6 मुलांना विहिरीत ढकलून आईने आत्महत्येचा प्रयत्न का केला?

रूनाने आत्महत्येचा प्रयत्न केलेली विहीर

रायगड जिल्ह्यातील महाडमध्ये 30 वर्षीय महिलेने पोटच्या 6 लहान मुलांना विहीरीत ढकलून दिलं. त्यानंतर स्वत: विहिरीत उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला.

या धक्कादायक घटनेत महिलेचा जीव वाचवण्यात स्थानिक गावकऱ्यांना यश आलंय. मात्र, सहा कोवळ्या जीवांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. रायगड पोलिसांनी या आईवर मुलांच्या हत्येचा गुन्हा दाखल करून तिला अटक केलीये. तर, तिच्या पतीलाही पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलंय.

रायगडचे पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांनी बीबीसी मराठीला दिलेल्या माहितीनुसार, "पतीसोबत भांडण झाल्याने या महिलेने पोटच्या 6 लहान मुलांना विहीरीत ढकलून दिलं. त्यानंतर स्वत: आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला."

मृत मुलांमध्ये पाच मुली आणि एक मुलगा आहे. सर्वात लहान मुलाचं वय दीड वर्ष तर, मोठ्या मुलीचं वय 10 वर्ष असल्याची माहिती आहे.

केव्हा आणि कुठे घडली घटना?

ही हृदयद्रावक घटना सोमवारी (30 मे) संध्याकाळी महाड तालुक्यातील ढाकलाठी गावात घडली.

उत्तरप्रदेशच्या गोरखपूरमधून मजूरी आणि कामासाठी महाडमध्ये आलेला 33 वर्षांचा चिखरू सहानी, पत्नी रूना (30) आणि सहा मुलांसह शेलटोली गावात गेल्या महिनाभरापासून राहात होता. सहानी कुटुंब मोलमजुरी करून घर चालवत होतं.

रायगडचे पोलीस अधीक्षक अशोक दुधे बीबीसी मराठीशी बोलताना सांगतात, "या महिलेचं तिच्या पतीसोबत भांडण झालं होतं. त्यामुळे पती कामावर गेल्यानंतर सहा मुलांसह ती घराबाहेर पडली." सहनी कुटुंब रहात असलेलं शेलटोली गाव रुनाने आत्महत्या केलेल्या ढालकाठी गावापासून 3-4 किलोमीटर अंतरावर आहे.

रुनाने ढालकाठी गावात शेतात असलेली विहीर गाठली.

संध्याकाळच्या सुमारास स्थानिक आदिवासी ग्रामस्थांनी रुनाला विहीरीत उडी मारताना पाहिलं. त्यांनी तात्काळ विहिरीकडे धाव घेतली. तिला बाहेर काढलं आणि रुग्णालयात दाखल केलं.

"मी माझ्या सहा लहान मुलांना विहिरीत ढकलून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला," या महिलेचे शब्द ऐकून स्थानिकांनाही धक्का बसला.

घटनास्थळी पोहोचलेले पोलीस, स्थानिक रहिवाशांनी मिळून शोधमोहीम सुरू केली. रात्री 10 च्या सुमारास विहिरीतून सहा लहान मुलांना बाहेर काढण्यात आलं. पण, तोपर्यंत खूप उशीर झाला होता. पाण्यात बुडाल्यामुळे सहा जीवांचा मृत्यू झाला होता.

आईवर हत्येचा गुन्हा दाखल

रूनावर पोलिसांनी सहा मुलांच्या हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर महाड पोलिसांनी रुनाला अटक केली आहे.

पोलीस अधीक्षक पुढे माहिती देताना म्हणाले, "या महिलेला अटक करण्यात आलीये. तिच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. तिला कोर्टासमोर हजर करण्यात येईल."

पोलीस अधिकारी सांगतात, ही महिला सद्यस्थितीत काहीही बोलण्याच्या मनस्थितीत नाही.

पोलिसांच्या माहितीनुसार, नवरा सारखा दारू पिऊन येत होता. चारित्र्यावर संशय घेत होता. नवऱ्याकडून होणाऱ्या सारख्या मारहाणीला कंटाळून या महिलेने आत्महत्येचा प्रय्तन केला.

अशोक दुधे पुढे म्हणाले, "या महिलेने पहिल्यांदा मुलांना विहीरीत ढकलून दिलं. त्यानंतर तिने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला."

या प्रकरणाच्या चौकशीसाठी पोलिसांनी तीन अधिकाऱ्यांची टीम नियुक्त केली आहे.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)