You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
मान्सून परतीचा प्रवास कधी सुरू करेल?
- Author, जान्हवी मुळे
- Role, बीबीसी प्रतिनिधी
महाराष्ट्रात सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पावसानं पुन्हा जोर धरलेला दिसला.
गेल्या आठवडाभरात मुंबई, पुण्यासह अनेक जिल्ह्यांमध्ये संध्याकाळी जोरदार पाऊस आणि विजांचा थयथयाट पाहायला मिळाला. पुण्यात तर कमी कालावधीत जास्त पाऊस पडल्यानं अनेक ठिकाणी रस्त्यांवर, घरांमध्ये पाणी शिरलं.
आता पॅसिफिक महासागरात 'ला निना' स्थिती निर्माण झाल्याचं ऑस्ट्रेलियन हवामानखात्यानं जाहीर केलंय. ला निनाचा प्रभाव भारतातल्या मान्सूनच्या वाटचालीवरही होत असतो.
त्यात मान्सून कधी परत फिरेल याविषयी हवामान खात्यानं अजून निश्चित भाकित केलेलं नाही.
त्यामुळे आता अनेकांना प्रश्न पडला आहे की, पाऊस कधी थांबेल आणि मान्सूनचा म्हणजे नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा परतीचा प्रवास कधी सुरू होईल?
मान्सून परतीचा प्रवास कसा, कधी सुरू करतो?
भारतात साधारण जून ते सप्टेंबर या कालावधीत नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा प्रभाव दिसून येतो. एरव्ही सामान्यतः सप्टेंबरच्या मध्यावर वायव्य भारतातून म्हणजे राजस्थानातून मान्सूनच्या परतीचा प्रवास सुरू होतो. यालाच इंग्रजीत 'मॉन्सून विड्रॉवल' असं म्हटलं जातं.
हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार एखाद्या ठिकाणाहून मान्सूननं माघार घेतली आहे की नाही, हे ठरवण्याचे काही मापदंड असतात. त्यात पावसाचं प्रमाण (सलग पाच दिवस पावसाविना कोरडे राहणं) तसंच वाऱ्यांची दिशा यांचाही विचार केला जातो.
ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत मान्सूननं महाराष्ट्रातून पूर्णतः माघार घेतलेली पाहायला मिळते.
दक्षिण भारतात ईशान्य मोसमी वाऱ्यांचा प्रभाव सुरू होतो. या वाऱ्यांमुळे ऑक्टोबर ते डिसेंबर या काळात दक्षिण भारतात, विशेषतः तामिळनाडूमध्ये आणि कर्नाटक, आंध्र प्रदेश, केरळच्या भागात पाऊस पडतो.
पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी की या सगळ्या तारखा टेंटेटिव्ह म्हणजे केवळ सूचक तारखा आहेत. मान्सून असं कुठलं वेळापत्रक तंतोतंत पाळत नाही. दरवर्षी त्या त्या वेळच्या स्थानिक परिस्थितीनुसार मान्सूनच्या वेळांमध्ये बदल होतो.
मान्सूनचा परतीचा प्रवास लांबणीवर का पडला?
यंदा ऑगस्ट महिन्यात हवामान खात्यानं मान्सून यंदा लवकर माघार घेईल असा अंदाज व्यक्त केला होता. सप्टेंबरच्या मध्यापर्यंत मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू होईल असं भाकित करण्यात आलं होतं. पण आठवडाभरातच हवामानखात्यानं सुधारीत भाकित जाहीर केलं की, सप्टेंबरच्या किमान पहिल्या दोन आठवड्यांत मान्सून सक्रिय राहील.
यामागचं कारण हवामान विभागाचे महासंचालक एम मोहपात्रा यांनी स्पष्ट केलं होतं. त्यानुसार यंदा सप्टेंबरच्या सुरुवातीला बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालं होतं, ज्याचा परिणाम मान्सूनच्या प्रवासावर झाला.
याच कमी दाबाच्या क्षेत्रामुळे महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये वादळी पाऊस पडला.
मोहपात्रा म्हणाले की "राजस्थानात इतक्यात पाऊस पूर्णपणे थांबण्याची चिन्हं नाहीत. त्यामुळे आम्ही मान्सूनच्या माघार घेण्याविषयी इतक्यात कोणतंही भाकीत करत नाहीये. आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत आणि सुधारीत अंदाज वेळोवेळी वर्तवत राहू."
याआधी मान्सून कधी माघारी फिरला होता?
मान्सून आणखी काही काळ रेंगाळणं, ही नवी गोष्ट नाही. गेल्या वर्षीही मान्सूननं देशातून उशीरा माघार घेतली होती. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात राजस्थानातून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाला. 22 ऑक्टोबरपर्यंत जवळपास पूर्ण महाराष्ट्रातून मान्सूननं माघार घेतली होती.
2010 ते 2021 या कालावधीत पाचवेळा मान्सूननं उशीरा म्हणजे 25 ऑक्टोबरला किंवा त्यानंतर माघार घेतल्याचं हवामान खात्याच्या रेकॉर्डमधून स्पष्ट होतं.
यंदा महाराष्ट्रात किती पाऊस पडला आहे?
यंदा मोसमाच्या सुरुवातीलाच मान्सूननं वेळापत्रक मोडलेलं दिसलं. मे महिन्यात असनी चक्रीवादळाच्या प्रभावामुळे मान्सूनला गती मिळाली आणि तो 16 मे रोजी म्हणजे वेळेआधीच अंदमानमध्ये दाखल झाला. पण तिथून मान्सूनचा प्रवास काही काळ रेंगाळला.
महाराष्ट्रात यंदा मान्सूनच्या सुरुवातीला पावसानं दडी मारलेली पाहायला मिळाली. पण जुलैमध्ये पावसानं जणू सगळी कसर भरून काढली.
सप्टेंबर महिन्यात तर राज्यात सर्वच जिल्ह्यांमध्ये अतिरिक्त पाऊस झाल्याचं चित्र आहे. त्यामुळे यंदाच्या मोसमातल्या एकूण सरासरी पावसाची आकडेवारीही समाधानकारक दिसते आहे. राज्यात यंदा बहुतांश जिल्ह्यांमध्ये एकतर सरासरीएवढा किंवा सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे.
उत्तर भारतात गंगा नदीच्या खोऱ्यात तसंच ईशान्य भारताच्या काही भागांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. तर दक्षिण भारतात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. किनारी प्रदेशात बहुतांश ठिकाणी सरासरीएवढा पाऊस झाला आहे.
पॅसिफिक महासागरात 'ला निना'चा प्रभाव
भारतात आता यापुढच्या काही महिन्यांमधल्या हवामानावर 'ला निना' मुळे परिणाम होण्याचीही शक्यता आहे.
यंदा सलग तिसऱ्या वर्षी पॅसिफिक महासागरात 'ला निना' स्थिती निर्माण झाल्याचं हवामान शास्त्रज्ञांनी जाहीर केलं आहे.
ला निना, म्हणजे पॅसिफिक महासागराच्या दक्षिण भागात पूर्वेकडून पश्चिमेकडे म्हणजे दक्षिण अमेरिका खंडाकडून आशिया खंडाकडे वाहणारा थंड पाण्याचा प्रवाह.
मुळात पॅसिफिक महासागर हा पृथ्वीवरचा सर्वांत मोठा महासागर असल्यामुळे तिथल्या वारे आणि प्रवाहांचा जगावर थेट परिणाम होताना दिसतो. साहजिकच ला निना परिस्थिती भारतावरही परिणाम करू शकते.
'ला निना'च्या काळात भारतात नेहमीपेक्षा जास्त पाऊस पडू शकतो आणि विशेषतः उत्तर भारतात थंडीचं प्रमाणही वाढतं.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)