You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
ऋषी कपूरः 'एक अभिनेता म्हणून माझं कधीच कौतुक झालं नाही' असं ऋषी कपूर का म्हणायचे?
- Author, सुप्रिया सोगले
- Role, बीबीसीसाठी मुंबईहून
रुपेरी पडद्यावरचा आपला अभिनय आणि ट्विटरवर आपले विचार स्पष्टपणे मांडण्यासाठी ऋषी कपूर प्रसिद्ध होते. पण त्यांना आजकालचे तरूण अभिनेते आवडायचे नाहीत. आज त्यांचं मुंबईतील रुग्णालयात निधन झालं. ऋषी कपूर यांनी 2018 मध्ये बीबीसीला एक मुलाखत दिली होती. त्या मुलाखतीमधील काही भाग येथे देत आहोत.
ते सांगायचे, बहुतांश अभिनेत्यांना अभिनयाशिवाय इतर गोष्टीच शिकायच्या आहेत.
बॉडीबिल्डिंगचा अभिनयाशी काय संबंध आहे? घोडेस्वारी आणि तलवारबाजीचा अभिनयाशी काय संबंध आहे? असा प्रश्न त्यांनी या मुलाखतीत विचारला होता.
त्यावेळी ऋषी कपूर म्हणाले होते, शरिरातले स्नायू बळकट बनवण्याआधी चेहऱ्यावरचे हावभाव तरी शिकून घ्या. अभिनय शिका. आज अभिनेते सर्वप्रथम आपला शर्ट उतरवण्याचीच घाई करतात.
या मुलाखतीत ऋषी कपूर म्हणाले होते, सध्याच्या काळात चांगला अभिनय करू शकणारे अभिनेतेच टिकू शकतात. इतर कामात कितीही पारंगत असले तरी अभिनयाचा दर्जा साधारण असलेले कलाकार इथं काम करू शकणार नाहीत.
एक अभिनेता म्हणून माझं कधीच कौतुक झालं नाही, असं ऋषी कपूर म्हणायचे. याचे जबाबदार ते स्वतःलाच मानत. प्रेक्षक आणि समीक्षकांसमोर कोणतीही नवी गोष्ट आपण केली नाही, याचा त्यांना खेद वाटायचा.
मी अभिनेत्रीसोबत रोमान्स करायचो. झाडांच्या आजूबाजूला नाचत होतो. उटी, काश्मीर आणि स्वित्झर्लंडमध्ये गाणी गात होतो. सगळ्या जगात माझं नाव स्वेटरमॅन पडलं होतं. मला कधीच वेगळ्या भूमिका दिल्या गेल्या नाहीत. त्याच वेळी माझ्या समकालीन अभिनेत्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका करण्याची संधी मिळत होती.
'माझी स्टाईल नव्हती कारण मी नैसर्गिक अभिनेता होतो'
त्या मुलाखतीत ऋषी कपूर यांनी आपली काहीच तक्रार नाही, असं सांगितलं. मुलाखतीत ऋषी कपूर पुढे म्हणाले होते, "माझं 25 वर्षांचं लांबलचक रोमँटिक करिअर राहिलं. मोठा स्टार नसलो तरी पाच मोठ्या अभिनेत्यांपैकी एक मी होतो. त्यावेळी 25 वर्षांपर्यंत असं करिअर कोणत्याच अभिनेत्याचं नव्हतं."
देव आनंद, जितेंद्र, राजेश खन्ना आणि अमिताभ बच्चन यांनीसुद्धा तीन वर्षांचा ब्रेक घेतला होता. आज फिल्म इंडस्ट्रीमध्ये तीन खानांनी (आमिर खान, सलमान खान आणि शाहरूख खान) 25 वर्षं काम केलं. कारण सध्याच्या काळात हे सोपं आहे.
आपल्या अभिनयाची कोणतीही स्टाईल नाही. पण मी एक नैसर्गिक अभिनेता आहेत, असं कपूर म्हणायचे.
ज्या अभिनेत्यांची स्टाईल होती. ते एक कलाकार या नात्याने असुरक्षित होते. त्यामुळे त्यांना या स्टाईलचा आधार घ्यावा लागला होता, असं त्यांचं मत होतं.
ऋषी कपूर यांनी गेल्या काही काळापासून वेगवेगळ्या भूमिका स्वीकारल्या. या काळात अशा भूमिका करण्याची संधी मिळत आहे, याचा त्यांना आनंद वाटायचा.
पूर्वीच्या काळी प्रत्येक अभिनेत्याला तीन-चार सिनेमे हरवणे-सापडणे या कहाणीशी संबंधित असलेले मिळायचे. किंवा श्रीमंत-गरिब यांची प्रेम कहाणी असलेले सिनेमे त्यावेळी असत, असं कपूर यांनी मुलाखतीत सांगितलं होतं.
'ऋषिकेश-गुलजार यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली नाही'
त्यावेळी ऋषिकेश मुखर्जी आणि गुलजार वेगळ्या प्रकारचे सिनेमे बनवायचे. पण त्यांच्यासोबत काम करण्याची संधी कधीच मिळाली नाही, याची खंत ऋषी कपूर यांना असल्याचं त्यांनी मुलाखतीत सांगितलं होतं.
सध्याच्या काळात मल्टीप्लेक्स आले आहेत. चांगला सिनेमा पाहण्याची इच्छा असलेल्या संवेदनशील प्रेक्षकांसाठी एक हक्काचं ठिकाण बनलं आहे. यामुळेच माझ्यासारख्या अभिनेत्यांना वेगवेगळ्या भूमिका करण्याची संधी मिळत आहे. नाही तर 40-50 वयातच अभिनेत्यांना संन्यास घ्यावा लागत होता, असं कपूर यांनी मुलाखतीत सांगितलं होतं.
शेवटच्या काळामध्ये ऋषी कपूर यांनी हिरो-हिरॉईनच्या वडीलांची भूमिका करणार नाही असं ठरवलं होतं. ते म्हणायचे मला सध्या तरी फक्त वेगळ्या भूमिका करायच्या आहेत आणि प्रत्येक भूमिका वेगळ्या पद्धतीने साकारून दाखवायची आहे. त्यांना आणि अमिताभ बच्चन यांना एकत्र पाहायला लोकांना आवडत होतं. 27 वर्षांनंतर ऋषी कपूर आणि अमिताभ बच्चन यांचा 102 नॉट आऊट सिनेमा आला होता. यामध्ये ऋषी कपूर 75 वर्षांचे आणि अमिताभ यांचं वय 102 दाखवण्यात आलं होतं.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)