You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
सिंधुताई सपकाळ दोन दिवसांपूर्वी मानसकन्येला म्हणाल्या होत्या…
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ यांचं मंगळवारी (5 जानेवारी) रात्री 8 वाजून 10 मिनिटांनी पुण्यात निधन झालंय.
त्यांच्यावर गेले काही दिवस पुण्यात उपचार सुरू होते. काही दिवसांपूर्वीच त्यांच्यावर हर्नियाची शस्त्रक्रिया करण्यात आली होती.
बुधवारी (5 जानेवारी) 12 वाजता नवी पेठ येथील ठोसर पागा येथे महानुभाव पंथाच्या विधीनुसार सिंधुताईंवर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
पुण्यातल्या गॅलक्सी केअर हॉस्पिटलमध्ये सिंधुताईंवर उपचार सुरू होते. मंगळवारी (4 जानेवारी) रात्री 8 वाजून 10 मिनिटांनी त्यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याचं या हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ. शैलेश पुणतांबेकर यांनी सांगितलं.
मानसकन्येशी अखेरचा संवाद
सिंधुताईंना 24 नोव्हेंबरला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
दोनच दिवसांपूर्वी सिंधुताईंच्या मानसकन्या कीर्ती वैराळकर यांचं त्यांच्याशी बोलणं झालं होतं.
"माझं माईंसोबत 2 दिवसांपूर्वी बोलणं झालं होतं. तेव्हा त्या म्हणाल्या होत्या की, मी व्यवस्थित घरी येणार आहे म्हणून. आणि आज हे असं झालं," सिंधूताई सपकाळ यांच्या मानसकन्या किर्ती वैराळकर यांनी बीबीसी मराठीशी बोलताना हे सांगितलं.
पद्मश्री पुरस्काराने सन्मान
सिंधुताई सपकाळ यांनी 1994 साली पुण्यातील पुरंदर तालुक्यात अनाथ मुलांसाठी 'ममता बाल सदन' नावाची संस्था स्थापन केली. अनाथ मुलांसाठी त्यांनी केलेल्या कामांमुळे महाराष्ट्रासह देशभरात त्या 'अनाथांची माय' म्हणून परिचित झाल्या.
गेली 40 वर्षं त्या सामाजिक कार्य करत होत्या. त्यांना आजवर 750 हून अधिक पुरस्कारांनी गौरवण्यात आलं आहे. अनाथ मुलांना आईसारखी माया देणाऱ्या सिंधुताई 'मी हजारहून अधिक मुलांची आई आहे' असं अभिमानाने सांगत.
2021मध्ये भारत सरकारने त्यांचा पद्मश्री पुरस्काराने गौरव केला होता. अनाथ लेकरांची आई म्हणून अवघ्या महाराष्ट्राला ठाऊक असलेल्या सिंधुताईंचा जीवनप्रवास अतिशय खडतर होता. अनाथ मुलांना सांभाळणाऱ्या सिंधुताई सपकाळ याचं वक्तृत्वावरही चांगलं प्रभुत्व होतं. कार्यक्रमांमध्ये त्यांना ऐकण्यासाठी अनेकदा मोठी गर्दी जमायची. त्यांना माई म्हणून ओळखलं जात होतं. भाषणांदरम्यान स्वतःच्या जीवनाची कर्मकहाणी सांगतानाच अस्खलित ऊर्दूतील शेर आणि मराठी कवितांच्या ओळी यांच्या माध्यमातून त्या मनं जिंकून घेत.
चित्रपटाद्वारे सर्वांपर्यंत पोहोचला संघर्ष
सिंधुताई सपकाळ यांना शिक्षणाची आवड होती. तरी त्यांना शिकता आलं नव्हतं. बालपणी आलेल्या अनुभवांमुळं अनाथ मुलांच्या जीवनातील संघर्ष कमी करण्यासाठी त्यांनी एक संस्था सुरू केली होती.
पुण्यातील पुरंदर येथील कुंभारवळण याठिकाणी असलेल्या ममता बाल सदन या संस्थेच्या माध्यमातून सिंधुताई अनाथ आणि गरजू मुलांना मदतीचा हात देत होत्या.
संस्थेच्या माध्यमातून मुलांना शिक्षण देऊन स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी प्रयत्न करायचा हा त्यांचा उद्देश होता. त्यासाठी सर्वप्रकारची मदत संस्थेतर्फे केली जात होती.
या संस्थेच्या माध्यमातून एक हजारपेक्षा अधिक मुलांना त्यांनी मदत केली होती.
सिंधुताई सपकाळ यांच्या जीवनातील प्रेरणादायी प्रवासावर 'मी सिंधुताई सपकाळ' हा चित्रपटही तयार झाला होता. दिग्दर्शक अनंत महादेवन यांनी त्यांच्या जीवनातील संघर्ष याद्वारे मांडला होता. या चित्रपटात तेजस्विनी पंडित यांनी तरुणपणातील सिंधुताई आणि ज्योती चांदेकर यांनी वृद्ध सिंधुताईंची म्हणजे माईंची भूमिका केली होती.
अमिताभ यांना भेटण्याचा अनुभव
सिंधुताई सपकाळ यांना अमिताभ बच्चन होस्ट करत असलेल्या कौन बनेगा करोडपतीच्या विशेष एपिसोडमध्ये आमंत्रित करण्यात आलं होतं. त्यांच्या भेटीचा किस्सा त्यांनी बीबीसीबरोबर बोलताना सांगितला होता.
"अमिताभ बच्चन यांनी वाकून माझे आशीर्वाद घेतले तेव्हा असं कधी घडेल असं वाटलं नव्हतं. आता आपला जीव गेला तरी हरकत नाही," असं त्यावेळी वाटलं होतं, असं सिंधुताई सपकाळ म्हणाल्या होत्या.
मी काहीतरी आहे याची जाणीव तेव्हा झाली असं त्या म्हणाल्या. बिग बींबरोबरचा कार्यक्रमाचा अनुभव अत्यंत भारावून टाकणारा होता, असं त्या म्हणाल्या.
करोडपतीमध्ये मी कधी जाईन असं कधी वाटलं नव्हतं, पण ती संधी मिळाली असं त्यांनी सांगितलं. या शोमध्ये सिंधुताई सपकाळ यांनी 25 लाखांची रक्कम जिंकली होती.
सिंधुताईंना श्रद्धांजली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करत सिंधुताईंना श्रद्धांजली वाहिली. सिंधुताईंच्या प्रयत्नांमुळे अनेक मुलांना चांगलं आयुष्य लाभलं, सिंधुताई त्यांच्या कार्यासाठी लक्षात राहतील असं म्हणत पंतप्रधान मोदींनी आदरांजली वाहिली आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सिंधुताईंच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त करणारं ट्वीट केलंय.
सिंधुताईंच्या निधनाची बातमी धक्कादायक असल्याचं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
"सिंधुताईंच्या निधनाची बातमी धक्कादायक आहे. आईच्या ममतेनं हजारो अनाथांचा सांभाळ करणारी ती मातृदेवताच होती. त्यांच्या अचानक जाण्यानं समाजसेवेतील एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व आपल्यातून हरपले आहे," अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दु:ख व्यक्त केलं आहे.
'ज्येष्ठ समाजसेविका पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांचे अकाली निधन चटका लावणारे आहे. अनाथ मुलांसाठी मायेची सावली धरणाऱ्या सिंधूताईंनी उभं केलेलं सामाजिक कार्य अनेक पिढ्यांना मार्गदर्शक ठरेल,' असं ट्वीट करत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सिंधुताईंना श्रद्धांजली वाहिली.
भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही सिंधुताईंना श्रद्धांजली वाहिली आहे.
सिंधुताईंच्या जाण्याने अवघा महाराष्ट्र पोरका झाल्याची भावना राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केली आहे.
माईंच्या मोठ्या परिवाराच्या दुःखात सहभागी असल्याची भावना व्यक्त करीत यशोमती ठाकूर यांनी सिंधुताई सपकाळ यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
अनाथ मुलांना आधार देत त्यांना आपल्या पायावर उभे करण्यासाठी त्यांनी आयुष्यभर काम केले, असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सिंधुताईंना श्रद्धांजली वाहणारं ट्वीट केलं.
'बाळ धनंजय, माईने समाजाला खूप दिलं, पण माईच्या संस्थेला सरकार म्हणून काहीतरी देणारा तूच रे पहिला...असं म्हणून माझ्या कार्याला अभिनव पोहोच पावती देणारी अनाथांची माय, पद्मश्री सिंधूताई सपकाळ यांच्या निधनाचे वृत्त व्यथित करणारे आहे, असं ट्वीट सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी केलं आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)