एकनाथ शिंदे : मुख्यमंत्र्यांचे 'ते' व्हीडिओ व्हायरल कोण करतंय?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन दिवस दिल्ली दौऱ्यावर होते. पण दिल्लीत असले तरी शिंदेंचं सगळं लक्ष महाराष्ट्राकडे असल्याचं यादरम्यान दिसून आलं. महाराष्ट्रातील पूरस्थिती तसंच इतर महत्त्वाच्या विषयांचा आढावा ते घेत होते.

संबंधित अधिकाऱ्यांना फोन करून आवश्यक सूचना ते देत होते.

गेल्या काही दिवसांत अशा प्रकारचे काही व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यापैकी एका व्हीडिओत एकनाथ शिंदे अपघातग्रस्त वारकऱ्यांवर तातडीने उपचार करण्याची सूचना करताना, वारकऱ्यांना बोलताना दिसतात.

मुख्यमंत्री शिंदेच्या या सगळ्या व्हीडिओंना सोशल मीडियावर चांगला प्रतिसाद मिळत आहे.

तातडीची कार्यवाही करत असल्याबाबत काही जण मुख्यमंत्र्यांचं कौतुक करताना दिसतात. पण दुसऱ्या बाजूला मुख्यमंत्र्यांचा हा पब्लिसिटी स्टंट आहे, असं म्हणून टीका करणारेही बरेच लोक आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर याबाबत टीका करताना "कोणतंही काम आलं की फोन लाव सांगतो, कॅमेरा लाव सांगत नाही," अशी टीका विरोधीपक्ष नेते अजित पावर यांनी केली आहे.

या निमित्ताने मुख्यमंत्र्यांचे हे व्हीडिओ नेमकं कोण आणि का व्हायरल करत आहे, याची आपण माहिती घेऊ -

व्हीडिओ व्हायरल कोण करतं?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत सातत्याने उपस्थित असलेल्या जनसंपर्क टीमकडूनच (PR टीम) हे काम केलं जात आहे. मुख्यमंत्र्यांनी घेतलेले निर्णय लोकांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी या PR टीमकडे असते.

इतकंच नव्हे तर यासंदर्भातले काही व्हीडिओ महाराष्ट्राच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या म्हणजेच महाराष्ट्र DGIPR च्या अधिकृत ट्विटर खात्यांवरूनही ट्वीट करण्यात आले आहेत.

वारकऱ्यांच्या अपघातानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांना फोन केला होता. या फोनवरील संवादाचा व्हीडिओ सर्वप्रथम व्हायरल झाल्याचं दिसून आलं.

यामध्ये एकनाथ शिंदे म्हणतात, "हे सगळे आपले वारकरी आहेत. सगळे बरे होतील, अशी ट्रिटमेंट त्यांच्यावर करा. त्यांना लागणारा सगळा खर्च मी करतो. त्यांना काहीही कमी पडू नका. गरज भासल्यास मोठ्या हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करा."

यानंतर मुख्यमंत्री शिंदे हे जखमी वारकऱ्यांशी संवाद साधताना एक व्हीडिओही DGIPR च्या अकाऊंटवरून ट्वीट करण्यात आला.

मुख्यमंत्री शिंदे दिल्ली दौऱ्यावर असतानाही अशाच प्रकारे दोन व्हीडिओ व्हायरल झाले. यामध्ये एक व्हीडिओ हिंगोली जिल्ह्यात आसना नदीला आलेल्या पुरासंदर्भात होता.

तर अमरावती जिल्ह्यातील मेळघाट परिसरात दूषित पाणी प्यायल्याने 50 प्रकृती खराब झाली होती. त्याविषयी मुख्यमंत्री जिल्हाधिकाऱ्यांना सूचना करत असल्याचाा हा दुसरा व्हीडिओ होता.

व्हीडिओवरील प्रतिक्रिया

तानाजी व्ही. मालुसरे नामक एका ट्विटर अकाऊंटने यावर प्रतिक्रिया दिली. "खरंच साहेब, तुम्ही ग्रेट आहेत. किती काळजी आहे. सर्वसामान्य लोकांची तुम्हाला खूप खूप धन्यवाद साहेब," असं ट्विट या खात्यावरून करण्यात आलं.

धनु नामक एका खात्याने म्हटलं, "बरोबर आहे, लोकांना समजलं पाहिजे साहेब काम करत आहेत म्हणून.."

बिचेवार या ट्विटर खात्यावरून प्रतिक्रिया देण्यात आली, "पारदर्शक आणि गतिमान प्रशासन. पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा."

पण या व्हीडिओंवर नकारात्मक प्रतिक्रियांची रांगही लागलेली आहे. इतकंच नव्हे तर त्यावर मीमही बनवण्यात आले आहेत.

रौनक ठाकूर नामक एका खात्यावरून एक मीम पोस्ट करण्यात आली आहे. यामध्ये कॅमेरामन म्हणतोय, "साहेब, कॅमेरा चालू केलाय. राज्याच्या पूर परिस्थितीचा आढावा घ्या..."

दे धक्का चित्रपटातील एक दृश्य वापरून हे आणखी एक मीम तयार करण्यात आलं आहे.

पराग कविटके नामक एका ट्विटर अकाऊंटवरून एकनाथ शिंदे यांना असं न करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

पराग म्हणतात, "शिंदे साहेब तुमच्यावर विश्वास आहे आमचा.. पण हे असे व्हीडिओ टाकून स्वतःची इमेज खराब करू नका. बालिशपणा आहे हा."

एकूण काय या व्हीडिओंवर लोकांची मतमतांतरं असली तरी त्यांची चर्चा लोकांमध्ये होत आहे, हे मात्र नक्की.

जनसंपर्काचं प्रभावी माध्यम

महाराष्ट्राच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या पुणे विभागीय उपसंचालकपदावरून नुकतेच निवृत्त झालेले मोहन राठोड यांच्याशी बीबीसी मराठीने याविषयी बातचित केली.

एकनाथ शिंदे यांचे व्हीडिओ व्हायरल होण्यामागची रणनिती समजावून सांगताना मोहन राठोड म्हणतात, "सध्याच्या काळात शॉर्ट व्हीडिओ हे प्रभावी माध्यम ठरत आहेत. शहरी भागासोबतच ग्रामीण भागातही हे व्हीडिओ मोठ्या प्रमाणात पाहिले जातात. आपलं काम कसं सुरू आहे, हे लोकांना कळण्यासाठी या माध्यमांचा वापर राजकीय नेत्यांकडून केला जात आहे."

ते म्हणतात, "नेत्यांना लोकांमध्ये राहून राजकारण करण्यासाठी इमेज बिल्डिंग महत्त्वाची असते. आपलं काम लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी हे आवश्यकही आहे. एकूणच, आपले मुख्यमंत्री थेट जिल्हाधिकाऱ्यांना बोलत आहेत, आपली कामं लवकर होत आहेत, हे पाहून लोकांना बरं वाटतं.

"पूर्वीच्या काळी मुख्यमंत्री काम करण्याचं आश्वासन द्यायचे. पुढे जाऊन जिल्हाधिकाऱ्यांना फोन करायचे, पण आपलं काम होतंय की नाही, हे आपल्या गावी बसलेल्या व्यक्तीला यादरम्यान कळायचंही नाही. पण काम सुरू आहे, हे सांगण्यासाठी असे व्हीडिओ बनवले जातात. इंटरनेटच्या काळात जनसंपर्काची ही पद्धत आवश्यक बनली आहे," असं मोहन राठोड यांना वाटतं.

राज्यभरात प्रतिमा निर्माण करण्यासाठी

"इतके दिवस एकनाथ शिंदे मंत्री होते तरी त्यांची ठाणे जिल्ह्याच्या बाहेर विशेष अशी ओळख नव्हती. आता मुख्यमंत्रिपदी बसल्यानंतर राज्यभरात आपली प्रतिमा निर्माण करण्याचा प्रयत्न ते करत आहेत. व्हीडिओ व्हायरल करणं, हा या प्रयत्नांचाच एक भाग आहे," असं विश्लेषण ज्येष्ठ राजकीय विश्लेषक हेमंत देसाई यांनी केलं.

त्यांच्या मते, "उद्धव ठाकरेंना बाजूला करून एकनाथ शिंदे पदावर आले आहेत. त्यामुळे ठाकरे गटाकडून वारंवार त्यांच्यावर खंजीर खुपसल्याचा, आमदारांना 50 कोटींचं लालुच दाखवल्याचा आरोप करण्यात येत आहे. या आरोपांना मागे टाकून कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री म्हणून प्रतिमा निर्माण करण्याचा प्रयत्न एकनाथ शिंदे करत आहेत.

ज्या पद्धतीने एकनाथ शिंदे यांचं सरकार स्थापन झालं. त्यादरम्यान झालेल्या हॉटेल पॉलिटिक्समुळे हे चैन करताहेत, अशी त्यांची प्रतिमा बनली होती. तसंच आधीचं सरकार कार्यक्षम नाही, असं पर्सेप्शन भाजपने तयार केलं होतं. त्यामुळे हे सगळं बदलून नवं सरकार वेगळं आहे. मी तुमच्यापैकीच एक आहे, असं शिंदे दर्शवत आहेत."

देसाई यांच्या मते, "सोशल मीडिया नव्हतं तेव्हापासून अशा प्रकारे प्रतिमा निर्माण करण्याचे प्रयत्न मुख्यमंत्री करत आले आहेत. ए. आर. अंतुले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना त्यांनी अशा प्रकारे राजकारण सुरू केलं होतं. अधिकारी कामात खोडा घालतात म्हणत त्यांना झापणं, मला जनतेचं हित साधायचं आहे, म्हणून मी कशा प्रकारे हे तातडीने करून घेत आहे, असं दाखवण्याचा प्रयत्न अंतुले नेहमी करायचे. तातडीने लोकप्रियता मिळवण्यासाठी नेते ही पद्धत वापरत आले आहेत."

'मी पण फोन करतो, पण कॅमेरे लावत नाही'

एकनाथ शिंदे हे कामाचा आदेश देतानाच्या व्हीडिओसंदर्भात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. मी पण फोन करतो, पण कॅमेरे लावत नाही, अशा शब्दांत अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे.

ते म्हणाले, "मी हे आधीपासून करत आलो आहे. मी माझं काम करतो. सोबत फोनही अधिकाऱ्यांना लावतो. मात्र, फोन आणि कॅमेरा एकाच वेळी लावायला सांगत नाही."

अजित पवार यांना आपल्या कामासाठी ओळखलं जातं. मंत्रालयात ते सकाळी 7 वाजल्यापासूनच दाखल होतात. दिवसभर आपली कामं करून घेण्याकडे त्यांचं प्राधान्य असतं, अशी त्यांची ओळख आहे. त्यामुळे अजित पवारांनी आपल्या शैलीत शिंदे यांच्यावर टीका केल्याचं दिसून येतं.

अंमलबजावणी झाली तरच उपयुक्त

"मुख्यमंत्री शिंदे यांच्यामार्फत जनसंपर्कासाठी ही क्लृप्ती वापरली जात असली तरी त्याची प्रभावी अंमलबजाणी होत असेल तरच त्याचा उपयोग होऊ शकतो," असं मोहन राठोड सांगतात.

त्यांच्या मते, "असे व्हीडिओ पाठवल्यानंतर वातावरण निर्मिती अथवा इमेज बिल्डिंग होत असली तरी संबंधित काम तातडीने होणं सर्वांत जास्त महत्त्वाचं आहे. मुख्यमंत्री आदेश देत असलेल्या कामाची अंमलबजावणी योग्य रितीने झाली पाहिजे. कोणतेही प्रश्न योग्य वेळी मार्गी लागले पाहिजेत."

"असं न घडल्यास हे फक्त नावालाच आहे, प्रत्यक्षात कोणतंच काम होत नाही, असा उलटा संदेशही यामधून जाऊ शकतो. म्हणून आदेश दिलेल्या कामाची अंमलबजावणी होणं हेच सर्वाधिक महत्त्वाचं आहे. तरच इमेज बिल्डिंगचं काम योग्यरित्या होऊ शकतं. अन्यथा त्याचा उपयोग होण्याऐवजी त्यामुळे नुकसान होण्याची भीतीही असते," असं मोहन राठोड यांनी सांगितलं.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)