कंगना रनौत फिल्मफेअर वाद: जेव्हा ऋषी कपूर म्हणाले होते, 'मी फिल्मफेअर विकत घेतला होता...'

सध्या कंगना रनौत आणि फिल्मफेअर यांच्यातील वाद ताजा आहे. कंगना रनौतचे म्हणणे आहे की फिल्मफेअर हे भ्रष्ट व्यवहारांना प्रोत्साहन देतं. फिल्मफेअरने हे आरोप फेटाळले आहेत.

फिल्मफेअरने कंगनाला थलैवीसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री या वर्गवारीत नामांकन दिले होते पण कंगना रनौतने त्यांच्याविरोधात आपण कोर्टात जाऊ असं म्हटल्यानंतर त्यांनी तिचे नामांकन रद्द केले आहे. या पार्श्वभूमीवर फिल्मफेअरवरील वादांची चर्चा रंगली आहे.

पण ही काही पहिलीच वेळ नाही जेव्हा फिल्मफेअरबद्दल असे विधान कुणी केले आहे.

ऋषी कपूर यांनी तर थेट आपण फिल्मफेअर पुरस्कार विकत घेतला होता अशी कबुली आपल्या आत्मचरित्रात दिली होती. ऋषी कपूर यांनी 'खुल्लम खुल्ला' नावाचे आत्मचरित्र लिहिले होते त्यात त्यांनी हा खुलासा केला होता.

ऋषी कपूर यांनी त्यांच्या आणि अमिताभ बच्चन यांच्या नात्याविषयी लिहिताना हेदेखील सांगितलं होतं की, कदाचित 'बॉबी' सिनेमासाठी बेस्ट अॅक्टर पुरस्कार मिळाल्याने अमिताभ बच्चन त्यांच्यावर चिडले होते.

ऋषी कपूर यांच्या मते कदाचित अमिताभ बच्चन यांना 'जंजीर' चित्रपटासाठी त्यांना बेस्ट अॅक्टरचा पुरस्कार मिळेल, अशी आशा होती. मात्र, तो पुरस्कार ऋषी कपूर यांना मिळाला.

ऋषी कपूर यांनी लिहिलं होतं- "मला हे सांगताना वाईट वाटतंय की, तो पुरस्कार मी विकत घेतला होता. सर, तुम्ही 30 हजार रुपये द्या. मी हा पुरस्कार तुम्हाला मिळवून देतो, असं मला एका पीआरनं सांगितलं होतं."

कुठलाही विचार न करता आपण त्याला पैसे दिल्याचं ऋषी कपूर यांनी पुस्तकात म्हटलंय.

कंगना रनौत आणि फिल्मफेअरचा वाद काय?

अभिनेत्री कंगना रानौतने फिल्मफेअरविरुद्ध खटला दाखल करणार असल्याचं म्हटलं आहे. आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये कंगनाने ही गोष्ट स्पष्ट केली आहे.

इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये एक नोट शेअर करताना कंगनानं म्हटलं आहे, "मी 2014 सालीच फिल्मफेअरला बॅन केलं होतं."

कंगनाने फिल्मफेअर पूर्णपणे अनैतिक आणि भ्रष्ट असल्याचं म्हटलं आहे.

आपल्या इन्स्टाग्राम नोटमध्ये कंगनाने लिहिलं आहे की, मी 2014 सालीच अशा व्यवहारांपासून लांब झाले होते. मात्र आता मला फिल्मफेअरकडून अनेक कॉल येत आहेत.

"मला यावर्षी फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात सहभागी होण्यासाठी अनेक फोन येत आहेत. कारण त्यांना मला 'थलैवी'साठी अवॉर्ड द्यायचं आहे."

कंगनाने पुढे लिहिलं आहे, "ते मला अजूनही नॉमिनेट करतात याचंच मला आश्चर्य वाटतं. पण कोणत्याही पद्धतीने भ्रष्ट व्यवहारांना प्रोत्साहन देणं हे माझ्या नैतिकता आणि मूल्यांविरोधात आहे. म्हणून मी फिल्मफेअरविरोधात खटला दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे."

2013 मध्ये फिल्मफेअरनं मला स्पष्टपणे सांगितलं होतं की, मी त्यांचा अवॉर्ड शो अटेंड केला नाही आणि तिथे डान्स केला नाही तर मला पुरस्कार मिळणार नाही, असंही कंगनाने म्हटलं आहे.

'तेरी मिट्टी' गाण्याच्या गीतकारने टाकला होता बहिष्कार

2020 साली झालेल्या फिल्मफेअर पुरस्कारानंतर तेरी मिट्टी या गीताचे गीतकार मनोज मुंतशीर यांनी आपण यानंतर फिल्मफेअरवर बहिष्कार टाकत आहोत असे म्हटले होते.

तेरी मिट्टी ऐवजी अपना टाइम आएगाला पुरस्कार मिळाला होता. त्यावर मनोजने नाराजी व्यक्त केली होती. मी पूर्ण आयुष्य जरी दिलं तरी याहून अधिक सुंदर गीत लिहू शकणार नाही तेव्हा यानंतर मी फिल्मफेअरवर बहिष्कार टाकत आहे असे मनोज मुंतशीरने म्हटले होते.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)