You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
अग्निपथ योजना : विरोधकांचे 7 प्रश्न, सैन्यदलांची 7 उत्तरं
14 जून 2022 रोजी केंद्र सरकारनं सैनिक भरतीसाठी अग्निपथ योजनेची घोषणा केली. त्यानंतर देशातील अनेक राज्यात हिंसक आंदोलन सुरू झाली आहेत.
चार वर्षांसाठी सैन्यदलात सेवेची संधी देणाऱ्या या योजनेवर देशातील तरूण नाराज आहेत आणि रस्त्यावर उतरून आपली नाराजी व्यक्त करत आहेत.
बिहार, उत्तर प्रदेश आणि तेलंगणात तरुणांनी 14 रेल्वेगाड्यांना आग लावली आणि अनेक ठिकाणी रेल्वेच्या कार्यालयांची तोडफोड केली. शनिवारी, 18 जूनला जवळपास 300 रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या.
या योजनेवरून आता अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. कुणी या योजनेला विरोध करतोय, तर कुणी समर्थन करतोय.
या सर्व गोंधळामुळे योजनेच्या घोषणेनंतर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी लष्कराच्या तिन्ही दलांच्या प्रमुखांशी चर्चा केली.
रविवारी म्हणजे 19 जून रोजी तिन्ही सैन्यदलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन अग्निपथ योजनेसंबंधी उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नांची उत्तरं दिली.
या पत्रकार परिषदेत संरक्षण मंत्रालयात लष्करविषयक विभागाचे अतिरिक्त सचिव लेफ्टनंट जनरल अनिल पुरी, वायुदलाचे एअर मार्शल एस. के. झा, नौदलाचे व्हाईस अडमिरल डी. के. त्रिपाठी तर भूदलाचे अडजुटेंट जनरल बन्सी पोनप्पा सहभागी झाले होते.
असेच 7 प्रश्न आणि त्या प्रश्नांना सैन्यदलाच्या अधिकाऱ्यांनी दिलेली उत्तरं आम्ही इथे देत आहोत.
1. अग्निपथ योजनेची नेमकी गरज काय आहे?
उत्तर - "या सुधारणा मोठ्या कालावधीपासून प्रलंबित होत्या. 1989 मध्ये यांवर काम सुरू झालं होतं. आमची इच्छा होती की, हे काम सुरू व्हावं. मात्र, त्याचे अनेक पैलू होते. त्यांना वाटत होतं की, कमांडिंग ऑफिसरचं वय कमी करावं. टीथ-टू-टेल रेशो कमी व्हावं.
एक एक करुन काम सुरू केलं गेलं. कमांडिंग ऑफिसरचं वय कमी केलं गेलं, आमचं टीथ-टू-टेल रेशो आहे, तोही कमी केला गेला.
त्यानंतर कारगील रिव्ह्यू कमिटीअंतर्गत अरुण सिंह कमिटीने म्हटलं की, सीडीएसचं गठन व्हायला हवं. तेही काम झालं. त्याच गोष्टीला पुढे घेऊन जात, आम्ही पुढच्या सुधारणा आणल्या होत्या, त्यात असं होतं की, आपल्या सैन्याचं सरासरी वय आता 32 वर्षे आहे, ते 26 पर्यंत आणावं.
2030 सालापर्यंत आपल्या देशाची 50 टक्के लोकसंख्या 25 वर्षांहून कमी असेल. याचा अभ्यास केला गेला. पहिल्या दोन्ही वर्षी आमचे तिन्ही प्रमुख आणि जनरल रावत यांच्यासह काही लोकांमध्ये चर्चाही झाली की, काय काय मार्ग असू शकतात.
त्याशिवाय आम्ही बाहेरील देशांचाही अभ्यास केला. यामुळे काय होईल, तर तरुणांचा उत्साह आणि अनुभव यांची सांगड घालता येईल."
2. आरक्षणाची घोषणा सरकारच्या नरमाईचे संकेत आहेत?
उत्तर - "काही आगीच्या घटनांमुळे हा निर्णय घेतला गेलाय, असा विचार करू नका. असं नाहीय. हे आधीपासूनच ठरलं होतं.
हे पहिल्यापासूनच ठरलं होतं आणि असं यासाठी होतं, कारण हे 75 टक्के तरुण, जे 4 वर्षांनंतर परत जातील, ते देशाची ताकद आहेत.
याची योजना आधीपासूनच ठरली होती की, किती टक्के आरक्षण दिलं जाईल. कारण हे 75 टक्के अग्निवीर देशाची ताकद असतील. त्यामुळे त्यांच्या वयोमर्यादेत सूट देण्याचा निर्णय घेण्यात आला."
3. कमी वयात अग्निवीर बनणारे तरुण लवकर निवृत्तही होतील?
उत्तर - "बारावी शिकलेल्या विद्यार्थ्यांना आम्ही घेऊ शकत होतो. मात्र, आमचं काम थोडं जोखमीचं आहे. जेव्हा युद्ध झालंय, तेव्हा तुम्ही पाहिलंय. जेव्हा मृतदेह पाहतो, तेव्हा आपले डोळे पाणावतात.
हे काम थोडं वेगळ्या पद्धतीचं आहे. हे काम पाहता आम्ही या योजनेत किमान वय साडे 17 वर्षे, तर कमाल वयाची मर्यादा 21 वर्षे निश्चित केली.
यात कुठलाच बदल होणार नाही. 21 वर्षांच्या कमाल वयोमर्यादेत बदल करण्यात आलाय, कारण गेल्या दोन वर्षात कोव्हिडमुळे भरती होऊ शकली नव्हती."
4. दरवर्षी केवळ 46 हजार जवानांची भरती होणार का?
उत्तर - "पुढच्या चार ते पाच वर्षांत आपली प्रवेशक्षमता 50 ते 60 हजार होईल. 50-60 हजारनंतर पुढे काय होणार, तर ही क्षमता 90 हजार ते 1 लाख 25 हजारापर्यंत जाईल.
ही केवळ 46 हजार असणार नाही. असं आम्ही केलं कारण कमीत कमी आता सुरू तरी करता येईल. त्यानंतर यामध्ये वाढ होईल. कारण योजना चालवल्यानंतर यात काय अडचणी येतात, यातूनही बरंच काही शिकायला मिळेल."
5. आधीपासून भरती प्रक्रियेत असलेल्यांचं काय?
उत्तर - "अग्निवीरांच्या भरतीसाठीचं कमाल वय 21 वर्षांवरून 23 वर्षांपर्यंत वाढवण्यात आलं आहे. पण ज्यांनी पूर्वीच्या भरती प्रक्रियांमध्ये सहभाग नोंदवला होता, त्यांच्यासाठीच हा बदल करण्यात आला आहे. कारण त्यांची नियुक्ती प्रक्रिया पूर्ण होऊ शकली नाही. सर्वात महत्त्वाचा टप्पा आहे प्रवेश परीक्षा. त्यांनी प्रवेश परीक्षेत सहभाग नोंदवला नव्हता.
त्यामुळे त्यांना दोन वर्षे जादा संधी देण्यात येत आहे. कारण गेल्या दोन वर्षांत त्यांचं वय वाढलं आहे. त्यांनी आपल्या अग्निवीर योजनेत सहभागी होण्यासाठी हा बदल करण्यात आला आहे.
हे जवान अग्निवीर म्हणूनच येतील. इथे त्यांना पुढे जाणार की नाही, असं विचारण्यात येईल. त्यासाठी त्यांना वेबसाईटवर अर्ज करावा लागणार आहे.
ही सगळी भरती अग्निवीरच्या माध्यमातूनच होईल. वयोमर्यादा 21 वरून 23 वर्षे अशी वाढवण्यात आली आहे.
यात पात्र ठरणारे या यंत्रणेतून अर्ज करू शकतील. वैद्यकीय स्थितीच्या दृष्टिकोनातून दोन वर्षे हा मोठा कालावधी असतो. त्यामुळे त्यांची स्क्रिनिंग पुन्हा एकदा होईल. पूर्ण प्रक्रिया नव्याने होईल. त्यानंतरच त्यांची निवड वायुदलात होऊ शकेल."
6. सैन्यात भरती प्रक्रिया इथून पुढे कशी होईल?
उत्तर - "केवळ अग्निवीर योजनेच्या माध्यमातूनच नवी भरती होणार आहे."
7. अग्निपथ योजना मागे घेण्यात येऊ शकते का?
उत्तर - "अग्निपथ योजना कधीच मागे घेण्यात येणार नाही. मागे घेण्याचा प्रश्नच नाही. देश आणि तरुणांसाठी हे सकारात्मक पाऊल आहे. याचं तुम्हाला उदाहरणही देतो.
दुर्गम भागातील नागरिकांची किती हानी होते, तुम्हाला माहिती आहे का? त्यामुळे तरुण आपल्यासाठी किती आवश्यक आहेत, हे तुम्हाला कळेल. त्यामुळे हे प्रयत्न करण्यात मागेपुढे पाहण्याची गरज नाही, असं मला वाटतं."
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)