विधिमंडळाचे विशेष अधिवेशन: 'गमतीचा भाग जाऊ द्या म्हणत' अजितदादांची भाजपवर टोलेबाजी

फोटो स्रोत, Mlscomputer
विधानसभेच्या अध्यक्षपदी भाजपचे नेते राहुल नार्वेकर यांची निवड झाली. त्यांची निवड झाल्यावर सर्वांनी अभिनंदन केले. राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील राहुल नार्वेकर यांचे अभिनंदन केले पण त्याचबरोबर आपल्या खास खुमासदार शैलीत चिमटे काढायला देखील ते विसरले नाहीत.
राहुल नार्वेकर हे आधी शिवसेनेत, नंतर राष्ट्रवादीमध्ये होते आणि नंतर ते भाजपमध्ये गेले. त्यांना भाजपने विधानसभेचे अध्यक्ष बनवले.
"नरेंद्र मोदी हे कधी पंतप्रधान बनतील की नाही हे माहीत नसताना देखील अनेक वर्षं हे भाजपचे कार्यकर्ते, नेते झटले पण त्यांना देखील जे जमलं नाही," ते राहुल नार्वेकर यांनी केवळ तीन वर्षांत केलं असं अजित पवार यांनी म्हटले.
रामराजे नाईक निंबाळकर हे राहुल नार्वेकर यांचे सासरे आणि राष्ट्रवादीचे नेते विधान परिषदेचे अध्यक्ष आहेत. दोन्ही पदं हे जावई-सासऱ्यांकडे असण्याची पहिलीच वेळ आहे असं सांगत अजित पवार पुढे म्हणाले, "रामराजे नाईक-निंबाळकरांचे ते जावई आहेत. त्यामुळे आमचेही ते जावईच आहे. आतापर्यंत आम्ही जावई हट्ट पुरवला. पण यापुढे जावई म्हणून तुम्हाला आमचा हट्ट पुरवायचा आहे."
"सासऱ्याच्या पक्षाला नाराज करू नका. आधी आम्ही जावायाचे लाड पुरवले आता आमचे लाड जावयाने पुरवावेत," असं पवार म्हणाले.

फोटो स्रोत, Mls computer
"गमतीचा भाग सोडा, पण राहुल नार्वेकर हे निरपेक्षपणे काम करतील," असं अजित पवार म्हणाले.
त्यानंतर अजित पवारांनी आपला मोर्चा भाजप नेते आणि एकनाथ शिंदेंच्या गटाकडे वळवला. ते म्हणाले, तुम्ही बाकं वाजवू नका, तुम्हाला मंत्रिपद मिळेल की नाही याची गॅरंटी नाही. गिरीश महाजन, सुधीर मुनगंटीवार, आशिष शेलार यांना ते म्हणाले, तुम्ही अनेक वर्षं काम केलं पण राहुल नार्वेकरांना अध्यक्षपद मिळालं ही कौतुकाची बाब आहे.
"आमच्यासमोर भाजपच्या बाजूने बसलेल्या सदस्यांपैकी भाजपचे मूळ लोकं सोडून आमच्याकडून तिकडे गेलेले सदस्य आहेत. त्यामुळे भाजपच्या मूळ लोकांना बाजूला सारून आमच्याकडून गेलेल्या लोकांना पहिल्या रांगेत बसवलं आहे. भाजपच्या लोकांचं वाईट वाटतं," असं अजित पवार म्हणाले.
"एकनाथ शिंदेंनी माझ्या कानात सांगितलं असलं की उद्धवजींना सांगा, मला मुख्यमंत्री करा. तर काय अडचणच आली नसती. काय आदित्य अडचण आली नसती ना? चंद्रकांत पाटील तुम्ही बाकं वाजवू नका तुम्हाला मंत्रिपद मिळतंय की नाही माहीत नाही. कोणाला किती मंत्री पदं मिळणार आता बघा," असंही अजित पवार म्हणाले.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








