You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
'मी पाण्याची किंमत माझ्या शरीराने मोजली कारण'
(या बातमीतील काही प्रसंग आणि वर्णन तुम्हाला विचलित करू शकतील)
"रात्रीच्या वेळा पाणी विकायला येतात ते बहुतांश पुरुष असतात, आणि त्यांनी जर तुमच्याकडे पाण्याची मागणी केली आणि तुम्ही नाही म्हणालात तर तुम्हाला पाणी मिळत नाही."
केनियाची राजधानी नैरोबीतली सगळ्यांत मोठी झोपडपट्टी किबेरातल्या एका महिलेने बीबीसीच्या प्रतिनिधींना सांगितलेला हा अनुभव.
नैरोबीत सध्या भीषण पाणीटंचाई आहे. बदलतं हवामान आणि जुन्या, काम न करणाऱ्या पाणीपुरवठा यंत्रणा ही त्या पाणीटंचाई मागची काही कारणं.
किबेरासारख्या झोपडपट्टीच्या भागत तर पाणी विकत घ्यावं लागतं. म्हणजे आता या लोकांच्या आयुष्यावर पाणी विक्रेत्याचा कंट्रोल असतो.
इथे पाण्यासाठी पैसा तर खर्च होतोच पण एक भली मोठी किंमत इथल्या मुलींना आणि महिलांना मोजवी लागते.
पाण्यासाठी होणारं लैंगिक शोषण
इथे राहाणाऱ्या मेरी दिवसातून आठ वेळा पाण्याने भरलेल्या कॅन घरी आणतात. त्यांचा पाण्यावर दर महिन्याला 1300 रुपये खर्च करतात. त्यांच्या महिन्याच्या कमाईचा 25 टक्के भाग फक्त पाणी विकत घेण्यात जातो.
इथले काही लोक अत्यंत गरीब आहेत आणि त्यांचा सगळा संघर्ष पाणी मिळवण्यासाठी आहे.
मेरीवर पाणी विकत घेताना बलात्कार झाला होता.
"रात्रीची वेळ होती आणि पाणी विकणारे दोन पुरुष होते, त्यांनी मला पकडलं आणि माझे कपडे फाडले. मी ओरडून इतर महिलांना बोलवेपर्यंत त्यांनी माझा बलात्कार केला."
पोलिसांचं म्हणणं आहे की "अशा गुन्हेगारांना पकडणं अवघड आहे कारण या महिला आपल्यावर झालेल्या अत्याचाराच्या घटना सांगत नाहीत, त्याची तक्रार करत नाही."
केनिया पोलिसांचे प्रवक्ते ब्रुनो शिसो यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं की, "पोलीस ऐकीव माहितीच्या आधारे तपास करू शकत नाहीत. तपासासाठी गुन्हा दाखल झालेला हवा. कोणी स्पष्ट शब्दांत आपल्या तक्रारी मांडल्या आणि आरोपींना ओळखलं तर आम्ही नक्कीच त्यांना मदत करू."
किबेरात सार्वजनिक पाण्याचे नळ आहेत पण इथल्या लोकांना ते पुरेसे नाहीत. नैरोबी शहर 2005 पासून पाणीटंचाईला तोंड देतंय. सरकारी यंत्रणा पुरेशी नाहीये त्यामुळे खासगी व्यापारी पाण्याच्या व्यवसायात उतरलेत.
किबेरासारख्या ठिकाणी तेच पाणी पुरवठा करतात.
पाण्याची किंमत मी माझ्या शरीराने मोजली
पाण्यासाठी काही महिलांना मोठी किंमत मोजावी लागतेय.
इथे राहाणाऱ्या जेन त्यांचा अनुभव सांगतात. "मी उधारीवर पाणी घ्यायचे. पण उधारी थकली आणि एकादा मला पाणी विक्रेत्याने विचारलं की तु आता एवढे पैसे कुठून आणशील. मी त्याला म्हणाले की कोरोना साथीमुळे माझ्याकडे काहीच पैसे नाही."
मग त्या विक्रेत्याने पाण्याच्या बदल्यात सेक्स अशी ऑफर जेनला दिली.
"मी पाण्याची किंमत माझ्या शरीराने मोजली," त्या म्हणतात.
किबेरातल्या या पीडित महिलांना आता उमांडे ट्रस्ट मानसिक आधार देतोय. इथे काम करणाऱ्या बेनझीर उमाडो म्हणतात, "इथल्या महिलांना अनेकदा मानसिक प्रश्न असतात. या पीडित महिलांचे मानसिक प्रश्न, गंड, अपराधी भावना अनेक दीर्घ काळ त्यांच्या मनात साठून राहिलेली असते."
इथल्या काहीच रहिवाशांनी आता 'पाण्यासाठी सेक्स संपवा' ही मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत त्यांनी पाणी पुरवठा करणाऱ्या व्यापाऱ्यांना जास्तीत जास्त महिला पाणी विक्रेत्या कामावर घ्यायला तयार केलं आहे.
इथे पाणी विकत घेणाऱ्या एका महिलेने बीबीसीशी बोलताना सांगितलं की, "पाणी विकायला आलेली महिला पाहिली की मला जर धीर येतो. चांगलं वाटतं. आधी इथे पुरुष असायचे. ते दारू प्यायचे, गांजा ओढायचे."
काही स्वयंसेवी संस्था आता पाण्याच्या बाबतीत देशपातळीवर धोरणात्मक बदल व्हावे म्हणून प्रयत्न करत आहेत.
यातला एक महत्त्वाचं धोरण म्हणजे गरीब, पीडित महिलांचं पाण्यासाठी शोषण होऊ नये. महिलांचं शोषण करणाऱ्या कोणालाही पाणी विकण्याची परवानगीच मिळू नये.
या प्रकल्पावर काम करणारे व्हिन्सट उमा म्हणतात की, "आम्ही संसदेत एक विधेयक मांडणार आहोत ज्यामुळे महिलांना सुरक्षा आणि आदर मिळेल. तसंच पाणी मिळवण्याचा त्यांना हक्क असेल."
मेरीसारख्या अनेक पीडित महिला या नव्या धोरणांची वाट पाहात आहेत.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)