या कारणामुळे तिच्या आई-वडिलांनी सासरच्या घरासमोर तिचा मृतदेह जाळला

    • Author, मानसी देशपांडे
    • Role, बीबीसी मराठीसाठी, सोलापूरहून

काही दिवसांपूर्वीच National Crime Records Bureau (NCRB) ने आकडेवारी जाहीर केली. त्यात असं सांगितलं की 2021 मध्ये महिलांविरोधात झालेल्या घरगुती हिंसाचाराच्या गुन्ह्यांची संख्या महाराष्ट्र राज्यात 10,095 इतकी आहे. तर हुंड्यासाठी 172 महिलांची हत्या करण्यात आली आहे.

दरवर्षी ही आकडेवारी प्रसिद्ध होत असते. पीडित महिलांची संख्या कमी-अधिक होताना दिसते पण त्यांच्यावरील अत्याचाराचे चक्र थांबताना मात्र दिसत नाही.

सरकार आकडेवारी प्रसिद्ध करतं, पण त्या आकड्यांपाठीमागे एक चेहरा असतो जो अत्याचाराला बळी पडतो.

एप्रिल 2022 मध्ये 24 वर्षीय विवाहितेला ठार करून सासरच्या लोकांनी आत्महत्येचा बनाव केला. पण हा प्रकार उघडकीस आल्यानंतर मुलीच्या माहेरच्या कुटुंबीयांनी उद्विग्न मनःस्थितीतून मुलीवर अंत्यसंस्कार केले.

या घटनेनी महाराष्ट्राचे मन सून्न केले होते. ही घटना घडल्यावर बीबीसी मराठीने त्या गावाला भेट दिली होती. त्या गावात नेमकं काय घडलं, त्या मुलींच्या कुटुंबीयांची परिस्थिती काय आहे आणि आपल्या मुलीला शेवटचा निरोप त्यांनी असा का दिला हे समजून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला.

पुणे- सोलापूर हायवेवर टेंभूर्णीकडे जाण्यासाठी एक फाटा आहे. अंजलीचं माहेर असलेलं गाव उंबरपारे आणि सासर मिटकलवाडी या गावात. या दोन्ही गावांसाठी जवळचं मोठं शहर म्हणजे टेंभुर्णी.

टेंभुर्णीहून उंबरपागे हे गाव तसं 10-12 किलोमीटर अंतरावरच. पण अंजलीच्या आई-वडिलांच्या घरी पोहोचण्यासाठी 45 मिनिटांहून अधिक वेळ लागला. कारण ते गाव आत होतं. रस्ते अरुंद आणि खराब होते.

पण एक गोष्ट नमुद करण्यासारखी होती. टेंभुर्णीहून त्या रस्त्याला लागल्यावर मे महिना असतानाही भरपूर हिरवळ होती. मोठे मोठे कालवे पाण्याने भरुन वाहत होते. बहुतांश घरं ही शेतातच होती. शेतांमध्ये ऊस डोलत होता.

अंजलीच्या आई वडिलांचं घरही असंच शेतात होत. त्यांचं एकत्र कुटूंब होतं. तिचे आई वडील, चुलते यांची शेताच्या समोरच्या आवारात जवळ जवळ घरं होती.

पाठीमागे ऊसाचं शेत. शेतकरी घरांमध्ये पाळली जाणारी जनावरं मोकळ्या अंगणात दिसली. गायी, म्हशी, कोंबड्या अशी पाळीव पशूधन होतं. तिच्या सासर आणि माहेरच्या कुटुंबाच्या उपजीविकेचं साधन शेती हेच होतं.

तिथे पोहोचल्यावर अंजलीच्या एका काकांच्या घराच्या ओसरीमध्ये सगळ्यांची बसायची व्यवस्था केली होती. ओसरीत सतरंज्या घालून घरातले पुरुष, वयस्कर महिला तिथे बसल्या होत्या. आम्ही पोहोचल्यावर अंजलीची आई पण आली. अंजलीला जाऊन 12 दिवसच झाले होते. अंजलीची आई डोळ्यातलं पाणी लपवण्याचा प्रयत्न करत होती.

तिच्या वडिलांच्या चेहऱ्यावर दुःख स्पष्ट दिसत होतं तर लहान भावाच्या मनातल्या संतापाने होणारी घालमेल चेहऱ्यावर उमटत होती. तिच्या कुटूंबियांनी आतापर्यंतचा घटनाक्रम सांगितला.

तिच्या लग्नाच्या आधीचं आयुष्य, आवडी निवडी, लग्न झाल्यावरचे बदल हे सगळं नमूद केलं. अंजली आंणि तिच्या बाळाचा फोटो दाखवताना मात्र तिच्या आईला अश्रू अनावर झाले. घरातल्या बाकीच्या महिलांच्या डोळ्यातही पाणी तरळलं.

तिथून माहिती घेतल्यावर आम्ही तिच्या सासरच्या घरी जायला निघालो. उंबरपागेवरून मिटकलवाडी हे जवळपास 10 किलोमीटरवर आहे.

कच्च्या रस्त्याने जाताना आजूबाजूला पाणवठे आणि हिरवीगार शेतं दिसत होती. एका प्रचंड मोठ्या कालव्याला लागून तिचं घर होतं. मागे त्यांचं शेत होतं. त्यातही ऊसाचे आणि इतर पीकं होती.

तिच्या सासरचं घर हे एका टोकाला होतं. तिच्यावर ज्या समोरच्या अंगणात अंत्यसंस्कार झाले तिथे चितेच्या खूणा होत्या.

घराला कुलुप होतं. पण अंगणात बांधिलेली काही गुरं हंबरत होती. 20-25 कोंबड्या कुणी वाली नसल्यासारखं अंगणभर फिरत होत्या. अंजलीचे भाऊ सोबत आले होते.

तिच्या चितेकडे पाहत तिच्या कुटुंबीयांनी बोललेलं वाक्य माझ्या मनाला चिरून गेलं, 'आमच्या मुलीच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशीच तिच्या सासरच्या घरासमोर तिच्यावर अंत्यसंस्कार केला.'

तिच्या घराच्या मागच्या बाजूला शेताकडे जायच्या पायवाटेच्या बाजूला 2 कच्च्या बांधलेल्या विहरी होत्या. त्यातल्याच एका विहिरीमध्ये तिचा मृतदेह सापडला होता.

त्या दिवशी काय घडलं?

सोलापूर जिल्ह्यातलं मिटकलवाडी हे छोटंसं गाव. पण मे महिन्यात झालेल्या एका घटनेमुळे हे गाव चर्चेत आलं. 24 वर्षांची विवाहित अंजली सुरवसे ही 30 एप्रिलच्या दुपारपासून बेपत्ता होती.

अंजलीचा मृतदेह सापडल्यावर माहेरच्या लोकांनी तिच्या घरासमोरच तिचा अंत्यसंस्कार केला. त्यावेळेस मोठा पोलीस बंदोबस्तही होता. असं नेमकं काय घडलं की, अंजलीच्या नातेवाईकांनी हे पाऊल उचललं?

1 मेला अंजलीच्या लग्नाचा वाढदिवस होता. पण हा आनंदाचा दिवस दुःस्वप्न बनेल असं कुणीही विचार केला नव्हता. 30 एप्रिलला दुपारपासून अंजलीचा पत्ता नव्हता. शोध सुरू होता.

मध्यरात्री तिचा मृतदेह घराच्या मागच्या बाजूला असलेल्या विहिरीमध्ये सापडला.

अंजलीने आत्महत्या केली असं म्हणायला सासरच्या लोकांनी सुरुवात केली.

पण अंजलीची आत्महत्या नसून कौटुंबिक छळातून हत्या झालेली आहे, असा अंजलीच्या माहेरच्या कुटुंबीयांनी आरोप केला.

अंजलीला गमावण्याचं दुःख आणि संतापामधून तिच्या माहेरच्या कुटूंबियांनी नवऱ्याच्या घराच्या अंगणातच तिची चिता रचली.

अंजलीच्या लग्नाला 1 मे रोजी 6 वर्ष पूर्ण होणार होती. तिचा सासरी छळ व्हायचा असं तिच्या कुटूंबाचं म्हणणं आहे. अंजलीच्या माहेरच्यांच्या तक्रारीवरुन टेंभुर्णी पोलिसांनी सासरकडच्या 6 लोकांवर गुन्हा दाखल केला आहे.

यात सासू, पती, दीर, 2 नणंदा आणि एका नणंदेचा पती यांचा समावेश आहे. यातील 4 लोकांना पोलिसांनी अटक केली आहे.

'एक ना एक दिवस परिस्थिती बदलेल'

ही हत्या आहे की आत्महत्या असा संभ्रम आधी झाला होता. पण पोस्ट मार्टमनंतर चित्र स्पष्ट झाल्याचं पोलीस सांगतात.

"प्रथमदर्शनी तिच्या शरीरावर काही बाह्य खुना दिसत नव्हत्या ज्यामुळे हे स्पष्ट होईल की तिची हत्या झाली आहे. पोस्ट मार्टम झाल्यावर डॉक्टरांच्या लक्षात आलं की अंतर्गत जखमा झाल्या आहेत. खांद्यांच्या हाडं आतून निखळली आहेत.

"त्यातून अंतर्गत रक्तस्त्राव झाला आणि त्यातून मृत्यू झाला असा पोस्ट मार्टमचा अहवाल 5 मेला डॉक्टरांनी आम्हाला दिला. त्यातील आरोपींवर 302 हे हत्येचं कलम लावले आहेत. कौटुंबिक हिंसाचाराची कलमं लावली आहेत," असं सुरेश निंबाळकर, पोलीस निरीक्षक टेंभुर्णी पोलीस ठाणे यांनी सांगतिलं.

अंजलीला सासरी होणाऱ्या त्रासाची कल्पना तिच्या माहेरच्यांना होती. पण एक ना एक दिवस परिस्थिती बदलेल या आशेवर तिच्या घरात त्यांनी फार हस्तक्षेप केला नाही.

मुलगा झाल्यावर तरी तिचा त्रास कमी होईल अशी त्यांना अपेक्षा होती पण तसं झालं नाही असं त्यांचं म्हणणं आहे.

अंजलीचा भाऊ अजय कदमने सांगितले, "रात्री 2 वाजता तिचा मृतदेह सापडला. रात्री टेम्पोने आम्ही पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली. 6 जणांविरोधात. तिची आत्महत्या नाही हत्या आहे हे स्पष्ट होतं, कारण तिला पोहता यायचं. तिला सासूकडून जाच व्हायचा. नवरा लक्ष द्यायचा नाही. या गोष्टी आम्हाला आधी माहीत होत्या. त्यावरुन तिची हत्या झाली हेच आम्हाला वाटतं.

"आमच्या मुलीला इतक्या क्रूरपणे मारलं. समाजात पण संदेश द्यावा की कोणत्याही मुलीला असा त्रास देणं चुकीचं आहे. त्यामुळे आम्ही तिच्याच घरासमोर तिचा अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेतला.

"तिची सासू आणि नणंदा छळ करायच्या. तिला सांगितलं जायचं की तू काम केलं पाहिजे. तिने एकटनीचे काम करावं यासाठी तिला त्रास दिला द्यायचा. लग्नाच्या वेळी त्यांनी हुंडा 2 लाख मागितले होते. काही वर्षांआधी ऊसतोडणीसाठी 2 लाख मागितले.

"तिला मारहाण पण व्हायची. तिला मानसिक त्रास व्हायचा. तिच्यामार्फत आम्हाला पैसे मागायचे. याविषयी आम्ही लक्ष घालण्याचा प्रयत्न केला. पण जर काही तक्रार केली तर तिला अजून त्रास देऊ किंवा नांदवणार नाही असं त्यांनी एकंदरीत दाखवलं," अजय सांगतो.

"त्यामुळे संसार चांगला चालावा यासाठी आम्ही जास्त हस्तक्षेप केला नाही. तिला न्याय मिळण्यासाठी त्यांच्याविरोधात तक्रार केली त्यांना कडक शिक्षा व्हायला हवी," अंजलीचा लहान भाऊ अजय कदम याने सांगितलं.

अंजलीला सासरी त्रास व्हायचा आणि त्याबद्दल ती घरी सांगायची असं अंजलीची आई अलका कदम यांनी सांगितलं.

"ती घरी आली की सांगायची की सासरी काय त्रास होतो. तिला रोज गुरांचं वैरणपाणी करावं लागायचं. शेतात खुरपणी करायची. सगळं तीच एकटी करायची. लग्नानंतर 6 महिन्यांनतर त्रास सुरू झाला.

"आम्ही सांगायचो की, नोकरी नाही म्हटल्यावर शेतातलं काम करावं लागायचं. तिने आधी कधी शेतातली गुरांची कामं घरी केली नव्हती. तिला तिथे गेल्यावर करावं लागायचं. आम्ही पण म्हणायचो की शेतकरी आहेत तर करावंच लागणार असं वाटायचं," अलका कदम यांनी सांगतिलं.

'पण त्रास तर कमी झाला नाही शेवटी ती गेल्याचीच बातमी आली', असं अलका कदम सांगतात.

आकडेवारी काय सांगते?

2021 मध्ये देशात एकूण 4,28,278 महिलांवरील अत्याचाराच्या घटना घडल्या आहेत.

महिलांविरोधातील अत्याचारांमध्ये महाराष्ट्राचा तिसरा क्रमांक आहे. पहिला क्रमांक उत्तर प्रदेश आणि दुसरा क्रमांक हा राजस्थानचा आहे.

केवळ कौटुंबिक हिंसाचाराचा विचार केला असता 2021 मध्ये राज्यात झालेल्या महिलाविरोधातील गुन्ह्यांची संख्या 10,095 इतकी आहे.

National Crime Records Bureau च्या आकडेवारीनुसार 2020 साली महाराष्ट्रात नवरा आणि सासरच्या कुटुंबीयांकडून हिंसाचार होण्याच्या 6,729 घटना झाल्या. 2021 मध्ये यामध्ये वाढ झाली आहे.

2021 च्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात एकूण 172 महिलांना हुंड्यासाठी आपले प्राण गमवावे लागले आहेत. तर सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करणासाठी प्रवृत्त करण्यात आलेल्या महिलांची संख्या 927 आहे.

पण या फक्त रेकॉर्डवर आलेल्या घटना आहेत. बऱ्याच वेळा, कौटुंबिक हिंसाचाराच्या विरोधात बोलण्यासाठी महिला पुढे येत नाही, असं या क्षेत्रात काम करणाऱ्या तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्यामागेही बरीच कारणं असतात असं ते स्पष्ट करतात.

घरगुती हिंसाचार हा प्रकार भारतात नवीन नाही. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, जगातील तीन महिलांपैकी एक महिला लिंगभेदाशी संबंधित हिंसेचा सामना करते आणि हे गुणोत्तर भारतात लागू होतं.

40 टक्क्यांहून अधिक महिला आणि 38 टक्क्यांहून अधिक पुरुषांनी नुकत्याच झालेल्या सरकारी सर्वेक्षणात म्हटलं की, जर एखादी महिला तिच्या सासरच्या मंडळींचा अनादर करत असेल, घर आणि मुलांकडे दुर्लक्ष करत असेल, न सांगता बाहेर जात असेल, सेक्ससाठी नकार देत असेल आणि नीट जेवण शिजवत नसेल, तर पुरुषाने महिलांना मारहाण करणं हे योग्य आहे.

सासरचा जाच मुली सहन का करतात?

या प्रश्नाचे स्वरूप समजून घेण्यासाठी बीबीसी मराठीने अॅड. अर्चना मोरेंशी संपर्क साधला त्या सांगतात, "मुली कायद्याची मदत का घेत नाहीत याचं दुसरं कारण असंही आहे की आपल्याकडे वैवाहिक मुलीं होणाऱ्या अत्याचाराविरोधात कायदे कोणते आहेत, तर IPC 498 अ, 304 ब.. पण या अंतर्गत जर मला तक्रार द्यायची आहे तर मला पोलिस स्टेशनमध्ये जावं लागणार. नवऱ्याला आणि सासरच्या लोकांना अटक होऊ शकेल. एकदा अटक झाली की सून ब्लॅकलिस्ट होते."

"माहेरी राहणे किंवा सासरचा छळ सहन करत राहणे या पलीकडे तिसरं राहण्यासाठी ठिकाण नसल्याने त्यांना ते सहन करावं लागत. एकट्या राहणाऱ्या मुलींना समाजाने स्वीकारलं नाहीये. 304 ब हे कलम मुलगी मृत झाल्यावर आहे. तिला तिच्या हक्कांसाठी भांडता यावं यासाठीचं हे कलम नाहीये. समाजव्यवस्था अशी आहे की, जेव्हा मुलीचा सासरी छळ होतो आहे हे आईवडिलांना माहिती असतं. तेव्हा ते सासरच्यांच्या विरोधात बोलत नाहीत," असं महिलांच्या प्रश्नांवर काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या अॅडव्होकेट अर्चना मोरे यांनी सांगितलं.

दुसरी गोष्ट म्हणजे की कौटुंबिक छळाच्या फौजदारी गुन्हांमध्ये तो सिद्ध करण्यासाठी पुरावे गोळा करणं कठीण होऊन बसतं. मग तो गुन्हा कोर्टात सिद्ध कसा होणार, हा प्रश्न निर्माण होतो.

"कौटुंबिक छळाच्या घटना या चार भिंतींमध्ये घडलेला असतात. तुम्ही प्रत्येक घटनेची नोंद ठेवत नाही. पुराव्याच्या निकषांमध्ये ते बसलं पाहिजे. पुरावे नाहीत म्हणून तुमच्यावर झालेली हिंसा तुम्ही सिद्ध करू शकत नाही. सिद्ध केली तरी शिक्षा किती होणार आहे आणि झाली तरी संसार तुटणार आहे. या सगळ्या परिस्थीतीचा विचार करुन महिला संघटनांनी वेळोवेळी मागणी गेली की कौटुंबिक हिंसेविरोधात दिवाणी स्वरूपाचा कायदा हवा.

2005 साली कौटुंबिक छळापासून स्त्रियांचं संरक्षण हा कायदा आपल्याला मिळाला. या कायद्यामध्ये जमेची बाजू अशी आहे की, पत्नी आपल्या घरात राहूनच स्वतःचे हक्क मागू शकते. तिला घर सोडून जाण्याची गरज नाही, मोरे सांगतात.

"कुठलीही स्त्री, तिच्या लग्नाच्या नात्यात असेल किंवा रक्ताच्या नातेवाईकांमध्ये असेल, दत्तकत्वाच्या नात्यामध्ये छळ होत असेल किंवा लग्ना सारख्या नात्यामध्ये असेल जसे की लिवइनमध्ये तर ती स्त्री या कायद्याअंतर्गत दाद मागू शकते," अर्चना मोरे यांनी सांगतिलं.

अंजलीच्या मृत्यूनंतर तिच्या घरच्यांनी ठरवलंय की यापुढे घरातल्या इतर मुलींनी केलेल्या छळाच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करायचं नाही. पण जोपर्यंत आपल्यावर होणाऱ्या छळाविरोधात बोलण्यासाठी महिला पुढे येत नाहीत तोपर्यंत हे चक्र थांबणार नाही.

हुंडाबळी

जरी भारताने 1961 साली हुंडा प्रथेवर बंदी आणली असली, तरी वधूच्या कुटुंबाकडून वराच्या कुटुंबाला रोख रक्कम, सोने आणि इतर महागड्या वस्तू भेट देण्याची शतकानुशतके जुनी परंपरा कायम आहे.

नुकत्याच झालेल्या जागतिक बँकेच्या अभ्यासानुसार, ग्रामीण भारतातील 95 टक्के विवाहांमध्ये हुंडा दिला जातो.

हुंडाविरोधी काम करणाऱ्यांच्या मते, पुरेसा हुंडा न दिल्याने नववधूंचा अनेकदा छळ केला जातो. अनेकदा सासरच्या मंडळींकडून वधूची हत्याही केली जाते.

अनेकदा पीडितेला जाळलं जातं आणि 'स्वयंपाक घरातील अपघात' असं सांगितलं जातं.

1983 साली भारतानं हुंडाबंदीसाठी कलम 498-अ कायदा आणला. मात्र, तरीही हुंड्यामुळे बळी जातच आहेत.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)