You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
बाळासाहेब ठाकरे एकनाथ शिंदेंचे की उद्धव ठाकरेंचे? कायद्याने कुणाचा हक्क जास्त?
- Author, नामदेव काटकर
- Role, बीबीसी मराठी
"शिवसेना आणि ठाकरे हे नातं त्यांना तोडायचंय. ही बंडखोरी नाही, हारमखोरपणा आहे, नमकहरामी आहे. एवढी हिंमत तुमच्यात असेल तर शिवसेनाप्रमुखांचा म्हणजे माझ्या वडिलांचा फोटो लावू नका. हिंमत असेल तर स्वत:च्या नावाने मतं मागा."
"शिवसेनेतून फुटून गेलेल्या आमदारांपैकी ज्यांचे आई-वडील हयात आहेत, त्यांना सुखी मानतो. पण या आमदारांनी त्यांच्या आई-वडिलांना घेऊन राज्यात सभा घ्याव्यात आणि मतं मागावीत."
"तुम्हाला पक्षही चोरायचाय, वडीलही चोरायला निघालात. तुम्ही कसले बंडखोर, तुम्ही दरोडेखोर आहात."
ही विधानं आहेत शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची.
आणि उद्धव ठाकरेंच्या याच विधानांनी नव्या प्रश्नाला तोंड फोडलंय, तो प्रश्न म्हणजे, 'शिवसेनेतून बंड करून शिंदे गटात सामिल झालेले आमदार बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा किंवा फोटोचा वापर आपल्या राजकीय प्रचारासाठी किंवा मतांसाठी करू शकतात का?'
याचं उत्तर आपण या बातमीतून शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत.
मुळात हा प्रश्न उपस्थित का झाला, हे थोडक्यात पाहू.
अगदी बंडाच्या पहिल्या दिवसापासून आजपर्यंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबतचे 39 आमदारांच्या तोंडात सातत्यानं 'बाळासाहेब ठाकरेंचं हिंदुत्त्व' किंवा 'बाळासाहेब ठाकरे' हे शब्द वारंवार येत आहेत.
हेच हेरून उद्धव ठाकरेंनी त्यांच्या छोटेखानी भाषणात बंडखोर आमदारांवर निशाणा साधला.
रविवारी (24 जुलै 2022) मुंबईच्या काळाचौकीतील अभ्युदय नगरमध्ये शिवसेनेच्या नव्या शाखेचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी उद्धव ठाकरेंनी केलेल्या भाषणात 'बाळासाहेब ठाकरें'चं नाव आणि फोटो न वापरण्याचं आव्हान बंडखोर आमदारांना दिलंय.
शिवसेनेत अभूतपूर्व बंड झालंय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी शिवसेनेच्या निम्म्याहून अधिक आमदार आणि खासदारांना आपल्या गटात सामिल करून घेतलंय. संघटनेतील अनेक पदाधिकारीही शिंदे गटाला समर्थन देऊ लागलेत. 39 आमदार आणि 12 खासदार आजच्या घडीला एकनाथ शिंदेंच्या बाजूनं आहेत.
विधिमंडळ आणि लोकसभेतील पक्ष एकनाथ शिंदेंनी ताब्यात घेतल्याचं आकडेवारीवरून दिसतंच आहे. मात्र, आता लढाई पक्ष संघटनेवर कुणाचं वर्चस्व याची सुरू झालीय. 'शिवसेना', 'धनुष्यबाण' आणि 'बाळासाहेब ठाकरे' या तीन गोष्टींसाठी प्रामुख्यानं ही लढाई आहे.
यातली शिवसेना आणि धनुष्यबाणाची लढाई एव्हाना निवडणूक आयोगानं पक्ष संघटनेतील बहुमत सिद्ध करण्याची सूचना दिल्यानं सुरू झालीय. मात्र, 'बाळासाहेब ठाकरे' यांचं नाव आणि फोटो वापरण्याबाबत अद्याप नियमांच्या पातळीवर लढाई सुरू झाली नाहीय.
मात्र, उद्धव ठाकरेंच्या आव्हानानंतर या प्रश्नाला सुद्धा तोंड फुटलं आहे. त्यामुळे या प्रश्नाची नियमांच्या अंगानं चाचपणी आपण करणार आहोत.
कायदेतज्ज्ञांना काय वाटतं?
उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वातील महाविकास आघाडीचं सरकार महाराष्ट्रात सत्तेत असताना, थोर व्यक्तींच्या यादीत काही अधिकच्या नावांचा समावेश करण्यात आला होता.
या नव्यानं समावेश करण्यात आलेल्या नावांमध्ये बाळासाहेब ठाकरे यांचंही नाव होतं. त्यामुळे शासकीय पातळीवर जर बाळासाहेब ठाकरेंचं नाव थोर व्यक्तींच्या यादीत असेल, तर इतरांना ते वापरण्यास बंदी येऊ शकते का, असाही प्रश्न उपस्थित होतो.
याबाबत बीबीसी मराठीनं प्रसिद्ध कायदेतज्ज्ञ अॅड. असीम सरोदे यांच्याशी बातचित केली.
अॅड. असीम सरोदे म्हणाले की, "बाळासाहेब ठाकरे हे सार्वजनिक जीवन जगले. सार्वजनिक क्षेत्रात ते पाच दशकांहून अधिक काळ कार्यरत राहिले. त्यामुळे त्यांच्यावरील अधिकार कुटुंबापुरता मर्यादित राहू शकत नाहीत. आपल्याकडे महात्मा गांधी किंवा इतर थोर पुरुषांच्या नावाचा, फोटोंचा वापर अनेक पक्ष करतातच. त्यावर कुणीही आक्षेप घेऊ शकत नाही."
मात्र, "बाळासाहेब ठाकरेंचं नाव किंवा फोटोचा जोपर्यंत गुन्हेगारी प्रकाराच्या कामासाठी वापर होत नाही, तोवर त्यावर आक्षेप घेता येणार नाही," असंही अॅड. असीम सरोदे म्हणतात.
तसंच, "बाळासाहेब ठाकरे या नावावर कॉपिराईट करण्यात आल्यास कायद्याच्या किंवा नियमांच्या पातळीवर लढता येऊ शकतं, मात्र तसं अद्याप काही झालेलं दिसत नाही," असंही अॅड. असीम सरोदे म्हणाले.
पण यातच खरी मेख आहे आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं त्यावर आधीच कार्यवाही करण्याची तसदी घेतली आहे.
बाळासाहेबांच्या नावाबाबत शिवसेनेच्या कार्यकारिणीत काय ठराव झालाय?
एकनाथ शिंदे बंडखोर आमदारांसह आसामच्या गुवाहाटीत असताना, मुंबईत शिवसेना भवनात उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक पार पडली. या बैठकीत शिवसेनेनं पाच ठराव केले होते. त्यातील एक ठराव शिवेसना आणि बाळासाहेब ठाकरे या दोन नावांबाबतही होता.
याबाबत अधिक माहितीसाठी बीबीसी मराठीनं शिवसेनेचे खासदार आणि मुख्य प्रवक्ते अरविंद सावंत यांच्याशी बातचित केली.
अरविंद सावंत म्हणाले, "बंडखोर आमदारांच्या गटानं मध्यंतरी प्रयत्न केला होता की, त्यांच्या गटाला 'शिवसेना बाळासाहेब ठाकरे गट' असं नाव देण्याचा. पण तसं होऊ शकत नाही."
सावंत पुढे म्हणाले, "नुकत्याच पार पडलेल्या शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत ठराव झालाय की, बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. या दोन्ही बाजू वेगळ्या करता येणार नाही. त्यामुळे 'शिवसेना' आणि 'बाळासाहेब ठाकरे' ही नावं कुणीही कुठेही वापरू नये, असा ठराव आम्ही केला आहे आणि हा ठराव निवडणूक आयोगाकडेही दिलाय."
"जरी बाळासाहेबांचं नाव वापरलं तरी जिथं दाद मागायची तिथं दाद मागू, पण जनतेच्या दरबरात शिवसेना कुणाची हे ठरणारच आहे, हेही या बंडखोर आमदारांनी लक्षात ठेवावं," असंही अरविंद सावंत बीबीसी मराठीशी बोलताना म्हणाले.
बाळासाहेबांचा फोटो ठाकरे कुटुंबाची मालमत्ता असू शकत नाही - केसरकर
शिंदे गटाचे प्रवक्ते आणि सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर यांनी सोमवारी (25 जुलै) पत्रकार परिषद घेतली. यावेळी केसरकरांनी बाळासाहेबांचे फोटो आणि नाव वापरण्याविषयी भाष्य केलं.
केसरकर म्हणाले, "एक गोष्ट अशी आहे की, बाळासाहेबांचा फोटो प्रत्येकाच्या घरामध्ये दिसतो. त्यांनी कुणाची परवानगी घेतली आहे का? ते (बाळासाहेब ठाकरे) राष्ट्राचे नेते आहेत, राज्याचे नेते आहेत, ते प्रत्येकाच्या मनात आहेत.
"जेव्हा मनुष्य मोठा होता, तेव्हा तो आपल्या कुटुंबापुरता मर्यादित राहत नाही. माझ्या मतदारसंघामध्ये मला भाई म्हणतात, कारण ते त्यांच्या कुटुंबातील मला मानतात. उद्या जर माझ्या मुलीनं त्यांना विचारलं की, तुम्ही माझ्या वडिलांना भाई का म्हणता? असा विचारायचा तिला अधिकार नाही. जेव्हा मी राजकारणात गेलो, तेव्हा सगळ्यांचा झालो. ही भावना प्रत्येकानं लक्षात घेतली पाहिजे."
"मी छोटा कार्यकर्ता असताना माझ्याबाबत ही भावना असू शकते, तर बाळासाहेब तर संपूर्ण महाराष्ट्राचे नेते आहेत. महाराष्ट्राची अस्मिता आहेत ते. त्यांचा फोटो हा कुटुंबाची मालमत्ता असू शकत नाही," असंही केसरकर पुढे म्हणाले.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)