You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
नाशिकमध्ये महानुभव पंथाचे संमेलन, काय आहे हा पंथ?
- Author, प्रतिनिधी
- Role, बीबीसी मराठी
नाशिकमध्ये डोंगरे वसतिगृह येथे महानुभव पंथाचे संमेलन होत आहे. 29, 30, 31 या तीन दिवशी हे संमेलन होणार आहे. राज्यातील कानाकोपऱ्यातून लोक या संमेलनासाठी आले आहेत. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील या संमेलनाला उपस्थित राहिले.
या संमेलनाच्या निमित्ताने हा पंथ काय आहे याची माहिती आपण घेऊ.
इतिहास आणि संत साहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांनी या पंथाबाबत अधिक माहिती दिली.
डॉ. सदानंद मोरे म्हणाले, "13 व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये महाराष्ट्रात चक्रधर स्वामी होते. ते मूळचे गुजरातचे होते, ते महाराष्ट्रात आले त्यांनी या पंथाचा प्रचार केला. हा कृष्ण भक्तीचा पंथ आहे. तो भगवान कृष्ण आणि चक्रधरांची वचन प्रमाण मानतो. चक्रधर हे इश्वराचा अवतार आहे असं या पंथामध्ये मानलं जातं. त्यांनी जे मार्गदर्शन केलं त्याप्रमाणे ते आजही वागतात,"
"विदर्भात या पंथाचा मोठा प्रसार झाल्याचं पाहायला मिळतं. ऋद्धीपूर हे त्यांचं मुख्य ठिकाण आहे. परमार्थामध्ये कुठल्याही जातीची व्यक्ती संन्यास घेऊ शकते असं देखील या पंथामध्ये सांगण्यात आलं," असं देखील मोरे म्हणाले.
या पंथामध्ये दोन प्रकार आहेत
महानुभाव पंथामध्ये दोन प्रकार मानले जातात. ज्यांनी पूर्ण दीक्षा घेतली आहे संसार प्रपंचाचा त्याग केला आहे आश्रमात राहतात अशांना भिक्षू म्हणता येऊ शकतं आणि दुसरा सर्व सामान्य प्रापंचिक त्यांना वासनिक म्हटलं जातं.
दीक्षा घेतलेले महानुभाव पंथी हे वासनिक प्रपंचामध्ये असणाऱ्या लोकांपेक्षा अधिक कर्मठ असतात.
महानुभाव पंथाचा उत्तरेकडे प्रसार
महानुभाव पंथाचा प्रसार पाकिस्तानपर्यंत झाला होता. चक्रधरस्वामी पुढे उत्तरेकडे निघून गेले होते. तिकडे त्यांनी या पंथाचा मोठा प्रसार केला.
उत्तरेकडे या पंथाला 'जयकृष्णी' पंथ म्हटले जाते. आजही उत्तर भारतात या संप्रदायाचे आश्रम आणि महंत आहेत.
पंथाचे प्रमुख चार नियम म्हणजे शरणागती, प्रसाद सेवा, मूर्तिध्यान व मूर्तिज्ञान आणि नामस्मरण हे आहेत. या पंथामध्ये स्त्रियांना मठात संन्यासिनी म्हणून जगण्याचा अधिकार आहे.
अहिंसा, शाकाहार, सात्त्विक जीवन, भिक्षा मागणे व देशभ्रमण या गोष्टी काटेकोरपणे या पंथामध्ये पाळल्या जातात.
महानुभाव पंथात अंत्यसंस्कार कसे होतात?
ज्येष्ठ समाजसेविका सिंधूताई सपकाळ या महानुभव पंथाप्रमाणेच उपासना करत. जानेवारी महिन्यात त्यांचे निधन झाले होते. तेव्हा त्यांच्या अंत्यसंस्कार हे महानुभव पंथाप्रमाणेच झाले होते.
महानुभाव पंथामध्ये केल्या जाणाऱ्या अंत्यसंस्काराला 'निक्षेप' असं म्हटलं जातं. या पंथामध्ये अग्निसंस्कार केले जात नाहीत तर पार्थिव दफन करतात.
या विधीबाबत बीबीसी मराठीने या पंथाचे अभ्यासक पुरुषोत्तम नागपुरे यांच्याकडून अधिक माहिती घेतली होती.
नागपुरे म्हणाले, "महानुभाव पंथ स्विकारलेल्या व्यक्तीला दफन केले जाते. दफन करताना एक खड्डा केला जातो. त्या खड्ड्यात एक कपार केली जाते. त्या खड्ड्यात मीठ टाकतात त्यानंतर मृतदेह ठेवल्यानंतर वरुन पुन्हा एक दोन पोती मीठ टाकलं जातं. त्यानंतर माती टाकली जाते.
पार्थिव दफन करण्यासाठी नेण्यापूर्वी गीतेच्या पंधराव्या अध्यायाचे स्मरण केले जाते. त्यानंतर डोलीमध्ये ठेवून दफन करण्यासाठी नेले जाते. दफनस्थळी गेल्यानंतरही गीतेच्या पंधराव्या अध्यायाचे स्मरण केले जाते.
"भारतात असे अनेक पंथ आहेत ज्या पंथात संन्याशांचे दहन केले जात नाही तर दफन केले जाते. संन्यासी लोकांची समाधी देखील केली जाते.
"महानुभाव पंथामध्ये दफन केलं जातं परंतु समाधी केली जात नाही. समाधी करुन त्याचे पूजन करण्याच्या विरुद्ध महानुभाव पंथ आहे. महानुभव पंथामध्ये संन्यासी तसेच सन्यास न घेणाऱ्या प्रत्येकाचे दफन केले जाते," असं देखील नागपुरे सांगतात.
(जानेवारीमध्ये बीबीसी मराठीने प्रसिद्ध केलेल्या लेखाचा संदर्भ या लेखासाठी घेण्यात आला आहे.)
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)