You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
रामदेव बाबाः सतत वादात सापडूनही पतंजलीचा व्यवसाय जोमात
- Author, झुबैर अहमद,
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी.
योगगुरू बाबा रामदेव सतत आपल्या वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. आता ते चर्चेत आलेत सर्वोच्च न्यायालयाने केलेल्या टीकेमुळे.
बाबा रामदेव यांनी अॅलोपॅथीविरोधात दिलेल्या जाहिरातीवरून इंडियन मेडिकल असोसिएशनने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. त्यावर सरन्यायाधीश एन व्ही रमणा यांच्या अध्यक्षतेखालील पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाने सुनावणी करताना म्हटलं की, बाबा रामदेव यांना ही वैद्यकीय व्यवस्था नाकारता येणार नाही. त्यांनी इतर आधुनिक औषधोपचार पद्धतींवर टीका करू नये.
एवढंच नव्हे तर मागच्या आठवड्यात दिल्ली उच्च न्यायालयाने देखील 'रामदेव बाबांनी आयुर्वेदाबद्दल भ्रामक दावे करणं सोडून द्यावं' असं म्हटलं होतं.
रामदेव बाबा हे सातत्याने आधुनिक वैद्यकशास्त्रावर टीका करताना दिसतात. मागच्या वर्षीच्या मे मध्ये त्यांनी अॅलोपॅथीसंबंधी वादग्रस्त विधान केलं होतं.
ते म्हणाले होते की, अॅलोपॅथी विज्ञान निव्वळ मूर्ख आहे. कोव्हिडच्या उपचारासाठी ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने जी औषध मंजूर केली होती, ती औषध रुग्णांचा जीव वाचवण्यात अपयशी ठरली. ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे नव्हे तर अॅलोपॅथीच्या औषधांमुळेच लाखो रुग्ण दगावल्याचा दावाही रामदेव बाबांनी केला होता.
तसेच यासंदर्भात रामदेव बाबांनी आयएमएला एक पत्र लिहिलं होतं. या पत्रात त्यानी अॅलोपॅथीशी संबंधित 25 प्रश्न विचारले होते. हे पत्र रामेदव बाबांनी त्यांच्या ट्विटरवरही शेअर केलं होतं.
त्यात ते म्हणाले होते की, "अॅलोपॅथी जर एवढीच 'सर्वगुण संपन्न' आहे तर मग डॉक्टरही आजारी पडायला नकोत."
आधी चूक केली आणि नंतर माफी मागितली..
या सगळ्या प्रकारानंतर इंडियन मेडिकल असोसिएशनने त्यांच्या वक्तव्यावर आक्षेप घेतला होता. तर केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी रामदेव बाबांना पत्र लिहून आपलं वक्तव्य मागे घ्यावं असं सांगितलं होतं.
यावर रामदेव बाबांनी ट्विटरवर एक निवेदन प्रसिद्ध केलं. या निवेदनात, आपण आधुनिक वैद्यकीय विज्ञान आणि अॅलोपॅथीच्या विरोधात नसल्याचं म्हणत माफी मागितली होती.
जेव्हा कोव्हीड रुग्णांच्या संख्येत वाढ झाली होती त्याचदरम्यान रामदेव बाबांच्या हरिद्वार येथील पतंजली अनुसंधान संस्थेने 'कोरोनिल' टॅबलेट आणली होती.
या टॅबलेट सलग सात दिवस घेतल्यास कोव्हिड बरा होतो असा दावा करण्यात आला होता.
विशेष म्हणजे त्यावेळेस खुद्द केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन कार्यक्रमात उपस्थित होते. यावर आयएमएने तीव्र आक्षेप नोंदवला होता.
या टॅब्लेट डब्ल्यूएचओच्या प्रमाणन योजनेनुसार बनवण्यात आल्या असून आयुष मंत्रालयाने या टॅब्लेटला मान्यता दिली असल्याचा दावाही पतंजलीने केला होता.
पण नंतर पतंजलीने स्पष्टीकरण देताना म्हटलं की, "डब्लूएचओ कोणत्याही औषधाला मान्यता देत नाही. हे प्रमाणपत्र केंद्र सरकारने दिलं आहे."
कोव्हीडची लस सुरक्षित नसल्याचा दावा ही रामदेव बाबांनी केला होता. त्यासंबंधीचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. यात रामदेव बाबा म्हणाले होते की, "कोव्हिडच्या लशीचे दोन डोस घेतल्यावर जवळपास 10,000 डॉक्टरांचा मृत्यू झाला. त्यामुळे कोव्हिड विरुद्ध लढण्यासाठी आपली फुफ्फुस मजबूत हवीत. यासाठी त्यांनी योगाभ्यास करण्याचा सल्लाही या व्हीडिओतून दिला होता."
कोणतीही पदवी न घेता फक्त दिव्यतेच्या जोरावर आपण डॉक्टर बनल्याचा दावाही ते करतात.
यापूर्वीही वादात अडकलेत रामदेव बाबा..
2006 मध्ये रामदेव बाबांची औषधंसुद्धा वादात सापडली होती. पतंजलीच्या औषधात मानवी आणि प्राण्यांची हाडं मिसळल्याचा आरोप सीपीएम नेत्या वृंदा करात यांनी केला होता.
मीडियात हे प्रकरण चर्चेत आल्यानंतर पतंजलीने हे सर्व आरोप फेटाळले. पुढे तब्बल दहा वर्षानंतर पश्चिम बंगालच्या एका लॅबमध्ये पतंजली निर्मित आवळ्याच्या रसाची गुणवत्ता चाचणी घेण्यात आली. या चाचणीत नापास झाल्यानंतर मात्र पतंजलीने आपला आवळा रस मागे घेतला.
2012 मध्ये रामदेव बाबांनी काळ्या पैशाविरोधात आघाडी उघडली. त्यांनी उत्तराखंडमध्ये सत्तेवर असलेल्या काँग्रेस सरकारविरोधात मोहीम तीव्र केली. त्यानंतर मात्र काँग्रेसने रामदेव बाबांच्या विरोधात टॅक्सचोरी, जमीन बळकावणे आणि कथित भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली 81 खटले दाखल केले. तसेच त्यांच्या पतंजली केंद्रावरही छापेमारी करण्यात आली.
2018 मध्ये तर रामदेव बाबांचे एकेकाळचे सहकारी असलेल्या कर्मवीर यांनीच पतंजली तुपाच्या गुवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. एका ऑनलाइन पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत कर्मवीर म्हणाले होते की, एखाद्या देशी गायीचं तूप बनवायचं असेल तर त्याला खर्च येतो आणि त्याची विक्री किंमत 1,200 रुपयांच्या आसपास असते. मग पतंजलीला हे तूप 600 रुपये प्रतिकिलो दराने विकायला कसं परवडतं ?
आता एवढे आरोप होऊनही पतंजलीची गाडी मात्र सुसाटच आहे.
2019 मध्ये रामदेव बाबा म्हणाले होते की, मी एक फकीर आहे आणि मी देशासाठी काम करतो. पतंजलीमुळे देशाला बळकटी मिळेल तसेच देशाला अनेक फायदेही मिळतील असं ही रामदेव बाबा म्हणाले होते.
2019 मध्ये पतंजलीची उलाढाल तब्बल 8,000 कोटींच्या आसपास असल्याचं खुद्द रामदेव बाबांनी सांगितलं होतं. मात्र आज तीन वर्षांनंतर पतंजलीची उलाढाल तब्बल 10,000 कोटींच्या घरात आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)