महाराष्ट्र पाऊस: गडचिरोलीत मुसळधार पाऊस, आलापल्ली ते भामरागडसह अनेक मार्ग वाहतुकीसाठी बंद

गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे काही भागांत पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे.

गडचिरोली जिल्ह्यात प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, आलापल्ली सिरोंच्या महामार्गावरील बामणी येथे सर्वात जास्त 267.0 मिमी पावसाची नोंद झाली आहे. या ठिकाणी नाल्यांवरून पाणी वाहत असल्याने हा मार्ग बंद करण्यात आला आहे.

शनिवारी (9 जुलै)रात्रीपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे राष्ट्रीय महामार्ग 130 D वरील नाल्यावरून पाणी वाहत असल्यामळे राष्ट्रीय महामार्ग आलापल्ली ते भामरागड वाहतुकीसाठी बंद आहे अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

तसंच ताडगाव-हेमलकसा, आष्टी-आलापल्ली (चौडमपल्ली), आलापल्ली-सिरोंचा (बामणी), खामचेरू-आलापल्ली (तानबोडी) हे मार्ग सुद्धा ठप्प आहेत.

मराठवाड्यात मुसळधार पाऊस

गेल्या 2 दिवसांमध्ये मराठवाड्यातील बहुतेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडला आहे.

हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यात 8 जुलै रोजी रात्रभर झालेल्या पावसामुळे भयंकर परिस्थिती निर्माण झाली आहे.

नांदेड जिल्ह्यात शुक्रवारी (8 जुलै) झालेल्या पावसामुळे आसना नदी दुथडी भरून वाहत आहे. आसना नदीच्या पुलावरून पाणी वाहत आहे.

नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माहितीनुसार, नांदेड-मालेगाव रोडवरील पासदगाव येथे असलेल्या आसना नदीच्या पुलावर पावसाचे पाणी वाहत आहे. या ठिकाणी असलेल्या शाळेच्या पायऱ्या व परिसर पाण्याखाली असून पोलीस यंत्रणा वाहतुकीवर नियंत्रण ठेवून आहेत.

या नदीच्या काठावरील गावांमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून नांदेडचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर स्वतः लक्ष ठेवून आहेत.

जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन यावर देखरेख ठेवून आहेत.

हिंगोलीतही मुसळधार पावसामुळे नद्या दुथडी भरून वाहत आहेत. काही गावं तर पाण्याखाली गेली आहेत.

हिंगोली- वसमत तालुक्यातील कुरुंदा या गावापासून वाहणाऱ्या नदीच्या पुराचे पाणी गावात शिरल्यामुळे ग्रामस्थांना रात्र जागून काढण्याची वेळ येऊन आली.

कित्येकांच्या कोंबड्या, गुरे, शेळ्या गोठ्यात पाण्यात गुदरमरून पडल्या आहेत. रस्त्यावर आणि घरात कमरे इतके पाणी साचल्याने, ग्रामस्थांना जीव मुठीत घेऊन आसरा शोधावा लागतोय.

रस्त्यावर लावण्यात आलेली वाहने पाण्याच्या प्रवाहासोबत वाहून गेली आहेत, तर हेच पाणी अनेक गोठ्यामध्ये शिरल्याने गोठ्यात बांधलेली गुरे, ढोरे, शेळ्या यांचा देखील जागेवरच मृत्यू झालाय. काही ठिकाणी तर कोंबड्या मरून वर आल्याचेही धक्कादायक चित्र पाहायला मिळाले.

मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज (9 जुलै) दिल्लीत आहेत. ते राष्ट्रपती, पंतप्रधान, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि संरक्षण मंत्र्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. मात्र, दिल्लीत असतानाच त्यांनी नांदेड आणि हिंगोलीतील पूरस्थितीचा आढावा घेतला.

मुख्यमंत्री कार्यालयानं दिलेल्या माहितीनुसार, "हिंगोली जिल्ह्यातील आसना नदीला पूर आल्यामुळे अनेक घरे पाण्याखाली गेलेली आहेत. पुरामुळे संपूर्ण कुरुंदा गाव पाण्याखाली गेले आहे.

"दिल्ली दौऱ्यावर असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ही बाब कळताच त्यांनी स्वतः दिल्लीवरून हिंगोलीचे जिल्हाधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून संवाद साधून पूरपरिस्थितीचा आढावा घेतला, पूरग्रस्त नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवून त्यांच्या जेवणाची राहाण्याची व्यवस्था करण्याचे निर्देश दिले."

"तसेच पुराच्या पाण्यात अडकलेल्या नागरिकांची लवकरात लवकर सुटका करण्यासाठी एनडीआरएफ पथके पाठवण्याची सूचना केली. काही कमी जास्त लागल्यास स्वतः कळवावे असेही निर्देश त्यांना दिले."

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)