You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
बाबा रामदेव: पतंजलीच्या कोरोनिल औषधाची 241 कोटी रुपयांची विक्री
बाबा रामदेव यांच्या पतंजली कंपनीनं 4 महिन्यांच्या कालावधीमध्ये 85 लाखांहून अधिक कोरोनिल औषधीचे किट विकले आहेत. यातून कंपनीनं 241 कोटी रुपये कमावले आहेत. द प्रिंटनं ही बातमी दिली आहे.
या आकडेवारीनुसार कोरोनिल यशस्वी ठरल्याचं दिसून येत असल्याचं पंतजली आयुर्वेदचे मुख्य कार्यकारी अधिकारी आचार्य बालकृष्ण यांनी म्हटलं आहे.
तसंच कंपनी दररोज 50 ते 70 हजार कोरोनिल कीट तयार करत असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. कोरोनिल ही औषधी रोग प्रतिकारक क्षमता वाढवते अशी जाहिरात करण्यात आहे. एका किटची किंमत 545 रुपये आहे.
कोरोनिल आणि वाद?
कोरोनाचे थैमान रोखण्यासाठी रामदेव बाबा यांनी कोरोनिल, श्वासारी ही आयुर्वेदीक औषधं शोधून काढल्याचं (23 जून) पत्रकार परिषेदत जाहीर केलं होतं. या दोन्ही गोळ्या असून यामुळे कोरोनाचे रुग्ण सात दिवसांत बरे होतील, असा दावा रामदेव बाबा यांनी यावेळी केला होता.
रामदेव बाबा आणि त्यांचे सहकारी आचार्य बाळकृष्ण यांनी याच्या एक आठवड्यांपूर्वी आम्ही कोरोनावर औषध शोधून काढलं असल्याचा दावा केला होता. त्यांनी मोठी पत्रकार परिषद घेत याबद्दल माहिती दिली.
दरम्यान, रामदेव बाबांनी कोरोनावर औषधं शोधल्याचा हा दावा केल्यानंतर आयुष मंत्रालयानं त्याची गंभीररीत्या नोंद घेतली होती. या औषधांबद्दल आपल्यापर्यंत कोणतीही माहिती पोहोचली नसल्याचं आयुष मंत्रालयाने म्हटलं होतं.
त्यानंतर कोरोनिल हे कोरोनावरचं औषध आहे, अशी जाहिरात करू नका, अशी सूचना मंत्रालयानं कंपनीला केली होती. पण, रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्याच्या हेतूनं तुम्ही हे औषध विकू शकता, असंही मंत्रालयानं म्हटलं होतं.
काही दिवसांनंतर कोरोनिलमुळे कोरोना बरा होता, असा दावा आपण कधीच केला नव्हता, असं आचार्य बालकृष्ण यांनी म्हटलं होतं.
"पतंजलीने असा दावा केला नाही की कोरोनिल हे औषध कोरोनावरचा इलाज आहे की त्यामुळे कोरोना नियंत्रित होतो. आम्ही असं म्हणालो होतो की आम्ही या औषधाची चाचणी घेतली आणि त्यात असं आढळलं की कोरोनाचे रुग्ण बरे झाले. यात काही संभ्रम असण्याचा प्रश्नच नाही," असं पंतजली आयुर्वेदचे मुख्यकार्यकारी अधिकारी आचार्य बालकृष्ण यांनी स्पष्ट केलं होतं.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.' रोज रात्री 8 वाजता बीबीसी मराठीचे कोरोना पॉडकास्ट तुम्ही फेसबुकवर पाहू शकता.)