You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
विधिमंडळातला गोंधळ: 'पन्नास खोके, चिडलेत बोके' या घोषणांनी विधिमंडळ परिसर दुमदुमला
विधिमंडळात पावसाळी अधिवेशनाचा आज (25 ऑगस्ट) शेवटचा दिवस आहे. आजच्या दिवशी देखील विधिमंडळाच्या पायऱ्यांवर सत्ताधारी आणि विरोधकांकडून घोषणाबाजी झाली.
सकाळी सत्ताधारी पक्षांच्या आमदारांनी पोस्टरबाजी केली तर आता विरोधकांनी सरकारविरोधात घोषणाबाजी केली आहे.
पन्नास खोके चिडलेत बोके, ओला दुष्काळ जाहीर करा नाही तर खुर्च्या खाली करा, बलात्काऱ्यांचा सत्कार करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो अशा घोषणांनी विधानभवन परिसर दणाणून निघाला.
आज अधिवेशनाचा शेवटचा दिवस असून विरोधी पक्षनेते अजित पवार आणि अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीमधील सर्व आमदारांनी विधानभवनाच्या पायर्यांवर येत ईडी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
पायऱ्यांवर बसण्यावर बंदी घालावी - जयंत पाटील
विधिमंडळाच्या पायऱ्यांवर बसण्यावर बंदी घालावी असा मुद्दा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी उपस्थित केला.
ते म्हणाले, "पायऱ्यांवर सदस्य बसतात यावर आक्षेप घेतला पाहिजे. घोषणाबाजीही केली जाते. हे बरोबर नाही. तिथले कॅमेरे बंद करायला हवेत. त्यासाठी हे सगळं होतं."
यावर अनिल परब म्हणाले, पायऱ्यांवर बसण्यासाठी आक्षेप नसावा पण मारामारी करणे शिवीगाळ करणे अयोग्य आहे.
"लोकशाहीत सभागृहाचं स्थान सर्वोच्च आहे. आपण महाराष्ट्राच्या जनतेचे प्रश्न सोडवत असतो. विरोधी पक्षाला बोलण्याचा अधिकार आहे. सभागृहात मांडता येत नाही, किंवा जनतेला उत्सुकता असते सभागृहाच्या आवारात प्रश्नांची दखल घेतली पाहिजे. वर्षानुवर्षं लोक पायऱ्यांवर बसले असते. एकमेकांना भिडणं, शिवीगाळ करणं नियमात बसत नाही. हा अधिकार काढला जाऊ नये. या अधिकाराला तुम्हाला हात लावता येणार नाही," असं शिवसेना नेते अनिल परब म्हणाले.
उपसभापती नीलम गोऱ्हे म्हणाल्या, "विधिमंडळाच्या आवारात कसं वागलं पाहिजे हे ठरवलं पाहिजे. दोन्ही सभागृहाच्या सदस्यांची समिती करू. सर्वानुमते ठरवू की नियम काय असतील." या संदर्भात आपण विधानसभा अध्यक्षांशी बोलू असं नीलम गोऱ्हे यांनी म्हटले.
"विधिमंडळाच्या सदस्यांना पायऱ्यांवर बसता येणार नाही, जाण्यास अडचण होईल असं वर्तन करता येणार नाही, छायाचित्र काढता येणार नाही, मोबाईल वापरता येणार नाही. मी पत्रकारांच्या विरोधात नाही. मीडिया ड्रिव्हन आंदोलन असू नये," अशा सूचना गोऱ्हे यांनी दिल्या
आदित्य ठाकरेंनी बॅनरबाजीवर दिले प्रत्युत्तर, 'ती त्यांची संस्कृती'
विधिमंडळात काल ( 24 ऑगस्टला) गोंधळाचं वातावरण पाहायला मिळालं. काल विधिमंडळाच्या पायऱ्यांवर शिंदे गट आणि राष्ट्रवादींच्या आमदारांमध्ये हमरी-तुमरी झाली झाली. आज (25 ऑगस्ट) ही परिस्थिती निवळेल का असा प्रश्न पडलेला असताना आज एका नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
'युवराजांची दिशा चुकली,' असं या पोस्टरवर लिहिण्यात आलं आहे.
शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्यावर आज शिंदे गटातील आमदारांनी निशाणा साधला आहे. आदित्य ठाकरेंचा उल्लेख 'परमपूज्य युवराज' असा करत शिंदे गटाने आज विधिमंडळात बॅनरबाजी केली.
आदित्य ठाकरे हे पर्यटन मंत्री होते त्यावरुन पोस्टर बनवून शिंदे गटाने आज निदर्शनं केली.
शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी या कृतीचा निषेध व्यक्त केला आहे.
"आदित्य ठाकरे यांच्याबाबत अशी बॅनरबाजी करून काहीही साध्य होणार नाही. सर्व महाराष्ट्र तुमच्याकडे पाहत आहे. कोण काय करतंय याची नोंद जनता घेत आहे," असं अंधारे यांनी एबीपी माझाला प्रतिक्रिया देताना म्हटले.
'तीन माळ्यांच्या मातोश्रीचा आदर'
उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान 'जुने मातोश्री' आणि 'नवे मातोश्री' यावरून शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी टीका केली.
गोगावले म्हणाले, "प्रत्येकाने आपापली मर्यादा राखली पाहिजे. आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत. आम्ही लढतो. आमचं चुकलं तर आम्ही माफी पण मागतो. त्यांनी चूक दाखवावी. आम्ही काय बांगड्या घातल्या नाही. बॅनरवर तुम्ही वाचायचं आणि काय अर्थ काढायचा तो काढायचा. मातोश्री दोन आहेत. तीन माळ्यांच्या मातोश्रींचा आदर आहे. पण 8 माळ्यांच्या मातोश्रीवर आमचे पाय दुखतात."
'फुटलेल्या आमदारांनी आपली संस्कृती दाखवली'
शिंदे गटाच्या आमदारांनी जी निदर्शनं केली त्यावर शिवसेना नेते आदित्य ठाकरेंनी प्रत्युत्तर दिले आहे.
"आज फुटलेल्या आमदारांनी जी बॅनरबाजी केली, त्यातून त्यांनी आपली संस्कृती दाखवली आहे. या फुटीर आमदारांनी राजीनामे द्यावे आणि जनतेला सामोरं जावे," असं ठाकरे म्हणाले.
आम्ही आजही जनतेत जात आहोत. हे लोक का जनतेत जात नाही असा सवाल आदित्य ठाकरेंनी उपस्थित केला.
24 ऑगस्टला काय घडलं?
'हा तर एक ट्रेलर होता, पिक्चर अजून बाकी आहे. आम्ही घोषणा देत होतो, तेव्हा त्यांनी मध्ये यायला नको होतं. ते लोक काल परवा जेव्हा आंदोलन करत होते, तेव्हा आम्ही आलो होतो का?' असं म्हणत विधिमंडळात झालेल्या गोंधळावर शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांनी प्रतिक्रिया दिली.
'ते आम्हाला काय धक्काबुक्की करणार, आम्हीच त्यांना धक्काबुक्की केली,' असंही माध्यमांशी बोलताना गोगावले यांनी म्हटलं.
भरत गोगावलेंच्या या वक्तव्यांवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली असून थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीच या प्रकरणात लक्ष घालावं असं ट्वीट केलं आहे.
गृहमंत्री अमित शाह जी, शिंदे गटाचे आमदार महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या परिसरातच मविआ आमदारांबद्दल हिंसक वक्तव्यं करत आहेत, त्यांना धमकावण्याचं काम करत आहेत, असं सुप्रिया सुळेंनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
सत्ताधारी आमदारांनी महाराष्ट्राच्या संस्कृतीला न शोभणारं वर्तन केलं आहे. महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्था राहावी यासाठी तुम्ही तातडीने राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी तातडीने चर्चा करावी आणि परिस्थिती लक्षात घेऊन शिंदे गटाच्या आमदारांना लोकशाही मूल्यांची शिकवण द्यावी, असंही सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय.
नेमकं काय घडलं?
एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर झालेल्या विधिमंडळाच्या पहिल्या सत्रात आज (24 ऑगस्ट) गोंधळ झाला. सत्ताधारी पक्षातील आमदार आणि विरोधकांमध्ये विधिमंडळाच्या पायऱ्यांवर धक्काबुक्की झाल्याचे पाहायला मिळाले.
ही धक्काबुक्की कुणी सुरू केली यावरून सत्ताधारी आणि विरोधक दोन्ही गट एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत.
महिला पत्रकारांना धक्काबुक्की झाल्यामुळे हा गोंधळ सुरू झाल्याचा आरोप राष्ट्रवादीने केला तर सत्ताधाऱ्यांनी हा आरोप फेटाळून लावला.
ही धक्काबुक्की कशी झाली याबद्दल शिंदे गटाचे आमदार महेश शिंदे यांनी सांगितले की "सत्ताधारी पक्षाचे आमदार राष्ट्रवादीविरोधात आंदोलन करत होतो. आमच्या आंदोलनावेळी राष्ट्रवादीच्या आमदारांनी गाजरं आणली आणि आमच्या आंदोलनात ढवळाढवळ केली."
बीबीसीचे प्रतिनिधी शाहिद शेख हे विधिमंडळात वार्तांकनासाठी हजर आहेत. आणि त्यांनी नेमके काय घडले याबाबत आमदारांकडून अधिक माहिती घेतली. शेख सांगतात की "सत्ताधारी आंदोलन करत असताना तिथे अमोल मिटकरी आले आणि त्यांनी म्हटले की या आंदोलनामुळे महिला पत्रकारांना धक्काबुक्की झाली आहे. त्यावरून वाद सुरू झाला. शिंदे गटाचे आमदार महेश शिंदे यांनी महिला पत्रकारांना धक्काबुक्की झाली असल्याचे आरोप फेटाळले आहेत. राष्ट्रवादीच्या आमदारांनी गाजरांची माळ आणली होती. हा देखील वादाचा एक मुद्दा होता."
राष्ट्रवादीचे प्रवक्ते अनिल पाटील यांनी म्हटले की "सत्ताधारी आमदारांनीच ही धक्काबुक्की सुरू केली, पन्नास खोके एकदम ओके ही घोषणा सत्ताधाऱ्यांना आवडली नाही. त्यामुळे त्यांनी हे आंदोलन केलं."
शिंदे गटातील आमदारांना प्रत्येकी 50 कोटी रुपये मिळाल्याचा आरोप राष्ट्रवादींचे नेत्यांनी केला होता.
बुधवारी (24 ऑगस्ट) विधिमंडळाचं कामकाज सुरू झालं त्यावेळी पायऱ्यांवर सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात धक्काबुक्की झाली. सुरुवात त्यांनी केली असा आरोप राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी केला.
'50 खोके आणि ओके वरून राडा'
शिंदे गटाचे नेते भरत गोगावले यांनी सांगितले की "आम्ही शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करत होतो पण आम्हाला राष्ट्रवादीकडून विरोध झाला."
"आज आम्ही पायऱ्यांवरती घोषणाबाजीचा कार्यक्रम ठेवलेला होता. शिवसेना-भाजप युतीचे नेते त्यात सहभागी झाले होते. विरोधी पक्षाचे नेते गेले तीन चार दिवस पायऱ्यांवर बसून आंदोलन करत होते. गद्दार, 50 खोके असं काय काय बोलण्यात आलं. जे काय आम्ही केलं नाही ते आमच्या नावावर लावण्याचा विरोधी पक्षाचा प्रयत्न होता.
"जी वस्तुस्थिती आहे ते समोर यावं यासाठी आम्ही घोषणाबाजी केली. ते आंदोलन करत होते तेव्हा आम्ही मध्ये आलो नाही. त्यांच्याकडे शंभरेक नेते आहेत. आम्ही 170च्या आसपास लोक होते. आम्ही बोलत होतो तेव्हा त्यांनी यायला नको होतं. मिरची जशी झोंबते तसं त्यांना झोंबलं.
"आम्ही त्यांचा इतिहास बाहेर काढला. कोरोना, सिंचन घोटाळा, अनिल देशमुख, नवाब मलिक, सचिन वाझे आम्ही सगळं बाहेर काढलं. आम्ही वस्तुस्थिती मांडायचा प्रयत्न केला. आमचं बोलून झाल्यावर त्यांनी यायला हवं होतं. आम्ही पायऱ्या मोकळ्या करून दिल्या असत्या," असं गोगावले म्हणाले.
गोंधळ घालण्याची त्यांची मानसिकता होती. मीडियाचं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करायचा. आम्ही बांगड्या भरलेल्या नाहीत. त्यामुळे जशास तसं उत्तर दिलं. त्यांनी आमचा नाद करू नये", असं शिंदे गटाचे नेते भरत गोगावले यांनी सांगितलं.
"आम्ही कुणाला पाय लावत नाही. चुकून पाय लागला तर नमस्कार करतो. पण आम्हाला कोणी पाय लावायचा प्रयत्न केला तर आम्ही सोडणार नाही. जो येईल अंगावर, त्याला घेऊ शिंगावर", असा इशारा गोगावले यांनी दिला.
बुधवारी सकाळपासून भाजपचे आमदार विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन करत होते. कोव्हिड भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरुन या आमदारांनी बॅनर्स झळकावले. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी रोहित पवार आणि अमोल मिटकरी यांच्या नेतृत्त्वाखालील मविआचे आमदारही त्याठिकाणी आले.
मविआच्या आमदारांनीही फलक झळकावत घोषणाबाजी करायला सुरुवात केली. यावेळी मविआच्या आमदारांना गाजराच्या माळा आणल्या होत्या. 'गाजर देणं बंद करा, ओला दुष्काळ जाहीर करा', अशी घोषणाबाजी मविआने केली. हे सगळे सुरू असताना सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांसमोर आले.
दोन्ही बाजूचे आमदार आक्रमक असल्यामुळे बाचाबाचीचा प्रकार घडला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी हे रागाच्या भरात सत्ताधारी आमदारांच्या अंगावर धावून जाताना दिसत होते. त्यामुळे विधिमंडळाच्या परिसरात प्रचंड गदारोळ माजला होता. अखेर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मध्ये पडत विरोधी पक्षाच्या आमदारांना बाजूला नेले. त्यामुळे पुढचा अनर्थ टळला.
'50 खोके, एकदम ओक्के घोषणा जिव्हारी'
"50 खोके, एकदम ओके ही घोषणा त्यांच्या फार जिव्हारी लागली. ते नाराज झाले असल्यानेच आज त्यांच्यातील काही आमदार येथे आले असून, घोषणा देत आहेत. विधिमंडळात अशा गोष्टी घडत असतात. पण त्यांच्या वागण्यातून मनाला लागलं असल्याचं स्पष्ट दिसत आहे," अशी प्रतिक्रिया विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिली आहे.
काय घडलं याआधी?
पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या चार दिवसांमध्ये महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर केलेल्या घोषणाबाजीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. 'आले रे आले गद्दार आले', '50 खोक्के एकदम ओक्के', 'गद्दारांना भाजपची ताटवाटी, चलो चले गुवाहाटी', अशा एकापेक्षा एक झोंबणाऱ्या घोषणांनी महाविकास आघाडीने शिंदे गट आणि भाजपला जेरीस आणले होते.
त्यामुळे सत्ताधाऱ्यांची चांगलीच कोंडी होताना दिसत होते. त्यामुळे आता अधिवेशनाच्या पाचव्या दिवशी भाजप-शिंदे गटाने आपली रणनीती बदलल्याचे दिसत आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)