You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
मुंबई : उंदरांनी पळवलेले सोन्याचे दागिने पोलिसांनी उंदराच्याच मदतीने शोधून काढले
- Author, शाहिद शेख
- Role, बीबीसी मराठीसाठी
हरवलेली वस्तू शोधण्यासाठी पोलिसांनी श्वानाचा उपयोग केल्याचे तुम्ही ऐकले असेल पण यावेळी चक्क उंदराच्याच मदतीने पोलिसांनी सोन्याच्या दागिन्यांची पिशवी शोधून काढली. गंमत म्हणजे पिशवी उंदरांनीच पळवून त्यांच्या बिळात नेली होती. पण त्या उंदराचा माग घेत घेत पोलिसांनी बरोबर ती पिशवी शोधून काढली.
पोलिसांच्या समयसूचकतेचे त्यांच्या वरिष्ठांनी कौतुक तर केलेच पण उंदराच्या मदतीने सोनं शोधल्याची चर्चा तर सर्वत्रच रंगली आहे.
दिंडोशी परिसरात एका कचऱ्याच्या ढिगाऱ्यातून मुंबई पोलिसांनी 10 तोळे सोनं जप्त केलं आहे. ही सोन्याची पिशवी कोरडा पाव समजून भिकाऱ्याने कचऱ्यात फेकली होती, सीसीटीव्हीच्या मदतीने पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावला.
कचऱ्याच्या ढिगाऱ्यात उंदराच्या तावडीत असलेली दागिन्यांची पिशवी पोलिसांनी आता पीडित महिलेच्या ताब्यात दिली आहे. यातील दागिन्यांची किंमत सुमारे 5 लाख रुपये आहे.
दिंडोशी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आरे कॉलनी परिसरात राहणारी सुंदरी पलानीवेल नावाची महिला आपल्या मुलीच्या लग्नाचे कर्ज फेडण्यासाठी घरात ठेवलेले 10 तोळे सोन्याचे दागिने बँकेत गहाण ठेवायला जात असताना हा प्रकार उघडकीस आला.
रस्त्याने जाताना सुंदरी यांना एक भिकारी स्त्री आणि तिचा मुलगा दिसला, सुंदरी यांनी पिशवीत ठेवलेले 2 वडापाव मुलाला दिला आणि तिथून निघून गेल्या, सुंदरी बँकेत पोहोचल्या तेव्हा त्यांना समजले की त्यांनी मुलाला दिलेल्या वडापावच्याच पिशवीत सोन्याचे दागिनेही ठेवले होते.
सुंदरी लगेच बँकेतून निघून त्या महिलेकडे धावल्या. त्या ठिकाणी गेल्या असता त्यांना ती महिला सापडली नाही. सुंदरी यांनी तात्काळ पोलिसांना याची माहिती दिली.
दिंडोशी पोलिसांच्या तपास पथकाचे प्रमुख सुरज राऊत यांनी तत्काळ या प्रकरणाचा तपास सुरू केला, अधिकारी सूरज राऊत यांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज स्कॅन केले असता ती भिकारी महिला निघून जाताना दिसली. पोलिसांनी महिलेशी संपर्क साधला असता तिने सांगितले की तो वडापाव कोरडा होता म्हणून त्यांनी तो पिशवीसह तिथेच फेकून दिला.
पोलिसांनी कचऱ्याच्या ढिगाऱ्यात पिशवी शोधण्यास सुरुवात केली मात्र ती त्यांना सापडली नाही. पोलिसांनी त्या कचराकुंड्यांजवळ बसवलेले सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, पोलीस ज्या कचऱ्याची पिशवी शोधत होते ती उंदराच्या ताब्यात असल्याचे दिसून आले.
तिथे उंदीर पिशवीसह इकडे तिकडे फिरत होते. पोलिसांनी त्या उंदराचा पाठलाग केला, तोपर्यंत उंदीर त्या पिशवीसह जवळच्या नाल्यात शिरला.
पोलिसांनी ती बॅग नाल्याच्या आत जाऊन बाहेर काढली त्यात सोन्याचे दागिने सुरक्षित सापडले. एका प्रकारे उंदराने पोलिसांना सोन्याच्या पिशवीचा मार्ग दाखवला, असं पोलिसांनी सांगितले.
पोलिसांनी सोन्याची बॅग जप्त करून पोलिस ठाण्यात आणली, चौकशी करून ती सुंदरी यांना परत केली, अशी माहिती दिंडोशी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत घार्गे यांनी दिली.
दागिने बँकेत गहाण ठेवून कर्ज फेडणार होते..
काही दिवसांपूर्वीच माझ्या मुलीचं लग्न झालं आहे. लग्नासाठी आम्ही काही कर्ज घेतलं होतं. आमच्याकडे असलेलं सोनं बँकेत गहाण ठेवून आमच्यावर असलेला कर्ज आम्ही फेडणार होतो.
पिशवीतलं सोनं मिळालं नसतं तर मी जीव दिला असता. पोलिसांनी मोठ्या शिताफीनं याचा तपास केला आणि माझं सोनं परत मिळवून दिला त्याबद्दल मी त्यांचे आभारी आहे, असं सुंदरी पलानीवेल यांनी सांगितलं.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)