एकनाथ शिंदेंनी ठोठावले सुप्रीम कोर्टाचे दार, तातडीच्या हस्तक्षेपाची मागणी

फोटो स्रोत, Shardul Kadam/BBC
शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदेंनी 40 हून अधिक आमदारांसह बंड केलं आणि सुरतमार्गे आसाममधील गुवाहाटीला जाऊन थांबले आहेत. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे दोघेही आपापल्या भूमिका मांडत असतानाच, सर्वसामान्य शिवसैनिक मात्र आक्रमक झालेत.
या शिवसैनिकांमध्येही दोन गट दिसून येतायत. कुणी बंडखोर आमदारांच्या समर्थनार्थ मोर्चे काढतंय, तर कुणी विरोधात निदर्शनं करतंय. विरोधातल्या निदर्शनांची संख्या मात्र जास्त आणि आक्रमकही दिसून येतेय.
शिंदे गटातील आमदारांविरोधात आरपारची लढाई लढण्याचे संकेत शिवसेनेच्या गोटातून समोर येत असल्याने राज्यभरातील शिवसैनिक रस्त्यावर उतरून शिंदे गटातील आमदारांविरोधात मोर्चे काढतायेत. अनेक ठिकाणी जाळपोळ, बॅनर फाडणं, प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढणे असले प्रकारही घडल्याचे दिसून आले आहेत.
शिवसेनेच्या अभूतपूर्व बंडानंतर महाराष्ट्रात काय पडसाद उमटतायेत, हे आपण पाहूया.
एकनाथ शिंदेंनी ठोठावले सुप्रीम कोर्टाचे दार, तातडीच्या हस्तक्षेपाची मागणी
शिवसेनेतील बंडखोर आमदारांचं नेतृत्त्व करणाऱ्या एकनाथ शिंदेंनी सुप्रीम कोर्टाचे दार ठोठावले आहे.

आमदारांना अपात्रतेची नोटीस, अविश्वास प्रस्तावाला फेटाळणं आणि गटनेतेपदाची निवड या तीन मुद्द्यांवर सुप्रीम कोर्टानं तातडीनं हस्तक्षेप करावा, अशी मागणी एकनाथ शिंदेनी याचिकेतून केलीय.
या याचिकेवर उद्याच म्हणजे 27 जूनला सुनावणी होणार आहे.
उद्धव ठाकरेंचे हात-पाय हलत नव्हते, या आजारपणाचा फायदा घेत बंड केलं - आदित्य ठाकरे
उद्धव ठाकरेंच्या आजारपणाचा फायदा घेत बंड केलं, असा आरोप करत आदित्य ठाकरेंनी उद्धव ठाकरेंच्या आरोग्याची स्थितीही वर्णन केली.
आदित्य ठाकरेंनी सांगितलं, "उद्धव ठाकरेंच्या वेदना मी पाहिल्यात. त्यांची सर्जरी झाल्यानंतर पुन्हा एकदा प्रोसेजर करावी लागली. कारण इथपासून (मानेपासून) खालपर्यंत हात-पाय काहीच हलत नव्हतं. अक्षरश: बेडवरून हलणार की नाही, अशी अवस्था होती. अशा स्थितीत त्या माणसानं हिंमतीनं, ताकदीनं सकाळी चार तास आणि संध्याकाळी दोन तास सगळ्या मंत्री-आमदारांचे व्हॉट्सअप मेसेज बघत, फोन करत. नंतर व्यायाम करत आज उभे राहिलेत. तुमच्या प्रेमामुळे आणि ताकदीमुळे ते आज पुन्हा उभे राहिले."

फोटो स्रोत, Getty Images
आदित्य ठाकरे पुढे म्हणाले, हे बंड नाहीय. हे बंड करण्याच्या लायकीचे नाहीत. हे फुटरवादी आहे. बंडाला हिंमत लागते.
तसंच, हिमंत असेल तर राजीनामे द्या, निवडणुकीत उतरा, प्रत्येकाला पाडल्याशिवाय राहणार नाही, असं आव्हान आदित्य ठाकरेंनी बंडखोर आमदारांना दिला.
महाराष्ट्रातील लढाई केवळ राजकीय नसून कायदेशीर - अरविंद सावंत
शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी सुप्रीम कोर्टाचे वकील देवदत्त कामत यांच्यासोबत पत्रकार परिषद घेतली.

फोटो स्रोत, Shardul Kadam/BBC
काही दिवस शिवसेनेचे अनेक आमदार गुवाहाटीत थांबलेले आहेत आणि तिथं थांबून वेगवेगळ्या क्लिप मीडियाकडे देत राहतात, अशी टीका करत अरविंद सांवत म्हणाले की, महाराष्ट्रातील लढाई केवळ राजकीय नसून कायदेशीर आहे.
शिवसेनेचे वकील देवदत्त कामत यांचे मुद्दे -
- मी कायदेशीर अंगानं बोलणार आहे, राजकीय बोलणार नाही
- शिवसेनेने आमदारांना बैठकांसाठी बोलवलं, पण ते आले नाहीत, महाराष्ट्राबाहेर जाणे, भाजपच्या नेत्यांना भेटणे हे पक्षाविरोधात वर्तन आहे.
- बंडखोरांनी सरकार पाडण्याचा प्रयत्न केला
- दोन तृतीयांशचा नियम केवळ एखाद्या पक्षात विलीन झाल्यावर लागू होतो. विलीन व्हावं लागेल त्यांना.
- आतापर्यंत ते कोणत्याही पक्षात विलीन झाले नाहीत, त्यामुळे ते आमदारकीसाठी अपात्र ठरवले जाऊ शकतात.
- नोंद नसलेल्या ईमेलवरून कुणीतरी विधानसभा उपाध्यक्षांविरोधात अविश्वास प्रस्ताव पाठवला गेला
- उपाध्यक्षांच्या कार्यक्षेत्रात येत नाही असं ते (बंडखोर आमदार) म्हणतात, पण त्यांच्याकडे सर्व अधिकार आहेत.
- उद्यापर्यंत (27 जून) त्यांना उत्तर द्यावं लागेल, आम्हाला खात्री वाटते की, त्यांनी नियमबाह्य वर्तन केलं आहे. त्यामुळे ते अपात्र ठरतात.
- आमदारांच्या अपात्रतेच्या प्रकरणात राज्यपाल काहीच करू शकत नाहीत, असं सुप्रिम कोर्टानं आधीच स्पष्ट केलंय
राजीनामे द्या आणि निवडणूक लढा, पाडल्याशिवाय राहणार नाही - आदित्य ठाकरे
"आज राजीनामे द्या आणि निवडणुकीला सामोरे जा, आम्ही तुम्हाला पाडल्याशिवाय राहणार नाही," असं आव्हान युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे आणि इतर बंडखोर आमदारांना दिलंय.
"धनुष्यबाण आपल्याकडेच (शिवसेनेकडे) राहणार आहे. शिंदे गटाला प्रहार किंवा भाजपमध्ये विलीन होण्याचाच पर्याय आहे. त्यांचं स्वत:चं अस्तित्त्व संपणार आहे," असंही आदित्य ठाकरे म्हणाले.

फोटो स्रोत, Getty Images
आदित्य ठाकरेंचा कालिना आणि कुर्ला विधानसभा मतदारसंघात कार्यकर्ता मेळावा होता. तिथं त्यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना उद्देशून भाषणं केली.
आदित्य ठाकरेंच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे :
- दिलीप मामा लांडे परवा हातात हात घालून रडलेला माणूस कसा जाऊ शकतो?
- मी जास्तीत जास्त फंड संदीपान भुमरे, शिरसाट, मराठवाड्यासाठी दिलाय, मला आश्चर्य वाटतं ते गुवाहाटीला गेले.
- आपण जनतेसाठी हा पैसा देतो स्वतःला विकायला नाही
- 15 वर्षात किती फंड मिळायचा आणि आता किती मिळतोय सांगा
- बंडखोरांना आव्हान माझ्यासमोर येऊन बसा डोळ्यात डोळे घालून बघा सांगा काय कमी केलं
- हिंमत असेल तर निवडणूक लढा, प्रत्येकाला पाडल्याशिवाय राहणार नाही गाठ माझ्याशी आहे
- जिथे पूर आलाय लोकांना खायला अन्न नाही अशा ठिकाणी तुम्ही मजा मारायला जाता?
- आम्हीच शिवसेना, बाळासाहेब ठाकरे नाव लावतात तुमची लायकी असती, तर सुरतमध्ये पळाला असता?
- उद्धवजींनी मोह सोडलाय जिद्द, ताकद नाही
- प्रत्येक आमदार तिथे गेला तरी विजय शिवसेनेचाच होणार
- साहेब तुम्ही जास्ती विश्वास टाकला, असं म्हणतात तेव्हा उद्धव जी म्हणतात शिवसैनिकवर विश्वास नाही टाकायचा तर कोणावर टाकायचा
- प्रत्येक आमदाराचे मान पकडून, हात पकडून कैद्यासारखे सुरत ते गुवाहाटी फरपटत नेले असे व्हीडिओ आहेत
सदा सरवणकरांच्या घराबाहेर CRPF ची सुरक्षा
मुंबईतील माहीम विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे आमदार सदा सरवणकर हे सध्या एकनाथ शिंदेंसोबत गुवाहाटीत आहेत.
बंडखोर आमदारांपैकी एक असलेल्या सरवणकरांच्या दादरमधील घराबाहेर CRPF च्या जवानांचा बंदोबस्त ठेवण्यात आलाय.
शिवसेनेचं मुख्यालय असलेला सेनाभवन हे सदा सरवणकरांच्या मतदारसंघात येतो.
सदा सरवणकर माहीम विधानसभेचे आमदार आहेत. ही त्यांची दुसरी टर्म आहे. 2014 मध्ये त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यावेळी ते निवडणूक हरले होते. मनसेचे नितीन सरदेसाई निवडून आले होते.
2017 मध्ये सरवणकर यांनी पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला. 2019 साठी त्यांना पक्षाने पुन्हा संधी दिली. तसंच त्यांचा मुलगा समाधान सरवणकर यांनाही बीएमसी निवडणुकीत संधी दिली. ते या भागाचे नगरसेवक आहेत.
सेनाभवनाच्या आमदारानेही बंड केल्याने शिवसैनिकांमध्ये अधिक रोष आहे.
'सिल्व्हर ओक'वर महाविकास आघाडीची बैठक
शरद पवारांचं निवासस्थान असलेल्या सिल्व्हर ओक बंगल्यात महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक पार पडली.
या बैठकीला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांसह काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, शिवसेनेचे खासदार अनिल देसाई, राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल हे उपस्थित होते.
आमदारांना अपात्र ठरवण्याच्या नोटीशीला आव्हान दिल्यास कायदेशीर प्रक्रियेबाबत या बैठकीत चर्चा झाली.
आबिटकरांचं ऑफिस फोडलं, क्षीरसागरांचे पोस्टर फाडले
एकनाथ शिंदे यांच्या गटात शिवसेनेचे कोल्हापूर जिल्ह्यातील आमदार प्रकाश आबिटकर आणि माजी आमदार राजेश क्षीरसागर हे सामील झाल्यानंतर कोल्हापूरमध्ये अबीटकर आणि क्षीरसागर यांच्या विरोधात शिवसैनिकांच्यावतीने आंदोलन करण्यात येतंय.
आजाऱ्यात संतप्त शिवसैनिकांनी आबिटकरांच्या कार्यालयाची तोडफोड केली आहे, तर क्षीरसागर यांच्या पोस्टरचे दहन करण्यात आले आहे.
यावरून कोल्हापूरचे माजी शहरप्रमुख रविकिरण इंगवले आणि राजेश क्षीरसागर यांच्यामध्ये एकमेकांना धमकी देण्याचा प्रकार झाला आहे.
परभणीत शिवसैनिकांकडून अनोख्या पद्धतीने निदर्शनं
परभरणीतील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी एकनाथ शिंदे आणि गुलाबराव पाटील यांच्या प्रतिमा गाढवांवर लटकवल्या आणि चपलांचे हार घालून गाढवांना शहरात फिरवलं.
तसंच, बंडखोर आमदारांच्या प्रतिकात्मक पुतळ्यांचं दहनही केलं.
यावेळी शिवसेनेच्या संतप्त पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. या घोषणाबाजीने संपूर्ण परिसर दणाणून गेला.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








