You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
भारतातून नामशेष झालेला चित्ता अखेर येणार परत, असा होणार प्रवास
- Author, सौतिक बिस्वास
- Role, बीबीसी प्रतिनिधी
देशातून चित्ता नामशेष झाला त्याला 50 वर्षांपेक्षा जास्त काळ उलटला आहे...पण सारं काही ठरवल्याप्रमाणे घडलं, तर 5 मादी आणि 3 नर असे एकूण 8 चित्ते दक्षिण आफ्रिकेहून 8,405 किलोमीटरचा प्रवास करून नोव्हेंबर महिन्यात भारतात दाखल होतील.
संवर्धनासाठी एक मोठ्या मांसाहारी प्राण्याचं एका खंडातून दुसऱ्या खंडात स्थलांतर करण्यात येण्याची ही पहिली घटना आहे.
"अखेरीस आता आपल्याकडे चित्त्यांसाठी आवश्यक अधिवास आणि गरजेच्या इतर गोष्टी आहेत. हे रोमांचक आणि आव्हानात्मक आहे," असं वाईल्डलाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे अधीक्षक यादवेंद्र देव झाला सांगतात.
चित्ता भारतामध्ये आणण्याची जबाबदारी असणाऱ्या तज्ज्ञांपैकी ते एक आहेत.
हे चित्ते नेमके कुठून आणले जात आहेत ?
जगातल्या एकूण 7,000 चित्त्यांपैकी बहुतेक दक्षिण आफ्रिका, नामिबिया आणि बोत्स्वानात आढळतात. इथल्याच दक्षिण आफ्रिका आणि नामिबियातून 16 चित्ते भारतात आणले जात आहेत.
दक्षिण आफ्रिकेतले चित्ते तीन वेगवेगळ्या ठिकाणी आढळतात. ते इथल्या वाळवंटांमध्ये, रेताड जंगलांमध्ये, कुरणांमध्ये, घनदाट अरण्यांमध्ये आणि डोंगरांमध्ये राहतात. तर राखीव क्षेत्रात चित्त्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. तर काही चित्ते खाजगी मालकीचे आहेत.
दक्षिण आफ्रिकेच्या या राखीव क्षेत्रात चित्त्यांची संख्या जास्त असल्याने तिथलेच चित्ते भारतात आणले जाणार आहेत. या 50 राखीव क्षेत्रात साधारण 500 च्या घरात प्रौढ चित्ते असतील.
दक्षिण आफ्रिकेतील चित्त्यांच्या संवर्धनाचं काम करणारे व्हिन्सेंट व्हॅन डर मर्वे सांगतात, की या राखीव क्षेत्रातील काही चित्ते पकडण्यासाठी पशुवैद्यकांनी हेलिकॉप्टरमधून ट्रँक्विलायझर डार्ट्स चित्त्यांच्या दिशेने सोडले. यातले काही चित्ते आक्रमक होते.
या चित्त्यांना पकडल्यानंतर त्यांना मायक्रोचिप लावण्यात आल्या. संसर्ग टाळण्यासाठी त्यांना अँटीबायोटिक्सचे इंजेक्शन देण्यात आले. ड्रीप्सने रीहायड्रेट करण्यात आले. डीएनएसाठी त्यांचे ब्लड सॅम्पल्स घेऊन नंतर त्या चित्त्यांना क्रेटमध्ये मध्ये ठेऊन क्वारंटाईन करण्यासाठी नेण्यात आलं.
भारतात आणल्या जाणाऱ्या चित्त्यांमध्ये सहापेक्षा जास्त मादी आहेत. या माद्या तरुण असून प्रजननक्षम वयातल्या आहेत.
"या तरुण माद्या त्यांच्या आईपासून वेगळ्या झाल्या असून त्या जगण्यासाठी सक्षम झाल्या आहेत," असं व्हॅन डर मर्वे सांगतात.
सध्या हे चित्ते कुठे आहेत?
हे सर्व चित्ते दक्षिण आफ्रिकेतील दोन ठिकाणावर क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले आहेत. यातले अर्धे रुईबर्गमधील पशुवैद्यकीय सुविधा केंद्रात, तर अर्धे झुलुलँडमधील फिंडा गेम रिझर्व्हमध्ये ठेवण्यात आले आहेत. यातले चार चित्ते नामिबियात आहेत.
ज्या रोगांना चित्ते बळी पडू शकतात अशा अनेक रोगांच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत. रेबीज आणि नागीण यासोबतच इतर सहा रोगांचं लसीकरण करण्यात आलं आहे. चित्ते सक्षम आहेत का, ते कोणत्याही रोगांना बळी पडणार नाहीत ना यासाठी क्वारंटाईनमध्ये चित्त्यांचे निरीक्षण केलं जाईल, असं व्हॅन डर मर्वे सांगतात.
भारतात येईपर्यंतचा प्रवास चित्त्यांसाठी आव्हानात्मक असेल का?
तज्ज्ञांच्या मते, जंगली चित्त्यांची वाहतूक करणं कठीण असतं. कारण एकतर ते माणसांच्या संपर्कात येतात आणि त्यांना क्रेटमध्ये बंदिस्त केल्यामुळे ते तणावग्रस्त होतात.
भारतात आणल्या जाणाऱ्या चित्त्यांना मालवाहू विमानाने जोहान्सबर्गपासून ते दिल्लीपर्यंत आणले जाईल. त्यानंतर रस्त्यामार्गे किंवा हेलिकॉप्टरने त्यांना त्यांच्या नव्या घरी म्हणजेच मध्य प्रदेश राज्यातील कुनो राष्ट्रीय उद्यानात आणलं जाईल.
प्रवासाच्या दिवशी चित्त्यांना ट्रँक्विलायझर म्हणजेच भूल देऊन स्थिर केलं जाईल. त्यानंतर त्यांना क्रेटमध्ये बंद करून पशुवैद्य वन्यजीव तज्ञांसह प्रवासाला पाठवण्यात येईल.
चित्त्यांना एकदा क्रेट्समध्ये ठेवलं की त्यांची भूल उतरावी म्हणून त्यांना एक अँटीडोय दिला जाईल. पण प्रवासादरम्यान त्यांनी जागं राहावं पण शांत राहावं यासाठी त्यांना सौम्य अशी भूल देण्यात येईल.
प्रिटोरिया विद्यापीठातील पशुवैद्यकीय वन्यजीव प्राध्यापक अॅड्रियन टॉर्डिफ म्हणतात, "यामुळे या चित्यांची वाहतूक करणं सोपं होईल."
व्हॅन डर मर्वे सांगतात की, यापूर्वीही चित्त्यांची वाहतूक दूरवर करण्यात आली आहे. दक्षिण आफ्रिकेतून रस्तामार्गे 55 तासांचा प्रवास करून एक मादी चित्ता मलावीपर्यंत नेण्यात आली होती. ते अतिशय जुळवून घेणारे प्राणी आहेत.
हवाई प्रवासादरम्यान चित्त्यांना खायला दिला जाईल का?
तर याचं उत्तर आहे 'नाही'. चित्त्यांना दर तीन दिवसांतून एकदाच 15 किलो मांस खायला दिलं जातं. दक्षिण आफ्रिकेत, चित्त्यांना मुख्यतः जंगली डुक्कर खायला दिलं जातं. पण या चित्त्यांना मध्यम आकाराची आफ्रिकन हरीण आवडतात.
लांबच्या प्रवासापूर्वी चित्त्यांना खायला घालणं धोक्याचं ठरू शकतं. प्रवासात त्यांना उलट्या होऊन हे प्राणी गुदमरतात आणि आजारी पडतात.
व्हॅन डर मर्वे सांगतात की, भारतात आणल्या जाणाऱ्या चित्त्याना प्रवासापूर्वी दोन दिवस खायला दिलं जाणार नाही.
चित्त्यांना भारतात आणल्यावर पुढं काय?
कुनो नॅशनल पार्कमधील कुंपण घातलेल्या कॅम्पमध्ये या चित्त्यांना सुरुवातीला किमान एक महिना क्वारंटाईन केलं जाईल.
त्यांना एक महिना क्वारंटाईन ठेवण्यामागे प्रजनन करणे हा उद्देश नसून त्यांनी या भागाला आपलं मानावं यासाठी त्यांना क्वारंटाईन करण्यात येईल. व्हॅन डर मर्वे सांगतात की, "सर्व चित्त्यांचा आपण ज्या भागातून आलोय तिथं परत जाण्याकडे कल असतो. त्यांची ही सवय मोडण्यासाठी एक किंवा दोन महिन्यांसाठी सोयीसुविधा असलेल्या ठिकाणी ठेवण्यात येतं."
एका दोन महिन्यानंतर या चित्त्यांना 115,000 हेक्टरच्या राष्ट्रीय उद्यानात मोकळं सोडण्यात येईल.
या नव्या चित्त्यांना कोणत्या नव्या आव्हानांना सामोरं जावं लागू शकतं?
बिबट्या हे एक मोठं आव्हान असेल!
हे बिबटे चित्त्याची पिल्ले मारून त्यांची संख्या मर्यादित करू शकतात, विशेषतः कुनो राष्ट्रीय उद्यानात.
चित्ता हा नाजूक प्राणी आहे. तो त्याच्या वेगासाठी ओळखला जातो. तो शक्यतो संघर्ष टाळतो आणि त्यामुळेच इतर प्राण्यांकडून चित्त्यांची शिकार केली जाते.
भारतात येणार्या चित्त्यांना सिंह, बिबट्या, तरस आणि जंगली कुत्रे यांचा सामना करावा लागेल. पण कुनोमध्ये त्यांचा पहिला सामना अस्वल, पट्टेदार तरस आणि लांडग्यांशी होईल.
भारतात आणल्या जाणाऱ्या चित्त्यांना ज्या ठिकाणी ठेवण्यात येणार आहे तिथं त्यांना शिकारीसाठी मोठी हरणं, पिंगट उदी रंगाची लहान हरणं आणि चार शिंगी हरीण असतील.
"आम्हाला वाटतं की कुनोमधील बिबट्यांच्या कोणत्याही धोकादायक परिस्थितीला हाताळण्यासाठी हे चित्ते पुरेसे अनुभवी आहेत," असं व्हॅन डर मर्वे म्हणतात.
कुनो सारख्या कुंपण नसलेल्या उद्यानात चित्ते कोणत्याही दिशेने विखुरले जाण्याची आणि एकाकी पडण्याची शक्यता असते. त्यांना मध्यवर्ती भागात परत आणण्यासाठी सॅटेलाईट किंवा व्हीएचएफ ट्रॅकिंग कॉलरचा उपयोग करण्यात येईल.
प्रोफेसर टॉर्डिफ म्हणतात, "चित्ते थोड्या कालावधीनंतर एखाद्या भागात स्थिरावतात. पण तरीही त्यांना एका ठिकाणी परत आणण्यासाठी आमच्याकडे काही स्ट्रॅटेजी आहेत. आम्ही काही गंध ठिकठिकाणी पेरून ठेवणार आहे."
प्राण्यांचे स्थलांतर नेहमीच धोक्याने भारलेलं असतं.
प्रोफेसर टॉर्डिफ सांगतात की, "आम्ही प्राण्यांना त्यांच्या परिचित अधिवासातून बाहेर काढून नव्या ठिकाणी पाठवत आहोत. पण या नव्या ठिकाणी त्यांना आरामदायी वाटावं यासाठी वेळ जावा लागेल. स्थलांतरित केलेल्या इतर मांसाहारी प्राण्यांच्या तुलनेत चित्त्यांचं जगण्याचं प्रमाण कमी आहे."
पण तेच मलावीमध्ये काही चित्त्यांना जेव्हा पाठवण्यात आलं तेव्हा त्या वातावरणाशी जुळवून घेण्यात ते यशस्वी ठरले. म्हणजे मलावीत जे चित्ते पाठवण्यात आले होते त्यांच्यापैकी 80 टक्के चित्ते एका वर्षांनंतरही जिवंत होते. त्यांचं प्रजननही यशस्वीरित्या वाढत होतं. पण यातले 20 टक्के चित्ते गमवावे लागले.
चित्यांची संख्या टिकवण्यासाठी भारताने कोणती योजना आखली आहे?
काही भारतीय संवर्धनवादी या कल्पनेबद्दल साशंक आहेत. त्यांच्या मते, चित्त्यांना मोठ्या जागेची आवश्यकता आहे. त्यांचे जुने अधिवास आता राहिले नाहीत.
मात्र झाला यांच्यासारखे अधिकारी चित्त्यांच्या पुनरागमनाबाबत आशावादी आहेत. त्यांच्या मते, कुनो पार्कमध्ये चित्त्यांसाठी पुरेशी जागा पुरेशी शिकार आहे, इथे मानवी वस्ती नाहीये. या सर्व गोष्टी चित्त्यांच्या अस्तित्वासाठी पुरेशा आहेत.
भारत कुनो नॅशनल पार्कमध्ये 20 चित्ते ठेवण्याची क्षमता आहे.पुढच्या पाच ते सहा वर्षांमध्ये देशभरातील इतर राखीव उद्यानांमध्ये 50 ते 60 चित्ते आणण्याचं उद्दिष्ट आहे.
चित्त्यांच्या संवर्धनातील हा महत्त्वाचा प्रयोग असल्याचं तज्ञांचं म्हणणं आहे.
आजच्या घडीला इराणमधील जंगलात फक्त 12 आशियाई चित्ते शिल्लक आहेत.
"चित्त्यांच्या एवढ्या कमी संख्येतून ही प्रजाती पुन्हा पुनरुज्जीवित करण्याची आशा बाळगणे माझ्या दृष्टीने हास्यास्पद आहे. अशा उप-प्रजातींचे संवर्धन करण्यासाठी प्रयत्न करणे म्हणजे वेळ वाया घालवण्यासारखे आहे. आणि त्यात यश मिळण्याची शक्यता कमी आहे. त्याऐवजी संकरित प्रजातीवर लक्ष केंद्रित करून चित्त्यांची संख्या वाढवता येईल." असं प्रोफेसर टॉर्डिफ म्हणतात.
"भारतात चित्ता आणणं हे चित्त्यांच्या संवर्धनाच्या दृष्टीने उचललेलं धाडसी पाऊल म्हणावं लागेल. या प्रजातीला नामशेष होण्यापासून वाचवण्याची कोणतीही संधी मिळाल्यास आपण त्या संधीचा फायदा घेतला पाहिजे."
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहि61890597ले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)