CCD : कॉफीची चावडी सुनी सुनी होते तेव्हा...

    • Author, रोहन नामजोशी
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

मी पहिल्यांदा सीसीडीत गेलो तेव्हा मला सीसीडीच्या वातावरणाचं प्रचंड दडपण आलं होतं. थंडगार हवेचा झोत, कॉफीच्या बियांचा पसरलेला सुवास, सुहास्य चेहऱ्याने स्वागत करणारे तिथले कर्मचारी यांचं नकळत दडपण आलं होतं. मेन्यू कार्ड उघडलं तर कॉफीची चित्रविचित्रं नावं लिहिली होती.

कॅफे लाटे आणि एस्प्रेसो मधला फरक कळला नाही. जे उच्चारायला सोपं ते घ्यावं म्हणून तिथली लाटे कॉफी घेतली. पाहिलं तर फेस जास्त आणि कॉफी कमी. ते पाहून माझं मन लगेच चरकलं. पुन्हा तिथे न येण्याची जवळजवळ न येण्याची प्रतिज्ञा करूनच मी तिथून बाहेर पडलो. पण असं अर्थातच झालं नाही आणि तिथे जाण्याची वारंवार वेळ आली. त्याला एक मोठं कारण म्हणजे मी प्रेमात पडलो होतो.

अनोळखी शहरात सगळ्यांच्या बोचऱ्या नजरा लपवून हक्काने गप्पा मारायचं ते एकच ठिकाण होतं. सीसीडीच्या अनेक शाखांमध्ये मी आणि माझ्या प्रेयसीने (नंतर पुढे जाऊन तीच माझी पत्नी झाली) कितीतरी गोष्टी ठरवल्या. बरीच भांडणं इथल्या कॉफीच्या साक्षीने मिटली आहेत.

एकदा तर एक कौटुंबिक प्रश्न सोडवण्यासाठी मी, माझी पत्नी आणि माझी आई तिथे गेलो होतो. तिथले कॉफीचे दर पाहून या पैशात किती कप कॉफी घरात होईल असा हिशोब तिने लगोलग मांडला. हे अनुभव कदाचित कुणाला चुकले नसावेत.

'कॅफे कॉफी डे'चे संस्थापक व्ही. जी. सिद्धार्थ गेल्याच्या बातमीमुळे देशभरात हळहळ व्यक्त केली जात आहे. माझ्या अवतीभवती तीच चर्चा. काही जणांना एवढं मोठं कॉफी साम्राज्य उभं करणारा माणूस गेल्याचं दुःख होतं तर काहींच्या त्यांनी सीसीडीमध्ये कॉफीच्या प्रत्येक घोटाबरोबर तयार केलेल्या आठवणी जाग्या झाल्या.

तसं बघायला गेलं तर कॉफी ही एक श्रीमंत गोष्ट आहे. एक मोठा कप ज्याला मग म्हणतात, तो घेऊन फिरणं, मधूनमधून घुटके घेत काम करणं यात एक श्रीमंती थाट असतो.

काही वर्षांपर्यंत हे सगळे श्रीमंती चोचले आहेत असं समजलं जायचं. मात्र गेल्या काही वर्षांपासून भारतात कॅफे कॉफी डे म्हणजेच सीसीडी अवतरलं आणि कॉफी भोवती पसरलेले समजच बदलले.

मागच्या पिढीच्या प्रेमकथा या शहरात असलेल्या कॉफी हाऊसने फुलवल्या. लग्न ठरल्यानंतर कॉफी हाऊसमध्ये गेल्यावर असलेलं अवघडेपण, बुजरेपणा कॉफी हाऊसच्या भिंतींनी पाहिला. तिथल्या कॉफीवर जमलेल्या सायीच्या थराने अनेक भावनांना उकळी आल्याचे किस्से आपल्या आई वडिलांच्या पिढीने अगदी रंगवून रंगवून सांगितले आहेत. हेच किस्से थोड्याफार फरकाने आमच्या पिढीत म्हणजे 80 च्या पिढीत जन्मललेल्या लोकांच्या बाबतीत सीसीडी या जादुई ठिकाणी घडले आहेत.

सीसीडी हा रुढार्थाने मध्यमवर्गीयांचं कॉफी शॉप आहे. आज स्टारबक्स, मोका, बरिस्ता असे अनेक कॉफी शॉप उघडले असले तरी सीसीडीचा आपलेपणा तिथं नाही. तिथे एक प्रकारचं अवघडलेपण येतं.

मग सीसीडीमध्ये ते येत नाही का? नक्कीच येतं. सुरुवातीला जेव्हा ते सुरू झालं तेव्हा तिथे जायचं दडपण यायचं. त्याचं मुख्य कारण म्हणजे कॉफीची विचित्र नावं आणि त्याच्या किंमती.

त्या किमतीत किती कटिंग चहा किंवा फिल्टर कॉफी येतील असा हिशोब न लावणारा विरळाच. अजूनही ते हिशोब लावले जातात. तरीही पावलं तिथे वळतात. अशा ठिकाणी बसून तासनंतास गप्पा मारण्याची संस्कृती भारतात रुजवण्यात सीसीडीचा महत्त्वाचा वाटा आहे.

सीसीडीत आज अनेक वाटाघाटी होतात. कोणत्याही कामासाठी भेटायचं असेल तर सीसीडीत भेटूया असं आपसूकच बोललं जातं. लग्नासाठी मुलगी किंवा मुलाला भेटायचं असलं की तिथेच भेट घेतली जाते. त्याचं बिल कोणी भरलं यावरून अनेक लग्न ठरली किंवा तुटली आहेत. त्या बिलाचे किस्से सर्वत्र रंगवून सांगितले जातात.

लग्न ठरलंच तर त्या पहिल्या भेटीच्या आठवणी नंतर सोशल मीडियावर शेअर होतात. नाहीच जमलं काही तर त्याच वेळी त्याच ठिकाणी पुन्हा पुन्हा भेटी घेतल्या जातात. तिथल्या जड कपात कॉफी घेऊन, तिथल्या वेटरशी उगाच इंग्लिशमध्ये बोलत आयुष्य पुढे सुरू राहतं. नाती फुलतात किंवा तुटत जातात. A lot can happen over the coffee ही टॅगलाईन कॉफीच्या बियांच्या सुवासासकट हवेत दरवळत राहते.

सीसीडीत गेलात तरह पहिल्यांदा भावते तिथली शांतता. तिथून कुणीही हुसकावून लावणार नाही याची शाश्वती असते. त्यामुळे तिथे अनेकदा ऑफिसची कामं केली जातात. अनेकदा जर्नलही पूर्ण केले जातात. फक्त तिथे फुकटात बसण्याची मुभा नाही. तिथे काहीतरी घेऊन बसायचं, मग वेळेची मर्यादा नाही.

तिथे गेलात की काही खुर्च्यांवर लोक लॅपटॉप उघडून बसले असतात. काही प्रेमी युगूल कॉफीवर काढलेल्या हार्टचे फोटो इन्स्टावर टाकत असतात.

एक मुलगा आणि एक मुलगी अस्वस्थ बसललेले दिसतात तेव्हा हे इथे भविष्याची तजवीज करत आहेत हे दिसतं. या दृष्यांत थोड्याफार फरकाने बदल होतात मात्र गाभा तसाच होतो.

चहा हे भारतीयांचं सगळ्यात आवडतं पेय आहे. म्हणूनच कदाचित त्याला अमृततुल्य असं नाव आहे. घरात पाहुणा आला की अजूनही चहा की कॉफी असा पारंपरिक प्रश्न विचारला जातो. एक कप चहा भारतात कुठेही मिळतो, पण कॉफीचं तसं नाही. कॉफी पिण्याची एक विशिष्ट तऱ्हा आहे, एक वेळ आहे. म्हणूनच चहात एक रांगडेपणा आहे तर कॉफीत एक थाट आहे.

1996 मध्ये पहिली सीसीडीची शाखा सुरू झाली तेव्हा हाच थाट तमाम भारतीयांमध्ये रुजवण्याचा विचार सिद्धार्थ यांनी केला असावा.

सीसीडीच्या टॅगलाईन नुसार गेल्या 23 वर्षांत कॉफीने बरीच वादळं पचवली, अनेक भावनांचा निचरा केला. अनेक नाती फुलवली, अनेक अश्रू पुसले.अनेक व्यवसायांचा श्रीगणेशा याच शाखांमध्ये झाला. सीसीडीचा हा थाट पुढे राहणार का असा प्रश्न सिद्धार्थ यांच्या जाण्याने झाला आहे.

सीसीडीची कॉफी आज वेगळ्या कारणाने कडू झाली आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)