You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
राज ठाकरे, नारायण राणे, छगन भुजबळांच्या शिवसेनेतील बंडामागे शरद पवार होते?
- Author, मयांक भागवत
- Role, बीबीसी मराठी
'राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी तीन वेळा शिवसेना फोडली,' मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे प्रवक्ते आणि आमदार दीपक केसरकर यांनी हा आरोप केलाय.
शिंदेंच्या बंडानंतर बीबीसी मराठीशी बोलताना दीपक केसरकर म्हणाले होते, "जेव्हा-जेव्हा शिवसेना फुटली त्यामागे शरद पवारांचा हात होता." आता शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर दिल्लीत बोलताना त्यांनी पुन्हा हा आरोप केलाय.
राष्ट्रवादी कॉंग्रेसने दीपक केसरकर यांचे आरोप फेटाळून लावले आहेत. प्रवक्ते महेश तपास म्हणाले, "केसरकरांचं वक्तव्य अत्यंत बेजबाबदार आहे. त्यांना शिवसेनेचा इतिहास आणि फुटीची कारणं माहिती नसावीत. शरद पवार आणि बाळासाहेबांचे संबंध अत्यंत चांगले होते."
पण, दीपक केसरकर यांनी केलेले आरोप किती खरे आहेत? शिवसेनेत याआधी झालेल्या बंडामागे शरद पवारांचा किती हात होता? हे आम्ही शोधण्याचा प्रयत्न केला.
दीपक केसरकरांचे आरोप
एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर बीबीसी मराठीने दीपक केसरकर यांची मुलाखत घेतली होती. यात शिवसेनेतील बंडाबाबत त्यांना प्रश्न विचारण्यात आला होता. ते म्हणाले होते, "जेव्हा-जेव्हा शिवसेना फुटली त्यामागे शरद पवारांचा हात होता. तुम्ही शिवसेना फुटण्याचा इतिहास तपासून पाहा."
बुधवारी (13 जुलै) दीपक केसरकर दिल्लीत NDA च्या बैठकीत उपस्थित राहिले. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी पुन्हा पवारांवर शिवसेना फोडण्याचा आरोप केला. ते म्हणाले, "शिवसेना फोडून बाळासाहेबांना यातना का दिल्या. याचं उत्तर त्यांनी जनतेला दिलं पाहिजे."
एबीपी माझाशी बोलताना केसरकर म्हणाले, "राणेंना बाहेर पडण्यासाठी पवारांनी मदत केली." शरद पवारांनीच त्यांना हे खासगीत खासगीत सांगितल्याचा दावा त्यांनी केला. ते पुढे म्हणाले, "छगन भुजबळांना पवारच स्वत: बाहेर घेऊन गेले होते. राज ठाकरेंच्या मागेही त्यांचे आशिर्वाद होते."
राष्ट्रवादीने फेटाळले आरोप
दीपक केसरकर यांचे आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसने फेटाळून लावले आहेत. बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांच्यात अत्यंत चांगले संबंध होते, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीने दिलीये.
प्रवक्ते महेश तपासे म्हणाले, "बहुदा त्यांना शिवसेनेचा इतिहास माहित नाही. यात शरद पवारांचा काही संबंध नाही. शिवसेनेतून लोक बाहेर का पडले याचं कारणंही त्यांना माहित नसावीत."
शिंदे गटाने भाजपसमोर लोटांगण घातलंय. बाळासाहेबांना वेदना देणारी कृती यांनी केलीये, असा आरोप त्यांनी केला. ते पुढे म्हणाले, "2019 मध्ये शिवसैनिकाला स्वाभिमान जपण्याचं काम शरद पवारांनी केलं."
पवारांनी फोडली शिवसेना?
दीपक केसरकर यांनी केलेले आरोप खरे का खोटे हे तपासण्याआधी शिवसेनेतील बंडखोरीचा इतिहास जाणून घेणं महत्त्वाचं आहे.
1966 मध्ये स्थापन झालेल्या शिवसेनेत पहिली मोठी बंडखोरी केली छगन भुजबळांनी. त्यानंतर नारायण राणे आणि राज ठाकरेंसारख्या मोठ्या नेत्यांनी बाळासाहेब ठाकरेंना सोडून वेगळी वाट धरली.
शिवसेना नेत्यांच्या बंडामागे शरद पवारांचा हात होता? पवारांवर नेहमी आरोप का केले जातात. याबाबत मॅक्स महाराष्ट्रचे संपादक रवींद्र आंबेकर सांगतात, "अनेक पक्षातील लोक पवारांच्या कायम संपर्कात असतात. खासकरून अडीअडचणीच्या वेळी तर नक्कीच. शिवसेनेतील अनेक नाराज त्यांच्या संपर्कात होते आणि असतात. पण, पवारांनी शिवसेना फोडली असं मानायला पुरेसं तार्किक कारण उपलब्ध नाही."
शिवसेनेच्या राजकीय वाटचालीदरम्यान अनेक आमदार, खासदार आणि नेते सोडून गेले आहेत. केसरकर यांनी भुजबळ, राणे आणि राज ठाकरेंच्या शिवसेना सोडण्यामागे शरद पवारांचा हात असल्याचा आरोप केलाय.
बीबीसीशी बोलताना राजकीय विश्लेषक सचिन परब सांगतात, "शिवसेनेत विचारधारा, संघटना आणि क्लास यात अंतर्गत विरोधाभास आहेत. हीच शिवसेना फुटण्याची प्रमुख कारणं आहेत."
शिंदे यांच्या बंडाला भाजपने पहिल्यापासून रसद पुरवली होती. भाजप नेते शिंदे यांच्यासोबत सातत्याने दिसून येत होते. सचिन परब पुढे म्हणाले, "ज्या आक्रमकतेने भाजप ऑपरेशन लोटस करतं. तितक्या आक्रमकपणे शरद पवार वागलेले दिसत नाहीत."
"राष्ट्रवादी कॉंग्रेसचा सरळ लढा शिवसेनेशी आहे. तरी पवार-ठाकरे कौटुंबिक संबंध पहाता, पवारांनी शिवसेना फोडण्यासाठी थेट प्रयत्न केल्याचं दिसत नाही," रवींद्र आंबेकर पुढे म्हणतात. छगन भुजबळांची बंडखोरी
तीन दशकांपूर्वी छगन भुजबळ यांनी पहिल्यांदा शिवसेनेला धक्का दिला. साल होतं 1991. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे राजकारणात सक्रिय होते. सुधाकरराव नाईक यांच्या नेतृत्वात कॉंग्रेसचं सरकार होतं. शिवसेना सत्तेची प्रबळ दावेदार मानली जात होती.
मंडल आयोगाची अंमलबजावणी आणि महात्मा फुलें विरोधात अवमानकारक लिहील्यामुळे भुजबळ दुखावलेले होते. त्यांनी शिवसेनेला मोठा हादरा दिला. 54 पैकी 18 आमदारांसह त्यांनी शिवसेना सोडली.
भुजबळांच्या बंडखोरी करण्यामागे पवार होते का? हा प्रश्न आम्ही आम्ही राजकीय विश्लेषक राही भिडेंना विचारलं. भुजबळांची बंडखोरी त्यांनी जवळून कव्हर केलीये. बीबीसीशी बोलताना त्या म्हणाल्या, "छगन भुजबळांच्या बंडाला शरद पवारांचा संपूर्ण सपोर्ट होता. पवार कॉंग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर भुजबळांनी पाठोपाठ राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यामुळे भुजबळांच्या बंडाला पवारांचा पाठिंबा होता हे स्पष्ट आहे."
विरोधी पक्षातील नाराज नेत्यांना आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न प्रत्येक पक्षाकडून केला जातो. मोठे नेते नाराज नेत्यांना बंडखोरीसाठी उद्युक्त करून कुरघोडीचं राजकारण करत असतात. भुजबळांच्या बंडावेळी सत्तेच्या चाव्या फिरवण्याचं केंद्र होतं नाशिक. या बंडानंतर भुजबळांना मंत्रिपद मिळालं. पण, सहा बंडखोर आमदार पुन्हा शिवसेनेत परत आले होते. राणेंच्या बंडामागे पवारांचा हात?
बंडखोरीचा दुसरा मोठा धक्का शिवसेनेला बसला जेव्हा नारायण राणेंनी पक्ष सोडला. साल होतं 2005. बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेची सूत्र उद्धव ठाकरेंच्या हाती दिली आणि राणे नाराज झाले. उद्धव ठाकरेंवर आरोप करत नारायण राणेंनी शिवसेनेला सोडचिठ्ठी दिली.
शिवसेनेत झालेली राजकीय कोंडी राणेंच्या शिवसेना सोडण्यामागचं प्रमुख कारण होतं, त्यामागे शरद पवारांचा थेट हात नव्हता असं राजकीय जाणकार सांगतात.
सिंधुदुर्गातील वरिष्ठ राजकीय विश्लेषक दिनेश केळुस्कर यांनी नारायण राणेंची बंडखोरी आणि राजकारण जवळून पाहिलंय. ते म्हणाले, "राणे नाराज असल्याचं कळताच पवारांनी एक दार खुलं केलं होतं. राणे राष्ट्रवादीत प्रवेश करणार होते. यासाठी चाचपणी करण्यात आली होती. पण, नेत्यांच्या विरोधामुळे हे शक्य झालं नाही."
राणे आणि पवार यांच्यात वैयक्तिक चांगले संबंध आहेत. रवींद्र आंबेकर पुढे म्हणाले, "राणे-पवार संबंध चांगले असूनही पवारांनी त्यांच्यासाठी राष्ट्रवादीची कवाडं खुली केली नाहीत."
शिवसेना सोडल्यानंतर राणेंनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांच्यासोबत मुंबई आणि सिंधुदुर्गातील राणे समर्थकही कॉंग्रेसमध्ये गेले होते. त्यामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला होता.
राही भिडे सांगतात, "शरद पवारांनी राणेंना पक्षात घेतलं नाही. पण, बंडखोरीमागे पवारांचा थेट हात नसला तरी बाहेरून पाठिंबा नक्कीच होता. याचं कारण, शिवसेना फुटली नसती कर राष्ट्रवादी कॉंग्रेस वाढली नसती."
राजकीय विश्लेषक सचिन परबही राही भिडे यांच्या मतशी सहमत आहेत. "राणेंच्या बंडाला पवारांचं थेट नाही पण छुपं समर्थन असू शकतं याची शक्यता नाकारता येत नाही," असं ते म्हणतात.
राज ठाकरे शिवसेनेतून कोणामुळे बाहेर पडले?
बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर शिवसेनेची सूत्र राज ठाकरे यांच्याहाती येतील, असं अनेकांना वाटलं होतं. राज यांची शैली, आक्रमकता बाळासाहेबांसारखी होती. त्यामुळे शिवसेना कार्यकर्त्यांना राज यांच्याकडे पक्षाची सूत्र येतील असं वाटत होतं. पण प्रत्यक्षात मवाळ स्वभावाच्या उद्धव यांच्याकडे शिवसेनेची सूत्र गेली.
राज ठाकरे शिवसेनेत प्रचंड नाराज होते. ते बाहेर पडले आणि त्यांनी 2009 मध्ये स्वत:चा पक्ष स्थापन केला. राज ठाकरेंचं शिवसेना सोडणं वरिष्ठ राजकीय विष्लेषक सचिन परब यांनी कव्हर केलंय.
राज ठाकरेंच्या बंडखोरीमागे पवारांचा हात होता. हा आरोप खरा आहे का? ह सवाल मी त्यांना केला. त्यावर सचिन परब सांगतात, "राज ठाकरेंच्या बंडाशी शरद पवारांचा संबंध आहे असं मला त्या काळात वाटलं नाही. आणि हे आरोप दीपक केसरकर यांनी करावे यासारखं हास्यास्पद काही नाही."
रवींद्र आंबेकर म्हणतात, "राज ठाकरे यांचं शिवसेना सोडून जाणं शरद पवारांच्या दृष्टीने फूट नसून घरगुती वाद होता. प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना राज राष्ट्रवादीत येणार का? यावर 'या वयात बाळासाहेबांना त्रास होईल असं काही मला करायचं नाही' असं त्यांनी सांगितलं होतं."
सचिन परब यांच्यामते, "राज यांच्या बंडाला भाजपची थोडीफार प्रमाणात फूस असण्याची शक्यता नाकारता येत नाही. नितीन गडकरी, विनोद तावडे आणि आशिष शेलार यांसारखे नेते त्याकाही राज यांना भेटायला येत होते."
शिवसेनेत फूट पडावी असं पवारांनी केलेलं नसलं तरी इतरांपेक्षा आपला पक्ष वाढावा यासाठी त्यांनी आक्रमक प्रयत्न केले आहेत, असं मात्र आंबेकरांना वाटतं.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)