मुंबई घर: 'आम्हाला इकडे कोंबलंय,कोणीही आमच्याकडे लक्ष देत नाही'

    • Author, दीपाली जगताप
    • Role, बीबीसी मराठी

"आम्ही इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर राहतो, तिथे पॅसेजचा एक भाग खाली कोसळल्याने आम्ही इकडे दोरी बांधली. जाण्या-येण्यासाठी सुरक्षित वाटावं म्हणून आम्ही दोरीचा वापर करतो. हे धोकादायक आहे आम्हाला माहिती आहे पण आमच्या हक्काचं घर सोडून आम्ही कुठे जाणार होतो? पण पुनर्विकासाचा प्रश्न मार्गी लावायचं सोडून आम्हाला रात्री 3 वाजता घराबाहेर काढलं."

"रात्री 3 वाजता भर पावसात आमच्या सर्व रहिवाशांना महानगरपालिकेने पोलिसांच्या मदतीने घराबाहर काढलं. आहे त्या कपड्यांवर आम्ही घर सोडलं. आमचं सर्व सामान अजून घरातच आहे," 53 वर्षांच्या छाया कांबळे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं.

मुंबई महानगरपालिकेने 387 इमारती धोकादायक असल्याचं जाहीर केलं आहे. त्यापैकी टाटा नगर या इमारतीत छाया कांबळे 34 वर्षांपासून राहत आहेत. स्वदेशी मिल कामगारांच्या या इमारतीत 140 खोल्यांध्ये सर्व गिरणी कामगार राहतात असंही त्या सांगतात.

ही इमारत 70 वर्षांहून अधिक जुनी असून मोडकळीस आल्याने महानगरपालिकेने इथल्या सर्व रहिवाशांना घरं खाली करण्याची सूचना केली होती.

वॉर्ड अधिकारी महादेव शिंदे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं, "ती इमारत 60-70 वर्षं जुनी आहे. धोकादायक आहे. त्यामुळे आपण लोकांना बाहेर काढलं. रात्री 9.30 वाजता आम्ही तिकडे गेलो होतो पण आम्हाला पहाटेचे 3-4 वाजले. लोकांना समजवण्यात एवढा वेळ गेला. इमारतीत लोकांचं सामान आहे. याची जबाबदारी आमची नाही. आम्ही शाळेत त्यांना निवारा दिला आहे. पण त्यांना आता दुसरीकडे पर्याय शोधावा लागेल. आम्ही एवढे दिवस त्यांना शाळेत राहण्याची परवानगी देऊ शकत नाही."

'शाळा म्हणजे घर नाही ना...'

छाया कांबळे पुढे सांगतात, "दरवर्षी मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी घर खाली करायला सांगायचे. पण पुनर्विकासाचं काय झालं? किंवा आमची पर्यायी व्यवस्था कुठे करणार? यावर काहीच उत्तर नाही. यावर्षी कुर्ल्याची इमारत कोसळली म्हणून अचानक आम्हाला जबरदस्ती घरातून काढलं आणि शाळेत आमची सोय केली. "

कुर्ला येथील कामगार नगर महानगरपालिका शाळेत रहिवाशांना राहण्यासाठी ताडपत्री लावून हॉल तयार केला आहे. पण "ही तात्पुरती व्यवस्था केली असली तरी शाळा म्हणजे घर नाही ना..." अशी इथल्या रहिवाशांची भावना आहे.

या हॉलमध्ये रहिवाशांना झोपण्यासाठी गाद्या, पंखा स्टँड, लाईट्स आणि पिण्याच्या पाण्याची सोय आहे.

छाया कांबळे यांचा मुलगा आणि सून इथूनच कामावर जातात. त्या म्हणाल्या, "इथूनच आमची मुलं नोकरीला जातात. कॉलेज आणि शाळेत जातात. ज्या मुलांची शाळा चुनाभट्टीला आहे त्यांना मात्र इथून जावं लागलं. भाड्याचा खर्च परवडत नसला तरी ते राहतायत. काही जण आपल्या नातेवाईकांच्या घरी गेले. पण त्यांच्याकडे तरी किती दिवस राहणार?"

इथेच आमची भेट 65 वर्षीय निर्मला सोनटक्के यांच्याशी झाली. आपल्या आजारी पतीच्या शेजारी त्या बसल्या होत्या.

त्या म्हणाल्या, "इथे आल्यापासून आमची आजारपणं वाढली आहेत. ज्येष्ठ नगारिकांना असं राहणं सहन होतंय का आता, इथे रोज थंड पाण्याने आंघोळ करावी लागते. पाणी आणि जेवण बदललं. ताडपत्री लावल्याने खूप मच्छर असतात. आता महिना झाला आम्ही असंच राहतोय. त्यामुळे अनेकांना ताप, सर्दी, खोकला, दमा याचा त्रास होतोय."

घरातलं सामान सोबत नसल्यानेही रहिवाशांना अनेक अडचणी आहेत. तसंच एकत्र राहत सार्वजनिक शौचालय वापरावं लागत असल्यानेही त्रास होत असल्याचं रहिवासी सांगतात.

'मराठी कुटुंबाना बेघर केलं तर तुम्हाला...'

स्वदेशी मिलमध्ये 33 वर्षं नोकरी केलेले भुजंग कांबळे आता 73 वर्षांचे आहेत. त्यांना काठीचा आधार घेतल्याशिवाय चालता येत नाही.

"टाटा नगरमध्ये मी एकटाच राहतो. त्यादिवशी पोलिसांनी आमचं काहीच ऐकलं नाही. कपडे घालायलाही वेळ दिला नाही. आमच्या घराचं लाईट-पाणी कापलं. काय करायचं आम्ही. या शाळेत कधीपर्यंत रहायचं आहे याचीही काही कल्पना नाही. आमचं वय झालं आता, आमचं घर सोडून किती दिवस आम्ही उघड्यावर रहायचं? आम्हाला कोंबलंय इकडे," असं बोलता बोलता भुजंब कांबळे भावनिक झाले.

टाटा नगर या इमारतीच्या पुनर्विकासाचं काम अनेक वर्षांपासून रखडलं आहे. हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याचंही रहिवासी सांगतात. परंतु महानगरपालिकेने अवसायक आणि विकासकांशी बोलून एवढ्या वर्षांत काहीच तोडगा काढला नाही अशीही रहिवाशांची तक्रार आहे.

भुजंग कांबळे सांगतात, "या प्रकरणी अनेकदा आमदार, खासदार आणि मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलं आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही आम्ही भेटलो होतो. आता एकनाथ शिंदे यांच्याकडेही मागणी केलीय. पण आतापर्यंत राजकारण्यांनी आम्हाला फक्त आश्वासनं दिली आहे. आम्हाला इथे कोणी भेटायलाही येत नाही आणि आम्ही गेलो तर भेट देत नाही."

'निवडणुका जवळ आल्या की मराठी माणसाच्या नावावर मतं मागायला मात्र येतात,' असाही रोष इथल्या रहिवाशांचा आहे.

छाया कांबळे म्हणाल्या, "मराठी कुटुंबांना तुम्ही असं बेघर केलत तर तुम्हाला मत कोण देईल. आमच्या पुनर्विकासाचा प्रश्न सोडवला नाही तर मुंबईतून उरले-सुरले मराठी कुटुंबं बाहेर पडतील. कारण मुंबईत भाड्याने राहणं काही परवडणारं नाही."

धोकादायक इमारतीत राहण्यासाठी कोर्टात याचिका

दादर येथील जनार्दन इमारत सुद्धा महानगरपालिकेच्या 387 धोकादायक इमारतीच्या यादीत आहे. काही दिवसांपूर्वी महानगरपालिकेने इथे राहणाऱ्या सर्व नागरिकांना घरं तात्काळ सोडण्यास सांगितली.

इथल्या रहिवाशांनाही घर सोडावं लागलं आणि जवळपास राहण्याची सोय करावी लागली. पण या इमारतीत दुसऱ्या मजल्यावर राहणारं माने दाम्पत्य अजूनही इथेच राहतात.

70 वर्षांचे एकनाथ माने यांचा जन्म या इमारतीतच राहिला. त्यांच्या पत्नी गीता माने या सुद्धा लग्न झाल्यापासून जवळपास 45 वर्षांपासून इथे राहत आहेत.

एकनाथ माने सांगतात, "माझी पत्नी आजारी असते. ती अंथरुणाला खिळून असते. तिला मधुमेह आहे. गुडघ्याचा आणि जॉईंट्सचा त्रास आहे. त्यामुळे ती चालू शकत नाही. मी निवृत्त असल्याने माझी काही कमाई नाही. अशा परिस्थितीमध्ये मी माझ्या पत्नीला घेऊन बाहेर कुठेही राहण्यासाठी जाऊ शकत नाही."

एकनाथ माने यांनी या कारणास्तव मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

"माझी पत्नी आजारी असल्याने मला धोकादायक इमारतीत राहण्याची परवानगी द्या अशी मागणी मी न्यायालयाकडे केली आहे."

200 स्क्वेअर फूटच्या घरात हे दोघं राहतात. पण पालिकेने जनार्दन इमारतीची वीज आणि पाणी बीएमसीने कापलं आहे.

"आमच्या इमारतीखाली एक सार्वजनिक नळ आहे. तिथून मी पाणी घेऊन येतो. मुंबई महानगरपालिकेने इथल्या रहिवाशांना घराबाहेर काढलं. त्यांचं सामान पण बाहेर फेकून दिलं. पण पालिकेने आम्हाला कुठेही पर्यायी व्यवस्था दिलेली नाही. मग म्हाताऱ्या, आजारी लोकांनी घर कसं सोडायचं? हा साधा प्रश्न आहे."

जीव मुठीत घेऊन रहिवासी का राहतात?

इमारत मोडकळीस आल्यास प्रशासनाच्या निकषांमध्ये इमारतीचं बांधकाम बसत नसेल तर महानगरपालिकांकडून अशा इमारती राहण्यासाठी धोकादायक आहेत असं जाहीर केलं जातं.

नियमानुसार, वॉर्ड अधिकारी आपल्या प्रभागात असलेल्या धोकादायक इमारतींचा आढावा घेतात आणि पावसाळा सुरू होण्यापूर्वी अशा इमारतीत राहणाऱ्या रहिवाशांना नोटीसा पाठवण्यात येतात. पण तरीही रहिवासी घर सोडत नसल्याचं अनेकदा दिसून येतं.

यावर्षी मुसळधार पावसात कुर्ला येथील नाईक नगर सहकारी इमारत 26 जूनला कोसळली. या दुर्घटनेत 19 जणांचा मृत्यू झाला आणि 15 जण जखमी झाले होते.

ही इमारत जीर्ण होती. तसंच राहण्यासाठी धोकादायक होती तरीही काही रहिवासी राहत होते. याप्रकरणी आता न्यायालयात सुनावणी सुरू आहे.

जीव मुठीत घेऊन रहिवासी अशा इमारतीत का राहतात? या प्रश्नाचं उत्तर देताना रहिवासी सागतात, "आमचं घर सोडून आम्ही जाणार तरी कुठे? पुनर्विकासाचं काम रखडल्यावर आम्ही काय करावं. आम्ही आयुष्यभर ज्या घरात राहिलो, मुलांची शाळा, नोकऱ्या सर्वकाही जिथे आहे ते सोडून कुठे जाणार? असा प्रश्न आमच्या समोर असतो."

दुसरं एक कारण रहिवाशांनी सांगितलं ते म्हणजे, "मुंबईतलं भाडं आम्हाला परवडत नाही. प्रशासनाने आम्हाला ठोस पर्यायी व्यवस्था केली तर आम्ही घर सोडून जाऊ शकतो. घरात म्हातारी माणसं असतात, त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू असतो. त्यांचा दवाखाना सगळं घराजवळ असतं. हे सोडून लांब कुठे जायंच?"

हा प्रश्न केवळ काही मोजक्या इमारतींचा नाहीय. तर मुंबईत शेकडो इमारती अशा आहेत ज्या एकतर राहण्यासाठी धोकादायक आहेत किंवा त्या इमारतींचा पुनर्विकास रखडला आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)