You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
गोव्यात पर्यटकांना डांबून ठेवून अर्धनग्नावस्थेतील व्हीडिओ शूट करणाऱ्या टोळक्याला अटक
- Author, स्वाती पाटील
- Role, बीबीसी मराठीसाठी
कोल्हापूर जिल्ह्यातील गोवा पर्यटनासाठी आलेल्या तरुणांना एका टोळीने डांबून ठेवले, त्यांना मारहाण केली आणि त्यांचे व्हीडिओ बनवले. नंतर त्यांना ब्लॅकमेल करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गोवा पोलिसांनी या टोळक्याला बेड्या ठोकल्या आहेत.
या मुलांचे अर्धनग्न व्हिडिओ बनवून ब्लॅकमेल करत जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. असे देखील पोलिसांनी सांगितले. भेदरलेल्या मुलांच्या पोलीस तक्रारीनंतर तीन तरुणांना पोलिसांनी अटक केली आहे. या टोळीतील इतर आरोपींचा शोध सुरू आहे.
घाबरलेल्या पिडीत मुलांनी अखेर म्हापसा पोलीसांकडे अज्ञातांविरोधात तक्रार दाखल केली. तसंच चंदगड पोलीस ठाण्यात पोलीस संरक्षण मिळावे अशा मागणीचे निवेदन दिले आहे. या प्रकरणी पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे.
नेमकं काय घडलं?
कोल्हापूर जिल्हातील चंदगड तालुक्यातील अकरा तरुणांचा ग्रूप गोव्याला फिरण्यासाठी गेला होता. गोव्याहून घरी परतत असताना या मुलांसोबत धक्कादायक प्रकार घडला.
या मुलांकडून पैसे, मोबाईल आणि दागिने काढून घेत लुटण्याचा प्रकार समोर आला आहे.
घरी परतत असताना बोंदगेश्वर देवस्थानजवळ काही अज्ञातांनी या मुलांची गाडी थांबवली. स्वस्त जेवण देतो असं सांगून या मुलांना निर्जनस्थळी नेण्यात आले. तिथं एका हॉटेलमध्ये या मुलांना कोंडून ठेवण्यात आले. त्यानंतर या मुलांजवळचे पैसे, अंगठ्या, गळ्यातील चैन असा ऐवज मोबाईल असं सगळं या टोळक्याने काढून घेतलं.
गंभीर बाब म्हणजे या मुलांजवळचे मौल्यवान वस्तू घेऊनही घरातून ऑनलाईन पैसे मागवण्यासाठी दबाव आणला. या मुलांना लाथा बुक्क्यांनी जबर मारहाण करत कोंडून ठेवण्यात आले. हे टोळकं इतक्यावरच थांबले नाही. काही मुलींसोबत या तरुणांचे नग्न विडिओ करण्यात आले. हे विडिओ व्हायरल करण्याची धमकी देत या मुलांना ब्लॅकमेल करण्यात आले.
झाल्या प्रकाराची कुठेही वाच्यता करू नका अशी धमकी देत या अज्ञातांनी मुलांचे व्हिडिओ व्हायरल करण्याची तसंच जीवे मारण्याची धमकी दिली. तब्बल तीन तास हा थरार सुरू होता.
या मुलांनी कशीबशी या टोळीच्या तावडीतून सुटका करुन घेत घर गाठलं. गावी परतल्यानंतरही मानसिक धक्का बसलेल्या, घाबरलेल्या तरुणांनी या बाबत कुणालाही सांगितलं नाही.
मात्र सामाजिक कार्यकर्ते संतोष मळवीकर यांना याबाबत माहिती मिळाल्यानंतर हे गंभीर प्रकरण उघडकीस आले. मळवीकर यांनी मुलांच्या नातेवाईकांना विश्वासात घेत पोलिसात तक्रार करण्यासाठी पुढाकार घेतला. या गंभीर प्रकाराची रविवारी म्हापसा पोलीसात तक्रार देण्यात आली.
आरोपी हे स्थानिक नाहीत
प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत म्हापसा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रुपेश नाईक यांनी कसून तपास करत आरोपींना अटक केली आहे. इतर आरोपींचा देखील शोध सुरू आहे.
अटक केलेले आरोपी हे गोव्यातील स्थानिक नसून बाहेरून गोव्यात आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. सचिन भारद्वाज, आशिष सिंग हे दोघे हरियाणा चे तर मुबारक मुल्ला हा तामिळनाडू चा असल्याची माहिती आहे.
दरम्यान, असे प्रकार रोखण्यासाठी कठोर कारवाईची मागणी मळवीकर यांनी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याकडे केली आहे.
या सगळ्या प्रकारानंतर लुटालुटीच्या भीतीने अनेकांनी काळजी व्यक्त केली आहे. मात्र फिरायला गेल्यानंतर सतर्क राहण्याची नितांत गरज या निमित्ताने निर्माण झाली आहे. अनोळखी लोकांच्या कोणत्याही बतावणीला भूलू नये. तसंच कोणत्याही आमिषाला सहज बळी पडू नये हे ही सर्वांनी लक्षात घ्यायला हवे, असे पोलिसांनी सांगितले.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)