You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
दीपक केसरकर म्हणतात, 'आदित्यजी, बोलायची वेळ आणू नका...'
"शिवसैनिकांनी शिवसेनेसाठी संघर्ष केला, कट्टर शिवसैनिकांची बदनामी केली जातेय," असं सांगत एकनाथ शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी आपल्या गटाची बाजू मांडली. दीपक केसरकरांनी पत्रकार परिषद घेऊन आदित्य ठाकरेंच्या टीकांना उत्तरं दिली.
"शिवसैनिकांचा अपमान करू नका, ज्यांचा आदर केला त्यांच्याविरोधात बोलायची वेळ आणू नका," असा सल्ला केसरकर यांनी आदित्य ठाकरे यांना दिला.
केसरकर पुढे म्हणाले, "संजय राठोडांचा विवाह असताना ते शिवसेनेसाठी तुरुंगात गेले होते. भुमरे एकहाती लढत राहिले, अनेकवेळा तुरुंगात गेले याला शिवसेना म्हणतात. या सगळ्यांमुळे सेना ताठ उभी आहे. त्यांच्यावर शंका घेणं वेदनादायी आहे."
"बाळासाहेब एकवचनी होते. शिंदेसाहेबांना मुख्यमंत्रिपदाचं वचन दिलं होतं. त्यांना मिळालं नाही तरी शिंदेसाहेब गप्प राहिले. उद्धव ठाकरे यांनी पद देऊ करुनही त्यांनी मुख्यमंत्रिपद नाकारलं. पण राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसशी आघाडी तोडायची विनंती केली," असं केसरकर म्हणाले.
तसंच, "आम्ही आमचा गट विलिन करू शकलो असतो पण आम्ही शिवसैनिक आहोत. आमचा लढा बाळासाहेबांच्या विचारांसाठी आहे. जिथं बाळासाहेबांचा विचार नाही ती शिवसेना नाही. जे बाळासाहेबांच्या विचारांना घेऊन पुढे जातात ते शिवसैनिक. आम्ही हाडाचे शिवसैनिक आहोत, आम्हाला अपात्र ठरवण्यासाठी का प्रयत्न केले जात आहे. बाळासाहेबांचे हिंदुत्व सोडणार असाल तर त्याला शिवसेना कसं म्हणता येईल.
"उद्धव ठाकरे आजारातून बरे झाल्यावर शिंदे त्यांना भेटले आणि राष्ट्रवादीशी संबंध तोडण्यास सांगितले. ते आजारी असताना बंड झालं हे खोटं आहे. आज कार्यकर्ते लांब जातील असे वाटत असल्यामुळे यात्रा सुरू आहेत," असंही केसरकर म्हणाले.
आदित्य ठाकरे यांचा नाशिक दौरा
राज्यातील सत्ता संघर्षानंतर युवासेना प्रमुख व माजी मंत्री आदित्य ठाकरे नाशिक दौऱ्यावर असून एकनाथ शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे यांच्या मतदार संघातील मनमाड मध्ये शिवसंवाद मेळावा घेऊन शिवसैनिकांशी संवाद साधणार आहे, आदित्य काय बोलणार, याकडे सर्वांच लक्ष आहे.
युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे दोन दिवस नाशिक जिल्हा दौरावर असून शिव संवाद दौऱ्याच्या माध्यमातून ते शिवसैनिकांशी संवाद साधत आहेत.
काल शहरातील शिवसैनिकांशी संवाद साधल्यानंतर आज सकाळी त्यांनी पंचवटीतील प्रसिद्ध श्री काळाराम मंदिरात जाऊन प्रभू रामचंद्रांचे दर्शन घेतलं.
जसं देशातील सुख-समृद्धीसाठी प्रभू रामचंद्रांच्या चरणी प्रार्थना केल्याचं युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी सांगितलं.
आमदार सुहास कांदे भेटायला आले तर त्यांना भेटू आणि त्यांना मातोश्रीचेही दरवाजे खुले आहेत, याचा पुनरुच्चार आदित्य ठाकरे यांनी केला.
माझं कुठे चुकलं? - सुहास कांदे
एकीकडे आदित्य ठाकरे यांचा दौरा सुरू असताना त्याला प्रत्युत्तर म्हणून नांदगाव मतदारसंघाचे आमदार सुहास कांदे यांनी पोस्टरबाजी सुरू केली आहे.
माझं कुठे चुकलं, असा प्रश्न सुहास कांदे यांनी या माध्यमातून आदित्य ठाकरे यांना विचारला आहे.
सोबतच हजारो कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन आदित्य ठाकरे यांची घेणार आहे, असं ते म्हणाले.
हिंदुत्व तसेच काही प्रश्नाबाबत त्यांना निवेदन सादर करणार असल्याचे पत्र त्यांनी पोलिसांना दिले आहे.दरम्यान कांदे यांनी आदित्य ठाकरे ज्या मार्गाने येणार आहेत, त्या ठिकाणी विविध प्रश्न विचारणारे फलक लावले.
आदित्य ठाकरे यांची भेट घेण्यासाठी सुहास कांदे आपल्या घरातून निघाले. पण रस्त्यातच त्यांच्या वाहनांचा ताफा शिवसैनिकांनी अडवल्याचं समोर आलं. नंतर त्याच शिवसैनिकांनी आदित्य ठाकरे यांचं पिंपळगाव टोलनाक्याजवळ स्वागत केलं. यादरम्यान काय घडामोडी घडतात, याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)