You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
उद्धव ठाकरेंना साथ देत एकनाथ शिंदेंना ठाण्यात आव्हान देणारं विचारे दाम्पत्य कोण आहे?
शिवसेनेचे ठाण्याचे खासदार राजन विचारे आणि आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांनी आज (31 जुलै) ठाण्यातील शिवसैनिकांसह 'मातोश्री' येथे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.
गेल्या जवळपास 30 वर्षांपासून ठाणे शहर शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. आनंद दिघे यांच्यानंतर ठाणे जिल्ह्यात पालकमंत्री आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं वर्चस्व आहे. अशा परिस्थितीत आता त्यांच्या बंडानंतर उद्धव ठाकरे यांना ठाण्यातून साथ देणारे राजन विचारे एकमेव खासदार आहेत तर त्यांच्या पत्नी नंदिनी विचारे या एकमेव नगरसेविका आहेत.
यापूर्वी 7 जुलैला ठाण्यात शिवसेनेच्या 67 नगरसेवकांपैकी 66 नगरसेवकांनी एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यावेळी राजन विचारे यांच्या पत्नी नंदिनी विचारे उपस्थित राहिल्या नव्हत्या.
ठाण्यात एकनाथ शिंदेंना आव्हान देत उद्धव ठाकरे यांची साथ देणारं विचारे दाम्पत्य कोण आहे? हे जाणून घेऊया,
राजन विचारे कोण आहेत?
नंदिनी विचारे यांचे पती राजन विचारे ठाण्याचे शिवसेनेचे खासदार आहेत.
जवळपास 30 वर्षांपासून ते शिवसेनेत सक्रिय आहे. ठाण्याचे शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांचे ते समर्थक होते. तसंच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचेही ते जवळचे नेते मानले जातात.
राजन विचारे 1992 ते 2012 या कार्यकाळात चार टर्म शिवसेनेचे नगरसेवक म्हणून निवडून आले. तसंच 2007 ते 2008 या काळात ते ठाणे महानगरपालिकेचे महापौर होते.
2009 ते 2014 ते ठाण्यात आमदार म्हणून निवडून आले.
तसंच ते याचिका समिती सदस्य, उद्योग स्थायी समिती सदस्य अशा विविध समित्यांमध्येही कार्यरत होते.
आता ते शिवसेनेचे लोकसभेचे मुख्य प्रतोद आहेत. राजन विचारे शिंदे गटात जाणार की उद्धव ठाकरे यांना आपलं समर्थन कायम ठेवणार हे अद्याप स्पष्ट नाही.
कोण आहेत नंदिनी विचारे?
एकनाथ शिंदे यांना ठाण्यातील 66 नगरसेवकांनी समर्थन जाहीर केलंय. यानिमित्त या नगरसेविकांनी माजी महापौर नरेश म्हस्के यांच्या नेतृत्त्वात एकनाथ शिंदे यांची भेट घेतली.
यावेळी नगरसेविका नंदिनी विचारे मात्र तिथे नव्हत्या. 66 नगरसेवकांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत फोटोदेखील काढला. यावेळी नंदिनी विचारे गैरहजर होत्या.
चरई प्रभागाच्या नगरसेविका नंदिनी विचारे या शिवसेनेचे खासदार राजन विचारे यांच्या पत्नी आहेत.
उद्धव ठाकरे यांनी नुकतीच खासदार भावना गवळी यांना मुख्य प्रतोद पदावरून हटवलं आणि त्या जागेवर राजन विचारे यांची नियुक्ती केली.
2017 मध्ये नंदिनी विचारे यांचं नाव महापौरपदाच्या शर्यतीतही आघाडीवर होतं.
राजन विचारे आणि नंदिनी विचारे यांना दोन मुली आहेत. त्यांची मुलगी लतिशा विचारे ह्यांचा विवाह माजी कृषीमंत्री आणि शिंदे समर्थक शिवसेना गटातले आमदार दादा भुसे यांच्या मुलाशी झाला आहे.
दादा भुसे यांचं पुत्र अविष्कार भुसे आणि लतिशा विचार यांचा विवाह एप्रिल 2021 मध्ये मालेगाव येथे पार पडला.
ऐन कोरोना काळात या लग्नाला हजेरी लावण्यासाठी ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे खासगी होलिकॉप्टरमधून गेले होते.
तर नंदिनी विचारे यांची दुसरी कन्या धनश्री आदित्य ठाकरे प्रमुख असलेल्या युवासेनेत कार्यरत आहे.
नंदिनी विचारे यांची नेमकी राजकीय भूमिका काय? हे जाणून घेण्यासाठी आम्ही त्यांना फोनवरुन संपर्क साधला. पंढरपूर येथे वारीत सहभागी झाल्याने याविषयावर सध्या बोलणार नाही असं त्यांनी सांगितलं.
मनसेचा टोला
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेत्यांनी या मुद्यावरून शिवसेनेला डिवचलं आहे.
मनसेचे नेते गजानन काळे म्हणाले, "'चमत्कार बाबा'संजय राऊत यांच्यामुळे ठाण्यात नवाब सेनेत एकच नगरसेवक राहिला. त्याला बहुतेक महापौर करणार आता पक्षप्रमुख. सौ दाऊद, एक राऊत." असं ट्वीट त्यांनी केलं आहे.
"शिवसेनेचा आता एकच नगरसेवक राहीला, मनसेला हसणाऱ्यांनो आता कसं वाटतंय?" असं ट्वीट मनसे रिपोर्ट या ट्वीटर हँडलवरुन करण्यात आलं आहे.
ठाणे कुणाचं?
ठाणे जिल्हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. ठाणे शहरात शिवसेनेचे सर्वाधिक नगरसेवक आहेत.
गेल्या जवळपास 30 वर्षांपासून ठाणे महानगरपालिकेवर शिवसेनेची एकहाती सत्ता आहे.
परंतु आता शिवसेना कोणाची असाच प्रश्न निर्माण झाल्याने वर्चस्व शिवसेनेचं की एकनाथ शिंदे ह्याचं? असाही प्रश्न उपस्थित होतो.
बुधवारी (6 जुलै) संध्याकाळी माजी महापौर नरेश म्हस्के यांच्या नेतृत्त्वात ठाण्यातील 66 नगरसेवकांनी एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला.
एकनाथ शिंदे यांनी आपण अद्याप शिवसेनेतच असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हासाठी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात कायदेशीर लढाई होणार का हे आगामी काळात स्पष्ट होईलच.
पण सध्याची राजकीय परिस्थिती पाहता उद्धव ठाकरे यांच्यासाठी आगामी ठाणे महानगरपालिकेची निवडणूक आव्हानात्मक असणार हे स्पष्ट आहे.
ठाण्यात शिवसेनेचे 67, राष्ट्रवादी काँग्रेसचे 33, भाजपचे 23, काँग्रेसचे 3 आणि एमआयएमचे 2 नगरसेवक आहेत. कार्यकाळ संपल्याने ठाणे महानगरपालिकेवर सध्या प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे.
एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर ठाण्यात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी यापूर्वीच त्यांंना समर्थन दिलं आहे.
शिवसेनेचे जिल्हा प्रमुख नरेश म्हस्के यांनी नुकताच आपल्या पदाचा राजीनामा दिला. आपल्या राजीनाम्याचं पत्र त्यांनी उद्धव ठाकरे यांना पाठवलं होतं.
आगामी काळात एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र येणार की शिवसेना पक्षासाठी दोन्ही गटात संघर्ष होणार हे पहावं लागेल.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)