शिवसेनेसारखंच बंड बिहारमध्येही काही महिन्यांपूर्वी झालं होतं...

    • Author, मयांक भागवत
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

महाराष्ट्रात जून महिन्यात सत्तांतराचं नाट्य रंगलं. शिंदे मुख्यमंत्री झाले. या बंडानंतर आता शिवसेना कोणाची ठाकरेंची का शिंदेंची? हा सत्तासंघर्ष सुरू झालाय. पण, गेल्यावर्षी जून महिन्यात असाच एक सत्तासंघर्ष बिहारमध्ये रंगला होता.

पक्षावरील वर्चस्वाच्या लढाईत चिराग पासवान आणि पशुपती पारस ही काका-पुतण्याची जोडी आमने-सामने होती. दिवंगत केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांचा लोकजनशक्ती पक्ष कोणाचा? हे या संघर्षाचं प्रमुख कारण होतं.

चिराग रामविलास पासवान यांचा मुलगा तर, पशुपती पारस रामविलास पासवान यांचे लहान भाऊ. रामविलास पासवान यांचा खरा राजकीय उत्तराधिकारी मीच, असं म्हणत पारस यांनी बंड केलं. चिराग पासवान यांना लोकसभा गटनेता पदावरून हटवून ते गटनेते झाले.

शिवसेनेतील बंडखोरी, चिन्हासाठी सुरू असलेली लढाई पाहता लोकजनशक्ती पक्षातील फूट आणि शिवसेनेतील बंडखोरी या दोन राजकीय घटनांमध्ये प्रचंड साम्य आहे.

'मी पक्ष वाचवला'

महाराष्टातील शिंदे गटाच्या बंडखोरीप्रमाणे बिहारच्या लोकजनशक्ती पक्षातही मोठं बंड झालं होतं. तारीख होती 14 जून 2021.

लोकजनशक्ती पक्षाचे लोकसभेतील खासदार पशुपती पारस यांनी चिराग पासवान यांच्याविरोधात बंड पुकारलं. दिवंगत केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांच्या मृत्यूनंतर चिराग पासवान यांच्याकडे पक्षाच्या अध्यक्षपदाची धुरा आली. चिराग यांच्या पक्ष चालवण्याच्या पद्धतीवर पशुपती पारस आणि इतर खासदार नाराज होते.

पशुपती पारस यांनी लोकसभेतील लोकजनशक्ती पक्षाचे सहापैकी पाच खासदार फोडले. बंडखोरीनंतर माध्यमांशी बोलताना पशुपती पारस म्हणाले होते, "पक्षातील पाच खासदारांची पक्ष वाचवण्याची इच्छा होती. मी पक्ष फोडला नाही. उलट मी पक्ष वाचवला आहे." तर, चिराग पासवान यांनी, "पक्ष आईसारखा असतो. त्याच्याशी दगा कधीच करायचा नाही," असं भावनिक ट्वीट केलं होतं.

महाराष्ट्रतही काही प्रमाणात असंच घडलंय. एकनाथ शिंदेंनी बंडानंतर सातत्याने "मी पक्ष फोडलेला नाही. शिवसेनेला संपवण्याचा राष्ट्रवादी कॉंग्रेसचा डाव होता. आम्ही शिवसेना वाचवली," अशी भूमिका घेतली. तर उद्धव ठाकरेंकडून, "ज्या नेत्यांना शिवसेनाप्रमुखांनी इतकं दिलं. तेच विसरले," या शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या.

आम्हीच खरा पक्ष

पशुपती पारस यांच्या नेतृत्वाखालील बंडखोर गटाने चिराग पासवान यांची पक्षाच्या अध्यक्षपदावरून हकालपट्टी केली. चिडलेल्या चिराग यांनी मग पारस आणि इतर खासदारांना पक्षातून काढून टाकलं. त्यामुळे लोकजनशक्ती पक्ष कोणाचा यावरून काका-पुतण्यात रणकंदन सुरू झालं.

"रामविलास पासवान यांचा खरा राजकीय उत्तराधिकारी मीच आहे. चिराग त्यांचा मुलगा आहे. पण, राजकीय उत्तराधिकारी नाही आणि होऊ देखील शकत नाही," अशी प्रतिक्रिया पशुपती पारस यांनी बंडखोरी केल्यानंतर पीटीआयशी बोलताना दिली होती.

2021 मध्ये पशुपती पारस यांना केंद्रातील नरेंद्र मोदींच्या कॅबिनेटमध्ये जागा मिळाली. चिराग पासवान त्यावेळी म्हणाले होते, "पशुपती पारस यांना लोकजनशक्ती पक्षातून काढून टाकण्यात आलंय. त्यामुळे त्यांना पक्षाच्या कोट्यातून मंत्रीपद मिळू शकत नाही."

महाराष्ट्रातही काहीसं हेच चित्र पहायला मिळतंय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि समर्थक आमदार वारंवार "आम्हीच बाळासाहेब ठाकरेंची खरी शिवसेना आहोत," असा दावा करत आहेत.

उद्धव ठाकरे यांनी शिंदे समर्थक नेते, विभागप्रमुख, जिल्हाप्रमुख यांच्यावर हकालपट्टीची कारवाई केली आहे. पण, एकनाथ शिंदे यांनी त्या सर्व नेत्यांना पुन्हा त्याच पदावर परत आणलं. शिंदे गटाने उद्धव ठाकरेंविरोधात काहीच कारवाई केलेली नाही. पण, पक्ष कोणाचा हा वाद महाराष्ट्राच्या राजकारणातही पहायला मिळतोय.

पशुपती पारस बनले गटनेते

चिराग पासवान यांच्याविरोधात मोहीम उघडणारे पशुपती पारस आणि इतर खासदारांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लांची भेट घेतली. पाच खासदारांनी लोकजनशक्ती पक्षाचा लोकसभेतील गटनेता म्हणून पशुपती पारस यांना पाठिंबा जाहीर केला.

लोकसभा अध्यक्षांनी 1988 साली अॅटर्नी जनरल यांनी सुप्रीम कोर्टात केलेल्या सूचनेचा आधार घेतला. अॅटर्नी जनरल यांनी सुप्रीम कोर्टात म्हटलं होतं की "ज्या नेत्याला जास्त मतं मिळतील तो त्या पक्षाचा गटनेता असेल" याच आधारावर पशुपती पारस यांची गटनेता म्हणून नियुक्ती केली.

सद्य स्थितीतही पशुपती पारस लोकजनशक्ती पक्षाचे गटनेते आहेत.चिराग पासवान यांनी लोकसभा अध्यक्षांच्या निर्णयाविरोधात नाराजी व्यक्त केली होती.

महाराष्ट्रातही काहीसं असंच घडलं. शिवसेनेच्या 12 बंडखोर खासदारांनी शिंदे गटाला पाठिंबा जाहीर केल्यानंतर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लांनी राहुल शेवाळे यांना शिवसेनेचा गटनेता म्हणून नियुक्त केलंय. राहुल शेवाळेंची निवड पूर्वनियोजित असल्याचा आरोप शिवसेनेने केलाय. खासदार विनायक राऊत पत्रकारांशी बोलताना दिल्लीत म्हणाले, "आमचं म्हणणं ऐकून घेतलं गेलं नाही. लोकसभा सचिवालयाची भूमिका संशयास्पद आहे."

चिराग पासवान यांनी अध्यक्षांच्या आदेशाला कोर्टात आव्हान दिलं होतं. आता शिवसेनादेखील कायदेशीर लढाई लढणार आहे.

NDA मधून बाहेर पडण्याचा निर्णय

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याशी असलेल्या मतभेदांमुळे 2020 मध्ये, बिहार निवडणुकांआधी चिराग पासवान यांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून (NDA) बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्यांनी बिहारमध्ये निवडणूक लढवली. पण, लोकजनशक्ती पक्षाचा फक्त एक आमदार निवडून आला. त्यामुळे पक्षात नाराजी होती. तेव्हापासूनच चिराग पासवान यांच्याविरोधात पक्षातच बंडाची बीजं पेरली गेली होती.

2021 मध्ये गटनेते झाल्यानंतर पशुपती पारस यांना मंत्रीपद मिळालं. "लोकजनशक्ती पार्टी NDA चा घटक आहे. मी NDA सोबत होतो आणि पुढेही राहीन," असं ते त्यावेळी दिल्लीतील पत्रकार परिषदेत म्हणाले होते.

उद्धव ठाकरेंनी 2019 मध्ये भाजपशी युती तुटल्यानंतर कॉंग्रेस-राष्ट्रवादीसोबत महाविकास आघाडीची स्थापना केली. आता अडीच वर्षानंतर शिंदे गटाने उद्धव ठाकरेंची साथ सोडून भाजपशी हातमिळवणी केली आहे. शिंदे गट आता भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा घटकपक्ष बनलाय.

पीटीआयच्या वृत्तानुसार, 17 जुलै 2022 दिल्लीत NDA च्या बैठकीत चिराग पासवान यांनी हजेरी लावली होती.

बिहारचे वरिष्ठ पत्रकार मणिकांत ठाकूर यांनी चिराग पासवान आणि पशुपती पारस यांचं राजकारण अत्यंत जवळून पाहिलंय. ते म्हणतात, "चिराग पासवान यांनी नितीश कुमार यांच्याविरोधात मोहीम सुरू केली होती. त्यामुळे नितीश नाराज झाले." त्यामुळे भाजपने चिराग पासवान यांना जवळ केलं नाही.

ते पुढे सांगतात, "जेडीयू आणि भाजपचे संबंध फारसे चांगले नाहीत. पण सत्तेत एकत्र रहाणं त्यांची मजबुरी आहे. ज्यावेळी जेडीयू भाजपपासून फारकत घेईल. भाजप चिराग पासवान यांना जवळ करेल."

पक्षाच्या चिन्हाचा वाद

ऑक्टोबर 2021 मध्ये लोकजनशक्ती पक्षाचं निवडणूक चिन्ह कोणाचं? हा वाद सुरू झाला. चिराग पासवान आणि पशुपती पारस दोन्ही गटांनी लोकजनशक्ती पक्षावर आपला दावा केल्याने प्रकरण केंद्रीय निवडणूक आयोगाकडे गेलंय. केंद्रीय निवडणूक आयोगाने अद्याप अंतिम निर्णय दिलेला नाही.

राज्यातही शिवसेना कोणाची हा ठाकरे विरुद्ध शिंदे वाद सुरूच आहे. एकनाथ शिंदे गटाने केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र लिहिलंय. तर, शिवसेनेने आमचं ऐकून घेतल्याशिवाय पक्षाच्या चिन्हाबाबत कोणताही निर्णय घेऊ नका, अशी विनंती केंद्रीय निवडणूक आयोगाला केली आहे.

टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, ऑक्टोबर 2021 मध्ये केंद्रीय निवडणूक आयोगाने चिराग पासवान आणि पशुपती पारस गटाला वेगळं नाव आणि निवडणूक चिन्ह दिलं होतं.

बिहारमध्ये झालेल्या विधानसभेच्या पोटनिवडणुकीत चिराग पासवान गटाला 'लोकजनशक्ती पक्ष' (रामविलास) हे नाव आणि 'हेलिकॉप्टर' चिन्ह मिळालं. तर, पशुपती पारस यांना 'राष्टीय लोकजनशक्ती पार्टी' असं नाव आणि 'शिलाई मशिन' चिन्ह देण्यात आलं.

दोन्ही गटांनी आम्हीच खरा 'लोकजनशक्ती पक्ष' असा दावा केला. पण, केंद्रीय निवडणूक आयोगाने त्यांना लोकजनशक्ती हे नाव आणि बंगला निवडणूक चिन्ह वापरण्यापासून मनाई केली होती.

लोकजनशक्ती पक्षाचे गटनेते बिहारच्या हाजीपूरचे खासदार आहेत. तर, चिराग पासवान जमुईतून निवडून आले आहेत.

काका-पुतण्यातील नाराजी नाट्य रंगत असताना चिराग पासवान दिल्लीत पशुपती पारस यांना भेटण्यासाठी त्यांच्या बंगल्यावर गेले. पाऊण तास बाहेर उभं राहिल्यानंतर त्यांना आत घेण्यात आलं. प्रसारमाध्यमांमध्ये छापून आलेल्या बातम्यांनुसार, चिराग पासवान जवळपास एक तास आत होते. पीटीआयच्या बातमीनुसार, पशुपती पारस घरी नसल्यामुळे चिराग पासवान यांची त्यांच्याशी भेट होऊ शकली नाही.

सत्तासंघर्षाच्या नाराजी नाट्यानंतर चिराग पासवान आणि पशुपती पारस यांच्यातील संबंध अजूनही ताणले गेलेले आहेत. इंडिया टीव्हीच्या बातमीनुसार, पशुपती पारस यांनी चिराग पासवान त्यांची हत्या करण्याचा प्लान करत असल्याचा आरोप केला होता. हाजीपूरमध्ये झालेल्या हल्ल्यामागे चिराग पासवान यांचा हात आहे असा आरोप पारस यांनी केला. जर माझ्यावर करण्यात आलेले आरोप खरे असतील तर सरकारने कारवाई करावी, अशी प्रतिक्रिया चिराग यांनी दिली होती.

मणिकांत ठाकूर पुढे म्हणाले, "चिराग पासवान एकटे पडले आहेत. जो जनाधार त्यांच्यासोबत होता आला तो विखूरला गेलाय." भाजप आणि नितीश कुमारांनी चिराग पासवान यांना एकटं पाडलंय.

"पशुपती पारस आणि नितीश कुमार यांचे अत्यंत चांगले संबंध आहेत. त्यामुळे चिरागला एकटं पाडण्यासाठी नितीश यांनी पशुपती यांना जवळ केलंय."

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)