You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
विधान परिषद निवडणूक: 'सरकार म्हणून विचार करण्याची गरज'- थोरात #5मोठ्या बातम्या
विविध वर्तमानपत्रं आणि वेबसाईट्स यांचा घेतलेला आढावा
1. सरकार म्हणून विचार करण्याची गरज- बाळासाहेब थोरात
विधान परिषदेत चंद्रकांत हंडोरे यांचा पराभव झाल्यानंतर महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी चिंता व्यक्त केली. "विधान परिषदेतील पराभव धक्कादायक असून सर्वांनीच आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे," तसेच ते पुढे म्हणाले की "सर्व गोष्टी आपल्या बाजूने असतानाही पराभव होत असेल तर सरकार म्हणून विचार करण्याची गरज आहे, असं मत महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केलं. 'लोकमत न्यूज18'ने ही बातमी दिली आहे.
राज्यसभेप्रमाणे विधान परिषद निवडणुकीतही कुठलीही चूक होऊ नये म्हणून महाविकास आघाडीतील पक्षांनी विशेष काळजी घेतली होती. असे असतानाही आघाडीची एकदोन नाही तर तब्बल 21 मतं फुटली आहे.
यात काँग्रेसची 3 मतं फुटल्याचे समोर आले आहे. कारण, काँग्रेसला 44 पैकी फक्त तीन मते मिळाली आहेत. दहाव्या जागेसाठी काँग्रेसचे चंद्रकांत हंडोरे आणि भाई जगताप आमने सामने होते. यात भाई जगताप यांचा विजय झाल्याने चंद्रकांत हंडोरे पराभूत झाले आहेत.
राज्यसभा निवडणुकीमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी चमत्कार घडवत भाजपचे तिन्ही उमेदवार विजयी झाले होते. त्यामुळे शिवसेनेचे उमेदवार संजय पवार पराभूत झाले होते. त्यामुळे विधान परिषदेसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व सूत्र आपल्या हातात घेतली होती.
त्यांनी सर्व आमदार आपल्याच देखरेखीखाली ठेवली होती. मतदानाच्या दिवशीही मुख्यमंत्र्यांनी सर्व आमदारांशी चर्चा करूनच मतदानाला पाठवले होते. यावेळी शिवसेनेनं कोणताही दगाफटका नको म्हणून आपल्याच आमदारांच्या संख्याबळावर आपले उमेदवार विजयी करण्यावर भर दिला होता. तर राष्ट्रवादी आणि काँग्रेसनेही काळजी घेतली होती. मात्र, तरीही तीनही पक्षांचं मतदान फुटल्याने ज्येष्ठ नेत्यांना धक्का बसला आहे.
2. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत हृदयविकाराने तिप्पट मृत्यू
मुंबईत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये हृदयविकाराच्या झटक्याने मृत झालेल्यांच्या संख्येत सुमारे 200 टक्के म्हणजेच तिपटीने वाढ झाली. करोना काळात कर्करोगासह हृदयविकार, क्षयरोगामुळे मृत्यू झाल्याचे प्रमाण घटले होते. 2021 मध्ये मात्र हे प्रमाण पुन्हा वाढल्याचे आढळले. 'लोकसत्ता'ने ही बातमी दिली आहे.
मुंबईत सर्वाधिक म्हणजे सुमारे 12 टक्के मृत्यू हे कर्करोगाने होतात. त्या खालोखाल हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू होणाऱ्यांचे प्रमाण 10 टक्के तर क्षयरोगामुळे सुमारे सहा टक्के असते. कोरोनाची साथ सुरू झाली त्यावर्षी, 2020 मध्ये मात्र कर्करोगासह हृदयविकार, क्षयरोगामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांच्या संख्येत घट झाल्याचे आढळले होते.
2021 मध्ये मात्र यात पुन्हा वाढ झाल्याचे आरटीआय कार्यकर्ते चेतन कोठारी यांनी माहिती अधिकारांतर्गत मागविलेल्या माहितीमधून निदर्शनास आले आहे. मुंबईत 2018 मध्ये हृदयविकाराच्या झटक्यामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 8 हजार 601 होती.
2019 मध्ये यात घट होऊन 5 हजार 849 झाली. करोनाच्या पहिल्या लाटेमध्ये म्हणजेच 2020 मध्ये आणखी घट होऊन 5 हजार 633 मृत्यू नोंदले गेले. करोनाच्या दुसऱ्या लाटेच्या काळात जानेवारी ते जून 2021 या सहा महिन्यांच्या काळातच हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झालेल्यांच्या संख्येत तिपटीहून अधिक वाढ झाली आहे. या काळात 17,880 रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे.
3. पुढच्या दोन महिन्यात फडणवीस मुख्यमंत्री होणार- रवी राणा
"पुढच्या दोन महिन्यात देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार आहेत. त्यासाठी लवकरच अविश्वास ठराव आणणार आहोत," असं अपक्ष पण भाजपला जाहीर पाठिंबा असलेले आमदार रवी राणा यांनी सांगितलं आहे. 'सकाळ'ने ही बातमी दिली आहे.
विधानपरिषदेचा निकाल अखेर जाहीर झाला असून भाजपने पाचही जागांवर दणदणीत विजय मिळवला आहे. त्यानंतर भाजपच्या गोटातून विजयी जल्लोष व्यक्त केला जात आहे. यामध्ये काँग्रेसच्या चंद्रकांत हंडोरे यांचा पराभव झाला असून महाविकास आघाडीच्या पाच उमेदवारांनी विधानपरिषदेवर वर्णी लावली आहे. भाजपच्या विजयानंतर अपक्ष आमदार रवी राणा यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केलीय.
4. राज ठाकरे यांच्या पायावर शस्त्रक्रिया, तीन महिने वॉकरच्या साथीने
मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या पायाची शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली आहे. मुंबईच्या लीलावती रुग्णालयात सोमवारी त्यांच्यावर हिप बोनची शस्त्रक्रिया करण्यात आली. तब्बल दीड तास ही शस्त्रक्रिया सुरू होती. ही शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली असली तरी पुढचे काही महिने राज ठाकरे यांना सक्तीची विश्रांती घ्यावी लागणार आहे. 'महाराष्ट्र टाईम्स'ने ही बातमी दिली आहे.
या काळात राज ठाकरे यांना कोणतीही सभा किंवा पक्षाच्या कार्यक्रमांना उपस्थित राहता येणार नाही. राज्यातील महापालिकांच्या निवडणुकाही अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. अशा काळात राज ठाकरे यांनाच घराबाहेर पडता न येणे, ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसाठी चिंता वाढवणारी गोष्ट आहे.
राज ठाकरे यांच्यावर शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉ. जलील पारकर आणि डॉ. विनोद अग्रवाल यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शस्त्रक्रियेनंतर राज ठाकरे यांची प्रकृती उत्तम असल्याची माहिती दिली.
येत्या चार ते पाच दिवसांमध्ये राज ठाकरे यांना रुग्णालयातून घरी सोडले जाईल. मात्र, घरी गेल्यानंतर राज ठाकरे यांना फिजिओथेरपी घेणे आवश्यक आहे. जेणेकरून त्यांच्या शारीरिक हालचाली या पूर्वीसारख्या सहज होण्यास मदत होईल. मात्र, या काळात राज ठाकरे यांना संपूर्णपणे आराम करावा लागणार आहे.
5. क्रिकेटपटू रवीचंद्रन अश्विनला कोरोना, इंग्लंड दौऱ्यासाठी प्रयाण लांबणीवर
भारतीय संघाचा अव्वल फिरकीपटू रवीचंद्रन अश्विनला कोरोनाचा संसर्ग झाला आहे. यामुळे इंग्लंड दौऱ्यासाठी अश्विनचं प्रयाण लांबलं आहे. इंग्लंड दौऱ्यापूर्वी अश्विनची कोरोना चाचणी घेण्यात आली. यामध्ये त्याला कोरोना झाल्याचं स्पष्ट झालं. 'एनडीटीव्ही'ने ही बातमी दिली आहे.
अश्विन सध्या क्वारंटीनमध्ये असून, कोरोनासंदर्भात सर्व प्रोटोकॉल्सचं पालन करत असल्याचं बीसीसीआयने स्पष्ट केलं आहे. भारतीय संघ इंग्लंडविरुद्धच्या एकमेव कसोटी आणि मालिकेसाठी इंग्लंडला पोहोचला आहे. इंग्लंडविरुद्धच्या एकमेव कसोटीपूर्वी भारतीय संघ लिसेस्टर संघाविरुद्ध सराव सामना खेळणार आहे.
1 जुलै पासून भारत-इंग्लंड टेस्ट सुरू होणार आहे. त्याआधी अश्विन बरा होऊन संघात परतेल असं बीसीसीआयने म्हटलं आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)