You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
'देवेंद्र फडणवीस कृष्ण नव्हे, धृतराष्ट्राची भूमिका निभावत आहेत,' सुषमा अंधारेंची टीका
आज विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा.
1. 'देवेंद्र फडणवीस कृष्ण नव्हे, धृतराष्ट्राची भूमिका निभावत आहेत'
राज्याच्या राजकारणात कृष्णाचं पात्र देवेंद्र फडणवीस रंगवत आहेत, असं त्यांना वाटत असेल तर त्यांचा अभ्यास कच्चा आहे. त्यांची पात्रांची निवड चुकली आहे. फडणवीस कृष्ण नव्हे तर धृतराष्ट्राची भूमिका निभावत आहेत, अशा शब्दांत शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.
मुंबईतील भाजपा मेळाव्यात मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलारांनी महाभारताचा संदर्भ देत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख 'कृष्ण' तर एकनाथ शिंदे यांचा उल्लेख 'कर्ण' असा केला होता. त्यावर प्रतिक्रिया देताना सुषमा अंधारे यांनी भाजपवर टीका केली.
त्या म्हणाल्या, "मला वाटतं देवेंद्र फडणवीस हे सध्या धृतराष्ट्राची भूमिका निभावत आहेत. एक असा धृतराष्ट्र ज्याने आधी ढीगाने आरोप केले. पण आता सगळं कळत असूनही आता त्यांचे डोळे, ओठ बंद आहेत. EDने आरोप केलेले सर्व लोक आता त्यांच्याकडे आहेत. पण धृतराष्ट्र काहीच बोलत नाही. सगळ्यांना सामावून घेत आहे." ही बातमी लोकसत्ताने दिली.
2. राज्यातील 12 जिल्ह्यांमध्ये वैद्यकीय महाविद्यालये स्थापन होणार
राज्यातील 12 जिल्ह्यांमध्ये नव्याने वैद्यकीय महाविद्यालये स्थापन करण्यात येणार असल्याची घोषणा वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी केली आहे.
यामध्ये 12 पैकी 6 जिल्हे हे विदर्भातील असून बाकी 6 उर्वरित विभागातील आहेत.
वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी दिलेल्या माहितीनुसार विदर्भातील गडचिरोली, वाशिम, बुलडाणा, भंडारा, अमरावती आणि वर्धा या 6 जिल्ह्यांमध्ये वैद्यकीय महाविद्यालयांची उभारणी केली जाणार आहे. त्यानंतर मराठवाड्यातील हिंगोली आणि जालनामधे नवे वैद्यकीय महाविद्यालय उभे राहील. त्यानंतर मुंबई उपनगर, ठाणे आणि पालघर, तर अहमदनगरचा समावेश आहे. ही बातमी झी 24 तासने दिली.
3. मुख्यमंत्र्यांनी भावनिक निर्णय घ्यायचा नसतो - अजित पवार
गोविंदांना सरकारी नोकरीत आरक्षण देण्याची घोषणा राज्य सरकारने केल्यानंतर त्यावरून वाद सुरू झाला आहे. स्पर्धा परीक्षा देणारे परीक्षार्थी आणि पाच टक्के आरक्षणाचा लाभ मिळणाऱ्या इतर खेळांमधील खेळाडूंनी विरोध केला आहे.
या प्रकरणावरून विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला. मुख्यमंत्र्यांनी भावनिक निर्णय घ्यायचा नसतो, असा सल्ला पवार यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना दिला आहे.
अजित पवार सध्या अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. याठिकाणी माध्यमांशी बोलताना पवार यांनी वरील प्रकरणावर आपली भूमिका स्पष्ट केली.
"गोविंदा पथकांना आरक्षण देण्याविषयी तुम्ही निर्णय घेतला. पण उद्या त्यांच्यातला एखादा काही न शिकलेला किंवा अगदी दहावीही न झालेला असेल आणि त्यानं त्या पथकात पारितोषिक मिळवलं, तर त्याला तुम्ही कोणती नोकरी देणार? तसंच स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना काय देणार, असा सवाल पवार यांनी केला. ही बातमी मुंबई तकने दिली.
4. बाळासाहेब ठाकरेंसाठी भाजपला मते द्या - देवेंद्र फडणवीस
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंनी मुंबईसाठी बघितलेले स्वप्न त्यांचे नाव घेत जे निवडून आले त्यांनी धुळीला मिळवले, असा हल्ला करीत आता मुंबईला मोठे करण्याचे बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी भाजपला मत द्या, असं आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.
मुंबई भाजपचे अध्यक्ष आशीष शेलार आणि पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या प्रमुख उपस्थितीत आज मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात कार्यकर्ता मेळावा आयोजित केला होता. त्यात फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना यांच्यावर जोरदार टीका केली.
"निवडणूक आली की कोणतीही भरीव कामगिरी न केलेली ही मंडळी मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव असल्याची ओरड सुरु करतात. भावनिक राजकारण पेटविण्याचा प्रयत्न सुरु होतो," असंही फडणवीस यावेळी म्हणाले. ही बातमी ई-सकाळने दिली आहे.
5. माझे चित्रपट चालले नाहीत, तर मीच जबाबदार - अक्षय कुमार
"जर माझे चित्रपट चांगले चालत नसतील, तर त्याला मीच जबाबदार आहे. प्रेक्षकांना काय हवं आहे, हे मला समजून घ्यावं लागेल, असं वक्तव्य अभिनेता अक्षय कुमारने केलं आहे.
'कटपुतली' चित्रपटाच्या ट्रेलर लाँच कार्यक्रमात अक्षय कुमार बोलत होता. नुकतेच प्रदर्शित झालेल्या अक्षय कुमारचे लागोपाठ तीन चित्रपट रिलीज झाले. हे तिन्ही चित्रपट फ्लॉप झाल्याचं निदर्शनास आलं होतं.
आता अक्षयचा पुढचा चित्रपट 'कटपुतली' थेट OTT वर प्रदर्शित होणार आहे.
यावेळी विचारण्यात आलेल्या प्रश्नांना उत्तर देताना अक्षय म्हणाला, "चित्रपट चालले नाहीत, तर ती माझी चूक आहे. मला माझी विचारसरणी आणि मार्ग बदलावे लागतील. मी कोणत्या प्रकारच्या चित्रपटात काम करावे, याचा विचार करावा लागेल. अशा परिस्थितीत दुसऱ्या जबाबदार धरणे चुकीचे आहे आणि ही सर्व जबाबदारी माझी आहे." ही बातमी एबीपी माझाने दिली.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)