छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेली सुरतेची लूट आणि मुंबईच्या विकासाचं काय कनेक्शन होतं?

छ. शिवाजी महाराज

छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील अनेक थरारक घटना आपण लहानपणापासूनच ऐकतो. मग ती लाल महालावर केलेला धाडसी हल्ल्याची असेल किंवा आग्र्याहून स्वतःची केलेली सुटका असेल! यापैकीच एक म्हणजे सूरतेची लूट!

महाराजांनी सूरत दोनदा लुटली. त्यापैकी पहिली लूट छत्रपती शिवाजी महाराजांनी 5 जानेवारी 1664 रोजी आपल्या घोडदळासह सूरतेत थडकून यशस्वी केली होती.

मराठ्यांच्या इतिहासातील हा कालखंड प्रचंड संघर्षाचा आणि धकाधकीचा आहे. 1661 ते 1663 दरम्यान मुघल बादशाह औरंगजेब यांचे बडे सरदार आणि मामा शाहिस्तेखान दख्खन मोहिमेवर होते. या दोन वर्षांच्या काळात दख्खनमधील शेतांची राखरांगोळी झाली होती, असं सर जदुनाथ सरकार यांनी त्यांच्या 'Shivaji and His Times' या पुस्तकात लिहिलं आहे.

शिवाजी महाराजांना स्वराज्य उभारणीसाठी धनाची आवश्यकता होती. त्याचबरोबर शाहिस्तेखान यांच्यावर हल्ला करून त्यांना पळवून लावल्यानंतर महाराजांना मुघल दरबारातही आपला धाक निर्माण करायचा होता.

छत्रपती शिवाजी महाराजांनी दोनदा सूरत लुटली.

फोटो स्रोत, DEA / BIBLIOTECA AMBROSIANA

फोटो कॅप्शन, छत्रपती शिवाजी महाराजांनी दोनदा सूरत लुटली.

सूरत हे बंदर मुघलांचं प्रमुख बंदर होतं. याच बंदरातून मुघलांचा व्यापार पर्शियन आखातापर्यंत चालायचा. इथे अनेक गडगंज व्यापारी होते तसंच मक्का-मदिनेसाठी जाणारी जहाजंही याच बंदरातून जायची.

त्यामुळे सूरत लुटली तर मुघलांना जरब बसेल आणि विपुल संपत्ती पदरात पडेल, असा विचार शिवाजी महाराजांनी केला होता, असं 'Shivaji, His Life and Times' या ग्रंथात इतिहासकार गजानन भास्कर मेहेंदळे यांनी नमूद केलं आहे.

सूरतची दुसरी लूट आणि अफवांचं पीक

महाराजांनी पहिल्यांदा सूरत लुटल्यानंतर त्यांचा बिमोड करायला औरंगजेब यांनी मिर्झाराजे जयसिंह यांना पाठवलं. त्यानंतर महाराज आग्र्याला गेले आणि तिथून औरंगजेब यांच्या कैदेतून सुटून पुन्हा राजगडावर पोहोचले.

या दरम्यानच्या वर्षांमध्ये मराठे आणि मुघल यांच्यात पुरंदरचा तह झाला होता. त्या तहानुसार मराठ्यांना अनेक किल्ल्यांवर आणि मुलुखावर पाणी सोडावं लागलं होतं. शिवाजी महाराज राजगडावर परतल्यानंतर त्यांनी हा मुलुख ताब्यात घ्यायला आणि मुघलांच्या मुलुखातही हातपाय पसरायला सुरुवात केली.

सूरतेचे जुने चित्र

फोटो स्रोत, Picasa

फोटो कॅप्शन, सूरतमधून पर्शियापर्यंत माल जायचा. मुघलांचं हे एक प्रमुख बंदर होतं.

औरंगजेब यांना पुन्हा एकदा दणका देण्यासाठी शिवाजी महाराजांनी पहिल्या सूरत लुटीनंतर सहा वर्षांनी म्हणजे ऑक्टोबर 1670 मध्ये पुन्हा सूरतेवर चाल केली. या वेळी महाराजांनी तीन दिवस सूरत लुटली.

सूरतेचे जुने छायाचित्र

फोटो स्रोत, IndiaPictures

फोटो कॅप्शन, मुघलांना जरब बसण्यासाठी छ. शिवाजी महाराजांनी सूरत लुटण्याचा निर्णय घेतला.

या दुसऱ्या सूरत लुटीचा परिणाम असा झाला की, सूरतमध्ये मराठ्यांबद्दल प्रचंड दहशत पसरली. त्यानंतर जवळपास वर्षभर 'मराठे आले' अशा अफवा सूरतमध्ये उठायच्या आणि लोकांची पळापळ व्हायची. या दोन लुटींनंतर सूरतचं महत्त्व कमी व्हायला लागलं, असं निरीक्षण सर जदुनाथ सरकार यांनी नोंदवलं आहे.

पण मुंबई कनेक्शन काय?

शिवाजी महाराजांनी सूरत लुटली, तेव्हा मुंबईत काय परिस्थिती होती, तेही बघू या. पोर्तुगीजांनी राजकुमारी कॅथरिन ब्रिगेंझा हिच्या लग्नातला हुंडा म्हणून ब्रिटनला 1661 मध्ये मुंबई आंदण दिली होती.

ही वस्तुस्थिती असली तरी त्या वेळी वेगवेगळी असलेली ही सात बेटं ताब्यात घेण्यासाठी इंग्रज फारसे उत्सुक नसावेत. कारण फेब्रुवारी 1665 पर्यंत त्यांनी या बेटाचा ताबा घेतलाच नव्हता. म्हणजे शिवाजी महाराजांनी सूरत लुटली, तेव्हा मुंबई ब्रिटनच्या ताब्यात असूनही नसल्यासारखी होती.

मुंबई शहर

फोटो स्रोत, UniversalImagesGroup

फोटो कॅप्शन, सूरत शहर लुटले गेल्यावर इंग्रजांनी मुंबईवर अधिक लक्ष केंद्रित केले.

शिवाजी महाराजांनी पहिल्यांदा सूरत लुटली तेव्हा या लुटीचा थेट फटका सूरतमधल्या इंग्रजांच्या वखारीला बसला नव्हता. उलट त्या वेळी मराठ्यांसमोर ताठ मानेने उभ्या राहणाऱ्या खूप मोजक्या लोकांपैकी एक म्हणजे इंग्रज होते, असं सर्वच इतिहासकार नमूद करतात.

ब्रिटिशांची वखार त्या वेळी मराठ्यांच्या तडाख्यातून सहीसलामत सुटली असली तरी, मराठ्यांच्या एकूण शक्तीचा अंदाज त्यांना सूरत लुटीच्या निमित्ताने आणि एकंदरीत कोकण प्रांतात शिवाजी महाराजांनी अवलंबलेल्या आक्रमक धोरणामुळे आला होता.

दुसऱ्या सूरत लुटीनंतर मराठे या बंदरापर्यंत अगदी सहज पोहोचू शकतात, हे इंग्रजांना अगदी स्पष्ट जाणवलं. त्यामुळेच त्यांनी नव्याने त्यांच्या ताब्यात आलेल्या बेटाकडे, म्हणजेच मुंबईकडे लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला, असं मुंबईच्या रूईया महाविद्यालयातील इतिहास विभागाच्या प्रमुख डॉ. मोहसिना मुकादम सांगतात.

मुंबईचा विकास

मुंबईचा विकास करण्यात मुंबईचे दुसरे गव्हर्नर जेराल्ड आँजियर यांचा वाटा खूप मोठा आहे. इंग्रजांच्या वखारींमधल्या नोंदीप्रमाणे असं आढळतं की, हे आँजियर महाशय सूरत लुटीच्या वेळी सूरतमधल्या वखारीत होते.

मुंबईला इंग्रजांच्या काळात जे महत्त्व प्राप्त झालं, त्याची पायाभरणी आँजियर यांनी केली, असं 'गॅझेटियर ऑफ बाँबे'च्या पहिल्या खंडात म्हटलं आहे.

मुंबईचा जहाज उद्योग

फोटो स्रोत, Universal History Archive

फोटो कॅप्शन, 18 व्या शतकात मुंबईच्या जहाजबांधणी उद्योगाची पायाभरणी झाली.

मुंबईला सध्या जे महत्त्व प्राप्त आहे, त्यात मुंबईतल्या जहाजबांधणी उद्योगाचा वाटा लक्षणीय आहे. इंग्रजांनी सूरत लुटीच्या आधीही मुंबईत जहाज बांधणी उद्योगाला चालना दिली होती, पण दोन वेळा सूरत लुटल्यानंतर त्यांनी या कामाला वेग देण्याचा प्रयत्न केला, असं निरीक्षण R. K. कोच्चर यांनी 'Shipbuilding at Bombay' या आपल्या शोधनिबंधात नोंदवलं आहे.

कोच्चर पुढे असंही लिहितात की, सूरत लुटीनंतर ब्रिटिशांनी सूरतमधल्या जहाज बांधणीत कुशल असलेल्या वाडिया कुटुंबाला मुंबईत आणण्यासाठी प्रयत्न केले होते. पण मुघल बादशाह औरंगजेब यांनी कोणत्याही कुशल कामगाराला सूरत सोडण्याची परवानगी दिली नाही. अखेर 1736 मध्ये ही परवानगी देण्यात आली आणि वाडिया मुंबईत आले.

मुंबईतील जहाज बांधणी उद्योगाला यामुळे गती मिळाली. मुंबईतील कापूस आणि कापडगिरण्यांनी 19व्या आणि 20व्या शतकात जगाच्या नकाशावर मुंबईचा ठसा उमटवला, त्याची ही सुरुवात होती.

प्रशासकीय बाबी

भारताच्या पश्चिमेकडील इंग्रजांचा कारभार मुंबईआधी सूरतमधील वखारीतूनच चालायचा. मुंबईचा ताबा इंग्रजांनी घेतला तरी या बेटाची मालकी भाडेतत्त्वावर ईस्ट इंडिया कंपनीकडे देण्यात आली होती. या कंपनीमार्फतच भारतातील कारभार बघितला जायचा.

मुंबईचा ताबा इंग्रजांनी घेतल्यानंतरही अनेक दिवस मुंबईतील कारभाराबाबत सूरतमधील ईस्ट इंडिया कंपनीचे संचालक निर्णय घ्यायचे. याबाबत गजानन मेहेंदळे यांनी 'Shivaji, His Life and Times' या ग्रंथात अनेक दाखले दिले आहेत.

शिवाजी महाराजांनी 1672 मध्ये पहिल्यांदा खांदेरी किल्ला बांधायला घेतला, तेव्हा मुंबईतील इंग्रजांनी सूरतला पत्र लिहून याबाबत काय कारवाई करायची, अशी विचारणा केली होती. मराठ्यांनी इंग्रजांच्या काही बोटी आणि सैनिक ताब्यात घेतले, तेव्हाही काय करावं, हे विचारणारं पत्र मुंबईहून सूरतला गेलं होतं.

पण दुसऱ्यांदा सूरत लुटल्यावर इंग्रजांचा नूर पालटला आणि त्यांनी हळूहळू सूरतमधून आपलं बस्तान मुंबईला हलवायला सुरुवात केली.

सूरत लूट महत्त्वाची, पण...

काही इतिहास अभ्यासकांच्या मते मुंबईच्या जडणघडणीत सूरतेच्या लुटीचा वाटा मोठा आहे, पण ते काही एकमेव कारण नाही.

मुंबई विद्यापीठाच्या इतिहास विभागाच्या प्रमुख डॉ. मंजिरी कामत सांगतात की मुंबईचा विकास टप्प्याटप्प्याने झाला. सूरत लुटली गेली आणि मुंबईचा उदय झाला, असं एकदम झालं नाही.

एशियाटिक लायब्ररी

फोटो स्रोत, ullstein bild Dtl.

फोटो कॅप्शन, टप्प्याटप्प्याने मुंबईचा विकास झाला. नव्या इमारती बांधल्या गेल्या. टाऊन हॉल ही त्यापैकीच एक महत्त्वाची इमारत. आज येथे एशियाटिक लायब्ररी आहे.

इतिहास अभ्यासक राजनारायण चंदावरकरही नेमक्या याच मुद्द्याचा परामर्श विस्तृतपणे घेतात. 'Origin of Industrial Capitalism in India' या ग्रंथात त्यांनी मुंबईच्या उदयावर एक अख्खं प्रकरण लिहिलं आहे.

या प्रकरणात ते लिहितात की, सूरत हे काही झालं तरी मुघलांच्या ताब्यातलं बंदर होतं. 17व्या शतकाच्या उत्तरार्धात आणि 18व्या शतकात मुघल साम्राज्याला उतरती कळा लागली. मराठ्यांनी सूरत लुटली आणि या बंदरांचं महत्त्व एकदम कमी झालं.

सूरतेचं महत्त्वं कमी होण्याला मुघल साम्राज्याची उतरती कळा, हे प्रमुख कारण होतंच. पण त्याच बरोबर मराठा साम्राज्याचा आणि ब्रिटिशांचा उदय हेदेखील एक महत्त्वाचं कारण होतं.

ब्रिटिशांना हवा असलेला कच्चा माल मुंबईच्या आसपासच्या प्रदेशांमधून मिळणं जास्त सोपं होतं. त्यामुळे ब्रिटिशांनी मुंबईला पसंती दिली, असं चंदावरकर सांगतात.

पण काहीही झालं तरी 355 वर्षांपूर्वी घडलेल्या त्या घटनेचा परिणाम मुंबईच्या विकासावर मोठ्या प्रमाणात झाला. त्यामुळे या सूरत लुटीचं मुंबई कनेक्शन समजून घ्यायला हवं.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)