हर घर तिरंगा :राष्ट्रीय स्वयंसेवक संघ तिरंग्याच्या विरोधात असल्याचा आरोप का होत आहे?

    • Author, दिलनवाज पाशा
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आता 'हर घर तिरंगा' अभियानाची घोषणा केली आहे. या मोहिमेअंतर्गत 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान देशातील 24 कोटी घरांवर तिरंगा फडकवला जाईल. भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त साजरा होणाऱ्या अमृत महोत्सवाअंतर्गत हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भारतीय जनता पक्षाचे मंत्री आणि नेत्यांनी सोशल मीडियावर आपल्या प्रोफाईल पिक्चरवर तिरंग्याचा फोटो लावला आहे.

दुसरीकडे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचा तिरंगा फडकवतानाचा फोटो प्रोफाईल पिक्चर म्हणून लावलाय. काँग्रेसच्या अन्य नेत्यांनीही तोच फोटो आपल्या प्रोफाईलवर लावला आहे.

पण आता याच 'हर घर तिरंगा' मोहिमेवरून नवा वाद सुरू झाला आहे. हिंदुत्ववादी संघटना आरएसएस तिरंगा विरोधी असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वत: आरएसएसचे स्वयंसेवक आहेत. आजपर्यंत त्यांनी कधीही त्यांचे आरएसएसशी असलेले संबंध लपवलेले नाहीत.

राहुल गांधींनी ट्विटच्या माध्यमातून आरएसएसवर तोफ डागली आहे. ते ट्विटमध्ये म्हणतात की, "इतिहास साक्षी आहे. 'हर घर तिरंगा' मोहीम चालवणारे देशविरोधी संघटना आहे ज्यांनी 52 वर्षे तिरंगा फडकावला नाही."

मात्र, बीबीसीशी बोलताना आरएसएसचे प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावलेत. आरएसएस तिरंग्याचा आदर करते, असं ते म्हटले आहेत.

भारत सरकारचे मंत्री आणि भाजप नेत्यांनी त्यांच्या प्रोफाईल पिक्चरवर तिरंग्याचा फोटो लावलाय. पण आरएसएसच्या अधिकृत पेजवर किंवा आरएसएसशी संबंधित उच्चपदस्थांनी त्यांच्या सोशल मीडिया प्रोफाईलवर तिरंग्याचा फोटो ठेवलेला नाही.

तिरंग्यावरून आरएसएसवर नेहमीच प्रश्न उपस्थित करण्यात आलेत.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा झेंडा भगवा आहे. मात्र तिरंग्याविषयी आरएसएसचा जो काही दृष्टिकोन आहे त्यावर नेहमीच प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलेत.

धार्मिक राष्ट्रवादाचे अभ्यासक आणि दिल्ली विद्यापीठात शिकवणारे शम्स-उल-इस्लाम यांनी 'हर घर तिरंगा' अभियानावरून भाजप आणि आरएसएसवर टीका केली. ते म्हणतात, आरएसएसने तिरंग्याला कधीच स्वीकारलेलं नाही.

शम्स-उल-इस्लाम सांगतात, "आरएसएसची स्थापना झाल्यापासूनचं म्हणजे 1925 नंतर ब्रिटीश राजवटीविरुद्ध जे काही अखंड भारतीय संघर्षाचे प्रतीक ठरेल त्या त्या प्रत्येक गोष्टीचा तिरस्कार आरएसएसने केलाय. 1929 च्या डिसेंबरमध्ये काँग्रेसच्या लाहोर अधिवेशनात स्वराज्याचा नारा देण्यात आला. आणि तिरंगा फडकवून दरवर्षी 26 जानेवारीला स्वातंत्र्यदिन साजरा करण्याचं आवाहन करण्यात आलं.

(तेव्हा अशोक चक्राऐवजी चरखा असायचा) जेव्हा 1930 चा 26 जानेवारीचा दिवस उजाडला त्यावेळी तत्कालीन सरसंघचालक हेडगेवार यांनी सर्व स्वयंसेवकांना त्यांच्या भगव्या ध्वजाची राष्ट्रध्वज म्हणून पूजा करण्याचे आदेश देणारं परिपत्रक काढलं."

शम्स-उल-इस्लाम पुढे सांगतात, "हे परिपत्रक आजवर कधीही मागे घेण्यात आलेलं नाही. आरएसएसचे प्रमुख विचारवंत एम एस गोळवलकर यांनी 14 जुलै 1946 रोजी नागपूरच्या संघाच्या मुख्यालयात गुरुपौर्णिमेनिमित्त उपस्थित लोकांना संबोधित करताना म्हटलं होतं की "भगवा ध्वज भारतीय संस्कृतीचं प्रतिनिधित्व करतो. हे देवाचे प्रतीक आहे. आमचा दृढ विश्वास आहे की एक दिवस संपूर्ण राष्ट्र या ध्वजापुढे नतमस्तक होईल."

शम्स-उल-इस्लाम पुढे सांगतात, 15 ऑगस्ट 1947 च्या पूर्वसंध्येला लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवण्याची लगबग सुरू होती. देशभरातील सर्व लोक हातात तिरंगा घेऊन आनंदोत्सव साजरा करत होते, तेव्हा आरएसएसने तिरंग्याला विरोध केला होता.

इस्लाम पुढे सांगतात, "14 ऑगस्ट 1947 रोजी आरएसएसचे मुखपत्र असलेल्या ऑर्गनायझरच्या एका संपादकीय मध्ये म्हटलं होतं की, नशिब जोरावर असलेले सत्तेवर आलेत आणि त्यांनी आमच्या हातात तिरंगा दिलाय. पण या तिरंग्याला हिंदू कधीही स्वीकारणार नाहीत आणि त्याचा आदर करणार नाहीत. तीन शब्द अशुभ असतात आणि तीन रंगांचा ध्वज निश्चितच वाईट मानसिक परिणाम करेल. देशासाठी तो हानिकारक ठरेल."

शम्स-उल-इस्लाम यावर प्रश्न उपस्थित करताना म्हणतात की, "पंतप्रधान नरेंद्र मोदी आज 'हर घर तिरंगा' अभियान राबवताना दिसतायत. ते स्वतः राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक राहिलेत. मग आता काय ते संघाच्या या विचारांनाही नाकारणार आहेत का ? की यावर टीका करणार आहेत? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख विचारवंत गोळवलकर यांच्या 'विचार नवनीत' या पुस्तकात तिरंग्यावर जी टीका करण्यात आली आहे तो मजकूर हटवणार आहेत का?

आम्ही तिरंग्याचा आदर करतो: आरएसएस

आरएसएसचे अखिल भारतीय प्रचारप्रमुख सुनील आंबेकर या आरोपांचं आणि टीकेचं खंडन करतात.

बीबीसीशी बोलताना सुनील आंबेकर म्हणाले, "भारतीय संविधान सभेने तिरंग्याला राष्ट्रध्वज म्हणून स्वीकारण्याचा निर्णय घेतला त्या दिवशी संघच काय तर संपूर्ण देशासाठी तिरंगा राष्ट्रध्वज झाला आहे. देशाशी संबंधित कोणतीही चिन्हे, मग तो राष्ट्रध्वज असो वा राष्ट्रगीत संघ त्यांचा आदर करतो."

आंबेकर पुढे सांगतात, "संघाचा उद्देश राष्ट्रासाठी आहे. जर संघाने राज्यघटना स्वीकारली आहे, देश स्वीकारला आहे तर त्याच्याशी संबंधित सर्व गोष्टीही स्वीकारल्या आहेत. सरसंघचालक मोहन भागवत यांनी विज्ञान भवनात जे भाषण केलंय त्यात त्यांनी याचं तपशीलवार वर्णन केलंय."

2002 पर्यंत तिरंगा न फडकवण्याच्या प्रश्नावर आंबेकर म्हणतात, "2004 पर्यंत खाजगीरित्या तिरंगा फडकवण्यावर अनेक निर्बंध होते. 2004 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने या संदर्भात निर्णय दिला. तेव्हापासून संघाच्या मुख्यालयावरही तिरंगा लावला जातो. यापूर्वीही स्वयंसेवक आणि अनेक संघटना राष्ट्रध्वज फडकवत होत्या."

'मोदी हे संघाचे स्वयंसेवक आहेत'

तेच दिल्ली विद्यापीठातील प्राध्यापक आणि आरएसएस समर्थक अवनीजेश अवस्थी म्हणतात, "पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'हर घर तिरंगा' मोहिमेचे आवाहन केलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संघाचे स्वयंसेवक आहेत. जर नरेंद्र मोदी या गोष्टी करतायत तर स्पष्ट आहे की संघ हे करतोय."

काँग्रेसने केलेल्या टीकेला फेटाळून लावत अवनीजेश म्हणतात, "नरेंद्र मोदी संघाचे कार्यकर्ते आहेत असं एकीकडे म्हणायचं आणि दुसरीकडे मोदी घरोघरी तिरंगा मोहीम राबवत आहेत त्यामुळे संघही तेच करणार का, असा सवाल करायचा. एकीकडे सरकारची सर्व धोरण संघाकडून प्रेरित असतात असं म्हणायचं आणि दुसरीकडे टीका करायची. या विरोधाभासी आणि कमी अकलेच्या गोष्टी काँग्रेस करत आहेत."

22 जुलै 1947 रोजी भारताने अधिकृतपणे तिरंगा राष्ट्रध्वज म्हणून स्वीकारला.

संघाने तिरंग्याला विरोध केलाय म्हणून जी टीका होते त्यावर अवनीजेश म्हणतात, "संघाने तिरंग्याला कधीच विरोध केलेला नाही. भारताने तिरंग्याला राष्ट्रध्वज म्हणून स्वीकारलं तेव्हा संघानेही त्याचा आदर केला. तिरंग्याचा स्वीकार करण्याआधी जे डिझाईन आले होते त्यात युनियन जॅक सुद्धा होता. संघाचा त्याला विरोध होता, जो आता नाहीये. प्रत्येक स्वयंसेवक तिरंग्याचा आदर करतो."

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने 15 ऑगस्ट 1947 आणि 26 जानेवारी 1950 रोजी नागपूरच्या मुख्यालयात तिरंगा फडकवलाय. हे अपवाद वगळता 2002 मध्ये संघाने मुख्यालयावर तिरंगा फडकवलेला नाही.

26 जानेवारी 2001 रोजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयावर तिरंगा फडकवण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन तरुणांनाही अटक करण्यात आली होती. पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार 2013 मध्ये या सर्वांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. राष्ट्रप्रेमी युवा दलाचे कार्यकर्ते बाबा मेंढे, रमेश काळंबे आणि दिलीप चट्टानी यांनी नागपुरातील रेशीमबाग येथील संघाच्या मुख्यालयावर जबरदस्तीने तिरंगा फडकावला होता.

2002 पूर्वी संघ कार्यालयात तिरंगा फडकवला जात नसल्याची टीका फेटाळून लावत अवनीजेश म्हणतात, "संघाने तिरंग्याला कधीच विरोध केलेला नाही. 1950 मध्ये भारत सरकारने प्रतीक आणि नाव कायदा लागू केला, ज्या अंतर्गत राष्ट्रध्वज कसा आणि कुठे फडकवता येईल याबाबत नियम बनवण्यात आले होते. त्या नियमांनुसार वैयक्तिकरित्या तिरंगा फडकवता येत नाही. नवीन जिंदाल यांनी सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती, त्यावर सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिला की कोणताही व्यक्ती आपल्या घरावर आपल्या कार्यालयात तिरंगा फडकवू शकतो. काँग्रेस आता तिरंग्याबद्दल निराधार टीका करते आहे."

गोळवलकरांच्या पुस्तकात तिरंग्यावर केलेल्या टीकेबाबत प्रश्न विचारला असता अवनीजेश सांगतात, "विचार नवनीत (बंच ऑफ थॉट्स) 1966 मध्ये प्रकाशित झाला असेल पण त्यात गोळवलकर गुरुजींनी मांडलेले काही विचार स्वातंत्र्यपूर्व काळातलेही आहेत. त्याच्यावर टीका करता येणार नाही. संघ तिरंग्याचा आदर करतो."

पण संघाचा स्वतःचा झेंडा भगवा आहे आणि सोशल मीडिया प्रोफाइलवर ही तोच फोटो आहे.

यावर प्राध्यापक अवनीजेश म्हणतात, "ज्याप्रमाणे डाव्यांचा झेंडा लाल आहे आणि ते तिरंग्यावर लाल ध्वज फडकवण्याच्या जशा घोषणा देतात अगदी तसंच संघाचा भगवा ध्वज आहे. आणि संघ आपल्या कार्यक्रमांमध्ये तो फडकवतो. केवळ संघावर टीका करून चालणार नाही की त्याचा ध्वज भगवा आहे. या देशातील प्रत्येक संघटना आणि पक्षांकडे स्वतःचे झेंडे आहेत."

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहि61890597ले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)