एकनाथ शिंदे सरकार : 'हॅलो'ऐवजी 'वंदे मातरम्' म्हणा, मुनगंटीवारांचे सरकारी कर्मचाऱ्यांना आदेश

फोटो स्रोत, Getty Images
सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी फोनवरील संभाषणादरम्यान 'हॅलो' म्हणण्याऐवजी 'वंदे मातरम्' म्हणावं, अशी सूचना महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे.
आजच महाराष्टाच्या मंत्रिमंडळाचं खातेवाटप जाहीर करण्यात आलं. यामध्ये सुधीर मुनगंटीवार यांना सांस्कृतिक कार्य विभागाची जबाबदारी मिळाल्यानंतर त्यांनी सर्वप्रथम वरील निर्णयाची घोषणा केली आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
मुनगंटीवार यांनी काढलेल्या आदेशानुसार, "महाराष्ट्रातील सगळ्याच सरकारी कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी नवर संभाषण करताना हॅलोऐवजी वंदे मातरम् बोलावं. यासंदर्भात अधिकृत शासननिर्णय लवकरच निर्गमित केला जाईल," असं सांगण्यात आलं आहे.
वंदे मातरमचा इतिहास
बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी लिहिलेल्या आनंदमठ या कादंबरीत वंदे मातरम् हे गीत आहे. त्यांनी हे गीत 1870मध्ये रचलं होतं.
बंकिमचंद्र हे सरकारी अधिकारी होते आणि त्यांनी 'आनंदमठ'च्या आधी 'दुर्गेशनंदिनी' नावाची कादंबरी लिहिली होती. त्यांनंतर त्यांनी कपालकुंडला ही कादंबरी लिहिली.

फोटो स्रोत, Anand Math Movie
1872 मध्ये त्यांनी 'बंगदर्शन' नावाचं एक नियतकालिक सुरू केलं होतं. या नियतकालिकेद्वारे त्यांनी बंगालमधील सांस्कृतिक आणि सामाजिक मुद्द्यांवर चर्चा घडवून आणली.
रविंद्रनाथ टागोरांनी 'वंदे मातरम'ला चाल लावली आणि हे गीत लोकप्रिय झालं.
1894 मध्ये चॅटर्जींचं निधन झालं आणि 12 वर्षांनंतर बिपिनचंद्र पाल यांनी एक राजकीय नियतकालिक सुरू केलं, ज्याचं नाव होतं 'वंदे मातरम'. तेव्हापासून वंदे मातरम हे स्वातंत्र्य लढ्याशी जोडलं गेलं.
इतिहासकार शमसुल इस्लाम सांगतात, "भगत सिंग, राजगुरू, सुखदेव, अशफाकउल्लाह खान सारखे असंख्य क्रांतिकारक वंदे मातरम गात गात फासावर चढले."

फोटो स्रोत, Getty Images
एका लेखात शमसुल इस्लाम पुढे सांगतात, "पण वंदे मातरमबरोबरच इंकलाब जिंदाबाद, हे घोषवाक्य देखील स्वातंत्र्य लढ्याशी तितकंच जोडलं गेलं होतं. 20व्या शतकाच्या अखेरीस ब्रिटिशांविरोधी राष्ट्रीय चळवळीने व्यापक रूप घेतलं. तेव्हा इंग्रजांनी घाबरून हिंदू राष्ट्रवाद विरुद्ध मुस्लीम राष्ट्रवाद, असा वाद निर्माण केला. या सर्व गोष्टी सुरू असताना वंदे मातरमदेखील वादाचं एक कारण बनलं."
'बंकिम चंद्र मुस्लीमविरोधी नव्हते'
"'आनंदमठ'मध्ये बंकिम चंद्रांनी भारत मातेला दुर्गा देवीचं प्रतीक मानलं. त्यामुळे मुस्लीम लीग आणि मुस्लीम समाज त्यांच्याकडे संशयानं पाहू लागला. हा वाद इतका विकोपाला गेला की त्यामुळे स्वातंत्र्य लढ्यात फूट पडेल की काय, अशी भीती काँग्रेसला वाटू लागली. त्यासाठी महात्मा गांधी, पं. नेहरू, अबुल कलाम आझाद आणि सुभाषचंद्र बोस यांनी एक 1937मध्ये एक समिती बनवली आणि वंदे मातरमवर कुणाला हरकत असेल तर त्यानी ती आताच नोंदवावी, असं आवाहन केलं," इस्लाम सांगतात.
"हे गीत एका विशिष्ट धर्माच्या नजरेतूनच भारतीय राष्ट्रवाद सांगतं, अशी हरकत काही लोकांनी घेतली. केवळ मुस्लीमच नाही तर शीख, जैन, ख्रिश्चन आणि बौद्ध संघटनांनी ही हरकत नोंदवली होती," असं इस्लाम सांगतात.
'आनंदमठ' या कादंबरीच्या कथेत मुस्लीम राज्यकर्त्यांविरोधात काही संन्याशी बंड करतात. त्यामुळे ही कादंबरी मुस्लीमविरोधी आहे आणि यात हिंदूंचं उदात्तीकरण आहे, असं देखील म्हटलं जाऊ लागलं. त्यावेळी या शंकांबाबत तत्कालीन काँग्रेसच्या नेत्यांनी मौन बाळगणं पसंत केलं, असं ते पुढे सांगतात.
पण केवळ बंकिमचंद्रांच्या साहित्याच्या आधारावर त्यांना मुस्लीमविरोधी म्हणता येणार नाही, असं मत के. एन. पणिक्करांनी यापूर्वी दिलं आहे. ते म्हणतात "मुस्लीम राज्यकर्त्यांवर टीका केल्यामुळे ते मुस्लीमविरोधी ठरत नाहीत. ही एक साहित्यिक कलाकृती आहे."
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








