औरंगाबादच्या या तरुणींनी 16 हजार प्लास्टिकच्या बाटल्या का गोळा केल्या?

    • Author, श्रीकांत बंगाळे
    • Role, बीबीसी मराठी

औरंगाबादच्या नमिता कपाळे आणि कल्याणी भारंबे या दोन तरुणींनी प्लास्टिकच्या बाटल्यांचा आणि प्लास्टिक कचऱ्याचा वापर करून टुमदार घर बांधलं आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील दौलताबाद रोडवरील शरणापूर फाट्यावर हे घर आहे.

या घराला त्यांनी 'प्रोजेक्ट वावर' असं नाव दिलं आहे. या प्रोजेक्ट वावरला चारही बाजूंनी भिंतीचं कुंपण करण्यात आलेलं आहे. या भिंतीवर प्लास्टिकच्या बाटल्यांची पेंटिंग काढलेली आहे.

अशी सुचली आयडिया

नमिता आणि कल्याणी फाईन आर्ट्सचं शिक्षण घेत असताना लॉकडाऊनच्या काळात त्यांना याप्रकारच्या घराची आयडिया सुचली, ती सोशल मीडियावरच्या एका व्हीडिओमधून.

याविषयी कल्याणी सांगते, "गुवाहाटीची शाळा आहे 'अक्षर स्कूल'. तिथला एक व्हीडिओ आम्ही सोशल मीडियावर पाहिला. तो व्हीडिओ नमितानं मला दाखवला. तर ते इकोब्रिक्स बनवत होते. त्यांनी मुलांना फीसच्या ऐवजी घरचं प्लास्टिक आणायला सांगितलं. त्यापासून ते इकोब्रिक्स बनवतात. छोटेछोटे झाडांचे कुंपण बनवतात. मग आम्ही विचार केला की आपण पण काहीतरी करू."

इकोब्रिक्स म्हणजे पर्यावरणपूरक विटा. या अशा विटा बनवण्यासाठी मग या दोघींनी जवळपास 16 हजार प्लास्टिकच्या बाटल्या गोळ्या केल्या. तसंच 10 टन इतका प्लास्टिकचा अविघटनशील कचराही गोळा केला.

हे करण्यासाठी आधी त्यांना घरच्यांना यासाठी तयार करावं लागलं. नाही, हो म्हणत घरच्यांनी त्यांच्या या प्रोजेक्टसाठी पाठिंबा दर्शवला.

कल्याणी सांगते, "सुरुवातीला आम्ही रोडवरनं प्लास्टिक गोळा करायला सुरुवात केली. पण ते खूप कमी प्रमाणात होतं. सकाळच्या वेळेला प्लास्टिक गोळा करायचो आणि दुपारच्या वेळेला बॉटल्स गोळा करायचो. त्यावेळेस बॉटलचं एक झाकण जरी दिसलं तरी आम्ही आमची गाडी बाजूला थांबायचो आणि झाकण उचलून घ्यायचो.

"ते घरी आणायचो. सगळ्यांसोबत एकत्र बसून ते स्वच्छ करायचो. आणि आणलेला प्लास्टिकचा कचरा त्या बाटल्यांमध्ये भरायचो. त्यांना हवाबंद करायचो. असं करत करत आम्ही दोन-तीन दिवसांत 100 इकोब्रिक्स बनवल्या."

पुढे या दोघींनी घरासाठी जागा शोधली. पण, इकोब्रिक्सपासून भींत बांधायची म्हटल्यावर या तरुणींसमोर काही आव्हानं होती.

याविषयी नमिता सांगते, "प्लास्टिकची बॉटल पाणी धरून नाही ठेवत. त्यामुळे आमच्यासमोर सर्वांत मोठं आव्हान हे होतं की मातीपासून भिंत बनवली आणि त्यावरून पाणी गेलं तर काय? मग आम्ही मातीत मिक्स करता येणारे घटक शोधले. जेणेकरून दगडांची किंवा विटांची कसर भरून काढता येईल. मग आम्हाला काही गोष्टी सापडल्या आणि त्याचे ट्रायल घेतले."

पाणी शोषून घेणारे नैसर्गिक घटक जसं की नारळाच्या शेंड्या मातीत मिक्स केल्याचं नमिता सांगते.

अशी घेतली ट्रायल

बॉटलमध्ये प्लास्टिक भरण्यासाठी या दोघींनी 30 महिलांना कामावर ठेवलं. यामुळे लॉकडाऊनच्या काळात जवळपास 3 महिने त्या महिलांना रोजगार उपलब्ध झाला.

एक भींत उभी राहिल इतक्या इकोब्रिक्स तयार झाल्यानंतर या दोघींनी भिंतीची ट्रायल घेण्याचं ठरवलं.

"यासाठी दौलताबाद परिसरातील एक वीटभट्टी आम्ही बघितली. तिथं एक 6x4 ची एक भिंत बनवली. तीन महिने ती भिंत तिथं ठेवली. वातावरणाचा त्या भिंतीवर काय परिणाम होतो, याचा अभ्यास केला आणि मग आमच्या जागेवर येऊन घराचं बांधकाम सुरू केलं," कल्याणी सांगते.

जुन्या पद्धतीचं बांधकाम

गावातील घराचा फील येण्यासाठी नैसर्गिक आणि जुन्या पद्धतीनं घराचं बांधकाम पूर्ण करण्याचा या दोघींनी निर्णय घेतला.

नमिता सांगते, "आम्ही जुन्याच पद्धतीनं राचं फाऊंडेशन केलं. प्रॉपर नाली खणून त्यामध्ये दगड भरून, त्यात माती भरून, दोन-तीन दिवस त्याला पाणी टाकून बेस तयार केला. नंतर मातीमध्ये काही घटक मिक्स केले. त्याचा चिखल बनवून घेतला. त्या बाटल्या एकमेकांवर रचल्या. त्याच्या भिंती बनवल्या, त्याच्यावरती सारवण्याचा लेयर दिला."

या घराच्या भिंती प्लास्टिकच्या बाटल्यांचा वापर करून तयार करण्यात आल्या आहेत. घराचा दरवाजा लाकडी आहे. त्याला कडीकोंडासुद्धा आहे. गावाकडे याला कावड असं म्हणतात.

घराचं छत बांबूच्या चटयांपासून तयार करण्यात आलेलं आहे. या घरात प्रवेश केला तर ते बाहेरपेक्षा कमालीचं थंड जाणवतं.

जवळपास 4 महिन्यांच्या परिश्रमानंतर नमिता आणि कल्याणी यांचं हे घर पर्यावरणदिनी सर्वांसाठी खुलं करण्यात आलं. पण, हे घर बांधताना मुलगी म्हणून त्यांना अनेक आव्हानांचा समावेश करावा लागला.

नमिता सांगते, "मुली असल्यामुळे आम्हाला बरेचसे चॅलेंजेस आले. कारण कुणी आमच्यावर पहिले विश्वास ठेवत नव्हतं, की या मुली खरंच आम्हाला काम देणार आहेत का? प्रोजेक्ट उभा राहिल्यानंतर मग ते दादा सांगायचे की, पहिले 4 दिवस मी कामाला नव्हतो आलो, कारण मला डाऊट होता की तुम्ही खरंच काम देताल का? कारण तुम्ही मुली आहात. दिसतात पण छोटूछोटूशा."

इथं ठरू शकतात पर्याय

भूकंपप्रवण आणि डोंगराळ भागात ही घरं पर्याय ठरू शकतात, असं या तरुणींचं मत आहे.

नमिता सांगते, "भूकंपप्रवण क्षेत्र किंवा डोंगराळ भागातील घरे कधीही कोसळू शकतात. तिथं सिमेंट-काँक्रिटसोबत इकोब्रिक्स वापरली आणि आपत्तीच्या काळात ती घरं जरी पडली, तरी त्यामुळे जी जीवितहानी होते, ती कमी प्रमाणात होईल.

"इतकंच नाही तर घर पडलं किंवा पाडल्यानंतर इकोब्रिक्स असंख्य वेळा वापरता येऊ शकतात. बर्फाळ प्रदेशात किंवा दुर्गम भागात जिथं दळणवळणाच्या सुविधा नाहीत तिथं या इकोब्रिक्स अगदी बैलगाडीवर नेता येतात."

नमिता आणि कल्याणीने या घरासाठी 6 ते 7 लाख रुपयांची गुंतवणूक केली आहे. आता त्यांना यातून कमाईची अपेक्षा आहे.

त्यासाठी त्यांना हा प्रोजेक्ट इको-फ्रेंडली पर्यटन स्थळ म्हणून विकसित करायचा आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)