भगतसिंह कोश्यारी : 'मुंबईतून गुजराती आणि राजस्थानी लोकांना काढल्यास इथं पैसाच राहणार नाही' #5मोठ्याबातम्या

आज विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा :

1) मुंबईतून गुजराती आणि राजस्थानी लोकांना काढल्यास इथं पैसाच राहणार नाही - राज्यपाल

"मुंबई-ठाण्यातून जर गुजराती आणि राजस्थानी लोकांना बाहेर काढल्यास इथे पैसेच राहणार नाहीत. मुंबई आर्थिक राजधानीही उरणार नाही," असं वक्तव्य महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलंय. न्यूज 18 लोकमतनं ही बातमी दिलीय.

मुंबईतील अंधेरी भागातील एका चौकाला शांतीदेवी चंपालालजी कोठारी असं नाव देण्यात आलं. या नामकरण सोहळ्याच्या कार्यक्रमात बोलताना राज्यपाल कोश्यारींनी हे वक्तव्य केलं.

कोश्यारींच्या या वक्तव्यानंतर वादाला तोंड फुटलं आहे. विरोधकांकडून कोश्यारींवर टीका करण्यात येतेय.

काँग्रेसचे नेते सचिन सावंत म्हणाले की, "राज्याचा राज्यपाल त्याच राज्याच्या जनतेची बदनामी करतो हे भयंकर आहे. गुजराती-राजस्थानी हा विषय राहू द्या, यांनाच सर्वात आधी नारळ दिला पाहिजे. यांच्या कारकीर्दीत राज्यपाल या संस्थेचा व महाराष्ट्राच्या राजकीय परंपरेचा स्तर तर खालावला आहेच, पण महाराष्ट्राचा अवमानही सातत्याने झाला आहे."

2) पूरग्रस्त भागात कधी जायचं ते मी ठरवेन, मुख्यमंत्र्यांनी नाक खुपसू नये - अजित पवार

महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज्यातील पूरग्रस्त भागाची पाहणी केली. त्यानंतर ओला दुष्काळ जाहीर करून तात्काळ मदत करावी, अशी मागणीही अजित पवारांनी केली.

यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, "अजित पवार आता पूर ओसरल्यावर पाहायला गेले आहेत. पूर आला होता तेव्हाच आम्ही जाऊन पाहणी करून आलोय."

मुख्यमंत्र्यांच्या या उत्तरावर अजित पवारांनी प्रत्युत्तर दिलंय. अजित पवार म्हणाले की, "मी विरोधीपक्ष नेता म्हणून दौरा करतोय, मी हाडाचा शेतकरी आहे. अधिवेशन सुरु होईल तेव्हा सांगायला सोपं जातं. तर मी कधी जावं हा माझा प्रश्न आहे, बाकीच्यांनी नाक खुपसू नये."

कोण कधी गेला, हे बालीशपणानं विचारण्यापेक्षा शेतकऱ्यांना तातडीनं मदत करा, असंही अजित पावर म्हणाले. टीव्ही 9 मराठीनं ही बातमी दिलीय.

3) उद्या जरी निवडणुका लागल्या तरी आम्ही तयार - शरद पवार

उद्या जरी निवडणुका लागल्या तर आम्ही तयार आहोत, असं वक्तव्य राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले. एबीपी माझानं ही बातमी दिलीय.

शरद पवार पुढे म्हणाले, "निवडणुका होणार नसतील, तरी राज्य एकंदर कोणत्या परिस्थितीत चाललं आहे. त्यावर आम्ही बारकाईने लक्ष ठेवून आहोत. काही कमतरता आणि चुका असतील त्यासंबंधीची भूमिका त्या-त्या वेळी घेतली जाईल. त्यामुळे आम्ही बांधलेली राजकीय बांधणी अजिबात विस्कळीत होणार नाही."

राज्यातील पूरस्थइती आणि मंत्रिमंडळ विस्ताराबाबतही शरद पवारांनी आपलं मत व्यक्त केलं.

"राज्यात सरकार येऊन एक महिना झाला असून अद्यापही राज्याला मंत्री नाहीत. मंत्रिमंडळ विस्ताराला इतका विलंब योग्य नाही. राज्यात पूर परिस्थिती असताना काम करण्यासाठी मंत्रिमंडळ टीम असणे आवश्यक आहे," असं शरद पवार म्हणाले.

4) आमचं काय चुकलं की आमच्या पाठीत खंजीर खुपसला? - आदित्य ठाकरे

"ही नुसती गद्दारी नाही, तर त्यांनी प्रामाणिक माणसाच्या पाठीत खंजीर खुपसलाय," असं म्हणत आदित्य ठाकरेंनी पुन्हा एकदा शिंदे गटावर निशाणा साधलाय. नवी मुंबईतील मानखुर्दमध्ये झालेल्या निष्ठा यात्रेदरम्यान ते बोलत होते. लोकसत्तानं ही बातमी दिलीय.

आमचं काय चुकलं की यांनी आमच्या पाठीत खंजीर खुपसला? असा प्रश्न आदित्य ठाकरेंनी या सभेत उपस्थित केला.

ते पुढे म्हणाले की, "माझ्या मनात राग नाही आणि कोणत्याच शिवसैनिकांच्या मनातही पक्ष सोडून गेलेल्यांबद्दल राग नाही. मात्र, ज्या माणसाने यांना राजकीय ओळख दिली, त्यांच्या पाठीत यांनी खंजीर खुपसाला, याचं दुःख आहे."

"राज्यामध्ये हे 40 लोक कुठेही फिरले तरी गद्दार म्हणूनच फिरणार," असा टोलाही आदित्य ठाकरेंनी लगावला.

5) मला काही झाल्यास नाना पाटेकर जबाबदार - तनुश्री दत्ता

हिंदी सिनेसृष्टीतील अभिनेत्री तनुश्री दत्तानं इन्स्टाग्राम पोस्ट लिहून खळबळजनक वक्तव्य केलंय. माझ्या जीवाला काहीही झाल्यास नाना पाटेकर जबाबदार असतील, असं अभिनेत्री तनुश्री दत्तानं म्हटलंय. झी न्यूजनं ही बातमी दिलीय.

'मी टू' मोहिमेवेळी तनुश्री दत्तानं नाना पाटेकर यांच्यावर गैरवर्तनाचा आरोपही केला होता.

29 जुलै 2022 रोजी इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये तनुश्रीनं म्हटलंय, 'मला काहीही झाल्यास नाना पाटेकर आणि बॉलिवूडमधील माफिया जबाबदार असतील. बॉलिवूड माफिया कोण? तर तेच ज्यांची नावं सातत्यानं सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणात समोर येत होती.'

अभिनेत्री तनुश्री दत्तानं या पोस्टमधून 'बॉलिवूड माफियां'च्या सिनेमांवर बहिष्कार टाकण्याचंही आवाहन केलंय.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)