You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
जेव्हा पंडित शिवकुमार शर्मांनी पंडित भीमसेन जोशींना एकाच बैठकीत संतूर शिकवलं होतं...
संतूरवादक आणि संगीतकार पंडित शिवकुमार शर्मा यांचं निधन झालं आहे.
मृत्यूसमयी ते 84 वर्षांचे होते आणि अनेक विकारांनी ग्रस्त होते. गेल्या अनेक महिन्यांपासून ते डायलिसिसवर होते.
हरिप्रसाद चौरसिया यांच्याबरोबकर यांनी त्यांनी अनेक कार्यक्रम केले होतं. त्यातूनच शिव-हरी नावाची जोडी जन्माला आली होती. सिलसिला, चांदनी, लम्हें, डर या चित्रपटाचं संगीतही त्यांनी दिलं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही शिवकुमार शर्मा यांना ट्विटरवरून श्रद्धांजली वाहिली आहे.
त्यांचा जन्म 13 जानेवारी 1938 ला जम्मूला झाला होता. पाच वर्षांच्या वयापासूनच त्यांनी हे वाद्य त्यांच्या वडिलांकडून शिकायला सुरुवात केली होती.
त्यांनी पहिला कार्यक्रम 1955 मध्ये मुंबईत केला होता. त्यांचा मुलगा राहुल शर्मा हाही प्रसिद्ध संतूरवादक आहे.
काश्मीर मध्ये सुफी संगीतासाठी संतूर हे वाद्य वापरलं जातं. त्याला जागतिक पातळीवर नेण्यात आणि संगीत विश्वात एक उंचीचं स्थान प्राप्त करून देण्यात शिवकुमार शर्मा यांचा महत्त्वाचा वाटा होता.
संतूर हे फक्त काश्मीरचं लोकवाद्य आहे. त्याचा वापर मर्यादित स्वरुपात होता, असं शर्मा यांनी बीबीसी हिंदीला दिलेल्या एक मुलाखतीत सांगितलं होतं.
संतूर वाद्य ते वडिलांकडून शिकले होते आणि ते शिकणं सोपं नव्हतं. ही तपश्चर्या करण्यात काही वर्ष उलटून गेल्याचं ते नमूद करतात. संतूरवर शास्त्रीय संगीत वाजवता येत नाही, असा लोकांचा समज होता. तो शर्मा यांनी मोडून काढला.
कोणत्याही वाद्यापेक्षा वादक किती सर्जनशील आहे हे जास्त महत्त्वाचं असल्याचं ते नेहमी म्हणत. एखादं वाद्य चांगलं असेल आणि वादक चांगला नसेल तर त्याचं महत्त्व उरत नाही असंही ते म्हणायचे.
सवाई गंधर्व महोत्सवाशी वेगळं नातं
पुण्यात होणाऱ्या सवाई गंधर्व महोत्सवाशी पंडित शिवकुमार शर्मांचं जुनं नातं होतं. अनेक वर्षं यांनी या संगीत महोत्सवात आपली कला सादर केली.
पंडित भीमसेन जोशींच्या निधनानंतर या महोत्सवाला सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव असं नाव दिलं गेलं. त्यानंतर पुण्यात बोलत असताना पं. शिवकुमार शर्मांनी पं. भीमसेन जोशींबद्दल एक किस्सा सांगितला होता.
त्याचा गोषवारा असा, "पं. भीमसेन जोशींचा प्रवासाची प्रचंड आवड होती. ते प्रवास करत भारतभर फिरायचे. खूप वर्षांपूर्वी ते आमच्या घरी आले होते. संतूर या वाद्याबद्दल तेव्हा भारताच्या इतर भागांमध्ये फारशी प्रसिद्धी झालेली नव्हती. पंडितजींनीही ते वाद्य पहिल्यांदाच पाहिलं होतं.
माझ्याकडचं संतूर पाहून त्यांनी माझ्याकडे त्याबद्दल चौकशी केली. ते कसं जुळवतात, ते वाजवण्याचं तंत्र काय, ते कुठे बनतं असे अनेक प्रश्न त्यांनी मला विचारले. मी त्यांना उत्तरं दिली आणि संतूर वाजवूनही दाखवलं. त्यानंतर ते वाद्य घेऊन बाजूला गेले आणि काही वेळाने परत आले. त्यांनी एक अख्खा राग संतूरवर वाजवून दाखवला."
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)