You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
'महाराष्ट्र बारव मोहीम' : पाण्याला 'मोकळा श्वास' देणारी ही मोहीम आहे तरी काय?
- Author, जान्हवी मुळे
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
"मी म्हातारा होईन तेव्हा स्वतःला विचारेन की मी पाच कोटी कमावले की मी पाचशे बारव वाचवल्या. मला त्या पाचशे बारव वाचवल्या हे मला जास्त अभिमान असेल..."
रोहन काळे बारवांविषयी अगदी मनापासून बोलतो. बारव म्हणजे पायऱ्या असलेल्या विहिरी. अशा विहिरी पाणीसाठा तर करतातच शिवाय त्या स्थापत्यशास्राचाही उत्तम नमुना मानल्या जातात.
या विहिरींचं आणि सोबतच पुष्करणींच संवर्धन करण्यासाठी रोहन आणि त्याच्या सहकाऱ्यांनी 'महाराष्ट्र बारव मोहीम' सुरू केली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही 'मन की बात'मध्ये रोहनच्या कामाची दखल घेतली होती.
एरवी बारव म्हटलं की लोकांना गुजरात आणि राजस्थानातल्या मोठमोठ्या विहिरींची आठवण होते. पण महाराष्ट्रातही अशा शेकडो विहिरी आहेत, हे या मोहिमेनं समोर आणलं आहे.
रोहन सांगतो, 'मी म्हटलं की, महाराष्ट्रात भरपूर बारव आहेत. पण मग लोक म्हणतील कुठे आहेत, डेटा दाखवा? मग आज मी हक्कानं, अभिमानानं बोलतो 1650 बारव, पुष्करणी या मॅप केल्या आहेत आमच्याकडे."
2020 साली ऐन लॉकडाऊनदरम्यान या कामाची त्यांनी सुरूवात केली होती.
दोन मित्र, बाईक आणि बारव मोहीमेची सुरूवात
रोहन तेव्हा एका फार्मा कंपनीत एचआर विभागात काम करायचा. काही काळ नोकरीतून ब्रेक घेऊन त्यानं हे काम सुरू केलं.
खरं तर विहिरी, जलसंवर्धन किंवा अशा विषयांशी त्याचा थेट संबंध नव्हता. मित्रासोबत बाईकवरून भटकंती करताना या मोहिमेची सुरूवात झाल्याचं तो सांगतो.
"मी आणि माझा मित्र मनोज सिनकर, आम्ही सोबत ट्रेकिंग करायचो, बाईक राईडला जायचो. महाराष्ट्रभर फिरलो, तेव्हा जाणवलं की अशा बारवा दुर्लक्षित अवस्थेत आहेत."
रोहन आणि मनोजनं मग विहिरींची नोंद ठेवायला सुरूवात केली. पण केवळ नोंदणी करून ते थांबले नाहीत.
"जे काही करायचं ते चारी बाजूंनी करायचं आणि एकाच वेळी कँपेन - मोहीम सुरू करायची हे ठरवूनच आम्ही सगळं आखलं होतं. मार्चमध्ये सुरूवात करणार होतो, पण तेव्हाच देशभर लॉकडाऊन सुरू झालं."
लॉकडाऊनमधून प्रवासाची सूट मिळाल्यावर रोहन एकट्यानं दौऱ्यावर निघाला. पण हा प्रवास सोपा नव्हता, असं तो सांगतो.
'बारव मोहिमेसाठी आईवडिलांच्या शिव्याही खाल्ल्या'
ऑक्टोबर 2020 ते मार्च 2021 या काळात बाईकवरून रोहननं राज्यभर वेगवेगळ्या टप्प्यांत जवळपास 14 हजार किलोमीटरचा प्रवास केला. यादरम्यान त्यानं जवळपास चारशे विहिरी पाहिल्या.
"बाईकवर पुढे टँकबॅग असायची पाठी लॅपटॉपची बॅग आणि दोन सॅडलबॅग्स. आणि ते जडमजड जॅकेट घालून, हेल्मेट घालून, ऐन थंडीत, उन्हात प्रवास होता.
"वाटेत पैसेही संपत आले. गडचिरोलीपर्यंत जायचं होतं, पण अमरावतीमध्ये बाईकचा टायर फाटला. तेव्हा माझ्याकडे साडेसहा हजार रुपयेच शिल्लक होते. दोन दिवस मी फक्त एक-एक वडापाव खाऊन जगलो.
या मोहिमेसाठी रोहननं तेव्हा नोकरीतून ब्रेक घेतला होता.
"ही नोकरी सोडून सगळं करत होतो, घरून खूप शिव्या घातल्या आई वडिलांनी.. आईवडिलांना बोललेलो हा प्रवास सुरू करताना की कोणाकडून एक पैसा नाही मागणार, जे करीन ते स्वखर्चानं करीन. अभिमानानं काहीतरी मोठं करून दाखवीन महाराष्ट्रासाठी."
महाराष्ट्र बारव मोहिमेकडे आता 1650 हून अधिक विहिरींची नोंद झाली आहे.
बारवांविषयी जागरुकता निर्माण व्हावी म्हणून रोहन आणि त्याच्या सहकाऱ्यांनी दीपोत्सवाचं आयोजन केलं होतं.
यंदा महाशिवरात्रीला, म्हणजे 1 मार्च 2022 रोजी राज्यभरात 160 ठिकाणी पायऱ्यांच्या विहिरी, बारव, पुष्करणी स्वच्छ करण्यात आल्या आणि तिथे दीपोत्सव साजरा झाला.
रोहन सांगतो, "एवढं प्रचंड आवडलंय लोकांना, म्हणजे काळाच्या ओघात नष्ट होणाऱ्या बारवा सोन्यासारख्या लख्ख झाल्या आहेत."
ऐतिहासिक वारसा
महाराष्ट्रभर विखुरलेल्या या विहीरी वेगवेगळ्या काळात बांधल्या गेल्या आहेत. अनेक विहिरी तर शेकडो वर्षांपूर्वीच्या आहेत. त्यांचा स्वतःचा इतिहास आहे आणि त्या वेगवेगळ्या स्थापत्यशैलीत बांधल्या गेल्या आहेत.
त्यांची केवळ नोंद करून न थांबता या विहिरींचा इतिहास, शैलीविषयी माहिती गोळा करायची, त्यांचं जतन, संवर्धन करायचं रोहन आणि मनोजनं ठरवलं होतं.
त्यासाठी त्यांनी इतिहास अभ्यासक, तज्ज्ञ, ट्रेकर्स, दुर्गसंवर्धनाचं काम करणाऱ्या संस्था यांना सोबत घेतलं. राज्यभरात बाराहून अधिक आर्किटेक्चर कॉलेजेस महाराष्ट्र बारव मोहिमेशी जोडली गेली आहेत.
त्याशिवाय सरकारचा पुरातत्व विभाग, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा आणि पर्यटन विभागालाही रोहननं या मोहिमेशी जोडलं आहे. इतकंच नाही, तर पर्यटन विभागानं आपल्या वेबसाईटवर या मोहिमेतून समोर आलेल्या काही प्रमुख विहिरींची माहिती दिली आहे.
पण मुख्य सहभाग आहे तो सामान्य नागरिकांचा.
लोकांची मोहीम
रोहन सांगतो, "मी सुरुवात केली तेव्हा दीडदोनशे लोकांनी मदत केली असेल. आज जवळजवळ दहा हजार ते वीस हजार लोक कार्यरत आहेत."
"श्रीगोंदा, अहमदनगर मध्ये पाचच जणांनी मिळून सत्तर स्टेपवेल्स शोधल्या आहेत. परभणी जिल्ह्यातले लोक खूप जागरूक आहेत. मला काय करायचं होतं, अशा सगळ्या लोकांना एकत्र आणायचं. जेवढी लोकं जोडली जातील तेवढी ही मोहीम पुढे सरकेल."
यातले काहीजण आधीपासूनच स्थानिक पातळीवर विहिरी साफ करण्याचं, त्यातला गाळ काढून झरे पुनरुज्जीवीत करायचं काम करत होते.
परभणीत राहणारे मल्हारीकांत देशमुख सांगतात, "आम्ही साधारण 2016 पासून हे काम हाती घेतलंय. रोहननं परभणीत येऊन जे वातावरण निर्माण केलं, त्याच्यापासून आम्ही आणखी प्रेरणा घेतली. ग्रामीण युवकांना एकत्र आणून आम्ही काम करतोय. 22 23 वर्षांची मुलं स्वखर्चानं एकत्र येऊन श्रमदानातून हे काम करतायत. ही एक मोठी चळवळ उभी राहिली आहे परभणी जिल्ह्यामध्ये."
परभणीसाठी हे काम विशेष महत्त्वाचं असल्याचं ते सांगतात.
दुष्काळातला दिलासा
दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या मराठवाड्याला अशा प्राचीन विहीरींचा आधार असल्याचं मल्हारीकांत यांना वाटतं.
"मराठवाड्यात ज्या प्राचीन बारवा आहेत त्यांच्याकडे लोकांचं मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष झालं आहे. त्यामुळे हे पारंपरिक जलस्रोत निकामी झाल्यासारखे वाटत होतं. पण जेव्हा जेव्हा दुष्काळ पडला, या बारवांनीच गावांना वाचवलं असं इतिहास सांगतो. बारवांचं वैशिष्ट्य असं की, 20-30 फूट खोलीवरच पाणी आहे."
एकट्या परभणीत पेडगाव, चारठाणा, राणी सावरगाव, पिंगळी, हतूनर, वालूर, मानवत अशा अनेक गावांत जुन्या आणि सुबक पायऱ्यांच्या विहिरी आहेत.
भारतात, विशेषतः राजस्थान सारख्या पाणीटंचाई असलेल्या भागांत अशा विहीरी पुनरुज्जीवीत करण्याचे प्रयत्न गेल्या काही काळापासून सुरू झाले आहेत.
जिंदाल स्कूल ऑफ आर्ट अँड आर्किटेक्चरचे मोहित धिंग्रा अशाच एका प्रकल्पावर काम करतात. बीबीसीशी बोलताना त्यांनी संवर्धनाचे हे प्रयत्न का महत्त्वाचे आहेत, याविषयी आपले विचार मांडले होते.
"भारतात पाण्याची एक 'इको सिस्टीम' आहे, पण त्यातल्या पारंपरिक जलस्रोतांचा वापर थांबला आहे. बारवांचं पुनरुज्ज्वीन केल्यानं लोकांना हे पारंपरिक स्रोत आणि त्यावर आधारलेलं समाजजीवन परत मिळेल. मोठ्या विहिरींची पाणी धरून ठेवण्याची क्षमता पाहता, पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी त्या महत्त्वाच्या ठरतील," असं मोहित धिंग्रा सांगतात.
रोहनला विश्वास वाटतो की महाराष्ट्रातही बारवा आणि पुष्करणी पाणीटंचाईच्या प्रश्नावर उत्तर ठरू शकतात.
"आज आपल्या घराघरात नळ आहे म्हणून विहीरींकडे दुर्लक्ष होतं. पण आपल्या पूर्वजांनी खूप विचारपूर्वक भूजलाच्या जीवंत स्रोतांवर बारवा बांधल्या आहेत. गाळानं भरलेल्या, ढासळलेल्या या विहिरींचं पुनरुज्जीवन केलं. त्यांच्या आजूबाजूला रेनवॉटर हार्वेस्टिंग केलं, तर सतत पाणीपुरवठा उपलब्ध होऊ शकतो."
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)