नवरात्री : भारताबाहेरच्या या देवता तुम्हाला माहिती आहेत का?

    • Author, जान्हवी मुळे
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

नवरात्रीचा सण हिंदू धर्मात देवीचा, शक्तीचा उत्सव म्हणून साजरा केला जातो. या काळात भारतातील जवळपास सर्वच प्रांतांमध्ये स्त्रीरूपातल्या देवतांची पूजा केली जाते. त्यावरून भारतात महिलांना देवीचं स्थान आहे, असा दावाही केला जातो आणि प्रत्यक्षात महिलांच्या अवस्थेशी त्याची तुलनाही केली जाते.

पण शक्तीची किंवा महिलेच्या रूपातील देवतेची पूजा केली जाणारा भारत हा एकमेव देश आहे, हा दावा मात्र खरा नाही. जगभरातील बहुतांश संस्कृती आणि सभ्यतांमध्ये कुठल्या ना कुठल्या स्वरुपात स्त्रीरूपातील देवतेची पूजा होत आली आहे.

त्यात काही देवी प्रेम आणि प्रजननाचं प्रतीक आहेत, काही देवता दया, मुक्ती, भरभराटीचं प्रतीक आहे तर कुणी न्याय, युद्ध आणि अगदी संहाराचंही प्रतीक आहेत. काही देवतांचं एकमेकींशी ऐतिहासिक नातं असल्याचंही दिसून येतं.

म्हणजे एखाद्या संस्कृतीतील देवता दुसऱ्या काळात, दुसऱ्या प्रांतात एखाद्या वेगळ्या रूपात दिसते. कधी या देवता उपासनेच्या केंद्रस्थानी असतात तर कधी एखाद्या पुरूषरूपातील देवाच्या त्या सह-देवता असतात.

शतकानुशतकं वेगवेगळ्या भाषांमध्ये अशी स्त्रीरूपातील देवतांच्या अनेक कहाण्या सांगितल्या गेल्या. पण अलीकडच्या काळात अभ्यासक त्यांची नव्यानं दखल घेताना आणि स्त्रीकेंद्रीत दृष्टीकोनातून त्यांच्याकडे पाहू लागले आहेत.

धर्म आणि आध्यात्मात महिलांना असलेलं स्थान आणि महिलांना समाजात असलेलं स्थान यांची सांगड प्रत्येक ठिकाणी आहेच असं मात्र नाही. तरीही अनेकदा या देवतांच्या कहाण्या, त्यांच्याभोवती जमा झालेली मिथकं त्या त्या ठिकाणच्या लोकसंस्कृतीतील स्त्रियांविषयीचे समजही दाखवून देतात.

इजिप्तच्या 'आयसिस' आणि 'हाथोर'

'आयसिस' ही प्राचीन इजिप्तमधली एक प्रमुख आणि सर्वांत शक्तीशाली स्त्रीदेवता म्हणून ओळखली जाते. आयसिसच्या डोक्यावर गिधाडाच्या आकाराचं शिरस्त्राण अथवा गाईच्या शिंगांमध्ये सूर्य दर्शवला जातो.

आयसिसनंच शेतीचा शोध लावला, ती पृथ्वीचा देव गेब आणि आकाशाची देवी नूट यांची मुलगी आहे, असंही प्राचीन इजिप्शियन लोक मानायचे. ती कायदा-सुव्यवस्था, मातृत्त्व, वैद्यकशास्त्राचीही देवता आहे.

आयसिसच्या कहाण्यांमध्ये तिच्यातल्या जादुई शक्तीचा, पती ओसायरिस सोबत तिच्या निष्ठेचा आणि तिचा पुत्र होरसचा उल्लेख येतो. या देवतेची लोकप्रियता एवढी आहे, की ग्रीक आणि रोमन संस्कृतीवरही तिचा प्रभाव पडलेला दिसून येतो.

कलेच्या इतिहासात 'मदर अँड चाइल्ड' म्हणजे आई आणि बाळ यांचं चित्रण अनेकांनी केलेलं पाहायला मिळतं. त्याचं मूळ आयसिसपर्यंत जाऊन पोहोचतं. आयसिस आपला पुत्र होरसला स्तनपान देतानाची चित्रं प्राचीन काळापासून प्रसिद्ध आहेत.

इजिप्तमधली आणखी एक देवता इतिहासाच्या दृष्टीनं महत्त्वाची आहे. तिचं नाव 'हाथोर' आणि ती प्रेम, आनंद, संगीत, नृत्य मुलांचं संगोपन आणि गर्भवती स्त्रियांची देवता तसंच आकाशाचं प्रतीक मानली जाते.

ज्ञात इतिहासातली पहिली महिला राज्यकर्ती म्हणून जिचा अनेकदा उल्लेख केला जातो, त्या हाटशेसूट या इजिप्शियन राणीशी हाथोरचं नाव जोडलं गेलं आहे.

हाटशेसूट ही पहिली महिला फारो होती आणि सिंहासनावरचा आपला अधिकार सिद्ध करण्यासाठी ती आपण हाथोरची मुलगी असल्याचं सांगत असे.

हाथोरला गाईच्या रुपात दर्शवलं जातं आणि तिचं प्रतीक म्हणून कधीकधी गाईची पूजाही केली जात असे. हाथोर वेळप्रसंगी सेखमेत या देवतेचा अवतार घेताना दिसते, ही सेखमेत भारतातल्या कालीमातेशी साधर्म्य दाखवणारी वीरांगना देवी आहे.

ग्रीक आणि रोमन स्त्री-देवता

इतिहासाच्या पुस्तकांमध्ये तुम्ही ग्रीस आणि रोममधल्या संस्कृतीविषयी वाचलं असेल किंवा एखाद्या संग्रहालयात त्यांच्या देवदेवतांच्या मूर्ती पाहिल्या असतील.

ग्रीक देवता अथेना ही त्यातली प्रमुख स्त्री-देवता मानली जाते. पुढे याच देवीचं रोमनांच्या मिनर्व्हा या देवतेशी एकीकरण झालेलं दिसतं. अथेनाला बुद्धी, कला, युद्ध, देवतांची देवता आणि संस्कृती, सभ्यता, कायदा, गणित यांची जननी मानलं जातं.

ग्रीक दंतकथांचा भाग असलेली अथेना अनेकदा शुभ्रवस्त्रांकित रुपात दर्शवली जाते. रात्री अंधारातही पाहण्याची क्षमता असलेलं घुबड अथेनाचं प्रतीक आहे. या अथेनावरूनच ग्रीसच्या राजधानीचं 'अथेन्स' असं नामकरण झालं.

तर अॅफ्रोडेईटी ही ग्रीस देवता आजही प्रेमाची, कामभावनेची देवता म्हणून ओळखली जाते. इंग्रजित अॅफ्रोडिजिया (प्रबळ कामभावना) हा शब्द तिच्यावरूनच आला.

वसंत ऋतूच्या आगमनाशी संबंधित सणांमध्ये या देवीचा प्रामुख्यानं उल्लेख येतो.

रोमन संस्कृतीत तिला व्हीनस हे नाव मिळालं. एक सौंदर्यवती, शुक्राची देवता आणि समुद्रातून जन्मलेली म्हणून व्हीनस ओळखली जाते.

जपानची सूर्यदेवता अमातेरासू

एरवी अनेक संस्कृतींमध्ये सूर्याचा पुरुषवाचक उल्लेख केला जातो किंवा तो पुरुष रुपातील देव मानला जातो.

पण जपानच्या शिंटो धर्मामध्ये सूर्याला स्त्रीरूपात, अमातेरासू या देवीच्या रूपात दर्शवलं आहे.

अमातेरासू ओमिकानी ही शिंटो धर्मातली प्रमुख देवी असून तिच्या नावाचा अर्थ काहीसा "स्वर्गातून तेजानं उजळणारी महान देवी" असा होतो.

कहाणीनुसार अमातेरासूचा भाऊ सुझानो हा समुद्र आणि वादळांचा देव आहे. एकदा दोघांचं भांडण झालं आणि त्यानंतर अमातेरासू एका गुहेत जाऊन लपली. त्यामुळं जगभर अंधकार पसरला. अमातेरासूची समजूत घातल्यावरच ती बाहेर आली, आणि विश्वात पुनः प्रकाश पसरला. सुझानोला स्वर्गातून बाहेर काढण्यात आलं.

चीनच्या ताओ धर्मात कुआन यिन (ग्वानयिन) ही देवी बुद्धी आणि पावित्र्याची देवी म्हणून ओळखली जाते.

कमळात विराजमान असलेली कुआन यिन करुणामयी असून तिचे हजार हात दयेचं प्रतीक आहेत असं तिच्या भक्तांना वाटतं.

लोकांच्या इच्छा पूर्ण कऱणारी आणि आजार दूर करणारी देवता म्हणूनही ती ओळखली जाते.

इश्तार इनान्ना आणि इश्चेल

चार-साडेचार हजार वर्षांपूर्वी मेसोपोटेमियात (म्हणजे आजच्या इराक आणि सिरियामध्ये) असिरियन आणि सुमेरियन सभ्यतांचा विकास झाला.

इथली एक प्रमुख देवता होती इश्तार, जी इनान्ना या नावानंही ओळखली जाते. काहींच्या मते या दोन वेगळ्या देवता आहेत.

पण इश्तार आणि इनान्ना दोघीही या प्रदेशात प्राचीन काळातल्या प्रमुख स्त्री-देवता होत्या. त्या प्रेम, शक्ती, युद्ध यांचं प्रतीक होत्या. आख्यायिकेनुसार आठ टोकं असलेला तारा आणि सिंह ही इश्तारची प्रतीकं आहेत.

तिकडे मायन संस्कृतीतही एका महिला रुपातील देवतेची पूजा प्रसव आणि युद्धाची देवी म्हणून केली जायची. तिचं नाव इश्चेल.

आजच्या मेक्सिको आणि दक्षिण अमेरिकेत तिच्यासंबंधी कथा ऐकायला मिळतात. इश्चेल ही चंद्राशी संबंधित देवी आहे. तिची नखं आणि कान जॅग्वार या बिबट्यासदृष्य प्राण्याचे आहेत आणि ती डोक्यावर साप धारण करते.

त्याशिवाय जगातल्या इतर अनेक संस्कृतींमध्येही पाणी, पृथ्वी, अग्नी अशा तत्त्वांची किंवा प्रेम, राग अशा भावनांची देवता म्हणून अनेकदा स्त्रीरुपातील देवतांची पूजा केली जाते.

पण धर्म आणि आध्यात्मात स्त्रीदेवतांना असलेलं स्थान आणि महिलांना समाजात मिळणारी वागणूक यांची सांगड प्रत्येक ठिकाणी आहेच असं मात्र नाही.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)