पाऊस अंदाज : हवामान विभाग शेतकऱ्यांची दिशाभूल करतंय का?

    • Author, स्नेहल माने
    • Role, बीबीसी मराठीसाठी

"पावसाचे अंदाज योग्य वेळी कळाले तर त्यानुसार आम्ही पिकांचं नियोजन करू शकतो. नाहीतर महापुराच्या फटक्यात मोठं नुकसान होतं."

हवामान विभागाचा अंदाज अचूक असणं का गरजेचं आहे, ते ऊस उत्पादक शेतकरी अमित शंभूशेटे सांगतात. कोल्हापूरच्या शिरोळ तालुक्यातील नांदणीमध्ये त्यांची शेती आहे. पंचगंगा नदीला वारंवार येणाऱ्या महापुरामुळे हवामानाचा अंदाज पाहणं त्यांच्यासाठी महत्त्वाचं ठरत आहे.

पण गेल्या काही दिवसांत आलेल्या बातम्यांमुळे त्यांच्यासारख्या शेतकऱ्यांच्या मनात गोंधळ माजला आहे. भारतीय हवामान विभागाच्या एका घोषणेवर देशातली खासगी हवामान संस्था आणि काही तज्ज्ञांनीच आक्षेप घेतल्यापासून हा वाद सुरू झालाय.

29 मे 2022 रोजी हवामान विभागाने केरळमध्ये मान्सून सक्रीय झाल्याचं जाहीर केलं होतं. पण हवामान खात्याच्या या निर्णयावर स्कायमेट या खासगी संस्थेनं प्रश्नचिन्ह उपस्थित केलं.

ज्या निकषांच्या आधारे हवामान खातं एरवी मान्सूनचं आगमन झाल्याचं जाहीर करतं, त्या निकषांची पूर्तता 29 मे रोजी झाली नव्हती, असा दावा स्कायमेटनं केला.

स्कायमेटच्या आरोपांनंतर हवामान विभागाची अंदाज जाहीर करण्याची पद्धत चर्चेत आली आहे, तसंच नागरिकांचा, विशेषतः शेतकऱ्यांचाही अशा विरोधाभासी माहितीमुळे गोंधळ उडाला आहे.

नेमकं काय झालं हे जाणून घेण्याआधी पाहूयात, मान्सूनचं आगमन झाल्याचं कसं जाहीर केलं जातं आणि त्यासाठी कोणते निकष लावले जातात?

मान्सून आल्याचं जाहीर करण्याचे निकष काय आहेत?

केरळमध्ये मान्सून दाखल झाला की नाही, हे ठरवण्यासाठी काही निकषांची पूर्तता होणं आवश्यक असतं. 2016 साली हवामान विभागानं सुधारीत निकष स्वीकारले.

केरळ आणि लक्षद्वीप परिसरात 14 हवामान केंद्र आहेत. त्यातील किमान 60 टक्के म्हणजे 9 केंद्रांवर 10 मे नंतर कधीही सलग दोन दिवस 2.5 मिलीमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली, तर तिथे मान्सून दाखल झाल्याचं हवामान विभाग जाहीर करतो.

पावसाच्या प्रमाणाबरोबरच वाऱ्याची दिशा, आऊटगोईंग लाँगवेव्ह रेडिएशन (OLR किंवा समुद्राच्या पृष्ठभागावरून उत्सर्जित होणारी उर्जा) अशा गोष्टी पाहिल्या जातात.

स्कायमेटनं दावा केला की, 'हवामान खात्याने हेच निकष पायदळी तुडवून पावसाचं आगमन झालंय हे सांगण्याची गडबड केली.'

त्यांच्या म्हणण्यानुसार वाऱ्याची दिशा आणि OLR विषयीच्या निकषांची पूर्तता झाली, तसंच 29 मे रोजी पुरेसा पाऊसही पडला. पण 28 मे किंवा 30 मे रोजी पावसाचं प्रमाण कमी होतं आणि तरीही मान्सून सक्रीय झाल्याचं जाहीर करण्यात आलं. त्यावर स्कायमेटच नाही, तर अन्य काही तज्ज्ञांनीही आश्चर्य व्यक्त केलं आहे.

30 आणि 31 मे रोजी या निकषांची पूर्तता झाल्याचं हवामान संशोधक अक्षय देवरस यांनी निदर्शनास आणून दिलं आहे.

हवामान विभागानं आपण आधी जाहीर केलेल्या अंदाजाला पुष्टी मिळावी, अशा बेताने जाणूनबुजून घाई करत मान्सूनच्या आगमनावर शिक्कामोर्तब केलं असल्याचा आरोपही झाला.

हवामान विभागाचं स्पष्टीकरण

हवामान खात्याने सुरुवातीला स्कायमेटने केलेल्या गंभीर आरोपाची दखल घेतली नाही. पण सोमवारी पत्रकार परिषदेत यासंदर्भात प्रश्‍न विचारल्यानंतर विभागाचे महासंचालक मृत्युंजय महोपात्रा यांनी हा आरोप स्पष्ट शब्दांत फेटाळला.

महोपात्रा म्हणाले की, "दुसऱ्या दिवशी जरी आपण पावसाचे निकष पूर्ण केले नाही तरी फारसा फरक पडत नाही. सर्व मानकं दररोज पूर्ण होतील अशी अपेक्षा केली जाऊ शकत नाही. शास्त्रीय प्रक्रिया आणि निकषांचं पूर्ण पालन करूनच भाकीत केलं आहे."

त्याचवेळी विभागातील निवृत्त हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनीही स्कायमेटच्या आरोपावरच प्रश्नचिन्हचं उभं केलं. ते म्हणतात, "स्कायमेट या खासगी कंपनीवरही अनेक आरोप झालेले आहेत, त्यांचेही अंदाज चुकतात. असे आरोप करण्याऐवजी स्कायमेटने, भारतीय हवामानशास्त्र विभागाकडे यासंबंधीचा खुलासा मागावा. उगाच शिंतोडे उडवण्यात काही अर्थ नाही."

हवामानाचा अंदाज कसा सुधारणार?

हवामान खात्यावर असे आरोप होण्याची ही पहिली वेळ नाही.

मान्सून जाहीर करण्याची घाई करण्यामागे शेतीशी संबंधित उत्पादक कंपन्यांचे व्यावसायिक हितसंबंध, अर्थकारणाची गणितं, सरकारी राजकीय हेतू, उद्योगविश्‍वातील कंपन्यांचे लागेबांधे इत्यादी कारणं असल्याची उघड चर्चा ऍग्रोवन या वृत्तपत्रात छापून आली आहे.

'आज पाऊस पडणार नाही म्हटलंय, म्हणजे नक्की छत्री घेऊन जायला हवी' किंवा 'अतिवृष्टीचा अंदाज, म्हणजे ऊनच पडणार चक्क', 'हवामान नाही, दोलायमान खातं' अशी वाक्य तुम्हीही ऐकली असतील.

अशा जोक्ससोबतच हंगामाच्या सुरुवातीला पावसाचे अनुकूल अंदाज देण्यासाठी सरकारचा दबाव असतो, अशी चर्चाही होत असते. दिवंगत शास्त्रज्ञ डॉ. वसंत गोवारीकर यांनी 1990 च्या दशकात त्याला वाचा फोडली होती.

गोवारीकर हे केंद्र सरकारच्या विज्ञान-तंत्रज्ञान खात्याचे सचिवही होते आणि हवामान विभाग या खात्याचाच भाग होता. त्यांनी तयार केलेलं मान्सूनच्या अंदाजाचं मॉडेल जवळपास दशकभर वापरलं गेलं.

त्यानंतर तीन दशकांत तंत्रज्ञानानं प्रगती केली आहे आणि हवामानाचे अंदाज लावण्यासाठी आवश्यक माहिती आता अगदी मोबाईल फोनवरही उपलब्ध होऊ लागली आहे.

हवामान खातं आता अद्ययावत यंत्रणा वापरत असून, त्या आणखी सुधारण्याचे प्रयत्नही सुरू असल्याची माहिती मोहपात्रा यांनी सोमवारच्याच पत्रकार परिषदेत एका प्रश्नाला उत्तर देताना दिली.

एक नमूद करायला हवं, की मान्सूनची सुरूवात कधी झाली याचा पूर्ण हंगामात कधी, कुठे आणि किती पाऊस पडणार यावर परिणाम होत नाही.

शेतकऱ्यांच्या दृष्टीनं पुढच्या आठवडाभराचं हवामानाचं भाकित आणि पुढच्या काही तासांतलं भाकित (नाऊकास्ट) हे जास्त महत्त्वाचं ठरतं.

शेतकरी काय म्हणतात?

शिरोळचे शेतकरी अमित शंभूशेटे सांगतात. "शेतकऱ्यांसाठी हवामानाच्या अंदाजाची माहिती गरजेची असते. देशभरात पाऊस किती दिवस पडणार याहीपेक्षा आमच्या भागात, तालुक्यात पुढच्या पंधरा दिवसात पावसाची स्थिती काय असेल, तापमान कसं असेल हा अंदाज आम्हाला गरजेचा असतो."

मिरजेत द्राक्ष पिकवणारे श्रीपाल चौगुले म्हणाले, "आम्हाला खतं आणि औषध फवारणीचं नियोजन पावसाच्या अंदाजानुसार करावा लागतं. हवामानात होणारे छोटे मोठे बदल देखील द्राक्ष शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान करतात. पूर्वी रेडिओ आणि टीव्हीवरील बातम्यांमधून हवामानाचे अंदाज पहिले जायचे. आजकाल इंटरनेटच्या सोयींमुळे गुगल नाहीतर व्हाट्स ग्रुपमध्ये वर्तवलेल्या हवामानाच्या अंदाजावर विश्वास ठेवावा लागतो."

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)