नवरात्र विशेष : 'हो, मी मुस्लीम आहे आणि मला गरबा खेळायला आवडतं'

    • Author, समीना शेख
    • Role, बीबीसी गुजराती

नवरात्र म्हटलं की सगळीकडे गरब्याची धूम सुरू आहे. पण हा फक्त हिंदूंचा सण आहे आणि तेच तो साजरा करतात, असा एक समज आहे. प्रत्यक्षात खरच तसं आहे का?

अजिबात नाही. खरंतर दुसऱ्या धर्मातील लोकही गरबा खेळण्याचा आनंद लुटतात. गुजरातमध्ये तर अनेक मुस्लीम कुटुंब दरवर्षी गरबा खेळतात.

बीबीसी गुजरातीनं याच कुटुंबांतल्या काही मुलींशी बातचीत केली.

अहमदाबादमधील चांदखेडा इथे राहणारी झेबा दरवर्षी गरबा खेळते. "मला सुरुवातीपासूनच गरब्याविषयी आकर्षण होतं. माझ्या मित्र-मैत्रिणींमध्ये मी एकटीच मुसलमान आहे, म्हणून मला हिंदू परंपरांबद्दल माहिती आहे. पण त्यामुळे मी त्यांच्यापेक्षा वेगळी आहे असं मला कधीच वाटलं नाही," असं ती सांगते.

झेबा सांगते, "अब्बूंच्या नोकरीचं ठिकाण कालोल असल्याकारणानं आम्हाला चांदखेड्यात राहावं लागत होतं. तिथं मुस्लिमांची लोकसंख्या खूपच कमी असल्याने त्यांना त्या हिंदूबहुल भागात थोडं अस्वस्थ वाटायचं. त्यामुळे ते लखनौला निघून गेले. पण मला अहमदाबाद आवडलं म्हणून मी इथंच राहण्याचा आग्रह केला आणि अहमदाबादेतच थांबले."

झेबा पुढे सांगते की जेव्हा तिने आपली गरबा खेळण्याची आवड मैत्रिणींना सांगितली, तेवहा त्यांना आधी आश्चर्य वाटलं. पण तिनं मनातली इच्छा बोलून दाखवल्यांनतर त्या झेबाची मदत करण्यासाठी लगेच तयार झाल्या. "मग माझ्या मैत्रिणींनी मला गरबा खेळायला शिकवलं," ती सांगते.

"सोशल मीडियावर हिंदू-मुस्लीमविरोधी पोस्टची संख्या प्रचंड आहे. याचा नवीन पिढीवर परिणाम होतोय. यामुळेच वेगवेगळ्या धर्माच्या लोकांमध्ये भावनिक बंध कमी झाला आहे आणि दरी वाढत चालली आहे. नवीन पिढीनं ही दरी मिटवण्याचं काम करायला हवं," असं ती आवाहन करते.

आपण एकमेकांच्या सणावारात सहभागी झालो तर जवळीक निर्माण होऊ शकते, असं झेबाला वाटतं.

घरातच मिनी इंडिया

हेमा तारफ मंधरा या हिंदू असून त्यांनी मुस्लीम व्यक्तीशी लग्न केलंय. त्यामुळे त्यांच्या घरी दोन्ही धर्मांचे सण साजरे केले जातात. आमच्या घरात मिनी इंडिया वसतो, असं त्या म्हणतात.

"ईद, दिवाळी, नवरात्री आणि मोहर्रम असे सर्व सण आम्ही साजरे करतो. मी गरबा खेळला नाही, असं एखादंही वर्षं नसेल. फक्त गरोदर होते, त्या वर्षी फक्त मी गरबा खेळू शकले नव्हते," त्या अभिमानानं सांगतात.

हेमासोबत आता त्यांच्या वहिनीसुद्धा गरबा खेळतात. सुरुवातीला कुटुंबाचा विरोध होता, पण वेळेनुसार सर्व काही बदलत गेलं, असं त्या सांगतात.

"पाच वर्षं आम्ही आमच्या कुटुंबीयांपासून वेगळं राहिलो. पण आता मी माझ्या वहिनींसोबत गरबा खेळते. मीसुद्धा त्यांच्यासारखी बिर्याणी आणि शीरखुर्मा बनवायला शिकले आहे," असं हेमा सांगतात.

ज्या लोकांचं तुमच्यासोबत भावनात्मक नातं असतं, ते प्रत्येक कठीण समयी तुमच्यासोबत असतात, असं हेमा सांगतात.

मुलानं हिंदू आहे की मुसलमान असं विचारलं तेव्हा....

हेमा एक किस्सा सांगतात - "एकदा मला माझ्या मुलानं विचारलं की आपण हिंदू आहोत की मुसलमान. मी त्याला सांगितलं की आपण दोन्हीही आहोत. तू लोकांना असं सांगायला हवं की मी वडिलांसोबत मशिदीत जातो आणि आईसोबत मंदिरातही जातो."

पण समाज हा प्रश्न विचारू लागतो तेव्हा काय? असं विचारल्यावर हेमा सांगतात, "गुजरातच्या शांत भागांपैकी एक असलेल्या सौराष्ट्रात मी राहते. आजपर्यंत मला कोणत्याही प्रकारचा त्रास झालेला नाही."

गरबा खेळण्यामुळे शेजारी नाराज

अहमदाबादमधील बुशरा सय्यद ही सध्या विज्ञानाची रिसर्च स्कॉलर आहे. तिलाही गरबा खेळायला खूप आवडतं.

"गरबा खेळायची संमती मिळवण्यासाठी आधी भीती वाटायची, पण आता सहज संमती मिळते. मी कॉलेजमध्ये मैत्रिणींसोबत गरबा खेळायला जायची," असं ती सांगते.

"कुटुंबीय तर विरोध करत नाहीत पण शेजारी मात्र प्रश्न विचारतात - 'तू गरबा का खेळतेस? आपण गरबा नको खेळायला'."

बुशराला सुरुवातीला या प्रश्नांमुळे त्रास व्हायचा, पण आता ती शेजाऱ्यांना उत्तर देते. "एखाद्या शेजाऱ्यानं मला प्रश्न विचारल्यावर आता मी सांगते की मला गरबा खेळायला आवडतं आणि मी गरबा खेळायला जात आहे."

"मी आतापर्यंत तीनदाच गरबा खेळायला गेले आहे, पण या सणासोबत माझं नातं फार पूर्वीपासूनचं आहे. माझी हिंदू मैत्रीण सणादरम्यान माझ्याकडून नवीन ट्रेंडचे कपडे आणि दागिने घ्यायला यायची."

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)