हॉटेलमध्ये सर्व्हिस चार्ज देणं अनिवार्य आहे का? कायदा काय सांगतो?

    • Author, गीता पांडे
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

गेल्या काही दिवसांपूर्वी केंद्र शासनाचे काही अधिकारी रेस्टॉरंट संघटनेच्या काही प्रतिनिधींना भेटले. जेव्हा आपण हॉटेलमध्ये जातो तेव्हा अनेकदा ग्राहकांना सर्व्हिस चार्ज भरावा लागतो आणि हा कायम वादाचा मुद्दा होतो. याच वादावर तोडगा काढण्यासाठी ही भेट होती.

काही महिन्यांपूर्वी निकोल रुथ एलिस मुंबईच्या एका हॉटेलमध्ये गेल्या होत्या. त्या स्वत: खवय्या आहेत आणि मूळच्या मुंबईच्या आहेत.

"एके दिवशी संध्याकाळी मी असंच खायला गेले होते. त्यांनी मला एका खोलगट प्लेटमध्ये पिझ्झा दिला. त्यामुळे तो तुटून आला."

वेटर मध्येच येऊन एकदा विचारूनही गेला की पिझ्झा कसा आहे. "मी त्याला स्पष्टपणं सांगितलं की पिझ्झा फार काही खास नाही. त्याने माझं म्हणणं ऐकलं आणि तो निघून गेला."

जेव्हा बिल आलं तेव्हा एकूण बिलात 10 टक्के सर्व्हिस चार्ज लावला होता.

"माझा स्वभाव भांडकुदळ नाही. त्यामुळे मी सर्व्हिस चार्ज भरणार नाही असं त्यांना थेट सांगितलं नाही. पण मला असं वाटतं की सर्व्हिस चांगली असेल तरच टीप द्यावी. त्याची कुणीही बळजबरी करू नये," असं त्या म्हणाल्या.

गेल्या काही वर्षांपर्यंत टीप देणं ऐच्छिक होतं. मात्र त्यानंतर रेस्टॉरंट ने 5-15% सर्व्हिस चार्ज लावायला सुरुवात केली.

हा सर्व्हिस चार्ज लावण्यामागे एका रेस्टॉरंट मालकाने त्याची दोन कारणं सांगितली. पहिलं असं की वेटरला दिलेली टीप सगळ्यांना वाटली जाईल. त्यात शेफ, क्लीनर्स, डिशवॉशर्स याही लोकांना टीप मिळावी. दुसरं असं की भारतीय लोक फार उदारपणे टीप देत नाहीत.

पत्रकार आणि खाद्यसमीक्षक वीर संघवीसुद्धा दुसऱ्या मुद्द्याला दुजोरा देतात. "भारतीय लोक भरघोस टीप देत नाही हे तितकंसं सत्य नाही. मी फक्त वेटरच नाही तर डोअरमनलाही टीप देताना लोकांना पाहिलं आहे."

त्यांच्या मते टीप देण्याची पद्धत पाश्चिमात्य देशातून आली आहे.1960च्या दशकात वेटरला टीप दिली तर मालक लोक वेटर लोकांना कमी पगारावर राबवू शकत होते. 1950 ते 60 च्या दशकात दिल्लीतील कनॉट प्लेस, कोलकाताचं पार्क स्ट्रीट, किंवा मुंबईचं चर्चेगेट भागातील हॉटेल त्यांच्या वेटर्स ना पगार देत नसत. त्यांना ज्या टीप्स मिळतील त्यातून पगार उभा करण्याचं आवाहन त्यांच्यासमोर होतं.

2022 मध्ये मात्र खादयपदार्थ हा अतिशय मोठा व्यापार आहे. या क्षेत्राची एकूण उलाढाला 4.2 ट्रिलियन रुपये आहेत.

"आजही वेटर्सना चांगला पगार नाही. अपवाद फक्त उच्चभ्रू हॉटेल्सचा आहे. आजही वेटर लोकांना टीप्स आणि सर्व्हिस चार्जमधून पगार दिला जातो," असं संघवी सांगतात.

"वेटरला पगार देणं हे हॉटेलचं काम आहे ग्राहकांचं नाही," ते पुढे म्हणतात.

सर्व्हिस चार्ज ऐच्छिक आहे तो देण्याचं कोणतंही बंधन नाही, असं सरकारनेही सांगितलं आहे.

2017 मध्ये ग्राहक पंचायत विभागाने काही मार्गदर्शक तत्त्वं जारी केली होती. त्यानुसार मेन्यू कार्डवर जितकी किंमत आहे ती किंमत, शासनाने लागू केलेला कर देणं इतकंच ग्राहकांना बंधनकारक आहे. याव्यतिरिक्त कुठलेही पैसे ग्राहकांच्या मर्जीशिवाय उकळणं हे बेकायदेशीर आहे, असं म्हटलं आहे.

असं असलं तरी बहुतांश हॉटेस सर्व्हिस चार्ज घेतातच. म्हणून सरकारने National Restaurant Association of India च्या प्रतिनिधींना एका बैठकीसाठी बोलावलं होतं.

NRAI ला लिहिलेल्या एका पत्रात ग्राहक पंचायतीने काही आक्षेप नोंदवले. ग्राहकांकडून काही तक्रारी येत आहेत आणि अजूनही त्यांना सर्व्हिस चार्ज द्यावा लागत आहे. आधीच पदार्थांचे दर आभाळाला भिडले आहेत आणि सर्व्हिस चार्ज द्यायला ग्राहकांनी नकार दिला तर त्यांचा छळ होतो, असं त्यांनी नमूद केलं आहे.

NRAI मध्ये पाच लाख पेक्षा अधिक हॉटेल्सचा समावेश आहे. त्यांनी हा आरोप फेटाळला. त्यांच्या मते ग्राहकांना याची आधीच कल्पना दिलेली असते. मेन्यू कार्डवर आणि हॉटेलमध्ये विविध ठिकाणी लिहिलेलं असतं. त्यामुळे ही हॉटेल आणि ग्राहकांमधली सहमती असते. त्यात काहीही बेकायदेशीर नसतं.

जे ग्राहक सर्व्हिसने समाधानी नाहीत त्यांनी तो न देण्याचीही मुभा आहे.

"जर ग्राहक नाखुश असतील तर चांगले रेस्टॉरंट तो चार्ज तातडीने काढून टाकतात. त्याबद्दल कोणतेही प्रश्न विचारले जात नाहीत," असं सौरभ खानिजो म्हणाले. ते कायलिन नावाच्या एका हॉटेलचे मालक आहेत.

"जर ग्राहक आनंदी नसेल तर आम्ही त्या पदार्थाचेही पैसे घेत नाही. याचा आम्हालाच फायदा होतो. जर मी ग्राहकांना चांगलं वागवलं तर तेही तसंच वागतील," ते पुढे म्हणाले.

मात्र सर्व्हिस चार्ज द्यायला नकार देणं इतकंही सोपं नाही. काही लोक अगदी कोर्टातही गेले आहेत आणि काहींना नुकसानभरपाईसुद्धा मिळाली आहे.

एलिस म्हणतात तिच्यासारख्या अनेक ग्राहकांना आमचं बिल कमी करा हे सांगतानाही ओशाळल्यासारखं होत असेल.

टीप देणं थांबवायला हवं असा युक्तीवाद वीर संघवी गेल्या अनेक वर्षांपासून करत आहेत.

त्यांच्या मते फक्त वेटरच नाही तर एखादा पदार्थ चविष्ट होण्यासाठी अनेक हात लागलेले असतात. अनेकदा ग्राहकांना किती टीप द्यावी याचा अंदाज नसतो त्यामुळे ते गोंधळून जातात.

विमानात चांगली सेवा दिली म्हणून एअर होस्टेसला टीप देत नाही तर हॉटेलमध्ये टीप का द्यावी असा प्रश्न ते विचारतात.

सर्व्हिस चार्ज हा फक्त कागदावर चांगला असतो, असं संघवी यांचं मत आहे. कारण रेस्टॉरंट चालवणारे लोक सगळाच पैसा वेटरला देत नाहीत. काही वस्तू फुटल्या किंवा इतर काही गोष्टींची नुकसानभरपाई म्हणून ते वेटरकडूनच घेतात. हा जगभरात काळजीचा विषय आहे. असं संघवी म्हणतात.

"खरंतर मी नेहमी असं म्हणतो की पदार्थाचे दर वाढवा आणि तुमच्या कामगारांना चांगला पगार द्या. जर तुम्ही पाच टक्क्यांनी पदार्थांची किंमत वाढवली तर नुकसानभरपाईचा पैसा निघेल आणि इतका दर वाढवल्याने ग्राहक काही दूर जात नाहीत."

मात्र वाईट सर्व्हिसने ग्राहक नक्कीच दुरावतील असं निकोल रुथ एलिस म्हणतात.

"खाणं मला खूप आवडतं त्यामुळे चांगल्या सेवेवर माझा भर आहे. विशेषत: महागड्या हॉटेलमध्ये. एखादा वेटर चांगला वागला नाही तर मला असं वाटतं की मी सर्व्हिस चार्ज दिला नाही म्हणून तो असा वागतोय. त्यामुळे हा चार्ज निघून जावा आणि चांगली सेवा असेल तर सर्व्हिस चार्ज द्यायला मला आवडेल." त्या पुढे म्हणतात.

गुरुवारी (2 जून) ला झालेल्या बैठकीत सर्व्हिस चार्ज घेणं बेकायदेशीर आहे आणि रेस्टॉरंटने असे पैसे घेऊ नये यासाठी शासन कडक नियमावली आणणार आहे असं ठरलं आहे. सर्व्हिस चार्जमुळे ग्राहकांना त्रास होतो, असंही सरकारने म्हटलं आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)