स्विगीला सापडला 'तो' घोडेस्वार आणि घोडाही...

काही दिवसांपूर्वी एक लहानसा व्हीडिओ सोशल मीडियावर प्रसिद्ध झाला. यात एक व्यक्ती पांढऱ्या घोड्यावर बसलेला असून त्याच्या पाठीला स्विगीचे डिलिव्हरी बॉय लावतात ती काळी बॅग लावलेली होती. हा घोडेस्वार आता सापडला आहे. स्विगीनं खास पत्रक जारी करत याबद्दल माहिती दिली.

स्विगीला दिलेल्या माहितीनुसार, व्हीडिओत दिसणारा घोडेस्वार हा स्विगीचा डिलिव्हरी बॉय नाहीय. त्याचं नाव सुशांत असून, वय 17 वर्षे आहे.

मुंबईत घोड्यांच्या तबेल्यात सुंशांत काम करतो. सुशांतच्या या घोड्याचं नाव 'शिवा' असं आहे. सुशांतच्या पाठीवर असलेली स्विगीची बॅग त्यानं त्याच्या मित्राकडून घेतली होती, ती परत करायला तो विसरला. घोड्यावरून जाताना त्याच्या पाठीवरील त्या बॅगमध्ये लग्नसमारंभासाठी घोड्यांना सजवण्याचे कपडे आणि इतर साहित्य होते.

तबेल्याच्या दिशेनं जात असताना अवी नामक तरुणानं सुशांतचा व्हीडिओ काढला.

घोडेस्वाराला शोधण्याचं स्विगीनं केलं होतं आवाहन

काही दिवसांपूर्वी एक लहानसा व्हीडिओ सोशल मीडियावर प्रसिद्ध झाला. यात एक व्यक्ती पांढऱ्या घोड्यावर बसलेला असून त्याच्या पाठीला स्विगीचे डिलिव्हरी बॉय लावतात ती काळी बॅग लावलेली आहे. या व्हीडिओबरोबर स्विगी आता घोड्यावरुन फूड डिलिव्हरी करत असल्याची टिप्पणी त्यात केलेली होती. तसेच हा व्हीडिओ मुंबईच्या दादर परिसरातील असल्याचंही म्हटलं होतं.

झालं. व्हीडिओ पाहताच स्विगीच्या सोशल मीडियावर असलेल्या ग्राहकांच्या कल्पनाशक्तीला उकळ्या फुटू लागल्या. एरव्ही अन्नासाठी अर्धा, पाऊण तास वाट पाहणारे ग्राहक क्षणाचाही विलंब न लावता दणादण व्यक्त होऊ लागले.

त्यांनी स्विगीला या हिरोला बक्षीस द्यावं असंही सुचवलं. पण अशा अनेक सूचनांमुळे स्विगी आणखीच गोंधळली. हा कोण अनोळखी 'ब्रँड अँबेसडर' मुंबईत घोड्यावरुन फिरतोय हे त्यांच्या लक्षात येईना.

शेवटी स्विगीनेही आपल्या ग्राहकांच्याच भाषेत खुमासदार पत्र लिहून सोशल मीडियात प्रसिद्ध केलंय.

या पत्रात त्यांनी लोकांना या 'घोड्या'ला शोधून देण्याची विनंती केलीय.

स्विगीनं पत्रात काय म्हटलं होतं?

या पत्रात स्विगी म्हणतेय आम्हालाही हा हिरो कोण आहे याचाच प्रश्न पडलाय. तो ज्या घोड्यावर आहे तो तुफान घोडा आहे की बिजली घोडी ते आम्हालाही जाणून घ्यायचं आहे. त्याच्या बॅगेत काय आहे, मुंबईतला इतका गजबज असलेला रस्ता तो इतक्या निश्चयाने का ओलांडतोय?

ऑर्डरची डिलिव्हरी देताना तो घोडा कोठे पार्क करतो असे प्रश्न आम्हालाही पडलेत त्याची उत्तरं जाणून घ्यायची आहेत.

या अॅक्सिडेंटल ब्रँड अँबेसेडरची माहिती देणाऱ्याच्या स्विगी मनीमध्ये 5 हजार रुपये जमा केले जातील असं आमिष कंपनीनं दाखवलं आहे.

इको फ्रेंडली डिलिव्हरीसाठी आम्ही प्रयत्न करतोय खरं पण आम्ही डिलिव्हरीसाठी घोडे, खेचर, गाढव, हत्ती, युनिकॉर्नसारखा कोणताही प्राणी नेमलेला नाही अशी गोड कबुलीही या पत्रात दिली आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)