Zomato Uber Eats: उबर इट्सची मालकी आता झोमॅटोकडे जाणार

उबर कंपनीने त्यांचा खाद्यपदार्थ घरोघरी पोहोचवण्याचा उद्योग झोमॅटो कंपनीला विकला आहे. झोमॅटोने ही घोषणा केली आहे.

आता उबर इट्स चा वाटा 9.9 टक्के असेल. त्यामुळे नावापुरता का होईना, ते या उद्योगात असतील. आता उबर इट्स वरून खाद्यपदार्थ ऑर्डर केल्यानंतर झोमॅटोकडून मिळतील. यामुळे उबरच्या कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर गदा येईल का हे अद्याप अस्पष्ट आहे.

सध्या हे क्षेत्र वेगाने भारतात वाढत आहे. आजच्या या करारामुळे झोमॅटोचं स्थान बळकट होईल. सध्या झोमॅटो आणि स्विगी या कंपन्यांमध्ये या क्षेत्रात तीव्र स्पर्धा आहे.

झोमॅटो सध्या भारतातील 500 शहरांत कार्यरत आहे. या करारामुळे त्यांच्या कंपनीला आणखी बळकटी मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

"आम्ही हॉटेलमधील खाद्यपदार्थ घरोघरी पोहोचवण्याचा व्यवसाय सुरू केला याचा आम्हाला अभिमान आहे. या करारामुळे या व्यवसायात आमचं स्थान आणखी महत्त्वाचं होईल." असं झोमॅटोचं संस्थापक आणि सीईओ दिपींदर गोयल म्हणाले.

उबर इट्सची भारतात 2017 मध्ये सुरुवात झाली. या क्षेत्रात क्रांती आणण्याच्या दृष्टीने त्यांनी भारतात पाय रोवले होते. उबर सॅन फ्रान्सिस्कोची कंपनी आहे. तेव्हापासून ते ग्राहकांची संख्या वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र त्यांना झोमॅटो आणि स्विगी या कंपन्यांकडून तगड्या स्पर्धेचा सामना करावा लागत आहे.

CARE रेटिंग या कंपनीचे विश्लेषक दर्शिनी कन्सारा म्हणाल्या स्विगी आणि झोमॅटो या दोन्ही कंपन्यांची भारतीय बाजारपेठेवर चांगली पकड आहे.

"उबर ही एक जागतिक पातळीवरची कंपनी असली तरी भारतीय बाजारपेठ वेगळी आहे. तसंच दोन्ही कंपन्यांच्या अप उत्तम दर्जाच्या आहेत. अनेक हॉटेल्सशी त्यांचं टाय अप आहे. या सर्व गोष्टी या दोन्ही कंपन्यांसाठी फायदेशीर आहेत."

असं असलं तरी भारतीय बाजारपेठेला आमचं प्राधान्य असेल असं उबर तर्फे स्पष्ट करण्यात आलं आहे.

"उबर भारतासाठी महत्त्वी बाजारपेठ आहे आणि आम्ही स्थानिक पातळीवरच्या उद्योगावर लक्ष केंद्रित करू" असं उबरचे सीईओ दारा खोसरोवशाही म्हणाले.

या करारामुळे स्विगी आणि झोमॅटो यांच्यातील स्पर्धा आणखी तीव्र होईल असं काही पत्रकारांनी सांगितलं.

भारतीय बाजारपेठेसाठी लढाई

बीबीसी प्रतिनिधी सुरंजना तिवारी यांनी या कराराचं विश्लेषण केलं. त्या म्हणतात, "फुड डिलिव्हरी सर्व्हिसेस भारतातल्या आयुष्याचा अविभाज्य घटक आहेत. कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये काम करणारी लोक या अप्सवर पूर्णपणे अवलंबून आहेत. यामुळे हॉटेल्सचा व्यापार वाढला आहेच. मात्र त्यामुळे लाखो लोकांना त्यांचे आवडते खाद्यपदार्थ घरबसल्या मिळायला सुरुवात झाली आहे.

उबरची कॅब सेवा भारतात प्रसिद्ध आहेच. म्हणूनच त्यांनी या क्षेत्रात येणं फारसं आश्चर्यकारक नव्हतं.

मात्र या व्यवसायातला तोटा कमी करणं कंपनीपुढे मोठं आव्हान होतं. या आधी रशिया,चीन आणि दक्षिण पश्चिम आशियात त्यांनी या व्यवसायातून काढता पाय घेतला होता.

भारतातल्या बाजारपेठेत स्पर्धा का?

आजच्या घडीला झोमॅटो आणि स्विगी भारतातल्या अनेक शहरात कार्यरत आहेत. त्यांनी अनेक हॉटेल्स त्यांच्या पंखाखाली घेतली. मात्र भरघोस सूट हे त्यांचं बलस्थान आहे. भारतातल्या ग्राहकांसाठी सूट अतिशय महत्त्वाची ठरते. झोमॅटो अनेकदा वादात सापडलं आहे. तरीही ते भारतातल्या बाजारपेठेत स्थान निर्माण केलं आहे.

झोमॅटोला अलिबाबा या चीनच्या कंपनीचं पाठबळ आहे तर स्विगीच्या मागे चिनी कंपनी टेन्सेट या कंपनीचा आधार आहे.

हा करार मात्र उबरसाठी तितकासा धोकादायक नाही. कारण उबरचा वाटा अजूनही झोमॅटोत आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)