You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कर्नाटकमध्ये 27 दिवस बेपत्ता असलेल्या बिबट्याचा कसा शोध घेतला जात आहे?
- Author, शर्लिन मोलान
- Role, बीबीसी प्रतिनिधी
कर्नाटक राज्यात गेल्या 27 दिवसांपासून ठावठिकाणा न लागलेल्या बिबट्याच्या शोधासाठी मोठी मोहीम राबवली जातेय.
हा बिबट्या 5 ऑगस्टला सर्वात प्रथम चर्चेत आला होता. बेळगावमधल्या एका मजुरावर या बिबट्याने हल्ला केला होता. हा व्यक्ती जखमी झाला असला तरी बचावला.
तेव्हापासून हा बिबट्या अधूनमधून दिसत राहतो. बेळगावच्या गोल्फकोर्स जवळ अनेकदा दिसला होता त्यामुळे रहिवाशांमध्ये भितीचं वातावरण आहे.
राज्याच्या वनविभागाने या बिबट्याच्या शोधार्थ 300 लोक पाठवले आहेत. या लोकांमध्ये प्राण्याचे डॉक्टर्स, शार्प शुटर्स, भूलीचं इंजेक्शन देणारे असे सगळे लोक आहेत. या लोकांचं काम आहे की या बिबट्याला पकडावं आणि जंगलात नेऊन सोडावं. पण अजून त्यांना यश आलेलं नाही.
पण आता या बिबट्यामुळे राजकीय वादळही उठलं आहे. विरोधी पक्ष आता कर्नाटकचे वनमंत्री उमेश कट्टी यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. दुसरीकडे कट्टी यांनी म्हटलंय की, "माझ्या राजीनाम्याने बिबट्या सापडत असेल तर आता देतो."
कर्नाटकमध्ये सध्या भाजपचं सरकार आहे.
राज्यातले वरिष्ठ वनाधिकारी विजयकुमार गोगी यांनी बीबीसीशी बोलताना म्हटलं की, "या बिबट्याला पकडण्यासाठी दडपण वाढतंय त्यामुळे जास्तीत जास्त लोक त्याच्या मागावर पाठवले आहेत."
पण निसर्ग संवर्धन कार्यकर्त्यांना वाटतं की मीडियामधून इतकी अनावश्यक प्रसिद्धी, इतकी मोठी मोहीम आणि लोकांचं या गोष्टीकडे सतत असलेलं लक्ष याचा फायदा होण्यापेक्षा तोटाच जास्त होईल.
बिबटे तसे जंगलात लपून राहाणारे प्राणी आहेत पण गेल्या काही वर्षांत जंगलं कमी झाल्यामुळे मानवी वस्तीजवळ त्यांचा वावर वाढला आहे.
कर्नाटकात भलामोठा भूभाग जंगलांनी व्यापलेला आहे. तिथे एकूण 1783 बिबटे आहेत आणि बिबट्यांच्या संख्येत देशात कर्नाटकचा दुसरा क्रमांक लागतो. राज्यातल्या बंगळुरू आणि म्हैसूर अशा शहरांपाशी बिबटे दिसून आले आहेत.
बेळगावचे वन अधिकारी अँथनी एस मारिअप्पा या मोहिमेचं नेतृत्व करत आहेत. ते म्हणतात, "पहिल्यांदाच बेळगावमध्ये बिबट्या दिसला आहे, त्यामुळेच लोक घाबरले आहेत."
कशा स्वरूपाची आहे ही मोहीम?
वेगवेगळ्या ठिकाणी साधारण 20 कॅमेरा सापळे लावले गेले आहेत. गोल्फकोर्सच्या आसपास या बिबट्याच्या हालचाली कशा आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न या कॅमेऱ्यांव्दारे केला जाईल.
कॅमेरा ट्रॅप म्हणजे असा कॅमेरा ज्यात इन्फ्रारेड सेन्सर असतात. आसपास कोणतीही वस्तू हलताना दिसली की मोशन सेन्सर अॅक्टिव्हेट होऊन या कॅमेऱ्यातून आपोआप फोटो काढला जातो.
बिबट्याला जेरबंद करण्यासाठी धातूचे 10 पिंजरेही लावले आहेत. या पिंजऱ्यांमध्ये कुत्रे आणि डुकराची पिल्लं बांधली आहेत ज्यांच्या आमिषाने बिबट्या पिंजऱ्यात येईल.
"बिबट्याला आकर्षित करण्यासाठी मादी बिबट्याचं मूत्र आणि विष्ठाही या पिंजऱ्याभोवती लावली आहे" असंही अँथनी मारिअप्पा म्हणाले.
300 लोकांच्या गटाने जवळपास 300 हेक्टरचा प्रदेश विंचरून काढला आहे, एकदा नाही तीनदा. तरीही अजून बिबट्याचा ठावठिकाणा लागलेला नाही.
एकदा बिबट्याचा शोध लागला की शार्पशूटरच्या बंदुकीतून भूलीचं औषध असलेली सुई बिबट्याला मारली जाईल. तो बेशुद्ध झाला की त्याला पकडून अभयारण्यात सोडलं जाईल.
"या शोधमोहिमेसाठी आम्ही दोन प्रशिक्षित हत्तीही आणले आहेत. त्यांच्यावर बसून लोक बिबट्याचा शोध घेत आहेत कारण बिबट्याला उंचावरून शोधणं सोपं जाईल," मारिअप्पा यांनी माहिती दिली.
याबरोबरच सहा जेसीबींचाही वापर केला जातोय. यात बसून लोक घनदाट झाडी असलेल्या भागात बिबट्याला शोधत आहेत. जेसीबीचा वापर यासाठी केला जातोय, की समजा बिबट्या समोर आलाच आणि त्याने लोकांवर हल्ला केला तर त्यांचा बचाव होईल. एकदा तर या बिबट्याला शोधण्यासाठी ड्रोनचाही वापर केला होता.
मग या बिबट्याचा अजूनही शोध का लागला नाही?
मारिअप्पा यांच्या मते या मोहिमेदरम्यान दोनदा हा बिबट्या दिसला होता पण तो पकडला जायच्या आधीच पळून गेला. सततच्या पावसानेमुळे ही मोहीम राबवण्यात अडचण येत आहे असंही त्यांनी सांगितलं.
पावसामुळे दिसायला अडचण येते आणि अनेक ठिकाणी पाणी साठल्यामुळे सापळे लावायला अडचण येते.
"दुसरं म्हणजे या भागात बिबट्याला भरपूर भक्ष्य सापडतं. त्यामुळे आम्ही जे प्राणी त्याला पकडण्यासाठी पिंजऱ्यात बांधतो, ते प्राणी खाण्यात त्याला काही रस नसतो," मारिअप्पा म्हणतात.
मीडियात सतत येणाऱ्या बातम्यामुळे लोकांच दडपण वाढतंय आणि त्यामुळेही अडचणी येत आहेत असं त्यांचं म्हणणं आहे.
"लोकांना आणि सरकारला पटकन बिबट्या पकडला जावा असं वाटतंय. त्यामुळे आम्हाला नवे प्रयोग करावे लागतात किंवा आमच्या मोहिमेत रोज काही ना काही बदल करावे लागतात. पण बिबट्याला पकडायचं असेल तर आसपास अजिबात मानवी वावर नको आणि एकदम शांतता हवी."
जंगली प्राण्यांचा अभ्यास करणारे अभ्यासक संजय गुब्बी याला दुजोरा देतात. गुब्बी गेल्या एका दशकापासून कर्नाटकातल्या बिबट्यांचा अभ्यास करत आहेत.
"आसपास जरा जरी हालचाल झाली तर ते पळून जातात. ते सहसा हल्ला करण्यापेक्षा पसार होणं पसंत करतात. त्यामुळे काहीतरी तातडीने निकाल हवा या हेतूने जेव्हा इतकी मोठी मोहीम राबवली जाते तेव्हा त्याने फायदा होण्यापेक्षा तोटात जास्त होतो."
त्यांच्यामते एका बिबट्याला पकडल्याने हा प्रश्न सुटणारा नाही.
"आपल्याला लोकांना बिबट्याबदद्ल माहिती द्यावी लागेल. ते कसे वागतात हे समजावून सांगावं लागले. त्यांच्याबरोबर सुरक्षित कसं राहाता येईल हे पाहावं लागेल."
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहि61890597ले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)