You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
बिंधास काव्या : औरंगाबादमधून बेपत्ता झालेल्या या यूट्यूबरला पोलिसांनी कसं शोधून काढलं?
- Author, श्रीकांत बंगाळे
- Role, बीबीसी मराठी
औरंगाबादमधील प्रसिद्ध यूट्यूबर 'बिनधास्त काव्या' सापडली आहे. मध्यप्रदेशच्या इटारसी इथून पोलिसांनी तिला ताब्यात घेतलं आहे.
गणपती विसर्जनाच्या (शुक्रवार, 9 सप्टेंबर) रात्रीपासून ती बेपत्ता होती. याबाबत तिच्या पालकांनी औरंगाबादच्या छावणी पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती.
त्यानंतर पोलिसांनी 'बिंदास काव्या'चा शोध घेत तिला इटारसी इथून ताब्यात घेतलं आहे.
पालकांनी काय म्हटलं?
शुक्रवारी दुपारी काव्याच्या पालकांनी तिच्या यूट्यूब चॅनेलवर एक व्हीडिओ टाकून या प्रकाराविषयी माहिती दिली.
त्यांनी म्हटलं, "काव्या 9 सप्टेंबरच्या 2 वाजेपासून मिसिंग आहे. ती रागाच्या भरात कुठेतरी निघून गेलीय. ती आमच्यापासून इतका वेळ दूर नाही राहू शकत. आम्ही तिचा शोध घेत आहोत. आम्ही एफआयआर दाखल केला आहे. आम्ही तिला रेल्वे स्टेशन, दवाखाने असं वेगवेगळ्या ठिकाणी शोधलं. पण ती सापडली नाही."
"माझ्या मुलीला शोधण्यात आमची मदत करा. नाहीतर मी मरून जाईन. आम्हाला केवळ माझी मुलगी हवीय," असं काव्याच्या आईनं या व्हीडिओत म्हटलं होतं.
पोलिसांनी अद्याप आमची काही मदत न केल्याचंही काव्याच्या पालकांनी 9 तारखेच्या व्हीडिओत म्हटलं होतं. त्यांचा हा व्हीडिओ 37 लाख लोकांनी पाहिला होता.
काव्याचं 'बिंधास काव्या' हे यूट्यूब चॅनेल 44 लाख जणांनी सबस्क्राईब केलं आहे.
पोलिसांनी असा लावला शोध
छावणी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक पी. जे. डाके यांनी काव्या बेपत्ता झाल्यापासून ते तिला शोधण्यापर्यंतचा प्रवास सविस्तरपणे बीबीसी मराठीला सांगितला.
ते म्हणाले, "मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार या मुलीच्या पालकांनी छावणी पोलीस स्टेशनमध्ये नोंदवली. त्यानुसार 363 कलमाअंतर्गत अपहरणाचा गुन्हा नोंदवण्यात आला. दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास ही मुलगी बेपत्ता झाल्याचं तिच्या पालकांनी सांगितलं. पालकांनी रात्री साडेनऊच्या सुमारास तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी संपूर्ण शहरातील सीसीटीव्ही कॅमेरे चेक केले. पण मुलगी काही त्यात आढळून आली नाही.
"त्यानंतर गणपती विसर्जनाच्या वेळी ती जिल्हा परिषदेच्या मैदानावर दिसल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तिथं पाहणी केली, पण ती तिथेही सापडली नाही. विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी पहाटे माहिती मिळाली की, ही मुलगी औरंगाबादहून लखनौला जाणाऱ्या ट्रेनमध्ये बसली आहे.
"त्यानंतर पोलिसांनी या मार्गावरील मनमाड, भुसावळ, खांडवा, इटारसी या रेल्वे स्टेशन्सवर प्रवाशांची तपासणी केली. तिथल्या प्रवाशांची पोलीस माहिती घेत राहिले. शेवटी इटारसी रेल्वे स्टेशनवर ती सापडली."
आता पुढची प्रक्रिया काय असेल असं विचारल्यावर डाके म्हणाले, "आम्ही सध्या या मुलीसोबत मध्यप्रदेशमध्येच आहोत. आता तिला नियमाप्रमाणे चाईल्ड वेल्फेअर कमिटीसमोर हजर केलं जाईल. या समितीच्या आदेशानुसार पुढील प्रक्रिया पार पडेल."
काव्या काय म्हणाली?
पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर काव्यानं माध्यमांशी संवाद साधला.
एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी बोलताना ती म्हणाली, "त्यादिवशी माझे आई-वडील खूप चिडचिड करत होते. वडील माझ्यावर अभ्यासावरून खूप रागावले होते. मला त्यांच्याकडून इतकं रागावण्याची अपेक्षा नव्हती. त्यामुळे मला पण त्यांचा खूप राग आला. म्हणून मी रागारागात घर सोडून चालले गेले.
"मी माझ्या आजीच्या घरी चालले होते. मला दुसरा कोणता रस्ता माहिती नव्हता. मला फक्त औरंगाबादहून मनमाड, मनमाडहून लखनौच्या ट्रेननं जायचंय एवढंच माहिती होतं. त्यांनाही माहिती होतं की मी येणार आहे. मग माझे भाऊ वगैरे लखनौला आलेले होते. मी तुमच्याकडे येतेय असं मी त्यांना कळवलं होतं."
काव्या पुढे म्हणाली, "रागाच्या भरात घरातून निघून गेले. पण बाहेर पडल्यानंतर हे असं जायला नव्हतं पाहिजे हे माझ्या लक्षात आलं. गावी पोहचल्यानंतर आई-बाबांना फोन करून सांगेन, असं मी ट्रेनमध्ये बसल्यानंतर ठरवलं होतं.
आता मी हात जोडून माझ्या आई-वडिलांची माफी मागते. आपले आई-वडील रागावत असतील तर नाराज व्हा, पण असं घर सोडून जाऊ नका, असं आवाहन मी मुलामुलींना करते."
काव्या आमच्यावर नाराज होऊन आमच्या मूळ गावी चालली होती. इटारसी येथे पोलिसांना ती सापडली आहे. औरंगाबाद पोलिसांनी फास्ट अॅक्शनमध्ये येऊन काम केलं. आम्ही त्यांचे आभारी आहोत, अशी प्रतिक्रिया काव्याच्या पालकांनी ती सापडल्यांतर दिली आहे.
बिंधास काव्या कोण आहे?
बिंधास काव्या ही यूट्यूबर आणि व्हीडिओ क्रिएटर आहे. यूट्यूबवर तिच्या चॅनेलला 44 लाख जणांनी सबस्क्राईब केलं आहे.
ती या चॅनेलवर वेगवेगळ्या विषयांवरचे व्हीडिओ टाकत असते. तिच्या व्हीडिओंना लाखो लोक पाहतात. लहान मुलं आणि तरुणांमध्ये तिचे व्हीडिओ लोकप्रिय आहेत.
यूट्यूब चॅनेलच्या डिस्क्रिप्शनमध्ये माहिती देताना तिनं स्वत:विषयी म्हटलंय, ''माझं नाव काव्या आहे. मला व्हीडिओ ब्लॉगिंग, प्रवास, गेमिंग आवडतं. मी 'डाऊन टू अर्थ' आहे. बिंधास काव्या हे चॅनल माझ्या पालकांच्या नियंत्रणाखाली आणि माझ्या आईच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. हे चॅनल माझी आई अन्नू. एस. यादव हाताळत आहेत.''
इन्स्टाग्रामवरही बिंधास काव्याचे 10 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)