You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
सलमान खान आणि त्याच्या वडिलांना धमकीचं पत्र - 'तुमचाही मुसेवाला करू' #5मोठ्याबातम्या
आज विविध वर्तमानपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा-
1. तुमचाही मुसेवाला करू- सलमान खान आणि त्याच्या वडिलांना धमकीचं पत्र
पंजाबी रॅपर सिध्दू मूसेवाला याची काही दिवसांपूर्वी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. अभिनेता सलमान खान आणि त्याचे वडील सलीम खान यांना धमकी देणारं पत्र मिळालं आहे.
'सलमान और आपका बहुत जल्द मुसेवाला होगा' ( सलमान आणि तुमचा लवकरच मुसेवाला होणार) अशी धमकी चिठ्ठीतून देण्यात आली आहे.
सलीम खान यांना हे धमकीचं पत्र मिळाल्यानंतर त्यांनी लगेचच पोलिसांना याबद्दल माहिती दिली आहे. याप्रकरणी वांद्रे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रविवारी सकाळी नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉकसाठी गेलेले सलीम खान वांद्र्यातील बँड स्टँड इथं नेहमीचे बेंचवर बसले असता कोणीतरी अज्ञात इसमानं त्यांना आणि सलमान खानला चिट्ठीद्वारे जीवे ठार मारण्याची धमकी दिली. त्यानंतर त्यांनी त्यांच्या सुरक्षारक्षकाद्वारे पोलिसांशी संपर्क साधला.
पोलिसांनी त्यांचा जबाब नोंदवला असून अज्ञात इसमाविरोधात कलम 506 (2) भा.द.वि. अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
पंजाबी रॅपर सिध्दू मूसेवाला याची गोळ्या झाडून हत्या झाल्यानंतर सलमान खानची सुरक्षाही वाढविण्यात आली आहे. ज्या दिवशी मूसेवालाची हत्या झाली त्याच्या आदल्यादिवशीच त्याची सुरक्षा कमी करण्यात आली होती.
मात्र मुसेवालाच्या हत्येनतंर सलमान खानच्या सुरक्षेत मुंबई पोलिसांनी वाढ केली आहे. याचं कारण म्हणजे मुसेवालाच्या हत्येप्रकरणी गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचं पुढं आलेलं नाव.
काही वर्षापूर्वी लॉरेन्सने सलमानला जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्यामुळेच सलमानच्या घराभोवती पोलिसांची सुरक्षा वाढवण्यात आलीये.
महाराष्ट्र टाइम्सनं ही बातमी दिली आहे.
2. उत्तर काशीमध्ये बस दरीत कोसळून 25 जणांचा मृत्यू
उत्तराखंडमधील उत्तरकाशी जिल्ह्यात बस दरीत कोसळून 25 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.
रविवारी (05 जून) संध्याकाळी उशीरा एक बस एनएच-94 वर डामटापासून दोन किमी पुढे जानकीचट्टीजवळ खोल दरीत कोसळली. बसमधील लोक मध्य प्रदेशातील यात्रेकरू असल्याचे सांगण्यात येत आहे.
सकाळनं हे वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
"मध्य प्रदेशातील पन्ना येथील यात्रेकरूंच्या बसला अपघात झाल्याची अत्यंत दुःखद घटना आज घडली; तर 25 जणांचा मृत्यू झाला आहे. आम्ही सर्व मदत प्रयत्न करत आहोत. डीएम आणि एसपी दोघेही घटनास्थळी पोहोचले असून, एचएमने एनडीआरएफ टीम पाठवली आहे," अशी माहिती उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी दिली आहे.
मध्य प्रदेशातील पन्ना जिल्ह्यातील 28 यात्रेकरूंना घेऊन निघालेली बस उत्तरकाशी जिल्ह्यातील डामटाजवळ दरीत कोसळली असून 15 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले , तर 6 जखमींना रुग्णालयात पाठवण्यात आले . तसेच घटनास्थळी पोलिस आणि SDRF पोहचले असल्याची माहिती DGP अशोक कुमार यांनी दिली.
दरम्यान उत्तराखंडमधील या भीषण बस अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 2 लाख रुपये आणि जखमींना प्रत्येकी 50,000 रुपयांची मदत पंतप्रधान मोदींनी जाहीर केली आहे.
3. राज ठाकरे त्यांच्या अहंकारामुळे अयोध्येला येऊ शकले नाहीत- ब्रिजभूषण सिंह
उत्तर प्रदेशचे भाजप खासदार ब्रिजभूषण सिंह यांनी पुन्हा एकदा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना इशारा दिला आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्यांनी राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.
त्यांनी म्हटलं आहे, की जोपर्यंत राज ठाकरे आपला अहंकार सोडत नाहीत, तोपर्यंत त्यांच्यावर श्रीरामाची कृपा होणार नाही. जोपर्यंत त्यांचा अहंकार मोडत नाही, तोपर्यंत ते उत्तर भारतात येऊ शकणार नाही.
"राज ठाकरे हे दुर्दैवी आहेत, जर ते समजूतदार असतील तर जनतेची माफी मागायला काहीच हरकत नव्हती. इतिहास आहे, मोठमोठ्या राजांनी महाराजांनी, सम्राटांनी, संतांनीही जनतेची माफी मागितली आहे. आम्ही राज ठाकरेंना रोखले नाही, त्यांच्या अहंकाराने राज ठाकरेंना अयोध्येत येण्यापासून रोखले आहे. जोपर्यंत त्यांचा अहंकार मोडत नाही, तोपर्यंत ते उत्तर भारतात पाऊल ठेवू शकणार नाहीत," असंही ब्रिजभूषण सिंह यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे 5 जूनला अयोध्या दौऱ्यावर जाणार होते. पण नंतर तब्येत बरी नसल्याचे सांगत त्यांनी हा दौरा रद्द केला. त्यांच्या दौऱ्याला भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांनी विरोध केला होता.
एबीपी माझानं ही बातमी प्रसिद्ध केलीये.
4. मान्सूनचं आगमन लांबलं?
उष्ण लाटेने विदर्भ अक्षरशः भाजून निघत असून राज्यातही कमाल तापमानात वाढ झाली आहे. आज (6 जून) विदर्भात उष्ण लाटेचा इशारा असून, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या दक्षिणेकडील जिल्ह्यात विजा, मेघगर्जनेसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
रविवारी (5 जून) सकाळपर्यंतच्या 24 तासांमध्ये गोंदिया येथे राज्यातील उच्चांकी 45.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर वर्धा, नागपूर येथे 45 अंशांपेक्षा अधिक, ब्रह्मपुरी, अकोला येथे 44 अंशांपेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली. राज्यातही उन्हाचा चटका आणि उकाडा चांगलाच वाढला आहे.
पूर्व उत्तर प्रदेश आणि परिसरावर असलेल्या चक्राकार वाऱ्यांपासून दक्षिण छत्तीसगड पर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरात चक्राकार वाऱ्यांच्या स्थिती असून त्यापासून श्रीलंकेपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे.
मान्सून कर्नाटक किनारपट्टीचा बहुतांश भाग व्यापून गोव्याच्या उंबरठ्यापर्यंत मजल मारल्याने कोकणात मान्सून लवकर दाखल होण्याची स्थिती होती. मात्र मान्सूनचे प्रवाह मंदावल्याने अरबी समुद्रावरून प्रगती थांबल्याने महाराष्ट्रातील आगमनही लांबले आहे. संपूर्ण ईशान्य भारतासह सिक्कीम आणि पश्चिम बंगाल राज्याच्या हिमालयाकडील भागात मान्सून दाखल झाला.
अॅग्रोवननं हे वृत्त दिलंय.
5. '...तर राज्यात बंधनं लादावी लागतील'- अजित पवार
राज्यात वाढत्या करोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर पुन्हा निर्बंध लादणार की नाही यावर अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. याबाबत रविवारी (5 जून) पुण्यात थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाच वाढत्या करोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर निर्बंध लादले जाणार का? असा प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा अजित पवार यांनी स्पष्ट भूमिका घेतली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बंधने लादायला नको असं सांगितलं आहे. मात्र, टास्क फोर्सने निर्बंध लादण्यास सांगितल्यावर नाईलाजास्तव बंधने आणावी लागतील, असं मत अजित पवार यांनी व्यक्त केलं.
अजित पवार म्हणाले, "तुम्हीच प्रश्न विचारता आणि तुम्हीच मास्क घातला नाही. मी मास्क घालून बोलत आहे. मी जीव तोडून सांगतो की प्रश्न विचारताना मास्क घाला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मला आज अजित, बंधन आणायला नको असं म्हटलं. लोकांना मास्क घालण्याचे आवाहन करायला काही हरकत नाही."
लोकसत्तानं ही बातमी दिलीये.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)