेहमी एखाद्या मोठ्या आंतरराष्ट्रीय घडामोडीचा वापर करतात, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. पण कोरोना व्हायरसच्या साथीच्या या काळात नेहमीपेक्षा अधिक वेगाने हे सायबर गुन्हे घडत आहेत.
सायबर अॅनालेटिक्स फर्म CYFIRMA चे संस्थापक आणि चीफ एक्झिक्युटिव्ह कुमार रितेश यांनी बीबीसीला सांगितलं, "सायबर हल्ल्यांचं वाढलेलं प्रमाण ही सर्वांत मोठी चिंतेची बाब आहे. मालवेअरचं प्रमाण अतिशय वाढलेलं आहे. फसवणुकीसाठी विविध मार्ग वापरले जात आहेत आणि हे गुन्हेगार अगदी निर्दयीपणे लोकांना लुटतायत. त्यांच्यात थोडीही दया नाही. बनावट लस आणि बोगस औषधांचा थेट लोकांच्या आयुष्यावर परिणाम होऊ शकतो. या प्रकारची चुकीची माहिती पसरल्याने समाजात अशांतता निर्माण होऊ शकते."
देणगीच्या निमित्ताने फसवणूक
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यालयाच्या PMO कडून स्थापन करण्यात आलेल्या मदत फंडासाठी एका फेक मोबाईल अॅड्रेसवर पैसे भरल्याने आपली फसवणूक झाल्याचं ऑनलाईन फसवणूक झालेल्या एका महिलेने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितलं.
डोनेशनसाठी देण्यात आलेला हा ऑनलाईन अॅड्रेस pmcares@sbi या बनावट अकाऊंटशी संबंधित होता.
देणगी पाठवण्यासाठीचे असे अनेक बनावट अॅड्रेस सध्या लोकांसमोर येत आहेत.
शिवाय, हे आयडी असे असतात ज्यांच्याकडे वरवर पाहता शंकाही येत नाही.
उदाहरणार्थ - pmcares@pnb, pmcares@hdfcbank, pmcare@yesbank, pmcare@ybl, pmcares@icici
हे असे खोटे अकाऊंट अॅड्रेस आढळल्यानंतर इंडियन कंप्युर रिस्पॉन्स टीम, भारतीय स्टेट बँक (SBI) आणि पोलिसांनी लोकांना सतर्क करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वं जाहीर केली आहेत.
फसवणूक करणारे आणखी एका पद्धतीने लोकांची शिकार करत आहेत. कोरोनाच्या संकटामुळे बँकांनी ग्राहकांना कर्जाचे हप्ते तीन महिने न भरण्याची मुभा द्यावी असं काही दिवसांपूर्वीच सरकारने जाहीर केलं होतं.
जवळपास सगळ्या बँकांनी ही योजना लागू केली. आता सायबर गुन्हेगार या योजनेच्या पडद्याआड लोकांना फसवतायत. या योजनेचा फायदा घेणाऱ्या लोकांना पेपरवर्कमध्ये मदत करण्याच्या बहाण्याने फसवणूक केली जात असल्याचं PTI ने म्हटलंय.

- वाचा - महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा - माझा जिल्हा कोणत्या झोनमध्ये? पाहा संपूर्ण महाराष्ट्राची यादी
- वाचा - दारू विक्री, बांधकाम, सलून - लॉकडाऊन 3.0मध्ये कुठे काय सुरू राहणार?
- वाचा - कोरोना व्हायरसवरील लस बनवण्याचं काम कुठवर आलं?
- वाचा - उन्हामुळे कोरोना विषाणूचा प्रसार थांबू शकतो का?
- वाचा - कोरोना व्हायरसबद्दलच्या तुमच्या मनातील 11 प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं कोणती आणि त्याच्यापासून कसं संरक्षण करता येतं?
- वाचा-कोरोनाचं संकट कधी जाणार?

मदतीच्या बहाण्याने ग्राहकांना विश्वासात घेऊन त्यांच्या खात्याचे तपशील घेतले जातात, आणि त्यानंतर लोकांच्या खात्यातले पैसे गायब होतात.
या प्रकारच्या फसवणुकीपासून सावध करणारी ट्वीट्स भारतीय स्टेट बँक आणि अॅक्सिस बँकने केली आहेत.
कोरोना व्हायरसच्या साथीमुळे सध्या सगळीकडे काळजीचं वातावरण आहे. आणि याचाच फायदा घेत सायबर गुन्हेगार लोकांना लुबाडतायत.
लोक आपल्या जाळ्यात अडकावेत यासाठी ईमेल, SMS, फोन कॉल्स आणि मालवेअर सह इतर अनेक पद्धतींचा वापर केला जातोय. अशा 'फिशिंग' (Phishing) पर्यायाबद्दल आपल्याला पुरेशी माहिती आहे, असं वाटणाऱ्यांनाही त्यांच्या नकळत या जाळ्यात ओढलं जातं.

फोटो स्रोत, Getty Images
वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) च्या नावाखालीही एका प्रकारे फसवणूक केली जातेय. IBMच्या सायबर सिक्युरिटी सर्व्हिसने याचा छडा लावलाय.
गार्टनर या कंझ्युमर कन्सलटन्सी फर्मच्या प्रिन्सिपल अॅनालिस्ट राजप्रीत कौर सांगतात, "लोकांना एक ईमेल येतो. WHOचे संचालक टेड्रॉस अॅडनहॉम गिब्रयसस यांच्या तर्फे हा ईमेल पाठवण्यात आल्याचं वाटतं. यामध्ये असणाऱ्या अॅटॅचमेंटमध्ये मालवेअर असतं."
हे मालवेअर तुमच्या डिव्हाईसचं काम ठप्प करतं आणि गॅजेट नीट काम करत नाही. कधी कधी यामार्फत तुमच्या डिव्हाईसमधली माहिती चोरली जाते. मालवेअर घुसल्यानंतर तुमच्या डिव्हाईसचं लगेच नुकसान होतं. ते क्रॅश होतं किंवा री-बूट होतं किंवा मग मंदावतं.
DNIF या अॅनालेटिक्स कंपनीच्या अहवालानुसार अशाप्रकारचे मेल किंवा मेसेजेच्या बाबत अतिशय सावधगिरी बाळगणं गरजेचं आहे. कारण याद्वारे तुमच्या कंप्युटर आणि फोनमधली महत्त्वाची माहिती चोरली जाऊ शकते.
DNIF चे संस्थापक आणि चीफ एक्झिक्युटिव्ह समीरन दासगुप्ता सांगतात, "तुम्हाला फ्री कोरोना व्हायरस चेकअप किंवा मग फक्त 999 रुपयांत फुल बॉडी चेकअपचे व्हॉट्सअॅप मेसेज किंवा ईमेल येऊ शकतात. याच मेसेज आणि मेलच्या अॅटॅचमेंटमध्ये मालवेअर दडवलेलं असतं. लोकांकडची महत्त्वाची माहिती चोरण्यासाठी हॅकर्स कोरोना व्हायरस ट्रॅकर मॅपचाही वापर करत आहेत."
फेब्रुवारीच्या सुरुवातीपासून ते लॉकडाऊनच्या मध्यापर्यंत अशा प्रकारे हँकिंग करण्यात आल्याच्या प्रकरणांमध्ये 30% वाढ झालेली आहे. अशी 1700 पेक्षा जास्त प्रकरणं आढळलेली आहेत.
कोरोना व्हायरसच्या साथीच्या या काळात भारतात SMS फिशिंग मोठ्या प्रमाणात वाढल्याचं K7ने त्यांच्या वेबसाईटवर म्हटलंय. ही अफरातफर करणारे मोबाईल फोनवरून लोकांना ऑनलाईन मेसेज करतात. हे मेसेजेस भारतातूनच पाठवले जात आहेत आणि भारतातले युजर्स याला बळी पडत आहेत.
फेब्रुवारीच्या अखेरपासून फिशिंगच्या घटना 600 टक्के वाढल्याचं अमेरिकेच्या बाराकुडा नेटवर्क्स (Barracuda Networks)चं म्हणणं आहे.

फोटो स्रोत, PA Media
फसवण्याचा आणखी एक प्रकार म्हणजे - सरकारकडून टॅक्सचा रिफंड घेण्यासाठी पाठवण्यात येणारी लिंक.
अशा प्रकारे लोकांकडून त्यांच्या बँक खात्याविषयीची माहिती घेतली जाते.
लॉकडाऊनच्या काळात अनेक आठवडे लोक घरातून बाहेर पडलेले नाहीत. अनेक गोष्टी उपलब्ध नाहीत आणि ग्राहक या गोष्टींच्या शोधात आहेत.
यापैकीच एक गोष्ट म्हणजे दारू. लॉकडाऊन शिथील केल्यावर दारूच्या दुकानांसमोर गर्दी झाली आणि सरकारला ही दुकानं ताबडतोब बंद करावी लागली.
दारूची होम डिलिव्हरी आणि फसवणूक
लॉकडाऊनच्या काळात जी वस्तू गरजेची वा अत्यावश्यक नसल्याचं सरकारने ठरवलं, त्याच गोष्टींना फसवणूक करणाऱ्यांनी महत्त्व देत फसवणुकीचं माध्यम बनवलं.
अनेक लोकांना दारूची गरज असल्याचं या फसवणूक करणाऱ्यांनी हेरलं होतं.
लॉकडाऊनच्या काळात दारूची मान्यता प्राप्त दुकानं बंद होती. भारतामध्ये कायदेशीररीत्या याच दुकानांद्वारे दारू विक्री करता येऊ शकते.
दारूची दुकानं उघडून पुन्हा बंद झाल्याने फसवणूक करणाऱ्यांना संधी मिळाली. तुम्हाला हवं असल्यास घरपोच दारू देऊ असे मेसेज व्हॉट्सअॅपवर पाठवण्यात आले.

फोटो स्रोत, EPA
UPI (Unified Payments Interface)च्या माध्यमातून लोकांकडून आधी पैसे मागण्यात आले. लोकांकडून पैसे मिळाल्याबरोबर घोटाळा करणाऱ्यांनी मोबाईल बंद केला. त्यामुळे मोहापायी दारूची होम डिलीव्हरी घेण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना याचा मोठा फटका बसला.
आकर्षक ऑफर्स
लोकांनी सोशल डिस्टन्सिंगचं पालन करावं, वारंवार हात धुवावे, मास्क वापरावेत असं आवाहन सरकारने लोकांना केलं आणि रातोरात सॅनिटायझर, साबण आणि मास्कसाठीची एक नवीन बाजारपेठ उभी राहिली. या सगळ्या गोष्टी दुकानातून गायब झाल्यावर लोकांनी या वस्तू ऑनलाईन शोधायला सुरुवात केली.
हँड सॅनियाटझर आणि मास्कच्या तुटवड्याचा घोटाळेबाजांनी पुरेपूर फायदा उठवला. अनेक बोगस ई-कॉमर्स वेबसाईट्स सुरू करण्यात आल्या. यावर इतक्या आकर्षक ऑफर्स झळकल्या की मोह आवरणं अनेकांना कठीण झालं.
मुंबईच्या कीर्ती तिवारींनी अशाच एका वेबसाईटवरून संपूर्ण कुटुंबासाठी मास्क घेण्याचा प्रयत्न केला पण यात त्यांचे 1500 रुपये गेले.
कीर्ती यांनी सांगितलं, "मी वेबसाईटवर ऑफर पाहिली तेव्हा मला चांगली वाटली. शंका घेण्याचं काहीच कारण नव्हतं. पण माझी फसवणूक झाली. अशा साथीचा कोणी पैसे लुटण्यासाठी वापर करेल असं मला वाटलं देखील नव्हतं. हे अतिशय वाईट आहे."


यातली काही प्रकरण N-95 मास्कशी संबंधित आहेत. हे मास्क अतिशय जास्त किंमतीला विकत लोकांना फसवण्यात आलं.
तर लॉकडाऊनच्या पूर्ण कालावधीत लोकांना नेटफ्लिक्सचं अनलिमिटेड सबस्क्रिप्शन देण्याची ऑफर देत काही बोगस वेबसाईट्स लोकांना फसवत आहेत.
कोणती खबरदारी घ्याल?
ऑनलाईन व्यवहार करताना सध्या काळजी घेणं गरजेचं असल्याचं तज्ज्ञ सांगतात. Lucideus या सायबर सिक्युरीटी फर्मचे सहसंस्थापक राहुल त्यागी यांनी यासाठी काही टिप्स दिल्या आहेत.
- तुम्हाला ई-मेल वा मेसेज पाठवण्यात आलेला पत्ता वा आयडीविषयी शंका आल्यास लगेच सावध व्हा.
- जेनेरिक ग्रीटींग्स किंवा सही असणारे ईमेल्स म्हणजे 'Dear Valued Customer' किंवा 'Sir / Madam' असं लिहीलेल्या ईमेल्सकडे लक्ष देऊ नका. तुम्ही ज्यांचे ग्राहक आहात त्या कंपन्या तुम्हाला तुमच्या नावाने संबोधतील.
- मेसेजमधल्या व्याकरणाच्या चुका किंवा चुकीचे संदर्भ पहा. ही बोगस ईमेलची चिन्हं असू शकतील.
- मेसेज किंवा ई-मेल पाठवणारी व्यक्ती अनोळखी असेल तर त्यातली अॅटॅचमेंट उघडू नका.
- यासोबतच शक्य असेल तिथे टू - फॅक्टर ऑथेंटिकेशनचा वापर करा.
- याचा वापर करताना गुगल किंवा मायक्रोसॉफ्ट ऑथेंटिकेटर अॅप्लिकेशनचा वापर करा. SMS कोडऐवजी कॉल करा.

फोटो स्रोत, SPL
इतकं सगळं करूनही तुम्ही फसवले गेलात तर तुमच्या बँकशी संपर्क करा आणि बँकेच्या सूचनांचं पालन करा.
PwC India चे सायबर सिक्युरिटी प्रमुख सिद्धार्थ विश्वनाथन यांनी दिलेल्या माहितीनुसार भारतीय गृह मंत्रालयाने यासाठीच्या सूचना दिलेल्या आहेत. यानुसार जर तुम्ही सायबर गुन्ह्यांना बळी पडला असाल तर https://cybercrime.gov.in/ https://cybercrime.gov.in/ वर तुम्हाला याविषयीची तक्रार दाखल करता येऊ शकते.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








