सांगलीत एकाच कुटुंबातील 9 जणांचा गूढ मृत्यू?

सांगलीमध्ये 2 घरांमध्ये एकाच कुटुंबातील 9 जण मृतावस्थेत आढळून आल्याने खळबळ माजली आहे. ही धक्कादायक घटना मिरज तालुक्यातील म्हैसाळमध्ये घडली आहे.

मिरजेच्या शासकीय रुग्णालयात सर्व मृतदेहांचं शवविच्छेदन सुरू आहे. त्यातून नेमकं या 9 जणांच्या मृत्यूचं कारण समोर येईल, असं पोलिसांनी म्हटलं आहे.

तपासात पोलिसांच्या हाती एक चिठ्ठी लागली आहे. पोलिसांनी त्यादृष्टीने तपास सुरू केला आहे. या चिठ्ठीमध्ये काही व्यक्तींच्या नावांचा उल्लेख असल्याचं समोर आलं आहे.

यादृष्टीने तपासासाठी एक विशेष पथक नियुक्त करण्यात आल्याचं पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी सांगितलाय.

सध्या सर्व बाजूने तपास सुरू आहे. डॉक्टर माणिक व्हनमोरे यांच्यावर प्रचंड कर्ज असल्याने आर्थिक विवंचनेतून त्यांनी आणि त्यांच्या कुटुंबाने टोकाचं पाऊल उचलल्याची चर्चा गावात सुरू आहे.

म्हैसाळ येथील नरवाड रोडवर अंबिका नगर परिसर आहे. येथील हॉटेल राजधानी कॉर्नर आणि चौंडजे मळा या दोन ठिकाणच्या घरांमधील व्यक्ती मृतावस्थेत आढळून आल्या आहेत. धक्कादायक म्हणजे सर्व जण एकाच व्हनमोरे कुटुंबाचे सदस्य आहेत. या घटनेत एकूण 9 जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

"एकूण नऊ जणांचे मृतदेह आढळले आहेत, एका घरात तीन आणि दुसऱ्या घरात सहा असे मृतदेह सापडले आहेत आणि त्यांचं शवविच्छेदन करण्यात येत आहे. फॉरेन्सिक टीम देखील दाखल झाली आहे. अहवालानंतरच खरं काय ते कळेल," असं सांगलीचे पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम असं सांगितलं आहे.

हॉटेल राजधानी कॉर्नर परिसरातील घरामध्ये कुटुंबप्रमुख पशु वैद्यकीय डॉक्टर माणिक यल्लप्पा व्हनमोरे, त्यांची पत्नी रेखा माणिक व्हनमोरे, आई आकताई यल्लप्पा व्हनमोरे, मुलगी प्रतिमा माणिक व्हनमोरे, मुलगा आदित्य माणिक व्हनमोरे, पुतण्या शुभम पोपट व्हनमोरे या 6 जणांचे मृतदेह आढळले.

तर चौंडजे मळा येथील घरात डॉ. माणिक यांचे शिक्षक भाऊ पोपट यल्लप्पा व्हनमोरे, पत्नी संगीता पोपट व्हनमोरे, मुलगी अर्चना पोपट व्हनमोरे या 3 जणांचे मृतदेह आढळून आलेत.

या घटनेची माहिती मिळताच सांगलीचे पोलीस अधीक्षक दीक्षित कुमार गेडाम, उपविभागीय पोलीस अधीक्षक अशोक वीरकर, पोलीस निरीक्षक चंद्रकांत बेंद्रे यांनी घटनास्थळी भेट दिली.

परिसरात पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सदर घटनेचा पंचनामा पोलिसांनी केला असून पुढील तपास सुरू आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)